“वटपौर्णिमा”
जेष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.
सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.
पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेंव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेंव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागली. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेंव्हा त्या वचनबध्द झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.
वटवृक्षाचे पूजन करतांना प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात. -स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा.
वटपौर्णिमा या व्रताच्या पूजनामध्ये पाचच फळे अर्पण करण्यामागील शास्त्र ‘कोणत्याही पूजाविधीत पाच फळे अर्पण करण्याला महत्त्व आहे. फळे ही मधुर रसाशी, म्हणजेच आपतत्त्व दर्शक असल्याने पाच फळांच्या समूच्चयाकडे आकृष्ट आणि प्रक्षेपित होणार्या देवतांच्या लहरी अल्प कालावधीत जिवाच्या कोषांपर्यंत झिरपू शकतात. यामुळे जिवाला देवतेच्या चैतन्य लहरींचा खोलवर आणि दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते; कारण जिवाचा देह हाही पृथ्वी आणि आपतत्त्वात्मक आहे.’
PC:Pinterest.com,google.com


