आता Whatsapp चेही ‘अवतार’
समाजमाध्यमांवर स्वतःचा फोटो देण्याऐवजी ‘अवतार’ (स्वतःच्या चेहेऱ्यामोहऱ्याशी जुळणारे चित्र अथवा अन्य कोणत्याही हावभावातील चित्र असे आपण म्हणू या ) देण्याची सुविधा इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर या तीनही प्लॅटफॉर्मवर होतीच. आजपासून Whatsapp वरही ही सेवा उपलब्ध होत आहे. Whatsapp ने ३६ विविध भावभावना अथवा कृती दर्शविणारे ३डी अवतार वापरकर्त्यांसाठी आणले आहेत. स्वतःचा चेहेरा लपविणे व त्यायोगे सुरक्षितता मिळविणे हा हेतू त्यामुळे साध्य होणार असला तरी सगळ्यांचे एकसारखे ‘अवतार’ झाले तर माणसे ओळखायची कशी हा प्रश्नच आहे. अशामुळे कोणाचीही फसगत होऊ नये म्हणजे झाले. Whatsapp ने आणलेले अवतार हे स्नॅपचॅटचे बिटमोजी आणि apple चे मेमोजी यांच्यासारखे दिसतात अशी चर्चा आहे. ते वापरल्यावरच कळेल.
Whatsapp च्या settings मध्ये जाऊन हे अवतार तयार करता येतील. शिवाय आपण जेथे Profile फोटो वापरतो, तेथेही Use Avatar असा पर्याय दिसेल. लवकरच या अवतारामागची प्रकाशयोजना, शेडींग आणि केशरचनेत वैविध्य जाणारे अवतारही उपलब्ध करून देऊ असे Whatsapp ने म्हटले आहे. मात्र एक लक्षात ठेवा. तुम्ही Whatsapp वर तयार केलेले अवतार फक्त Whatsapp वरच वापरू शकाल.
काही दिवसांपूर्वी Whatsapp ने आयफोन वापरणाऱ्या लोकांसाठी picture-in-picture (PiP) सुविधा आणण्याचे जाहीर केले आहे. म्हणजे व्हिडिओ कॉल चालू असतानाही फोनवरची दुसरी अँप तुम्ही वापरू शकाल. मात्र साध्य ही सोय बीटा version वापरणाऱ्या काही निवडक लोकांनाच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कालांतराने अर्थात ती सगळ्यांना वापरता येईल.
©अशोक पानवलकर
लेखक श्री.अशोक पानवलकर यांच्याविषयी :
पत्रकार. १९८२ मध्ये काही काळ ‘समाचार भारती’ आणि नंतर जून २०२० पर्यंत ‘महाराष्ट्र टाइम्स’ असा पत्रकारितेचा प्रवास आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून कार्यकारी संपादक म्हणून निवृत्त. ‘नेटभेट’, ‘जगाच्या पाठीवर’ अशा सदरांचे लेखन. ‘नेटभेट’ नावानेच पुस्तक प्रकाशित. त्यांचे टेक्नोलॉजी विषयीचे इतर लिखाण त्यांच्या www.ashokpanvalkar.com या वेबसाईटवरही आपणास वाचता येईल.

