दिनचर्या
दिनचर्या म्हणजेच दिवसा आचरण केले जाणारे व्यवहार.
ब्रह्मे मुहूर्त उत्तिष्ठतेत स्वस्थौ रक्षार्थमायुष्य: ।
शरीरचिंताम निर्वत्यं कृतशौचविधिस्तत: ||
वरील श्लोकाचा अर्थ असा आहे की स्वस्थ व्यक्ती आपल्या आयुच्या रक्षणासाठी ब्राह्म मुहूर्त म्हणजेच सूर्योदयापूर्वी साधारणतः ( ४ ते ६ ) या वेळेमध्ये अंथरुणातून उठून आपल्या इष्ट देवाचे स्मरण करून , मलमूत्राचा त्याग करावा. त्या नंतर दंतधावन करावे. दंतधावन खदिर, करंज, बाभूळ या वृक्षांच्या काठीने करावे.
दंतधावनानंतर डोळ्यांच्या हितांसाठी दर दिवशी औषधी द्रव्य वापरून बनवलेले काजळ वापरावे. अंजनानंतर नस्य करावे. नस्य म्हणजेच प्रतिदिन नाकामध्ये औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले तेल २ थेम्ब या मात्रेमध्ये टाकावे. नस्यानंतर गंडूष व कवल करावे. नित्य गंडुषासाठी तीळ तेलाचा वापर करावा. मुखामध्ये तीळ तेलाचे ह्या प्रकारे धारण करावे की मुखाची हालचाल होणार नाही.
असंचारि मुखे गंडूष: । संचारी कवल उच्यते ।।
त्यानंतर अभ्यंग करावे. अकाली येणारे वृद्धत्व व श्रमजन्य थकावट दूर करण्यासाठी रोज तीळ तेलाने मालिश करावे. अभ्यंगानंतर व्यायाम करावा.
लाघवं कर्मं सामर्थ्य दिप्तो sग्नि र्मेदस:क्षय: ।
विभवत धनगात्रत्वम व्यायामादउपजयातें ।।
व्यायाम केल्याने शरीरातील अतिरिक्त मेद कमी होऊन शरीराला लाघवता प्राप्त होते. व्यायामानंतर उद्वर्तन करावे. उद्वर्तन म्हणजे वनस्पती चूर्ण शरीरावर स्नानपूर्वक लावल्यास शरीराची सुंदरता वाढते व अतिरिक्त कफ व मेदाचा नाश होतो.
उद्वर्तनानंतर कोमट पाण्याने स्नान करावे. स्नान केल्यास जठराग्नी प्रदीप्त होतो. आयुष्य वाढते, शरीराला बल आणि ऊर्जा मिळते. त्वचा रोगाचा नाश होतो.
सामान्य स्वस्थ राहण्याचे काही नियम –
पूर्वीचे भोजन पचल्यानंतरच हितकर असे हलके भोजन करावे.
मल , मूत्र आदि वेगांचे धारण करू नये व तसेच त्यांना बाहेर काढण्यासाठी बल वापरू नये.
डॉ.स्मिता गायकवाड
स्वरायु आयुर्वेदा सेंटर
मुंबई