‘देव’ या वैचारिक लेखाच्या प्रकाशनाबाबत.

‘देव आहे की नाही?’ खरंतर या प्रश्नापेक्षा ‘माणसाला देवाची काय गरज भासली असेल?’ हा प्रश्न मला बरोबर वाटतो.

मला असे वाटते की मनुष्याच्या जीवनात प्रबळ विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे. माणूस त्याच्या जीवनात जे काही कर्तृत्व साकारतो ते प्रबळ विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर.

मग काही लोक असतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात आणि कर्म करतात. त्यांना बाहेरच्या विश्वासाची गरज नसते. त्यांच्या स्वतःमध्ये सकारात्मकता असते. आणि काही लोक असे जे देवावर प्रबळ विश्वास ठेवतात, ते असा विश्वास ठेवतात की देव माझ्या सोबत आहे आणि देव आहे म्हणून कायम माझं चांगलंच होईल कारण असा मला देवाचा आशीर्वाद आहे. आता ही जी गोष्ट आहे ना ती आहे बाह्य सकारात्मकता. म्हणजे दृढ आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन ह्याच गोष्टी आहेत ज्या माणसाला कर्तृत्ववान बनवतात आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मदत करतात. मग माणूस त्या बाहेरून मिळवू देत किंवा त्या त्यांच्या आतून येऊ देत. हो, पण मग असेही नाही की जे बाहेरून मिळवतात त्यांच्या आत या गोष्टी अजिबातच नसतात. ही लोक बाहेरून आधार मिळवून स्वतःच्या आत या गोष्टी ज्वलंत ठेवतात.

मला असे वाटते की हे जग विश्वासावर चालते. तुम्ही बसमधून फिरता, तेव्हा तुमचा ड्रायव्हरवर विश्वास असतो. विमानातून फिरता, तेव्हा पायलटवर विश्वास ठेवता, समुद्रावर फिरायला जाता तेव्हा सकारात्मक दृष्टिकोन असतो, तेव्हा तुमच्या मनात हे येत नाही की जायलाच नको, त्सुनामी येईल. हा विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तिथे नकळत असतो ना की प्रत्येक वेळी तुम्ही असं ठरवून करता.

मग आपल्या आयुष्यात जे ध्येय असते ते गाठण्यासाठीसुद्धा असाच दृढ आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. मग जर काही लोकांना तो मिळवण्यासाठी बाह्य गोष्टींचा म्हणजेच देवाचा आधार घ्यायला लागला तरी त्यात वावगं काहीच नाही.

 

Main Menu