बुलडाण्याच्या युवकाच्या लढ्याची विधि आयोगाने घेतली दखल
समाजात विवाहबाह्य संबंधांमुळे कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होऊन हत्या आणि आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक रीत्या वाढले असून, यावर अंकुश आणण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक युवक कायद्याचा लढा लढत आहे. आशिष दुतोंडे असे या युवकाचे नाव असून, त्यांनी केलेल्या कायदेशीर पाठपुराव्याची दखल घेत केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने ही फाईल पुढील कार्यवाहीसाठी थेट ‘भारतीय विधि आयोगाकडे’ (Law Commission of India) वर्ग केली आहे (फाईल संदर्भ: F. No. 27(09)/2026-Leg.III).
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) अधिकृत आकडेवारीनुसार, देशभरात दरवर्षी पती-पत्नीमधील विश्वासघात आणि विवाहबाह्य संबंधांतील तणावातून १,५०० हून अधिक हत्या आणि १,२०० हून अधिक आत्महत्या घडत आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असल्यामुळे ही चिंतेची बाब बनली आहे. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचाराबाबतचे जुने कलम रद्द केल्यानंतर कायद्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या कायदेशीर शून्यामुळे कौटुंबिक नैतिकतेचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई होत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालली आहे.
या गंभीर समस्येवर प्रभावी आळा घालण्यासाठी लिंग-निरपेक्ष (Gender-Neutral) आणि कठोर दंडात्मक तरतूद असलेला नवीन कायदा करण्यात यावा अशी मागणी आशिष दुतोंडे यांनी संविधानाच्या अनुच्छेद ३५० अंतर्गत केली होती. त्यांच्या या निवेदनाची मंत्रालयाने दखल घेत हा विषय विधि आयोगाकडे आगामी ‘समान नागरी संहितेच्या’ (UCC) मसुद्यात याचा गांभीर्याने अभ्यास करण्यासाठी सुपूर्द केला आहे.
बुलढाण्याच्या मातीतून सुरू झालेला हा जनहिताचा लढा आता राष्ट्रीय पातळीवर धोरण निर्मितीच्या प्रक्रियेत पोहोचल्याने, या महत्त्वपूर्ण विषयाची स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून नागरिकांमधून या प्रयत्नाचे स्वागत होत आहे.


