वैभवलक्ष्मी व्रत
हे व्रत किमान अकरा किवा एकवीस शुक्रवार करतात . स्त्रियाच हे व्रत करीत असल्या तरी पुरुषांनीही हे व्रत केले तरी चालते . या व्रतामुळे परीक्षेत यश मिळते , लग्न ठरते , कौटुंबिक सुख प्राप्त होते आणि आर्थिक संकटांचे निवारण होऊन धनसंपदेचा लाभ होतो अशी सर्वांची श्रद्धा आहे .
व्रताच्या शुक्रवारी उपवास करून सायंकाळी पूजाविधी झाल्यानंतर नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करायचा असतो . उपवास शक्य नसल्यास फलाहार करूनही हे व्रत करता येते . एखाद्या शुक्रवारी अशीच किंवा मासिक पाळी आली तर तो शुक्रवार सोडून नंतरचा करावयाचा असतो . कोणत्याही परिस्थितीत संकल्प केल्याप्रमाणे सर्व शुक्रवार व्रतस्थपणे पूर्ण करायचे असतात .
या व्रताची माहिती देणारी पुस्तिका बाजारात उपलब्ध असते . त्यात सांगितल्याप्रमाणे हे व्रत करावे .
अखंड व अक्षय वैभव प्राप्तीसाठी रोज खालील प्रार्थना लक्ष्मी देवीला करावी .
नमस्कार महामाये , जगन्माते परात्परे
शंखचक्र गदाहस्ते , लक्ष्मीमाते नमोस्तुते .
आदि नाही अंत नाही आद्यशक्ती खरोखरी ,
विश्वाधारे , विष्णुकांते , लक्ष्मीमाते नमोस्तुते .
सर्वव्यापी , सर्वसाक्षी , शुद्धसत्व स्वरुपिणी ,
सर्वज्ञे सिंधुसंभूते, लक्ष्मीमाते नमोस्तुते .
कमले कमलनेत्रे, कोमले कमलासने ,
मंगले मुदिते मुग्धे , लक्ष्मीमाते नमोस्तुते .
शुभ्रवस्त्र धारिणी हे , गरुड ध्वजभामिनी ,
दिव्यालंकार भूषिते , लक्ष्मीमाते नमोस्तुते .
सर्व दुःख हरे देवी , भुजंग शयनांगने,
भगवती भाग्यदात्री ,लक्ष्मीमाते नमोस्तुते .
सिद्धी बुद्धि भुक्तिमुक्ति , संतती सुखसंपदा ,
आयुरारोग्यही देसी, लक्ष्मीमाते नमोस्तुते .
नमोनमः महालक्ष्मी , धनवैभवदायके ,
दैन्य दूर करी माझे , प्रार्थी मिलिंद माधव ,
वाचिता ऐकता भावे , नित्य या नमनाष्टका ,
इच्छिलेले मिळे सारे , सत्य श्रद्धाळू भाविका .


