अमिताभ बच्चन ©मुकुंद कुलकर्णी

महानायक
कौन बनेगा करोडपतीच्या झगझगीत मंचावर दमदार पावलं टाकीत मोठ्या आत्मविश्वासाने प्रवेश करणारा आपला लाडका महानायक आज ऐंशीव्या वर्षात पदार्पण करतो आहे , यावर त्याच्या देहबोलीकडे पाहिल्यावर विश्वास बसत नाही . रसिकांच्या मनात दडलेला हा अँग्री यंग मॅन आता तसा राहिला नाही खरा . आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या ज्ञानवृद्ध पितृतुल्य व्यक्तिमत्वासारखा तो अवतरतो . जराजर्जर अजिबात झालेला नसला तरी तो आता वृद्ध झाला आहे हे सत्यच . पिता हरिवंशराय यांचा सुसंस्कृत मुलगा हीच त्याची सांप्रत ओळख . संवेदनशील कवीचा हा मुलगा चित्रपटसृष्टीत उतरला नसता तर चांगला साहित्यिक नक्कीच झाला असता . हिंदी , इंग्रजी , उर्दू भाषांवर त्याचे प्रभुत्व आहे . वडिलांच्या बहुतेक कविता त्याला मुखोद्गत आहेत ! आपल्या वेल मॅनर्ड सुसंस्कृत व्यक्तिमत्वाने तो प्रेक्षकांना जिंकून घेतो , आपलासा वाटतो . अनेक शारिरीक व्याधी संभाळत तो आज ही ज्या निष्ठेने आपल्या अभिनय सामर्थ्याला न्याय देतो आहे , ते केवळ कौतुकास्पद आहे . आजही तो पहिल्या एवढाच कार्यमग्न आहे . नुकताच प्रदर्शित झालेला चेहरे हा चित्रपट याची साक्ष आहे . असाच धडधाकट आरोग्यसंपन्न अमिताभ पुढील अनेक वर्षे असेच रसिकांचे मनोरंजन करण्यास सक्षम राहो हीच प्रार्थना ! तुम जियो हजारो साल , साल के दिन हो पचास हजार !
 

हिंदीचित्रपटसृष्टीतील अभूतपूर्व चमत्कार म्हणजे महानायक अमिताभ बच्चन . आज हा महानायक 80 व्या वर्षात पदार्पण करतो आहे प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या पडद्यावरच्या रफ अँड टफ ‘ अँग्री यंग मॕन ‘ या प्रतिमेशी पूर्णपणे विसंगत मृदूभाषी , सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशा महानायकास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आरोग्य संपन्न जीवनाचे शतक साजरे होवो ही सदिच्छा !! जीवेत शरद: शतम् !!!

सुरुवातीलाअमिताभ आजिबात इंप्रेस करून गेला नाही , सुपरस्टार राजेश खन्ना जेंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवत होता तेंव्हा हा कठोर चेहऱ्याचा हडकुळा वाटणारा युवक बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता . सणकी जानी राजकुमार याने जंजीर नाकारला आणि योगायोगाने तो बच्चनला मिळाला . पुढे सगळा इतिहासच घडला . गेम चेंजर ठरला हा चित्रपट . रोमँटिक बॉलिवूड हिरो ची इमेज त्याने अँग्री यंग मॕन अशी बदलून टाकली . आजच्या त्याच्या केबीसी च्या भाषेत त्याने फ्लिप द क्वेश्चन आलट पलट करून टाकली हिंदी चित्रपटसृष्टी . पण किरकोळ शरीरयष्टीचा हा युवक जेंव्हा शेट्टी सारख्या तगड्या पाच पंचवीस जणांना पडद्यावर लोळवायचा तेंव्हा ते हास्यास्पद वाटायचं . पण त्याच्या अभिनय क्षमतेचा स्पार्क कधीच लपला नाही . काळाच्या पुढे असायचा तो . आज कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम केवळ त्याच्या लोकप्रियतेमुळे जगभरात पॉप्युलर आहे . मुळात कार्यक्रम ज्ञानवृद्धी करणारा आहेच , त्यात पितृतुल्य व्यक्तिमत्वाचे बच्चन साहेब आपल्या सुसंस्कृत सूत्रसंचलनातून तो कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात . इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व विलक्षण आहे . महान कवी हरिवंश राय यांचा हा सुपुत्र आपल्या वडिलांच्या कविता सहजपणे उलगडून दाखवतो . बाबूजी आणि आई तेजी बच्चन यांच्याविषयी बोलताना भावूक होणारा हा नवयुवक केंव्हा आपला ताबा घेऊन जातो आपल्यालाच कळत नाही.
 

