स्मृतीबनातून – मौक्तिकावीण शिंपा
संध्यार्तीची वेळ. पहिल्या किरणा पासून चैतन्याची पखरण करणारा गगनराज आता दुसऱ्या गोलार्धात प्रकाशण्यासाठी, निरोप घेऊ पाहात होता. पश्चिम क्षितिजा वर जणू काही केशर सडा शिंपला होता. त्या भास्करानं निरोप घेतल्या मुळे की काय कोण जाणे अंतरात काहीशी उदासिही रेंगाळत होती. संध्याकाळची अशी ही वेळ तृप्ती बरोबरच मनाला काहीशी हुर हूर लावून जाते. अश्या अवस्थेचं जगदीश खेबुडकर यांनी फार समर्पक वर्णन केलं आहे. ‘तृषा वाढते तृप्त या लोचनांची’ एकाचवेळी तृप्ती आणि तृषार्ततेची भावना मनात रुंजी घालतात, ती ही वेळ. अश्या वेळी तिची साथ नसेल तर पश्चिमेचा शीतल समीर, चांदणं हे सुद्धा मन पोळून टाकतं.
धरतीनं नेसलेल्या हिरव्या शालुवर पहाटे हलकेच पडलेला स्वर्गीय प्राजक्त सडा किती विलोभनीय असतो पण जर तिची चाहुल ही नसेल तर मग अशी आरास काय कामाची?
जर का तिची साथ नसेल तर साध्या सोप्या वाटेवरची वाटचाल ही कठीण होऊन बसते. या प्रवासात वारंवार तोल जाऊ लागतो. प्राजक्त, जाई, जुई सारख्या सानुल्या फुलांचा ही मनाला भार वाटू लागतो. पण या व्यथा कुणाला कश्या कळणार?
जिवलगाच्या नसण्यानं जीव अशांत, अस्वस्थ होतो. धीर सुटू पाहतो. कंठातून सुर फुटतच नाही. उरातली विरह वेदना मात्र सतत जागी राहते, वेदना गीत गाण्यासाठी.
भूतकाळातल्या चांदण रात्रीच्या आठवणी बिन मोत्याच्या शिंपल्या सारख्या आहेत, सागरात सापडणाऱ्या शिंपल्याचं मोल हे त्यात मिळणाऱ्या मोत्या मुळेच असतं. मोती नसलेला शिंपला हा चैतन्य निघून गेलेल्या कलेवरासमच नाही का? आता तर ती नाही. आहे फक्त जुन्या आठवणींची स्वप्नमाया. आज तिचीच साथ नाही तर मग पश्चिमेचा हा शीतल वारा, हे चांदणे काय कामाचे?
हे भावगीत म्हणजे विरह वेदनेचा उत्कट आविष्कार आहे. ‘ स्वर आले दुरुनी ‘ च्या जन्मात ह्या या गीताचा उगम दडलेला आहे. ध्वनीमुद्रिके (Gramophone Record) साठी ‘स्वर आले दुरुनी’ च्या जोडीला आणखी एक गीत हवं असल्यानं संगीतकार प्रभाकर जोग यांनी पुन्हा एकदा प्रथम चाल केली. ती बांधली, ती कलावती आणि कलावतीच्या हातात हात घालून विचरण करणाऱ्या रिखब वाली कलावती म्हणजेच कर्नाटक संगीतातील प्रचलित जनसंमोहिनी रागात. श्रद्धा, भक्तिभाव, विरह वेदना, पूर्वायुष्यातील गोष्टीबद्दल आसक्ती अश्या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी ही निवड चपखल ठरते.
त्यावेळी आकाशवाणी नागपूरच्या (All India Radio) सेवेत असलेले देव(#Yashwant Deo), छोट्या रजेवर मुंबईत आले असताना जोगांनी(#Prabhakar Jog) देवांकडेच आपल्या चाली साठी शब्द जोगवा मागितला. या विरहार्त सुरावटीला, शब्दावळीला आपल्या आर्त स्वरांच समर्थ कोंदण बाबूजींनी(#Sudhir Phadke) दिलं. उत्कृष्ट शब्दोच्चारासाठी ते प्रसिद्ध होतेच मात्र गायक सुधीर फडके केवळ शब्दार्थच नव्हे तर भावार्थही गात असत. त्यांच्याकडे गात्या गळ्याच्या बरोबरीन गातं हृदय ही होतं, हे त्यांनी गायलेली गीतं ऐकताना प्रकर्षानं जाणवतं. स्वर आले दुरुनी प्रमाणेच हे गीत ही साकारत असताना जोग – देव – फडके या त्रिगुणात्मक त्रिमूर्तीनं आपलं सर्वस्व प्रदत्त केलं आहे. एकूणच सर्व आले जुळूनी असं घडलं आहे आणि त्यामुळेच ही विरहिणी विरह साहणाऱ्यालाच नाही तर आपल्या सहचारिणीच्या निकट सानिध्यात असलेल्याला सुद्धा वियोग वेदनेनं व्याकूळ करू शकते. हीच या भावगीताची अहमियत आहे. खासियत आहे.
‘प्रिया आज माझी नसे साथ द्याया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धुंद वारे, नको चांदण्या या
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको पारिजाता धरा भूषवू ही
पदांची तिच्या आज चाहूल नाही
नको पारिजाता धरा भूषवू ही
पदांची तिच्या आज चाहूल नाही
प्रियेवीण आरास जाईल वाया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
फुले सान झेलू तरी भार होतो
पुढे वाट साधी तरी तोल जातो
फुले सान झेलू तरी भार होतो
पुढे वाट साधी तरी तोल जातो
कुणाला कळाव्या मनाच्या व्यथा या
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
न शांती जिवाला न प्राणास धीर
कसा आज कंठात येईल सूर
न शांती जिवाला न प्राणास धीर
कसा आज कंठात येईल सूर
उरी वेदना मात्र जागेल गाया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
अता आठवीता तशा चांदराती
उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती
अता आठवीता तशा चांदराती
उरे मौक्तिकावीण शिंपाच हाती
उशाला उभी ती जुनी स्वप्नमाया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
नको धुंद वारे, नको चांदण्या या
प्रिया आज माझी नसे साथ द्याया
प्रिया आज माझी नसे साथ द्याया’
ऐकण्यासाठी क्लिक करा – प्रिया आज माझी नसे
नितीन सप्रे,
8851540881
pc:google
टीप: लेखक श्री नितिन सप्रे हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्युज,(दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तीगत आहेत.
त्यांचे लिखाण https://saprenitin.blogspot.com या ब्लॉगवरही उपलब्ध आहे.


