बाजरीचे सूप
थंडी पडायला लागली की कपाटातले स्वेटर बाहेर निघतात. शेकोटीवर शेकणं सुरु होतं. शरीर गरम ठेवण्यासाठी ऊबदार पर्याय शोधायची खटखट आपली सुरु असते. पण थंडीच्या काळात शरीर केवळ बाहेरुन गरम करुन चालत नाही तर शरीराला आतूनही उब मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच थंडीत उबदार , गरम प्रकृतीचे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. या पदार्थांनी थंडीमुळे आरोग्य तर राखलं जातंच पण वजनही वाढतं. पण वजन वाढू न देता थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासोबतच आरोग्यास विविध फायदे देणारं बाजरीच्या पिठाचं सूप पिणं हे लाभदायक असतं. पूर्वीच्या काळी बाजरीचा घाटा केला जायचा. अजूनही ग्रामीण भागात हा घाटा आवडीनं नाश्त्याला पिला जातो. बाजरीचं सूपही बाजरीच्या घाटयाइतकंच पोषक असतं.
बाजरीचं सूप जितकं पौष्टिक आणि चवदार आहे तितकंच ते बनवायला खूप सोपं आणि झटपट होणारं आहे.
२ चमचे बाजरीचं पीठ, अर्धा कप दही, १ कांदा बारीक चिरलेला, १ चमचा आल्याची पेस्ट, ४ लसूण पाकळ्यांची पेस्ट, कढीपत्ता १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिमूटभर मिरेपूड, एक चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, थोडी हळद,. १ चमचा जिरे, एक ते दिड चमचा तूप किंवा बटर आणि २ वाट्या पाणी एवढं जिन्नस घ्यावं.
सर्वात आधी कढईत थोडं तूप किंवा बटर ( शक्यतो साजूक तूपच घ्यावं) घालून बाजरीचं पीठ खमंग भाजून घ्यावं. मग ते एका भांड्यात काढावं. एका भांड्यात दही घेऊन त्यात पाणी घालून ते फेटून घ्यावं. बाजरीचं पीठ गार झाल्यावर दह्यात मिसळून घ्यावं. गुठळी राहू नये इतपत ते नीट मिसळावं. कढईत पुन्हा थोडं तूप घालून जिरे, कढीपत्ता, हळद, हिंग घालावं. ते चांगलं परतून घ्यावं. मिरचीचे तुकडे घालावेत. नंतर कांदा परतून घ्यावा. कांदा परतला गेला की आल्याची, लसणाची पेस्ट घालून ती परतून घ्यावी. नंतर दही बाजरीच मिश्रण त्यात घालावं. मंद आचेवर त्याला चांगल्या दोन तीन उकळ्या फुटू द्याव्यात. चवीनुसार मीठ घालून सूप चांगलं हलवावं. पुन्हा दोन तीन उकळ्या काढून गॅस बंद करावा. हे सूप गरम गरम प्यावं.


