झोप, दिशा अन् वाघोबा

‘अहो, झोपलात काय? उठाSS. अहो, तुमची झोपेची गोळी घ्यायची, आजही विसरलात ना?’ ‘अगं’नी ‘अहों ‘ना हलवून झोपेतून जागं केलं. आरामखुर्चीत शांत झोपलेले ‘अहो’ त्रासिक चेहेरा करून उठले. ‘आण, दे तुझी ती गोळी. जरा डोळा लागलेला बघवत नाही तुला.’ असं काहीसं ते पुटपुटले. पण ‘अगं’नी ते ऐकलं. त्यानंतरचं संभाषण सांगणं गरजेचं नाही. नेहेमीप्रमाणेच ‘अहों’ची माघार, ‘अगं’चा नैतिक का तात्विक विजय. मग झोपेची गोळी घेऊनही ‘अहों’ची रात्रभर तळमळ आणि ‘अगं’ना मात्र शांत झोप. ह्या वाचलेल्या विनोदी प्रसंगावरून असाच आम्ही आमच्या कोकण प्रवासादरम्यान अनुभवलेला, चाळीसएक वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला.

दुपारच्या रणरणत्या उन्हातून ‘यष्टी’ बसने प्रवास करून दिवेलागणीच्या वेळेस आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो. पोहोचल्या पोहोचल्याच छतातून एक विंचू खाली टपकला. ह्या आपत्तीची आम्हाला कल्पना नव्हती. कोकणात साप असतात हे ऐकलं होतं; त्यामुळे कोणाहीकडे गेल्यावर, खाटेवर बसताना पाय वर घेऊन, मांडी घालून बसायची सवय लागली होती. परंतु विंचू छतातून पडतात हे समजल्यावर मनातली भीती एकदम दुप्पट झाली. खाटेवरच्या मांडीबरोबरच डोक्यावर छत्री घेऊन बसावं, अशी एक क्षणिक कल्पना मनात चमकून गेली पण दुसऱ्यांच्या घरात त्यांच्याच खाटेवर असं बसणं प्रशस्त वाटेना. त्यामुळे देवावर आणि दैवावर भरोसा ठेवणे, ह्याशिवाय गत्यंतर नसल्याचं मत झालं. ‘दिवेलागणी’ अगदीच ‘मिणमिणती’ झाली होती. त्या अंधुक प्रकाशात मग विंचू शोधण्याचा आणि मारण्याचा कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला. पाहुणेमंडळी आणि यजमान ह्यांची ओळखही त्यानिमित्ताने झाली. घरमालक आपल्या विंचूदंश घालवण्याच्या मंत्रशक्तीवर लांब उभं राहून अखंड प्रवचन देत होते. स्वतः दूर उभे राहून, मार्गदर्शन करत विंचू मारण्याचं काम त्यांनी आमच्यातीलच एका काकांच्या हस्ते करून घेतलं. ‘पाहुण्याच्या हस्ते साप मारणे’ हा वाक्प्रचार ‘पाहुण्याच्या हस्ते विंचू मारणे’ असा प्रत्यक्ष अनुभवता आला. त्याउपर तो विंचू कोणाला चावला असता तर त्यांच्या मंत्राशक्तीपूढे त्या विंचूदंशाची दाहकता अजिबात टिकली नसती, असा त्यांना विश्वास होता व त्यासाठी ते जेवताना बोलत नसत. अर्थात ह्या दोन्हींमधला परस्पर संबंध समजण्याची कुवत आमच्यात नसल्यामुळे आम्ही मूकपणे त्यांच्या सामर्थ्याला अनुमोदन दिलं. रात्रीच्या जेवणाच्या वेळी, आम्ही त्यांच्या जेवताना न बोलण्याच्या, तोंडाने नुसता ‘हूं हूं’ आवाज काढत, बोटांच्या खुणांनीच पदार्थ पानात वाढायला सांगण्याच्या कृतीचा अनुभव घेतला. एवढया ‘पावरफूल’ घरमालकाच्या सानिध्यात आम्हाला पुढील किमान तीन दिवस घालवायची संधी मिळणार असल्यामुळे विंचूदंशाबद्दलची भीती काहीशी कमी झाली.

