संस्कृती © सौ. मानसी मंगेश सावर्डेकर.
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुडीपाडवा साजरा केला जातो . चैत्र् शुद्ध पहिल्या दिवसा पासून हिंदूचे नववर्ष आरंभ होते. ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये घरोघरी गुडी उभारून हा सण साजरा करतात. ह्या दिवशी घरासमोर सडा घालून रांगोळी घालतात, देवाची पूजा करून महानैवेद्द करतात. देवाजवळ नवीन वर्ष सुख, समृद्धीचे, चांगले आरोग्याचे जावे म्हणून प्रार्थना करतात. गुडी उभारतांना काठीला वरच्या बाजूला रेशमी वस्त्र, कडू लिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार व साखरेची गुडी बांधून वरती चांदीचा किवा तांब्याचा कलश लावावा. कलशा वरती कुंकू ओले करून स्वस्तिक काढावे. व गुडी दरवाजाच्या बाजूला लावावी. ती जागा स्वच्छ धुवून घ्यावी त्यावर रांगोळी काढावी मग वरती गुडी बांधावी. गुडीला गंध, अक्षदा, फुले वाहून पूजा करावी व आरती करावी व नेवेद्य म्हणून दुध-साखर अथवा पेढा ठेवावा. दुपारी गोडाचा नेवेद्य दाखवावा.
अक्षय तृतीये पर्यंत कोणत्याही एका दिवशी हळदीकुंकू समारंभ करायचा. त्या दिवशी सगळ्यांना भिजवलेले हरभरे, खिरापत, आंबेडाळ व कैरीचे पन्हे द्यायचे. उतरंडीची आरास करायची. आरास करताना पहिल्या पायरीवर देवी म्हणजेच गौरी (अन्नपूर्णा) ठेवायची त्याच्या खालच्या पायरीवर भिजवलेले हरभरे, खिरापत, आंबेडाळ व कैरीचे पन्हे ठेवायचे.
त्याखाली सगळे पदार्थ (कुरडया , शेव, चकली, शंकरपाळे, अनारसे) करून ठेवायचे, त्याखालील पायरीवर, खेळण्यांची किंवा आपल्याला आवडीची आरास करायची. किमान चार ते पाच पायऱ्या व्हायला हव्यात.रात्री गौर जागवून झिमा, फुगडी खेळ खेळले जातात. जर मध्ये कधी जमलं नाही तर अक्षय तृतीयेला हळदीकुंकू समारंभ करावा, अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळे गोडाचे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवायचा. देवीचे विसर्जन करायचे नाही, दुसऱ्या दिवशी दररोजच्या देव्हाऱ्यात देवीला ठेऊन द्यायची.



