Whatsapp व्हायरल – “बाईचा न दिसणारा संसार ‘कॅलेंडर’…”
“बाईचा न दिसणारा संसार ‘कॅलेंडर’…”
आईनं रबरबॅन्डमध्ये रोल केललं कॅलेंडर कपाटातून बाहेर काढलं… देवासमोर ठेऊन त्याला हळद कुंकू वाहत नमस्कार केला आणि दरवर्षीप्रमाणं ते फ्रिजजवळच्या भिंतीवर लटकवलं. आई दरवर्षी हे असं करते… मनात प्रश्न आला…काय आहे या साध्या बारा कागदांमध्ये… म्हणून गेल्या वर्षीचं कॅलेंडर चाळत बसलो…
आईनं गॅस सिलेंडर लावलेली तारीख, बाबांच्या पगाराची तारीख,, किराणा भरल्याची तारीख व पैसे, दादाची परिक्षा, बचत गटात पैसे भरलेली तारीख, बिशी, दूध, पेपर व लाईट बिल भरल्याची तारीख, ईएमआयची तारीख, घरकाम करणा-या ताईंचे खाडे यासारख्या ब-याच गोष्टींच्या नोंदी होत्या या कॅलेंडरमध्ये… अगदी मावशीच्या मुलाच्या लग्नतारखेपर्यंत…
डिजीटल कॅलेक्युलेटर जरी आकडेमोड करत असलं तरी महिनाभराचं आर्थिक नियोजन याच कागदी कॅलेंडरवर उमटत असतं. गरोदर महिलेच्या चेकींगची तारीख, नंतर तिच्या बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवल्याची तारीख ते अगदी बाळंतीण झाल्याचा दिवसही या कॅलेंडरमध्ये लिहून ठेवला जातो…
दहावी बारावी बोर्डाचं टाईमटेबल शाळेतून मिळाल्यावर ते घरी आल्या आल्या या कॅलेंडरवर नोंदवण्याची आमच्यात प्रथा असे… अगदी शाळेत दांडी ज्या दिवशी मारली ती तारीख ते लायब्ररीतून घेतलेलं पुस्तक परत करण्याची तारीख याची नोंद आर्वजून या कॅलेंडरवर व्हायची. सहकुटूंब बाहेर फिरायला जायचं म्हंटलं तरी बिचा-या या कॅलेंडरला एक तास चर्चा ऐकावी लागे…
काही घरांमध्ये आजी आजोबांच्या औषधाच्या वेळाही कॅलेंडरवर पाहायला मिळतात. गंमत म्हणजे नवं कॅलेंडर आल्यावर घरातल्यांचे वाढदिवस कोणत्या वारी आलेत, हे पाहण्याचा एक जणू इव्हेंटच असतो. श्रावण, मार्गशीर्षातले उपवास यांचं एक वेगळंच स्थान या कॅलेंडरवर असतं. का कुणास ठाऊक पण संकष्टी चतुर्थी, आषाढी एकादशी, गणेशोत्सव, रक्षाबंधन, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, होळी, संक्रांत यासारखे दिवस व सण कॅलेंडरमध्ये एकदा पाहूनही मन भरत नाही, ते पुन्हा पुन्हा पाहण्यात एक वेगळंच समाधान वाटतं.
हातात स्मार्टफोन, एक चांगली डायरी घरी असूनही गृहिणी अशा कॅलेंडरवर का लिहीत असतील बरं…कॅलेंडरचं निरीक्षण केल्यावर उत्तर मिळतं… डोळ्यांसमोर राहणारं शाश्वत असतं म्हणतात, तसंच काही गोष्टी परंपरागत आहेत… गृहिणी घरात ज्या ठिकाणी जास्त असते त्या स्वयंपाकगृहातच अधिककरून हे कॅलेंडर लावलं जातं. याच कॅलेंडरकडं पाहत एकीकडे बाईच्या मनात आठवड्याभराचं सारीपाट मांडणं सुरु असतं आणि दुसरीकडे तितकाच चोख स्वयंपाक सुरु असतो… या दोन्हीमध्ये गल्लत मुळीच होत नाही…
या कॅलेंडरकडे पाहिल्यावर असं वाटतं घरातल्या प्रत्येकाच्या सुख दुःखाची, चांगल्या वाईट परिस्थीतीची नोंद घेण्याची जबाबदारीच जणू या कॅलेंडरनं आपल्याकडे घेतलीये. कदाचित काही महिलांना या कॅलेंडरकडे पाहिल्यावर काहीसा आधारही वाटत असेल… इवल्याशा हुकवर वर्षभर लटकणारं हे कॅलेंडर पाहिल्यावर कदाचित अनेकांना बळही मिळत असेल…
इतक्यात आतून आईचा आवाज आला, “कॅलेंडर टाकून नको रे देऊ ते…इतक्यात नसतं टाकायचं…” मला हसू आलं…पण खऱं सागू… ज्या कॅलेंडवर वर्षभराच्या सुख दुःखाच्या, प्रत्येक घटनेच्या नोंदी झाल्या त्या कॅलेंडरविषयी आईच्या मनात हा जिव्हाळा निर्माण होणं स्वाभाविक आहे…
२०२० चं कॅलेंडर पुन्हा रोल करून त्याला रबरबॅन्ड लावलं. त्यावेळी जाणीव झाली आपल्या हातात आहेत, ते फक्त साधे बारा कागद नव्हे, तर बाईचा न दिसणारा संसार आहे…
Source – Whatsapp वरून..


