त्यागाचा महामेरू

“काणे काका आज समीरा उठतच नाहीये हो. येता का जरा आमच्या खोलीत?” अय्यर आजोबांनी  सकाळ सकाळी हाक दिली तशी आनंद निवास वृद्धाश्रमाचे संचालक काणे किचन मधे बायकांची काही मदत  करत होते ते हातातले काम सोडून तातडीने त्यांच्या खोलीकडे निघाले. समीरा ही एक बुद्ध्यांक कमी असलेली आणि मानसोपचाराधीन मुलगी होती. मुलगी कसली बाईच म्हणायला हवे कारण आता तिचे वय चाळीस वर्षे होते. तिला देण्यात येणाऱ्या औषधाचा परिणाम म्हणून ती कधी कधी अशीच जास्त झोपून राहत असे. अय्यर आजोबांना टेन्शन येई आणि ते काणे काकांना हाक मारून बोलावून नेत. आजही तोच प्रकार झाला होता. काणे काकांनी तिच्या चेहऱ्यावर थोडे पाणी मारतच तिला उठवले. प्रेमळ स्वरात ते म्हणाले,”चला बेटा उठा. कॉफी थंड होते आहे तुझी आणि आजोबांची”. तशी समीरा हळू हळू उठली, बाथरूम मधे गेली आणि अय्यर आजोबांनी सुटकेचा निःश्वास टाकला. काणे काका त्यांच्या पाठीवर थोपटून  म्हणाले “या लवकर डायनिंग खोलीत. लगेच नाश्ता ही करून घ्या दोघांनी”. अय्यर आजोबांनी त्यांचा हात कृतज्ञतेने दाबला. बाकी काही बोलले नाहीत ते.

काणे काका पुढे गेले, डायनिंग रूम मधे जाऊन बसले. आणि आज त्यांना परत आठवू लागली समीरा – अय्यर आजोबांची कहाणी. अय्यर आजोबा खरे तर समीरा चे कुणीच लागत नव्हते. ती होती कोल्हापूर मधील एका नामवंत डॉक्टरांची दत्तक कन्या. म्हणजे त्या डॉक्टरांची देखील स्वतःची मुलगी नव्हेच. समीराला जन्म देतानाच तिची आई वारली आणि बाळंतपण करणाऱ्या त्या डॉक्टरांनीच मग तिला सांभाळायचे ठरवले. त्यांच्या लवकरच लक्षात आले की ही मुलगी नॉर्मल नाही आहे. मतीमंद आहे. तरीही त्यांनी तिला अंतर दिले नाही. जीवापाड सांभाळले. तिचे शक्य ते उपचार केले. पण अशा मुलांमध्ये सुधारणेला फारसा वाव नसतोच दुर्दैवाने. वर्षे उलटत गेली, समीरा वयाने वाढत राहिली पण तिला बाकी समज फारशी आली नाही. स्वतःची स्वतः अंघोळ, खाणेपिणे करायची हेच खूप होते. बाकी काही करायची नाही ती. म्हणजे करूच शकायची नाही बिचारी. बराच वेळ झोपूनच राहायची. दिवस, वर्षे पुढे सरकत होतीच. ती काय थांबतात का?  समीरासाठी “जगणे” याला म्हटले तर काही अर्थ नव्हता कारण जाणीवाच नव्हत्या. पण ती जगेल तेव्हढे तिला जगवणे भाग होते.