दि.11ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला . हिंदीतील सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांचे ते सुपुत्र हिंदू कायस्थ वडील आणि पंजाबी शीख मातेचे ते सुपुत्र . बच्चन खानदान हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकच आहे . त्यांचे खरे आडनाव श्रीवास्तव . श्रीवास्तव मूळचे उत्तर प्रदेशातील राणीगंज येथील बाबूपट्टी या गावातले . हरीवंशराय बच्चन हे उदारमतवादी होते . जात पात या पलिकडे जाऊन ‘ वसुधैव कुटुंबकम् ‘ अशा विशाल दृष्टीकोनातून त्यांनी आपल्या ‘ श्रीवास्तव ‘ ह्या आडनावाचा त्याग करून ‘ बच्चन ‘ हे आडनाव स्वीकारले . ‘ बच्चन ‘ हे त्यांचे साहित्यातले टोपण नाव . श्रीवास्तव कुटुंबाने पुढे बच्चन हेच नाव स्वीकारले . भारतीय स्वातंत्र्यलढा तेंव्हा चरमपदावर होता . स्वातंत्र्याची पहाट दिसू लागली होती . ‘ इन्किलाब जिंदाबाद ‘ हा तेंव्हा स्वातंत्र्यलढ्याचा प्रेरक मंत्र होता . त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी बच्चन यांचे नाव ‘ इन्किलाब ‘ असे ठेवले होते . नंतर सुमित्रानंदन पंत या ज्येष्ठ कवींच्या सूचनेवरून त्यांनी मुलाचे नाव ‘ अमिताभ ‘ असे ठेवले . आमिताभ म्हणजे असा प्रकाश किंवा तेज , जे कधीही नष्ट होत नाही . हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभने आपले नाव सार्थ केले आहे .

सुमारे पाच दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत बच्चन यांनी चित्रपट रसिकांवर अधिराज्य गाजवले आहे . इ.स.1970 च्या दशकात प्रस्थापित ‘ सिस्टिम ‘ च्या अन्यायाच्या विरोधात हल्लाबोल करणाऱ्या मर्दानी ‘ अँग्री यंग मॕन ‘ चा तो प्रतिनिधी होता . अशा पद्धतीच्या भूमिका साकारत असतानाच आमिताभ आपल्या अष्टपैलू अभिनय सामर्थ्याची चुणुक दाखवत होता . त्याला मिळालेल्या निखळ विनोदी भूमिकासुद्धा तो तेवढ्याच सक्षमपणे सादर करत होता . बॉलीवूडमध्ये एक उत्कृष्ट ‘ सेन्स ऑफ ह्यूमर ‘ असलेला अभिनेता अशी त्याची इमेज होती .

अल्पावधीतच यशाच्या अत्युच्च शिखरावर विराजमान झालेल्या अमिताभने एक एंटरप्रेन्यूअर म्हणूनही काही काळ काम केले . छोट्या पडद्यावरचे ‘ मॅग्नेटिक ‘ व्यक्तीमत्व हे बिरुद आजही समर्थपणे मिरवत आहे .

आपल्या जवळजवळ पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकीर्दीत अमिताभ बच्चन यांनी 180 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे . बेस्ट ॲक्टरच्या तीन नॅशनल ॲवार्ड्स व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत . देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराचे ते दोन वेळेस मानकरी आहेत . भारत सरकारने इ.स.1984 साली ‘ पद्मश्री ‘ आणि इ.स.2001 साली ‘ पद्मभूषण ‘ या सन्मानाने या महानायकाचा गौरव केला आहे . अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानाचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचेही मानकरी आहेत . Another feather in his cap !