रात्रीच्या झोपण्याची पडवीत व्यवस्था केलेली होती. घरमालकांनी स्वतः जातीने सर्व काही ठीक आहे ना, त्याची पाहणी केली. पडवीच्या लाकडी दरवाजास आतून कडी लावल्याची त्यांनी खात्री केली. रात्रीत प्यायला पाणी लागल्यास, तांब्याभांडं  ठेवलेली जागा सांगितली व ते त्यांच्या निजायच्या खोलीत जाण्यासाठी निघाले. सर्वजण अंथरुणावर आडवे झाल्यावर, पडवीच्या मध्यावर लटकत असलेला पंचवीस पावरचा ‘बल्ब’ त्यांनी घालवला. अंधार झाला. असा ‘अंधार’ मी प्रथमच ‘पाहत’ होतो. त्यांनी स्वतःच्या हातातली विजेरी सुरू केली आणि त्या प्रकाशात अंथरुणांच्या मधून वाट काढत दोन पायऱ्या चढून ओटीवर गेले आणि तिथेच थबकले. उलटे फिरले.

त्यांचं घर आणि त्याला लागूनच त्यांच्या चुलत्यांचं घर एकाच आवारात होतं. दोन्ही घरांच्यामध्ये साधारण आठ-दहा फुटांचंच अंतर असावं. दुसऱ्या दिवशी सकाळी नदीवर फिरायला जाण्याचा कार्यक्रम ठरवला असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘सर्वांनी शांत झोपा. उद्या सकाळी लवकर आपल्याला नदीवर जायचं आहे. रात्री काही खुडबुड जाणवल्यास घाबरू नका. तुम्ही मुंबईकर आमच्या कोकणाच्या काळोखाला सरावलेले नाहीत. आमच्या दोन घरांच्या मधून रात्री वाघ नदीवर पाणी प्यायला जातो; पण तुम्ही घाबरू नका. उद्या नदीवर जाताना मी तुम्हाला त्याच्या पाऊलखुणा दाखवीन.’ एवढं बोलून ते निजायला निघून गेले. त्यांच्या बोलण्याने सर्वजण अक्षरशः आडव्या अवस्थेत स्तंभित झाले. धक्का ओसरल्यावर एक-एक जण अंथरुणात उठून बसू लागला. आपल्या एवढया जवळून वाघोबा जाणार ह्या विचाराने सर्वांचीच झोप उडाली. त्या घरमालकांना झोपायला जाता-जाता ही बातमी आम्हाला सांगायची काय गरज होती, ते समजेना. कोकणी स्वभावाचाच तो नमुना म्हणायचा का? मग आमच्या सुरक्षेचा प्रश्न आम्हालाच सोडवायचा असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्या काळोखात परत एकदा कड्या-कोयंड्यांची तपासणी झाली. लाकडी दरवाजा, लाकडी गज, त्यांच्यावरच्या लाकडी तिरप्या पट्टया व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर सर्वजण परत एकदा दैवावर भरोसा ठेऊन आडवे झाले. यजमानांच्या विंचूदंशाच्या मंत्रशक्तीची जरी माहिती समजली असली तरी व्याघ्र हल्ल्यावरचा ‘उतारा’ देखील त्यांच्याकडे असल्याबद्दल मात्र काही समजलं नव्हतं.

