आले Whatsapp समुदाय, १०२४ जणांचा ग्रुप आणि ३२ जणांचा व्हिडिओ कॉल !

भारतासह जगभरात इंटरनेट आल्यापासून एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी विविध साधने उपलब्ध होत आली आहेत. इमेल हे त्यातील एक. परंतु गेल्या दशकभरात विविध समाजमाध्यमानी वापरकर्त्यांच्या मनावर ताबा मिळवला आणि आपण १५ वर्षांपूर्वी या समाजमाध्यमांशिवाय कसे जगत होतो असा प्रश्न पडला. (खरे म्हणजे आनंदात जगत होतो) . WhatsApp आल्यापासून आणखी चित्र बदलले. आज भारतात जवळपास ५२ कोटी लोक WhatsApp नियमित वापरतात. जगभरात हा आकडा जवळपास दोन अब्ज इतका आहे. (माहितीसाठी – फेसबुक १.३ अब्ज लोक वापरतात) .आपला वापर वाढता राहावा म्हणून WhatsApp सतत सुधारणा करत असते, नवनवीन सोयी ग्राहकांना देत असते. दि. १४ एप्रिल २०२२ रोजी WhatsApp ने नवीन घोषणा केली होती. ही सोय होती Community ची. आज जवळपास सात महिन्यांनंतर ती प्रत्यक्षात येत आहे.

WhatsApp ग्रुप चे admin या community म्हणजे समुदाय तयार करू शकतील. सध्या २५६ वापरकर्त्यांचा एक ग्रुप बनू शकतो. नंतर हा आकडा ५१२ करण्यात आला. आज तर हा आकडा १०२४ करण्यात आला. असे अनेक ग्रुप एकत्र केले की समुदाय तयार करता येईल. समुदाय तयार करण्यासाठी नवीन ग्रुप admin तयार करू शकतील अथवा सध्याचे ग्रुप एकत्र करू शकतील. समुदाय adminना समुदायातील ग्रुप काढून टाकण्याचा अथवा समुदायातील वैयक्तिक सदस्यांना पूर्णपणे काढून टाकण्याचा अधिकार असेल. समुदायात चुकीच्या अथवा समाजविघातक, आक्षेपार्ह पोस्ट केल्या तर त्यांना समुदायातून काढून टाकण्याचा अधिकार admin ना असेल. या समुदायात सामील व्हायचे की नाही हे वापरकर्ता ठरवू शकतो.

एखाद्या chat बद्दल आक्षेप असला तर तो तशी तक्रारही करू शकेल. समुदाय सोडायचा असेल तर कोणीही सोडू शकतो. इतरांना पत्ता लागू न देता, असे WhatsApp ने एप्रिलच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ते सारे आजपासून सर्व जणांना उपलब्ध होणार आहे. या Update साठी काही तास थांबावे लागेल. कारण सगळ्यांचे WhatsApp
एकाच वेळी Update होत नसते. ग्रुपमधील सदस्यांना नवीन समुदाय शोधायचे असतील तर तशी सोय सध्या उपलब्ध नसेल. ही बाब काही जणांना अडचणीची वाटू शकेल.

महत्वाचे म्हणजे समुदायातील सर्व सदस्यांना केवळ Admin मेसेज पाठवू शकतील. सध्या ग्रुपमध्ये एकापेक्षा जास्त लोकांना Admin करण्याची सोय आहे. तशी समुदायातही असेल का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. आधीच फॉरवर्ड केलेले मेसेज एकावेळी पाचऐवजी एका ग्रुपला फॉरवर्ड केले जाऊ शकतात असा नवा नियमही Whatsapp ने केला आहे. असे असले तर लोक कदाचित ब्रॉडकास्ट लिस्टचा वापर जास्त करतील असे वाटते. ग्रुपमधील २५६ सदस्यांची मर्यादा वाढवून ५००वर नेल्यास कदाचित हा प्रश्न सुटू शकतो, असे मी मागे म्हटले होते. काही काळातच हा आकडा ५१२ आणि आता १०२४ करण्यात आला आहे. खरे म्हणजे एका ग्रुपमध्ये ५१२ ही पुरेशी सदस्य संघ्या होती. तुम्हाला समुदायात समाविष्ट केले गेले तर तुमचा फोन नंबर तुमच्या ग्रुपच्या बाहेरच्या सदस्यांना (म्हणजे तुम्ही ज्या ग्रुपमध्ये नाही त्या सदस्यांना) दिसणार नाही. ही चांगली सोय आहे असे मला वाटते.