समस्त भारतीयांच्या मनावर मोहिनी घालणारा बच्चन यांचा खर्जातील धीरगंभीर आवाज मृणाल सेन यांच्या ‘ भुवन शोम ‘ मध्ये पहिल्यांदा रसिकांच्या कानावर पडला . इ.स.1971 च्या ‘ सात हिंदोस्तानी ‘ या चित्रपटातून बच्चन यांनी सर्वप्रथम अभिनय क्षेत्रात पदार्पण केले . एका गंभीर सिनिकल युवकाचा हा रोल होता . तेंव्हा ‘ सुपरस्टार ‘ राजेश खन्ना याच्या हलक्या फुलक्या रोमँटिक भूमिकांच्या तुलनेत या विरुद्ध प्रकारच्या भूमिका रसिकांना आवडू लागल्या . परवाना , रेश्मा और शेरा अशा भूमिकांमधून बच्चन हळूहळू प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यात यशस्वी होऊ लागला . ‘ गुड्डी ‘ या चित्रपटात आमिताभ पाहुणा कलाकार होता . या चित्रपटातील अतिशय गुणी , तरुण नायिका जया भादुरी नंतर बच्चनची धर्मपत्नी झाली .

सुरूवातीच्या चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवरील यश बच्चनला हुलकावण्या देत होते . इ.स.1973 च्या प्रकाश मेहरा यांच्या ‘ जंजीर ‘ या सिनेमाने ही कसर भरून काढली . प्रचंड यशस्वी ब्लॉकबस्टर होता ‘ जंजीर ‘ . त्यातला बच्चनचा रांगडा इन्स्पेक्टर विजय खन्ना प्रेक्षकांना जबरदस्त आवडला . कधीही उफाळून बाहेर पडेल असा त्याचा ‘ अँग्री यंग मॕन ‘ चा आविष्कार रसिकांना जवळचा वाटला . अन्यायी आणि उदासीन ‘ सिस्टिम ‘ च्या विरोधात उभा रहाणाऱ्या बंडखोर ‘ अँग्री यंग मॕन ‘ चा जन्म झाला . तो पर्यंतच्या रोमँटिक , भावूक अशा नायकांच्या प्रतिमेला छेद देणारा नवा रांगडा सुपरस्टार हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला . नंतरच्या काळात सुपरस्टार राजेश खन्नाला टक्कर देऊन त्याला मागे टाकणारा अभिनेता हिंदी चित्रपट सृष्टीला अमिताभच्या रुपात मिळाला . राजेश खन्नाबरोबर त्याचे ‘ आनंद ‘ आणि ‘ नमकहराम ‘ हे चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ‘ माईलस्टोन ‘ ठरले आहेत . दोघांनीही आपल्या अप्रतिम अभिनयाने या चित्रपटांचे सोने केले आहे . अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तो विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये चमकला . ‘ अभिमान ‘ मध्ये आपल्या पत्नीच्या गायन क्षेत्रातील वर्चस्वाचा हेवा करणाऱ्या गायकाची भूमिका , ‘ आनंद ‘मधील डॉ. भास्कर बॅनर्जी ऊर्फ ‘बाबूमोशाय’ नमकहराम ‘ मध्ये आपल्या अन्यायी , भांडवलदार उद्योगपती बापाविरुद्ध बंड करणारा तडफदार युवक विकी . याच मध्यवर्ती कल्पनेच्या जवळ जाणारा ‘ शराबी ‘ मधील व्यसनाधीन पण जिंदादिल मद्यपी विकी कपूर अशा विविध छटा असलेल्या भूमिका त्याने समर्थपणे साकारल्या .
 
