आठवणीतल्या गौरी
माझ्या आठवणीतल्या गौरी म्हणजे माझ्या माहेरच्या गौरी. माझ्या माहेरच्या गौरी ह्या नाशिक जिह्यातील दिंडोरी
अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. गौरींना आमच्या नाशिकला महालक्ष्मी असे संबोधिले जाते. आमच्या येथे काही घरात उभ्याच्या महालक्ष्मी असतात , काही घरांमध्ये फक्त मुखवटे पाटावर ठेवलेले असतात, तर काही घरांमध्ये खडे किंवा सुपारीच्या महालक्ष्मी असतात.
आमच्या घरी मात्र उभ्याच्या महालक्ष्मी असतात. त्या साच्यांवर ठेवल्या जातात. एका साच्यात गहू व एका साच्यात तांदूळ असतात.साच्यात (पोटात) खडीसाखर व करंजी ठेवली जाते. गौरी आगमनाच्या दिवशी अमृत मुहूर्तावर महालक्ष्मीचे मुखवटे आधी पाटावर ठेवतात. त्यांना पाच सवाष्णींनी औक्षण करायचे नंतर एकीने एक मुखवटा व दुसरीने दुसरा मुखवटा घ्यायचा. डाव्या हातात खण व त्यावर अक्षत घ्यायची त्यावर महालक्ष्मीचे मुखवटे धरायचे. एका ताटात थोडी हळद पातळ करून घ्यायची व दुसऱ्या ताटात थोडे कुंकू पातळ करून घ्यायचे. एकीने उजव्या हाताचा तळवा हळदीत बुडवायचा तर दुसरीने उजव्या हाताचा तळवा कुंकवात बुडवायचा. तुळशी पासून दोघींनी हळद कुंकवाचे हाताचे ठसे मारत घंटानाद ,टाळनाद करत उमऱ्याजवळ यायचे, उमऱ्यावर गव्हाचे माप ठेवायचे.
हळदीने हात बुडवलेली असतेती ज्येष्ठा आणि कुंकवाने हात बुडवलेली असते ती धाकटी कनिष्ठा. दोघींनी मिळून मुखवट्याच्या हाताने गव्हाचे माप ओलांडायचे.माप ओलांडल्यानंतर आधी ज्येष्ठा आत येते व कनिष्ठा उंबऱ्याच्या बाहेरूनच म्हणते कि “ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली” ज्येष्ठेने म्हणायचे”आली तशी येउद्या सोनपावली होऊद्या “. त्यांना चूल ( स्वयंपाक घर) भानोसे ,न्हाणीघर दाखवायचे. नंतर जेथे साचे ठेवले आहेत त्या साच्यांवर अक्षता टाकून मुखवटे ठेवायचे. नंतर त्या साच्यांना साडी चोळी नेसवून भरपुर अलंकार घालून सजवायचे. त्या दोघींच्या मध्ये एक बाळ ठेवायचे माझ्या माहेरी पूर्वीचा एक आठवा आहे (आठवा म्हणजे डमरूच्या आकारचे धान्य मोजण्याचे माप )त्यावर नारळ ठेवायचा व त्यालाबाळाचे आंगडंटोपडं घालायचे आणि सजवायचे. मग तिन्ही बाजूंनी गव्हाचा चौक भरायचा.
महालक्ष्मीपुढे आपल्याला हवी ती आरास करायची. धान्याच्या राशी ठेवायच्या एक तांदळाची रास असते तर एक गव्हाची रास असते. नारळ सुपारी ठेवायची व तांब्या भांडे भरून ठेवायचे.पानाचा विडा ठेवायचा .. दिवाळीचे जे गोड पदार्थ असतात जसे लाडू, करंज्या, अनारसे, साटोऱ्या हे पदार्थ महालक्ष्मी समोर ठेवायचे . पंचोपचारी पूजा करायची महालक्ष्मीलाकर्दळीची फुले वाहायची कर्दळीची फुले महत्वाची. दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा.

यात १६ ला खूप महत्व आहे. दोन सवाष्णींना जेवायला बोलवायचे एक सोवळ्याची व एक ओवळ्याची. त्यांची खणा नारळाने ओटी भरायची त्यांना भेट वस्तू द्यायची . माहेरवाशिणीला जेवायला बोलवायचे ,तिचीही खणा नारळाने ओटी भरायची तिला भेट वस्तू द्यायची.
संध्याकाळी सगळ्यांना बोलावून हळदी कुंकू करायचे. पाहुण्यांना खिरापत लाडू चिवडा द्यायचा. रात्री जागरण करायचे विविध खेळ खेळायचे.
तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी षोडोपचाराने पूजा करावी. व दही भाताचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीवर अक्षत टाकावी म्हणजेच विसर्जन झाले . महालक्ष्मीचे तातू घरातील लक्ष्मीने गळ्यात १६ दिवस ठेवायचे नंतर पाण्यात सोडून द्यायचे.