त्याही परिस्थितीत, दिवसभराच्या दगदगीने दमल्यामुळे लगेचच सर्वजण, जागृती-निद्रा ह्यांच्या सीमारेषेवर हिंदकळू लागले. अचानक कुठूनतरी कुजबुज ऐकू येऊ लागली. घरमालकांनी उल्लेखलेली ‘खुडबुड’ एव्हढ्या लगेचच अनुभवायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. पण ती ‘खुडबुड’ नसून ‘कुजबुज’ असल्याचं लक्षात आलं. आमच्यातल्या एक मावशी आपल्या यजमानांना जागं करत होत्या. ते तेव्हढ्या वेळेतही गाढ झोपले होते. अंथरुणाला पाठ टेकताक्षणी झोप लागण्याचं वरदान त्यांना लाभलं होतं. आधीचा वाघोबा संबंधीचा ‘एपिसोड’ त्यांना समजलाही नव्हता. त्यातून त्यांना ऐकायला येण्याची थोडी समस्या होती. मावशींनी त्यांना मग हलवायला सुरुवात केली. ते अंथरुणात उठून बसले. त्यांना झोपेतून कशासाठी जागं केलं हे कुणालाच समजेना. मावशींनी मग त्यांना त्या झोपलेल्या जागेवरून आकाश दिसत असल्याचं व त्यामुळे त्यांना झोप लागत नसल्याचं सांगितल्यावर, कुणीतरी ‘झोपताना डोळे उघडे कशाला ठेवायचे?’ असा माफक विनोद देखील केला. मावशी मात्र विनोद वगैरेंच्या पलीकडे गेल्या होत्या. त्यांनी आपलं आणि आपल्या यजमानांचं अंथरूण तिथून उचललं आणि आपला बिस्तरा आतल्या बाजूस ओटीवर पसरला. तिथून आकाश दिसत नसल्याची त्यांनी खात्री केली. जेमतेम पाचंच मिनिटं झाल्यावर, ओटीवरून बडबड व खुडबुड ऐकू येऊ लागली. ओटीवर झोपल्यावर मावशींच्या पायांना बाजूच्या खोलीतील टेबलफॅनचा वारा लागू लागला व त्याने त्यांचे पाय भिरभिरु लागल्याची तक्रार त्या त्यांच्या यजमानांकडे करत होत्या. पण आधीप्रमाणे ते केव्हाच निद्रादेवीच्या अधीन झाले होते. मग त्यांना जागं करण्याचा कार्यक्रम पार पडला. मावशींनी मग दोघांची अंथरुणं, विरुद्ध दिशेला फिरवली; म्हणजे ज्या दिशेला पाय होते तिकडे डोकं आणि डोक्याच्या दिशेला पाय. दोघेही परत आडवे झाले. काका परत झोपी गेले. तेव्हढ्यात मावशींचं दिशाज्ञान जागृत झालं. त्यांच्या लक्षात आलं की आपले पाय ज्या दिशेला आहेत ती दक्षिण दिशा आहे आणि दक्षिणेकडे पाय करून झोपणं निषिद्ध. एकदा डोक्यात हा विचार घुसल्यावर त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी परत काकांना हलवून उठवलं आणि दोघांची अंथरूणं आधीच्या काटकोनात घातली गेली म्हणजे आता पंख्याच्या वाऱ्याने पाय भिरभिरणार नव्हते, पायाकडे दक्षिण दिशाही नव्हती आणि तिथून आकाशही दिसत नव्हतं. दरवेळी मावशी काकांना उठवत असल्याने ते शेवटी वैतागले.त्यानंतर मावशी झोपेपर्यंत ते अंथरुणात बसून राहिले. मावशींना गाढ झोप लागल्यावरच त्यांनी अंथरुणाला पाठ टेकली.

ह्या गडबडीत तास-दीड तास गेला. त्यानंतर आम्ही झोपलेल्या ठिकाणी पंखा नसल्याने, उकडल्याची जाणीव होऊ लागली. अर्धी रात्र तळमळतच गेली. कुणाचे उकडण्याबद्दलचे उसासे तर कुणाचे निषेधात्मक आवाज. त्यामुळे असेल कदाचित पण त्या रात्री वाघोबा आमच्या जवळून नदीवर पाणी प्यायला जाताना काही दिसले नाहीत. मी खरंतर वाघोबांना एव्हढ्या जवळून पाहण्याची संधी सोडणार नव्हतो. ‘जंगल सफारी’ करून वाघोबा पाहण्यासाठी तिथे जाण्यापेक्षा एव्हढ्या जवळून जर वाघ दिसणार असेल, तर ती एक पर्वणीच होती. परंतु आमच्या गडबडीने वाघोबा घाबरले असावेत आणि नदीवर जाण्यासाठी त्यांनी वेगळा मार्ग अवलंबला असावा असा अंदाज मी बांधला.

माझा अंदाज खरा ठरला. आम्हाला वाघोबा घाबरले. सकाळी नदीवर फिरायला गेल्यावर वाघोबांच्या पाऊलखुणा नदीपरिसरात दिसल्या, परंतु त्यांचा माग काढताना, त्यांनी त्यांचा वहिवाटीचा मार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर आपली पदचिन्हं उमटवलेली आम्हाला पाहायला मिळाली.

 

डॉ. मिलिंद न. जोशी 
Email : milindn_joshi@yahoo.com    

 


Think Marathi Podcast : 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu