धुंडिराज गोविंद फाळके © मुकुंद कुलकर्णी
भारतातला सर्वात मोठा उद्योग म्हणजे चित्रपट निर्मितीचा उद्योग . चित्रपट निर्मिती करणारे भारतातील पहिले निर्माते दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाते . भारतीय चित्रपट उद्योगाची मुहुर्तमेढ रोवली गेली इ.स.1913 साली ‘ राजा हरिश्चंद्र ‘ या दादासाहेबांच्या पहिल्या मूकपटापासून .
इ.स.1937 पर्यंतच्या आपल्या 31 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 95 चित्रपट व 26 लघु चित्रपटांची निर्मिती केली . त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो .
इ.स.1911 मध्ये येशूच्या जन्मावर आधारित ‘ लाईफ ऑफ ख्राईस्ट ‘ या चित्रपटापासून प्रेरणा घेत भारतातही चित्रपट बनवण्याचा त्यांनी निश्चय केला . चित्रपट विषयक तांत्रिक ज्ञान मिळविण्यासाठी ते लंडनला गेले . तिथून त्यांनी कॅमेरा , कच्ची फिल्म सारखे साहित्य खरेदी केले , आणि दि.1 एप्रिल 1912 रोजी ‘ फाळके फिल्म्स ‘ ची स्थापना केली .

‘ राजा हरिश्चंद्र ‘ यांच्यावर आधारित मूकपटाची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य दादासाहेबांनी यशस्वीरित्या पेललं खऱ्या अर्थानं हे सिनेसृष्टीत पडलेलं पहिलं पाऊल होतं . ‘ राजा हरिश्चंद्र ‘ या मूकपटाचं लेखन , संवाद , दिग्दर्शन हे ‘ दादासाहेब फाळक्यांचच होतं . या पहिल्याच चित्रपटातने अनेक विक्रम प्रस्थापित केले .


