“गज-याची नीरगाठ “
स्वाती ऑफिस मधून घरी आली. चहा घेतला आणि स्वयंपाकाला लागली. अनिल ऑफिस मधून आला की त्याला चहा देऊन स्वाती फिरायला बाहेर पडत असे.तिला वाटे दोघांनी मिळून फिरायला बाहेर जावं पण अनिल घरीच बातम्या बघत मोबाईल वर गेम खेळत थांबत असे स्वाती एकटीच लांबवर चालून येई.
अनिल रसिक नव्हता पण त्याचं तिच्यावर जिवापाड प्रेम आहे हे ती जाणत होती. म्हणूनच ती कधी तक्रार करत नसे. त्याचं तिच्यावर जिवापाड प्रेम आहे ही भावनाच तिला जगण्याचे बळ देत असे.
स्वातीची कामं उरकली. अनिल आला. आल्या आल्या त्याने खिशातून गजरा काढला आणि स्वातीच्या हातावर ठेवला. तिला आश्चर्य वाटलं. आजपर्यंत त्याने कधी गजरा आणला नव्हता. ‘आज गजरा. आज काय विशेष?’ती हसत म्हणाली. ‘एकाही विशेष नाही. वाटलं तुला गजरा आणावा. आणला. गजरा आणायला काय विशेष लागतं ?’स्वाती ने खुशीत गजरा केसात माळला.
रोजच्या सारखच जेवण झालं. टी.व्ही. बघत असताना तिची मैत्रीण अनिता चा फोन आला. ‘अनिता आत्ता कसा फोन केलास?’अनिल स्वातीकडे बघत होता. त्याचा चेहरा पडला होता. ‘अगं काही नाही. तुला एक गंमत सांगायला फोन केला.आज संध्याकाळी मी छान नटून एका फंक्शनला चालले होते. रेल्वे स्टेशन जवळ तुझे अनिल भेटले. अरे वा अनिता खुप छान दिसतेस असं म्हणून त्यानी मला गजरेवाल्याकडुन पाच गजरे घेऊन दिले. मग मी एक गजरा त्याना दिला आणि म्हटलं हा गजरा स्वाती ला द्या. बोलले का तुला ते.?’स्वाती च्या चेह-यावर राग,दुःख, अविश्वास अशा निरनिराळ्या भावना उमटून गेल्या पण नंतर तिचा चेहरा निर्विकार झाला. ‘तू अनिताला गजरे घेऊन दिलेस आणि त्यातलाच एक तिने मला दिला. हे का नाही सांगीतलस? खोटं का बोललास? खरं सांगितलं असतं तरी चाललं असतं. ”अगं तसं काही नाही.’अनिल चाचरला. ‘तुझा उगाचच गैरसमज झाला असता म्हणून.”तुझं मन स्वच्छ आहे ना मग झालं तर. पण अनिल साली आधी घरवाली हे फक्त सिनेमा तच हं प्रत्यक्षात ते यशस्वी होणार नाही.”अगं काहीतरीच काय?’ ‘अरे गंमत केली.’
अनिल रात्रपाळी संपवुन सकाळी घरी आला तेव्हा स्वाती ऑफिस ला जायच्या गडबडीत होती. तिच्या केसात दोन गजरे माळलेले होते. अनिल गज-यांकडे बघत होता. ”अरे तुला सांगायचं राहिलंच. काल काॅलेज मधला जुना मित्र भेटला. त्याने गजरे घेऊन दिले. मग हाॅटेल मध्ये काॅफी पिताना खूप गप्पा मारल्या. फ्रेश झाले मी जुने दिवस आठवून .’उशीर होईल म्हणत ती भराभर निघुन गेली.
अनिल अस्वस्थ झाला. तो झोपायला रूममध्ये गेला पण झोप येत नव्हती. मनात शंकेचा बारीक किडा वळवळत होता. आता रोजच स्वाती च्या केसात दोन गजरे माळलेले दिसायचे. ते तिला कोणी तरी दिलेले असायचे. कितीही विश्वास ठेवायचा म्हटलं तरी अनिल अस्वस्थ व्हायचा. तो मनाला समजावायचा तसं काही नाही मी नाही का अनिता ला गजरे घेऊन दिले?मन म्हणायचं तु तिला सुंदर दिसते म्हणालासच. त्यातला गजरा स्वातीला अनिता ने दिला. तू नाही दिलास. उलट तू खोटं बोललास तिच्याशी. ती मात्र खरं ते च सांगते. तिच्या मनात चोर नाही. मनात द्वंद्व सुरु असायचं.
त्याला वाटायचं तिने दुस-याकडुन गजरे नाही घ्यायचे मी च तिला गजरा देणार. तिच्या बाबतीत आजपर्यंत त्याने केलेल्या चुका त्याला जाणवत होत्या. सुट्टी च्या दिवशी ही त्याने स्वतःचा वेळ दिला नव्हता. तो त्याच्याच विश्वात असायचा. तिची गरज त्याने कधीही लक्षात घेतली नव्हती. तरीही तिने त्याला नेहमीच सांभाळून घेतलं होतं.
अनिल ने मनाशी काही तरी ठरवलं. त्याने कंपनीत फोन करुन आठ दिवसांची रजा टाकली. स्वाती ला मेसेज करुन रजा घ्यायला सांगितली. गोव्याला हाॅटलात फोन करुन स्विट बुक केला. स्वाती घरी आल्यावर त्याने तिच्यापाशी मन मोकळं केलं. तिची क्षमा मागितली. ‘स्वाती तुला एक सांगु तु दुस-याकडुन गजरे घेऊ नकोस. मला त्रास होतो त्याचा. ती नुसतीच हसली.
दुस-या दिवशी दोघं गाडीत बसले. अनिल ने गाडी सरु केली. ‘अरे थांब थांब महत्वाचं विसरले असं म्हणून स्वाती पळत घरात गेली आणि एक पिशवी घेऊन आली. ‘काय विसरलीस?”अरे हे’ असं म्हणून तिने पिशवीतून गज-यांचा झुबका बाहेर काढला. दोन गजरे केसात माळले आणि बाकीचे गाडीत समोर टांगले.अनिल चा चेहरा पडला. ‘अरे आपण ह्या गज-यांमुळेच गोव्याला चाललोय मग त्याना बरोबर घ्यायला नको?’ ‘पण स्वाती काल मी तुला सांगितलं होतं तरी?’ ‘अरे वेड्या मला कोणीच गजरे देत नव्हतं. तुला ताळ्यावर आणायला माझी मीच गजरे विकत घेत होते. ‘ स्वाती खळखळून हसली.तिच्या सुंदर हास्याकडे बघत त्याने गाडी स्टार्ट केली.
स्वाती ने खिडकीतुन बाहेर बघत हळुच डोळ्यात आलेलं पाणी पुसलं. तिच्या मनात आलं मनाच्या कोप-यात एक नीरगाठ बसलीय. ती सुटेल ?का ती पण आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून सवयी ची होईल?.
– राही पंढरीनाथ लिमये पुणे