समीरा साधारण तिशीची असताना डॉक्टर आजारी पडल्या, त्यांना कळून चुकले आता आपले आयुष्य फार नाही. समीराचे काय करावे हा प्रश्न त्यांना सतावू लागला. कुणाला सोपवावी अशा मुलीची जबाबदारी?  अचानक त्यांना आठवले अय्यर जे राष्ट्रीय स्वयं सेवक म्हणून गेली अनेक वर्षे  पूर्ण वेळ आणि निष्ठेने कार्य करत होते. डॉक्टरांचे स्नेही होते. सडेफटिंग होते. त्यांना विचारावे का समीराला सांभाळाल का म्हणून? त्यांचे ही खरे तर वय झाले होते. ७५ च्या घरात होतेच ते पण डॉक्टरांना त्यांच्या इतका खात्रीलायक माणूस  दुसरा दिसेना. मग त्यांनी एक दिवस अय्यर ना बोलावून घेतले, परिस्थिती कथन केली आणि समीराला सांभाळण्याची गळ घातली. त्यांच्या अंगी निरलस सेवा वृत्त्ती बाणलेली होतीच शिवाय एकूण परिस्थिती पाहता अय्यर तयार झाले. समीरालाही हे आजोबा पटले. म्हणजे ते घरी येत राहिले तशी ती त्यांना ओळखू लागली, त्यांच्याशी थोडं बोलू लागली. डॉक्टरांना या गोष्टीने खूप दिलासा मिळाला. त्यांनी अय्यर ना इतके मात्र सांगितले की हिला घेऊन तुम्ही एखाद्या संस्थेत राहायला जा जिथे तुम्हा दोघांची काळजी व्यवस्थित घेतली जाईल कारण नाहीतर तुम्हाला हिचे करणे झेपणार नाही. आणि त्यांनीच आनंद निवास या वृद्धाश्रमात अय्यर आजोबांसोबत समीराला स्पेशल केस म्हणून प्रवेश मिळावा याची शिफारस केली.  इतकेच नाही तर उर्वरित आयुष्यात त्या दोघांना पैशाची कमी पडू नये याचीही व्यवस्था केली. काही काळातच डॉक्टर निवर्तल्या.

गेली दहा वर्षे ही आजोबा नातीची जोडी इथे राहते आहे सुरक्षित आणि आपल्या भरवशावर याचे समाधान दाटून आले काणे काकांच्या मनात. काणे काकाही निस्वार्थी सेवा करण्याचे उद्दिष्ट घेऊनच इथे आले होते काही वर्षांपूर्वी. आपले काम ते उत्तम रीतीने पार पाडत होते. हा वृद्धाश्रम नसता तर? कुठे गेले असते बरं अय्यर हिला घेऊन? कोण ठेवून घेणार होते त्यांना या अशा मुलीच्या जबाबदारी सकट? असे अनेक विचार परत एकदा काणे काकांच्या मनात तरळून गेले. कशी नाही म्हणावी वृद्धाश्रमाची गरज समाजात? प्रत्येक वेळी वृद्धांना सांभाळणे नको म्हणून, जबाबदारी टाळण्यासाठी म्हणून त्यांना इथे आणून “टाकले जाते” हा समज दूर व्हायला हवा असे काणे काकांना नेहेमी वाटायचे. प्रत्येक केस वेगळी असते, काही वेळा अपरिहार्यता असते हे त्यांना इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे चांगले कळले होते. त्यामुळे आपल्या परीने बऱ्याच लोकांना ही गोष्ट ते कळकळीने  समजावून सांगायचे. सकारात्मक दृष्टिकोन हवा हा त्यांचा विचार असायचा.

“काणे काका कसल्या विचारात गढला आहात? ” अय्यर आजोबा समीरा सकट डायनिंग हॉल मधे प्रवेश करता करता म्हणाले. किती सांभाळून आणत होते ते तिला. कोण म्हणालं असतं की त्यांची कुणीच नव्हती? काणे काकांच्या मनात विचार आला किती महान माणूस आहे हा, देवमाणूसच म्हटला पाहिजे. या काळात जिथे सख्खे सख्ख्यांना सांभाळायला तयार नसतात तिथे ही कोण कुठली मुलगी, ना नात्याची ना गोत्याची, जाणीव आणि नेणीव यांच्या पलीकडे पोचलेली तिचा प्रेमाने प्रतिपाळ करणे म्हणजे आपण करत असलेल्या कामावर  केव्हढी जबर निष्ठा, किती असीम त्याग! तिच्यासाठी स्वतःचे सगळे पाश तोडून इथे येऊन राहिलेत हे. हा तर त्यागाचा महामेरूच! त्यांनी मनोमन नमस्कार केला अय्यर आजोबांना, कितव्यांदा कुणास ठाऊक.

(सत्य कथेवर आधारित)

अवंतिका कानडे, ठाणे
pc:google

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu