नारळी पौर्णिमा
श्रावणात येणारा नागपंचमी नंतरचा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा म्हणतात.नारळीपौर्णिमा म्हणजे वरुणदेवाची आदरपूर्वक, प्रेमपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस .श्रावण पौर्णिमेस आपण समुद्र हे वरुणदेवाचे प्रतीक मानूनत्याचे पूजन करतो. शास्त्राप्रमाणे सागराची पूजा करून त्याला श्रीफळ अर्पण करण्यात येतो म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. कोळी समाजाचे आणि सागराचे नाते जिव्हाळ्याचे आणि अतूट असल्याने ते नारळी पौर्णिमा वाजतगाजत, थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून त्यात सोन्याचा नारळ (सोन्याचा मुलामा) ठेवतात . नाचत, गात अतिशय जल्लोषात मिरवणूक काढून समुद्रकिनाऱ्यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करतात . समुद्र देवतेला नारळ समर्पण करतात. वं मनोभावे प्रार्थना म्हणतात. “पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा शांत हो वं तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ, तुफान इत्यादीपासून रक्षण कर.”
सर्व नद्यांचे पाणी समुद्र आपल्यात सामावून घेतो. तो कुठलाही भेदभाव करत नाही. आपणही सर्वांवर सारखे प्रेम करायला हवे आणि सर्वांशी समान व्यवहार करायला हवा.
नारळाला हिंदू धर्मात पूजाविधीत फार महत्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणले जाते. . नारळाच्या बहुविध गुणांमुळेच नारळाला पवित्र फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. नारळात अनेक ओषधी गुण आहेत. शरीराचा दाह,उष्णता कमी करण्यासाठी ओले खोबरे खावे. रक्त पडल्यास साखर खोबरे खावे रक्त पडावयाचे थांबते. खोकल्यातून रक्त आल्यास मनुक्याबरोबर खोबरे खावे. ओले खोबरे खाल्ल्यास जास्त तहान लागत नाही. नारळाचे दूध बळ वाढविते. पाणी लघवी साफ करते, तूप अर्धांगावर उपयोगी आहे. तेल केसांची निगा राखते, चोथा सूज उतरवतो तर चोथा जाळून मधातून घेतल्यास उलटी,उचकी थांबते. इतकेच काय तर करवंटीदेखील उगाळून वा पेटवून तव्यावर ठेवल्यास त्याचे जे तेल येते त्याने खरूज नायटयासारखे त्वचारोगही बरे होतात. नारळाच्या झाडाच्या फांद्या व खोडापासून अनेक उपयोगी वस्तू तयार होतात. म्हणूनच नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात.