समुदायाचे काही फायदे जरूर होतील. समजा एखाद्या शाळेचे वेगवेगेळे ग्रुप आहेत. त्या सगळ्यांना एकत्र आणून शाळाप्रमुख सगळ्यांना एकच मेसेज पाठवू शकेल. उत्तम संगीत शेअर करण्यासाठी आज अनेक ग्रुप कार्यरत आहेत, ते एकत्र आणता आले तर संगीतप्रेमींना मोठाच खजिना हाती लागेल. अर्थात या ‘समुदाय’ प्रकरणाचा गैरवापर होणार नाही, ही काळजीही घयावी लागणार आहे. कारण आधी (ब्रॉडकास्ट लिस्ट सोडल्यास ) एक मेसेज एका ग्रुपमध्ये फार तर २५६ लोकांना मिळत होता. आता तो शेकडो जणांना मिळू शकेल. कोणतेही समाजमाध्यम हे दुधारी शस्त्र आहे हे लक्षात ठेवलेले बरे! आता मोठ्या आकाराच्या म्हणजे दोन जीबीपर्यंत फाइल्स पाठवता येतील. आता 5G आल्याने त्या खूप वेगाने पलीकडे पोचतील हे खरे असले, तरी हे सगळे वापरताना आपलं डेटासुद्धा त्याच वेगाने संपेल हे लक्षात घ्या.

आज समुदाय,ग्रुपमध्ये १०२४ सदस्य याबरोबरच तिसरी घोषणा मला जास्त महत्वाची वाटते. ती म्हणजे आता एका वेळेस जास्तीत जास्त ३२ जणांना व्हिडिओ कॉल करता येईल. आतापर्यंत हा आकडा ३२च होता, पण त्यांना फक्त ऑडिओ कॉल करता यायचा. आता व्हिडिओ कॉल होणार असल्याने झूम, स्काईप, गूगल मीट वगैरे धास्तावले असतील यात शंका नाही.

याच आठवड्यात इंस्टाग्राम आणि यु ट्यूब यांनी त्यांच्या सेवेत महत्वाचे बदल केले (त्यासंबंधी मी लिहिनच) आणि ते अधिक लोकांच्या जवळ आले. त्याच वेळेस ट्विटरवर अनेक निर्बंध येत आहेत. आणि त्याच्या वापरासंबंधी खूप शंका आहेत. अशा वेळेस WhatsApp , इंस्टाग्राम आणि यु ट्यूब दोन पावले पुढे टाकत आहेत. ही नव्या बदलाची नांदी आहे का, ते लवकरच लक्षात येईल. !

©अशोक पानवलकर 

लेखक श्री.अशोक पानवलकर यांच्याविषयी : 
पत्रकार. १९८२  मध्ये  काही काळ ‘समाचार भारती’ आणि नंतर जून २०२० पर्यंत ‘महाराष्ट्र टाइम्स’ असा पत्रकारितेचा प्रवास आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून कार्यकारी संपादक म्हणून निवृत्त. ‘नेटभेट’, ‘जगाच्या पाठीवर’ अशा सदरांचे लेखन. ‘नेटभेट’ नावानेच पुस्तक प्रकाशित. त्यांचे टेक्नोलॉजी विषयीचे इतर  लिखाण त्यांच्या  www.ashokpanvalkar.com या वेबसाईटवरही आपणास वाचता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu