नूतन © मुकुंद कुलकर्णी
पन्नास , साठ आणि सत्तरचं दशक आपल्या शालीन सौंदर्याने आणि अभिजात अभिनयाने गाजवणाऱ्या नूतनचा काल जन्मदिवस . ऐन भरात असताना नूतनने रसिकांवर आपले अधिराज्य गाजवले . त्या काळात बोल्ड आणि ब्युटीफुलची परिभाषा होती नूतन . आपल्या शालीन आणि खानदानी सौंदर्याने ओळखली जाणारी नूतन दिल्लीका ठग या सिनेमात स्विम सूटमध्येही बिनधास्त वावरली होती . अर्थात आजच्या बे वॉच स्विम सूटच्या जमान्यात अंगभर बसणाऱ्या त्या स्विम सूट ला स्विम सूट म्हणणं धाडसाचंच ठरेल ! देवसाब बरोबर नूतन ही मला वाटतं हिंदी चित्रपटसृष्टीतील ऑल टाईम ग्रेट रोमॅंटिक जोडी म्हणायला हरकत नसावी . पण या जोडीचे इन मीन चारच चित्रपट निघावेत हे अनाकलनीय . दिलिप कुमार बरोबर लिड रोल करायची तिची इच्छा ही राहूनच गेली . सेटवर सह कलाकारांसोबत अलिप्त वावरणारी नूतन तशी शॉर्ट टेंपर्ड होती . देवी चित्रपटाच्या सेटवर सिने मॅगेझिनमध्ये तिच्या आणि संजीवकुमारच्या अफेअर बद्दल छापून आलेला मजकूर वाचून तिने रागाच्या भरात संजीवकुमारच्या श्रीमुखात भडकावली होती . आई बरोबर झालेल्या मतभेदांमुळे ती कित्येक वर्षे आई बरोबर बोलत नव्हती . मुलगा मोहनीश बरोबर तिचे संबंध जिव्हाळ्याचे होते . मोहनीश आजही तिची आठवण सतावते म्हणून तिचे चित्रपट बघायचं टाळतो . देव आनंद आणि राज कपूर या दोघांसोबत त्याला आईची ऑन स्क्रिन जोडी आवडते . मिस इंडिया असलेली नूतन ही बहुधा पहिलीच मिस इंडिया अभिनेत्री असावी .
चार दशकांच्या दीर्घ चित्रपट कारकीर्दीत नूतनने सुमारे 70 चित्रपटात काम केले . आजही नूतन हिंदी चित्रपट सृष्टीतल्या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींपैकी एक मानली जाते . तेंव्हा पडद्यावर दिसणाऱ्या टिपिकल पारंपारिक नायिकांपेक्षा नूतनने खूपच हटके भूमिका केल्या . तिच्या अनकन्व्हेन्शनल भूमिकांना चित्रपट रसिकांनी , टीकाकारांनी , जाणकारांनी नेहमीच पसंतीची पावती दिली . उत्कृष्ट अभिनेत्रीच्या पाच फिल्म फेअर पुरस्कारांचे नूतनचे रेकॉर्ड त्यानंतर तीस वर्षांनी तिच्या भाचीने , काजोलने इ.स.2011 साली तोडले . जया बच्चनसहित नूतन ही अशी अभीनेत्री आहे की , जिला उत्तम अभिनेत्रीच्या विभागातील सहा फिल्म फेअर पुरस्कार मिळाले . इ.स. 1974 साली भारत सरकारने नूतनला पद्मश्रीने गौरवले .
नूतनची जोडी देव आनंद , राज कपूर बरोबर विशेष शोभून दिसली . विशेषतः देव आनंद बरोबरची तिची रोमँटिक गाणी आजही विलोभनीय वाटतात . तिचे शालीन , लाडिक विभ्रम आजही मोहवून टाकतात .
नूतनचे फिल्मी करियर वयाच्या चौदाव्या वर्षी इ.स.1950 च्या ‘ हमारी बेटी ‘ या चित्रपटापासून सुरू झाले . आई शोभना समर्थ या चित्रपटाची दिग्दर्शिका होती . त्यानंतर इ.स.1951 साली तिचे ‘ नगिना ‘ आणि ‘ हम लोग ‘ हे चित्रपट आले . नगिना हा ॲडल्ट चित्रपट होता . डोअरकीपरने हा चित्रपट पाहण्यासाठी तिला चित्रपट गृहात प्रवेश नाकारला होता . इ.स.1955 साली आलेल्या सीमा या चित्रपटाने नूतनला ओळख व प्रसिद्धी मिळवून दिली . या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला . इ.स.1960 व इ.स.1970 च्या दशकात तिची प्रमुख भूमिका असलेले चित्रपट खूप गाजले . या दरम्यान तिला चार वेळा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला . सुजाता ( इ.स.1959 ) , बंदिनी ( इ.स.1963) , मिलन ( इ.स.1967 ) , मै तुलसी तेरे आँगनकी ( इ.स.1978 ) . याशिवाय अनाडी ( इ.स.1959 ) , छलिया ( इ.स.1960 ) , तेरे घरके सामने ( इ.स.1963 ) , सरस्वतीचंद्र ( इ.स.1968 ) , अनुराग ( इ.स.1972 ) , सौदागर ( इ.स.1973 ) हे तिचे काही गाजलेले चित्रपट . त्यानंतर साजनकी सहेली ( इ.स. 1981 ) , मेरी जंग ( इ.स.1985 ) , नाम ( इ.स.1986 ) अशा काही चित्रपटातून ती आईच्या भूमिकेतही दिसली . मेरी जंग चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला .
नेव्हल लेफ्टनंट कमांडर रजनीश बहल यांच्याशी दि.11 ऑक्टोबर 1959 रोजी नूतनचा विवाह झाला . इ.स.1961 साली तिला मोहनीश हा मुलगा झाला . तोही उत्तम चित्रपट – दूरदर्शन अभिनेता आहे .
आजच्या नायिका झीरो फिगर , सडपातळ दिसण्याचा प्रयत्न करतात . पण , आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरूवातीच्या काळात खूपच सडपातळ आहे म्हणून तिला चित्रपटात भूमिका नाकारण्यात आल्या . इ.स.1955 च्या सीमा चित्रपटात अनाथाश्रमातल्या बंडखोर मुलीच्या भूमिकेमुळे तिच्या अभिनय क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले . सीमा चित्रपटातील तिच्या भूमिकेवर प्रख्यात समीक्षक दिनेश रहेजा लिहितात ” her eyes flashed fire in the intrecately sung manmohana bade jhoote picturised on her ( even singer Lata Mangeshkar was impressed ) characters striken soul was braught to heart breaking life as she faught a moral malestrom while hungrily inching towords a fallen coin . ”

सीमा नंतर देव आनंद बरोबर पेईंग गेस्ट आणि राज कपूर बरोबर अनाडी चित्रपटानी तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचवले . जुलै 2010 मध्ये द हिंदू मधील आपल्या लेखात विजय लोकपल्ली लिहितात ” Dev Anand is the paying guest in this film but , Nutan it is who holds the key , literally , to the success of this romantic comedy . Every times the movie threatens to meander from the planned path , she restores quality with her vibrant presence . The close up shots capture her pristine beauty even as Dev Anand competes to match her acting talents during one – on – one situations . Nutan emerges a winner by miles . ”
बंदिनीमध्ये नूतनने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या खूनी ‘ कल्याणी ‘ चा हटके रोल केला आहे . जेल डॉक्टर धर्मेंद्र आणि पुर्वायुष्यातील अशोककुमार यांच्यामध्ये होणाऱ्या कल्याणीच्या मानसिक अवस्थेचे चित्रण, चित्रपट समीक्षक व चित्रपट रसिकांना खूपच भावले . या चित्रपटासाठी नूतनला नॕशनल ॲवार्ड तसेच फिल्म फेअर ॲवार्ड मिळाले . नूतनच्या चित्रपट कारकीर्दीत नूतनवर पारितोषिकांचा अक्षरशः वर्षाव झाला .
वयाच्या 54 व्या वर्षी दि.21 फेब्रुवारी 1991 रोजी कॕन्सरने नूतनचा दुर्दैवी मृत्यू झाला .
मुकुंद कुलकर्णी ©