बॉक्स ऑफिसवर बच्चन यांचे चित्रपट चांगली कामगिरी पार पाडत होते . पण हिंदी चित्रपट सृष्टीत खऱ्या अर्थाने ‘ लीजंड ‘ म्हणून बच्चन यांचे स्थान इ.स.1975 साली प्रस्थापित झाले . इ.स.1975 हे बॉलिवूडच्या इतिहासातील महत्वाचं वर्ष होतं . त्यावर्षी महानायक अमिताभ यांचे दोन ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले . ‘ दीवार ‘ आणि ‘ शोले ‘ हे दोन्ही चित्रपट अमिताभच्या कारकीर्दीला एका निर्णायक टप्प्यावर , यशाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाणारे होते . ‘ दीवार ‘ ही दोन भावांची कथा . विजय एक गुन्हेगार , स्मगलर आणि रवी हा एक पोलिस अधिकारी . नैतिकतेचा पाठ देणारा हा एक क्लासिक चित्रपट होता . लहानपणी अनुभवलेले दारिद्रय आणि अवहेलना याचा सामना दोन भाऊ दोन वेगवेगळ्या प्रकाराने करतात . दांभिक समाजाशी बंडखोरपणे टक्कर देणारा ‘ अँग्री यंग मॕन ‘ अमिताभने साकारला होता .
 

त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ शोले ‘ या चित्रपटाने नवा इतिहास रचला . सर्वकालीन लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘ शोले ‘ चा उल्लेख करावा लागेल . मल्टिस्टार असलेला हा चित्रपट प्रचंड गाजला . मुंबईतील मिनर्व्हा थिएटर मध्ये तब्बल साडेपाच वर्षे हाऊसफुल्ल चालण्याचा विक्रम या चित्रपटाने केला . या चित्रपटानंतर हिंदी चित्रपटातील ‘ महानायक ‘ अशी बच्चन यांची प्रतिमा दृढ झाली .

शोलेच्या अभूतपूर्व यशानंतर अमिताभ यांनी पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या . इ.स.1977 सालच्या ‘ अमर अकबर अँथनी’ या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका , तसेच ‘ कभी कभी ‘ मधील रोमँटिक भूमिका तसेच , इ.स.1978 च्या ‘ डॉन ‘ मधील माफिया बॉस आणि त्याचा हमशकल विजय या दोन्ही भूमिका त्याने समर्थपणे पेलल्या . त्याची अष्टपैलू कारकीर्द सर्व बाजूंनी बहरत होती .
 

इ.स.1982 या वर्षी या महानायकाचा पुनर्जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही . ‘ कूली ‘ च्या सेटवर शूटिंग दरम्यान बच्चन गंभीर जखमी झाला . अमिताभ गंभीर अवस्थेत काही महिने हॉस्पिटलमध्ये होता . सबंध भारतभरात सहानुभूतीची लाट पसरली होती . देऊळ , प्रार्थनास्थळे येथे लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केल्या . परमेश्वराने या प्रार्थना ऐकल्या . आणि सर्वांचा लाडका अमिताभ या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडला . नंतर यथावकाश कूली चित्रपट पूर्ण झाला आणि तुफान यशस्वीही झाला .

इ.स.1984 साली राजीव गांधी यांच्या आग्रहावरून अमिताभने राजकारणात प्रवेश केला . आणि तिथेही त्याला अभूतपूर्व यश लाभले . काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर त्याने अलाहाबाद येथून प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला . पण राजकारण was not his cup of tea . तीनच वर्षात त्याने राजीनामा दिला . हळूहळू महानायक प्रौढ होत होता . त्याच्या अभिनय क्षमतेला न्याय देणाऱ्या भूमिका त्याला मिळत नव्हत्या . ऐंशीच्या दशकात एक ‘ शहेनशहा ‘ सोडला तर त्याचे इतर चित्रपट फारसे चालले नाहीत .

इ.स.1996 साली अमिताभ निर्माता , अभिनेता , यशस्वी उद्योजक अशा अनेक भूमिकांमध्ये दिसला . ‘ अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड ‘ ची त्याने स्थापना केली . पण त्याचे हे धाडस फारसे यशस्वी ठरले नाही . दोन वर्षात अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन बंद पडले . तो कर्जबाजारी झाला . बँकांचे थकित कर्ज टाळण्यासाठी नादारीचा सोपा मार्ग न स्वीकारता परिस्थितीशी टक्कर देत त्याने कर्जाच्या सर्व रकमेची परतफेड केली . या काळात अभिनय क्षेत्रात ही तो फारशी चमक दाखवू शकला नाही .

