येरे घना, येरे घना…… न्हाऊ घाल माझ्या मना” गाण्याच्या जन्माची कहाणी
येरे घना, येरे घना…… न्हाऊ घाल माझ्या मना”- कवि आरती प्रभु उर्फ चिं. त्र्यं. खानोलकर. आज मी इथे ह्या गाण्याचे बोल ऐकविण्यापेक्षा आधी ह्या गाण्याच्या जन्माची कहाणी सांगणार आहे. गंगा महान आहेच पण उगम पूजनियच.
नुकताच, स्व. सुनितीबाई देशपांडे यांचा एक अनोखा अनुभव देणारा काव्यांजली चा एक व्हीडिओ पाहण्यात आला. त्यामध्ये उल्लेखलेली ह्या उच्च दर्जाच्या काव्याच्या निर्मितीची विलक्षण कथा!
स्वतः सुनिती बाईंनी ह्या कथेची सुरुवात “जशी ऐकली तशी…. ” असा कबुलीजवाब देऊन केलेली आहे, त्यामुळे आमचेही साहजिकच “मम्!……”
कोकणातल्या एका तालुक्याच्या गावी आपल्या खानोलकरांची आई त्यांची एक छोटीशी खानावळ चालवायची, त्या काळच्या कोकणातल्या तालुक्यात खानावळीत ती काय गर्दी असणार? कुणी बदलीवर आलेले एखाद दुसरा चाकरमाना आणि सकाळी येऊन संध्याकाळी आपल्या गावी परतणारे दोन-चार जण,
बस्स! खानोलकरांनी आई दिवसभर खाणावळीसाठी लागणारा बाजारहाट, रांधणं वाढणं करायची आणि आपले कविवर्य – सदैव चेहऱ्यावर असणारी आठी सांभाळून- कागदावर काहीतरी खरडण्यात व्यग्र. तिथे नेहमी जेवायला येणाऱ्या काही लोकांपैकी दोघांच्या मनात सदैव एक कुतूहल असायचे, कि हा सारखा काय बरे लिहीत असेल? बहुधा प्रेम पत्रे असणार. ह्या कुतूहलापोटी त्या दोघांनी एक दिवस एक नाटक वठवायचे ठरविले. एके दिवशी त्यांनी ठरल्याप्रमाणे गल्ल्यावर बसलेल्या खानोलकरांना पैसे देताना आपल्या हातामधली पिशवी हेतुपुरःसर खाली पाडली आणि खिसे चाचपून पैसे शोधण्याचा बहाणा करून खानोलकर ह्यांना गुंतवून ठेवले . त्याच वेळेस दुसऱ्या इसमाने ते उचलताना खानोलकरांनी रचून ठेवलेले ते लिखित साहित्य पिशवीत भरून टाकले. मग पाहिल्याने दुसऱ्याला विचारले, “अरे, थोडे पैसे कमी पडत आहेत? तुझ्याकडे असतील तर दे”
दुसऱ्याने ते दिले. आणि दोघांनी तिथून काही घडलेच नाही अश्या अविर्भावात निघण्याची तयारी केली, अगदी हटकलेच तर चुकून घेतले, असे सांगून सर्व कागद परत करायचे. पण खानोलकर त्यांच्याच विश्वात रममाण.
हे दोघे इसम आपल्या खोलीवर गेले आणि चोरून आणलेले कागद, काही प्रेमपत्र वाचायला मिळतात का काय अश्या आशेने उघडून पाहतात तर काय?- काहीतरी उभे उभे लिहिलेले, बहुधा कविता असाव्यात. कारण आपल्या लेखी उभे लिहिले कि पद्य आणि आडवे लिहिले कि गद्य. ते कागद वाचल्यावर त्यांच्या डोक्यात काही प्रकाश नाही पडला. त्यांना आठवले कि असले काहीतरी मुंबई मौज प्रकाशनाच्या सत्यकथा मासिकात छापतात, म्हणून त्यांनी त्यातल्या काही कविता स्व- हस्ताक्षरात लिहून पोष्टाने त्यांना पाठवून दिल्या, अर्थात इमानदारीने चिं त्र्यं च्या नावानेच पाठविल्या . नंतर ३,४ महिने त्यांनी साप्ताहिक सत्यकथा चाळून पाहिले, पण त्यांना त्या कविता काही छापलेल्या आढळल्या नाहीत. त्यांना वाटले कि हे सत्यकथा वाले चिं त्र्यं अश्या काही नावाने आलेल्या कविता काही छापणार नाहीत, तर ते पोरी बाळींच्या नावाने आलेल्या कविता नक्की छापतील.
खानोलकरांचे आडनाव प्रभु खानोलकर आणि त्यावेळेस असलेले आधुनिक नाव आरती, ह्यांचा मेळ घालून त्याच कविता परत तश्याच लिहून फक्त कवियित्रीचे नाव “आरती प्रभु” घालून परत मौज प्रकाशनाला पाठवून दिल्या. ह्यावेळेला ते साहित्य श्री पु भागवतांच्या हाती पडले आणि ते अचंबित झाले. त्यांना त्या उच्च दर्जाच्या साहित्याने आकृष्ट केले, किती थोर कविता होत्या त्या. श्रीपुनी, “आरती प्रभु , c/o चिं त्र्यं खानोलकर” ह्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधून अजून पुढील कविता मागवून घेतल्या, नुसत्या कविताच नव्हे तर कथा, कादंबऱ्या, नाटके असे उच्च दर्जाचे साहित्य मागविले, छापले. वाचकवर्ग हे सर्व वाचून संभ्रमित, चकित झाला. “हा कोण सांप्रती नवा पुरुषावतार!”
आणि तिकडे खानोलकरांनी हे सगळे छापून आलेले पाहून त्यांचा जीव दडपून, घाबरून गेला आणि आपण कोणी अद्वितीय आहोत असा अहंकार तर आपल्या मनाला स्पर्श करणार नाही ना? असे वाटून कासावीस झालेल्या ह्या कविमनाच्या कवीच्या ओठी शब्द प्रकटले
“येरे घना, येरे घना…… न्हाऊ घाल माझ्या मना”
त्यांनी थेट त्या दयाघनाला साद घातली, नुसतीच पाण्याने धुवून काढ नव्हे तर आई ज्या मायेने आपल्या तान्ह्याला न्हाऊ घालते तसे न्हाऊं घाल म्हणून.
ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना
फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना
नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना
चिं त्र्यं खानोलकर ह्यांची ही रचना, त्यांच्या थोर कविमनाची साक्ष वेळोवेळी, प्रत्येक वेळी देऊन जाते.
ह्या बावनकशी सोन्याला सुगंधाची जोड लाभली आहे आशाताईंच्या स्वरांची आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या संगीताची.
जेव्हा कधीही हे गाणे कानावर पडते तेव्हा अनामिक हुरहूर दाटून येते. डोळ्यात “अकारण” पाणी तरळून जाते आहे असे वाटायचे. आता त्यामागची भावना आणि मनी दाटणाऱ्या त्या “अकारण” भावनेचे खरोखरीचे “निर्मळ कारण” कळल्यावर, हे गाणे ऐकताना कस्तुरीच्या सुगंधाने सैरभैर होणाऱ्या कस्तुरी मृगासारखी मनाची अवस्था, अस्वस्थता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे.
आशा करतो की तुमच्याही आनंदात नक्कीच भर पडेल, आवडल्यास अभिप्राय नक्की कळवा, अभिप्राय ह्यासाठी की आपल्यासारखे समविचारी भेटल्याचा आनंद होतो, नाही का?
लेखक – अनामिक
pc:google


