माझ्या यशामागचा खरा अभियंता

 

*माझ्या यशामागचा अभियंता*

आज मी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेला अभियंता आहे. माझ्या यशाचे श्रेय अनेकजण माझ्या बुद्धिमत्तेला, मेहनतीला किंवा नशिबाला देतात. पण मला ठामपणे वाटते की माझ्या नावापुढे लागलेली “अभियंता” ही पदवी सर्वप्रथम जर कोणाची असेल, तर ती माझ्या वडिलांची आहे. कारण माझ्या आयुष्याचा खरा अभियंता मी नसून माझे वडील आहेत.

शाळेत असताना मी एक साधारण विद्यार्थी होतो. दहावीनंतर डिप्लोमा अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतला; परंतु पहिल्याच वर्षी मला अपयश आले आणि एक वर्षाचा गॅप पडला. त्या अपयशाने माझा आत्मविश्वास ढासळला. माझे भविष्य अंधुक दिसू लागले. अनेकांनी माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण माझ्या वडिलांनी मात्र कधीच हार मानली नाही. त्यांना माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त विश्वास होता.

त्यांनी एक निर्णय घेतला—”माझा मुलगा अपयशाने थांबणार नाही.” या एका निर्धाराने त्यांनी स्वतःच्या आयुष्याची दिशा काही काळासाठी बदलली. त्यांनी कार्यालयातून रजा घेतली आणि माझ्यासोबत राहण्यासाठी गावी आले. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःला माझ्या शिक्षणासाठी पूर्णपणे वाहून घेतले.

दररोज पहाटे तीन वाजता ते उठत आणि मलाही उठवत. पण मला पाच वाजले आहेत असे सांगत. त्यामागे एक प्रेमळ युक्ती होती. मला अधिक वेळ अभ्यास करता यावा, हा त्यांचा उद्देश होता. मी अभ्यासाला बसलो की तेही माझ्यासोबत बसत. माझे विषय समजून घेत, मला शिकवत, प्रश्न विचारत आणि चुकांवर पुन्हा पुन्हा काम करून घेत. मी कुठेही असलो, अगदी प्रसाधनगृहात असतानाही ते बाहेर उभे राहून माझ्याकडून सूत्रे आणि संकल्पना म्हणवून घेत असत. त्यांच्या दृष्टीने माझ्या भविष्यापेक्षा महत्त्वाची दुसरी कोणतीही गोष्ट नव्हती.

आज मागे वळून पाहताना जाणवते की त्या काळात त्यांनी किती त्याग केला असेल. स्वतःची झोप, आराम, वैयक्तिक वेळ आणि अनेक गरजा त्यांनी सहजपणे बाजूला ठेवल्या. त्यांना फक्त एकच ध्यास होता—”माझा मुलगा उभा राहिला पाहिजे.” त्यांच्या डोळ्यांत माझ्यासाठी स्वप्ने होती आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते स्वतः झटत होते.

या प्रवासात माझी आई, मोठी बहीण, आजी-आजोबा यांनीही मोलाची साथ दिली. आईने घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण केले. मोठ्या बहिणीने वेळोवेळी मार्गदर्शन करून माझा आत्मविश्वास वाढवला. आजी-आजोबांनी आशीर्वाद, संस्कार आणि मानसिक बळ दिले. परंतु या सर्व प्रयत्नांचे केंद्रबिंदू माझे वडील होते. त्यांनी संपूर्ण कुटुंबाला आशेचा आधार दिला आणि मला अपयशातून यशाकडे घेऊन जाणारा मार्ग दाखवला.

त्यांच्या अथक परिश्रमांचे फळ मिळाले. माझा अभ्यास सुधारला, मी परीक्षेत अव्वल आलो आणि पुढे अभियंता म्हणून यशस्वी कारकीर्द घडवू शकलो. आज मी ज्या उंचीवर उभा आहे, ती माझ्या एकट्याच्या कष्टांची कमाई नाही; ती माझ्या वडिलांच्या जिद्दीची, त्यागाची आणि माझ्यावरील अढळ विश्वासाची कमाई आहे.

आज जेव्हा एखादा कठीण निर्णय घेतो, एखाद्या आव्हानाला सामोरे जातो किंवा एखादे यश साजरे करतो, तेव्हा मला पहाटे तीन वाजता उठवणारे, माझ्या पुस्तकांमध्ये स्वतःचे स्वप्न पाहणारे आणि माझ्या यशासाठी स्वतःचे सुख बाजूला ठेवणारे माझे वडील आठवतात. त्यांनी मला केवळ शिक्षण दिले नाही, तर जीवन जगण्याची दिशा दिली. त्यांनी मला शिकवले की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणतीही लढाई जिंकता येते.

वडिलांच्या कष्टांची, त्यागाची आणि प्रेमाची छाप माझ्या प्रत्येक यशात कायम जिवंत आहे. त्यांनी मला केवळ शिक्षण दिले नाही, तर संकटांशी दोन हात करण्याची हिंमत, अपयशातून पुन्हा उभे राहण्याची जिद्द आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद दिली. आज मी ज्या उंचीवर उभा आहे, त्या प्रत्येक पायरीवर त्यांच्या त्यागाचे आणि प्रेमाचे ठसे उमटलेले आहेत.

Father’s Day च्या निमित्ताने हा लेख मी माझ्या वडिलांना आणि त्या सर्व वडिलांना सादर अर्पण करतो, जे स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आयुष्यभर झटत असतात. मुलांच्या यशाचा पाया त्यांच्या कष्टांवर उभा असतो, पण अनेकदा त्यांचे योगदान शब्दांपलीकडे राहते. अशा सर्व वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मला अभिमानाने म्हणावेसे वाटते—

“माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणास्थान, माझे पहिले गुरु आणि माझ्या यशामागचे खरे अभियंता म्हणजे माझे वडील.”

निखिल माणिक वानखेडे
वरिष्ठ अभियंता
भावनगर, गुजरात

Main Menu