इ.स.2000 सालापासून मात्र अमिताभने काळाची पावले ओळखून चरित्र अभिनेत्याचे रोल स्वीकारायला सुरूवात केली . आणि अभिनय क्षेत्रातील त्याच्या कारकीर्दीला नवी दिशा मिळाली . त्याच्या बुजुर्ग , अनुभवी , ज्येष्ठ , वयस्कर भूमिका प्रेक्षकांनी स्वीकारायला सुरूवात केली , आणि बच्चन हे पुन्हा चलनी नाणे झाले . मोहोब्बते , बागबान , ब्लॅक सारख्या चित्रपटांना उदंड प्रतिसाद लाभला . ‘ बागबान ‘ मध्ये हेमा मालिनी बरोबर त्याची केमिस्ट्री रसिकांना खूपच आवडली . बुजुर्ग पती पत्नीच्या भूमिका दोघांनीही अप्रतिम सादर केल्या . ‘ ब्लॅक ‘ चित्रपटाने बच्चनला ‘ नॕशनल फिल्म ॲवार्ड ‘ मिळवून दिले . त्याच्या सर्वोत्कृष्ठ अभिनय सामर्थ्याचे रहस्य त्याला एका मुलाखतीत विचारले असता , त्याचे उत्तर होते , ” It was instinctive and I did not use any acting techniques . I just enjoy working in films . ”

त्याच्या आजवरच्या कारकीर्दीवर कळस चढवला तो ‘ कौन बनेगा करोडपती ‘ च्या ‘ होस्ट अँकरिंग ‘ ने ‘ हू वाँट्स टू बी अ मिलियॉनिअर ‘ ह्या ब्रिटिश शो चे हे देशी रुपांतर आहे . त्याच्या सुसंस्कृत आणि वेल मॅनर्ड व्यक्तीमत्वाने त्याला नवीन चाहतावर्ग मिळवून दिला . या कार्यक्रमातील त्याचा ‘ सॉफिस्टिकेटेड चार्म ‘ सर्व वयोगटातील तील प्रेक्षकांवर जादू करून गेला . आजही हा शो ‘ रन अवे सक्सेस ‘ ठरला आहे . दुसऱ्या कोणीही अशा प्रकारे सादर केलेला कार्यक्रम प्रेक्षकांना भावला नाही . ‘ झाले बहु होतील बहु परंतु यासम हा ‘ हेच खरे !

पडद्यावर अन्यायाविरुद्ध लढणारा हा अँग्री यंग मॅन खऱ्या आयुष्यात देखील तेवढाच लढवय्या आहे . वाढतं वय आणि आरोग्याशी निगडीत अनेक समस्या असूनही हा माणूस सकारात्मक उर्जेचे मूर्तीमंत उदाहरण आहे . कोवीड 19 च्या वैश्विक महामारीच्या काळात जनजागृती करण्यासाठी सरकारच्या अनेक योजनांमध्ये या महानायकाने संपूर्ण सहयोग दिला . स्वतः , या संकटात सापडला . पण , दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यावर मात करून तो पुन्हा सक्रिय झाला . खरा कर्मयोगी आहे हा महानायक . आजही त्याचा केबीसी तेवढाच लोकप्रिय आहे . आजही तो बारा तास कार्यरत आहे . सकारात्मक उर्जेचा स्रोत असणाऱ्या या कर्मयोग्यास सलाम !

आज या महानायकाची एक ‘ फादर फिगर ‘ आणि हिंदी सिनेमाचा ‘ ब्रँड अंबॅसिडर ‘ अशी प्रतिमा जनमानसात रुढ आहे . एक नायक , सुपरस्टार म्हणून त्याचा काळ जरी मागे पडला असला तरी , नवीन मिडिया त्याने चांगलाच आत्मसात करून घेतला आहे . सोशल मिडियावर त्याचे करोडो फॅन्स आहेत . ट्विटरवर त्याच्या ब्लॉग पोस्ट फॉलो करणारे करोडो फॉलोअर्स आहेत . आपल्या कर्तृत्वावर ‘ लार्जर दॕन लाईफ ‘ झालेल्या या महानायकास विनम्र अभिवादन ! तुम जियो हजारो साल , सालके दिन हो पचास हजार !!

मुकुंद कुलकर्णी©
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu