होय होय, आज अनंत चतुर्दशी!
श्रावण – गणपती, उत्साह, आनंद, पूजा अर्चा, सोवळे ओवळे, कुलाचार! आपण सर्वांनीच भगवंताची मनोभावे सेवा केली, यथाशक्ती, यथामति! भगवंत पण अतिशय प्रसन्न झालाय हं! तुम्हाला केलेल्या सेवेचे शास्त्रात व पुराणात सांगितलेले सर्व फलं तुमच्यासाठी तयार आहे अगदी!
ते: पण… पण… फलं ते काही मिळत नाही गं मृदुला

किती सत्यनारायणे घातली, किती अभिषेक केले, देव आमच्यावर कृपाच करत नाही गं! काय कारण आहे?
मी विचारते – श्राद्ध करता? (Silence)
ते: त्याचा काय संबंध गं?
काय मिळते श्राद्ध करून? एका वाक्यात सांगु?
“आयु: प्रजां धनं विद्यां स्वर्गम् मोक्षम् सुखानि च || “
बघा बरं, अजून काही आहे, जे वर लिहिले नाहीये आणि तुम्हाला हवे आहे?
आपण विविध देवतांची केलेली पूजा आणि त्या पूजांचे फळ भगवंत नेहमीच देतो पण डायरेक्ट नाही तर पितरांच्या मार्फत! आपल्या सृष्टीची रचनाच तशी आहे. मग आपण जर श्राद्ध करत नसू, जर आपले पितर तृप्त नसतील, भुकेने व तहानेने तडफडत इथे तिथे फिरत असतील तर देवतांचे आशीर्वाद व फलं आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत!!!
बरं हा पितृपक्ष फक्त भारतात नाही तर पूर्ण जगात आहे. COCO चित्रपट पाहिला आहे? भारताबाहेर अचानक अवतरणारी haloween ची भुते! तो त्यांचा पितृपक्षच बरका…
ज्यू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन सर्व पंथांमध्ये श्राद्ध होतात, महत्त्वाची समजली जातात.
कित्येक भारताबाहेरची कुटुंबे भारतात येऊन श्राद्ध विधी करून जातात.
पण! आपल्या धर्मातल्या गोष्टींनाच नावे ठेवायची लागलेली सवय, त्याने वाढत जाणारा पितृदोष, मग घरात घडणारी एखादी अप्रिय घटना, मग पुन्हा देव-पितरांना दिलेली दूषणे आणि मग परत वाढलेला पितृदोष आणि पुन्हा संतती व संपत्ती वर आलेली संकटे – अशा पूर्ण दुष्टचक्रात आपल्याकडची “शिकलेली” पिढी अडकली आहे.
त्यातले काही निवडलेली उदाहरणे —
1) देवाचे करणार, पण श्राद्ध नाही – आपला आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म हा वेदप्रणित व पुनर्जन्म व आत्मा मानणारा आहे. वेदांमध्ये जशी देवता सूक्त आली आहेत तशी पितृ सूक्त ही आहेत. मग देवतांना मानणार पण पितरांना नाही हे शुद्ध अज्ञान आहे!
2) पितृऋण – what is it? आपल्या धर्माने सांगितलेले प्रधान कर्म – म्हणजे पितृकर्म! एकवेळ देवपूजा करू नका पण पितृकर्म करा. पितृऋण फेडणे हे प्रत्येक मुलाचे व मुलीचे प्रथम कर्तव्य आहे. देवतांना संपूर्ण सृष्टीवर प्रेम आहे पण आपल्या वंशाची – आपल्या lineage ची काळजी फक्त आपल्या पितरांना असते!
3) आम्ही #गरिबांना खाऊ घालतो – असे करूयात, तुम्ही खूप भुकेले आहात, मी तुमचे स्वागत करते, तुम्हाला आसनावर बसवते आणि सुंदर स्वयंपाक करून तुमच्यासमोर 10 गरिबांना खायला घालते. माझी अशी अपेक्षा आहे की तुमचे पोट भरले…
4) आम्ही पैशाने #अनाथआश्रमाला मदत करतो – असे करूयात, तुम्ही खूप भुकेले आहात, मी तुमचे स्वागत करते, तुम्हाला सोफ्यावर बसवते, ताट भरून 50 रुपयांच्या नोटा, नाणी, सोन्याची नाणी तुमच्या समोर आणून ठेवते आणि सांगते पोटभर जेवा हं!!! चालेल? नाही ना? अन्न हवे तेव्हा अन्नच हवे बरका!
5)आम्ही गुरुजींना बोलावत नाही – मंत्र म्हणल्याशिवाय दिलेले अन्न पितरांना पोहोचत नाही.
एक ध्यानात घ्यावे, घरी जेव्हा सत्पात्र ब्राम्हण प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊन जातो त्या घरात सतत लक्ष्मी चा वास असतो, असा आशीर्वाद रुक्मिणी देवींनी दिलेला आहे…
6)आम्ही फक्त कावळ्याला पान ठेवतो – #वाडी ठेवतो – अन्नदान हे सत्कर्म आहेच, पण वर लिहिल्याप्रमाणे मंत्र उच्चारण/ अन्न निवेदन झाल्याखेरीज पितरांना ते मिळत नाही. उत्तम श्राद्ध कर्म घरी करून मग 15 ही दिवस कावळ्याला पान ठेवायला हरकत नाही.
7) आम्ही #गयेला श्राद्ध करून आलो आता आवश्यकता नाही – पूर्णपणे चुकीचा समज, अगदी कोणत्याही गुरुजींनी सांगितलेला असला तरी!
आपले आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणे जितके महत्त्वाचे तितकेच महत्त्वाचे ते गेल्यानंतर त्यांच्या सद्गतीसाठी श्राद्ध करत रहाणे आहे.
कुठल्याही इतर देवतेला न दिलेला (गणपती फक्त 10 दिवस, नवरात्र 9 दिवस), 15 दिवसांचा पूर्ण कालावधी व पुढे 2 महिन्यांपर्यंत असा काळ फक्त आणि फक्त आपल्या पितरांसाठी… म्हणजे श्राद्ध करणे किती महत्त्वाचे आहे? आपण आपलाच विचार करावा…
#का_करावे? – उत्तम संतती व संपत्ती ह्याची अपेक्षा असेल तर श्राद्ध न चुकता करावे. आपल्या घरी अपमृत्यु, दुर्मरण येऊ नये असे वाटत असेल तर श्राद्ध चुकवू नये. आपला वंश खंडित होऊ नये असे वाटत असेल तर सश्रद्ध व समंत्रक श्राद्ध विधी करावेत.
#कोणी_करावे? – ह्यावर अनेक मतमतांतरे आहेत. पण श्राद्धाचा लोप कधीच होऊ नये. अधिकारी व्यक्ती नसेल तर शास्त्राने अनेक उपाय दिलेले आहेत. गुरूजींकडून व्यवस्थित समजून घेऊन श्राद्ध करावे.
#कुठे_करावे? – आपल्या घरी
#केव्हा_करावे? – 10 सप्टेंबर, 2022 पासून ते 16 नोव्हेंबर, 2022 पर्यंत महालय असा काळ आपल्या हातात आहे. आपल्या घरात कोणत्या तिथीला श्राद्ध येते आहे ते आपल्या गुरुजींकडून काढून घ्यावे व संपूर्ण श्रद्धेने श्राद्ध करावे.
#कोणाचे_करावे – आपले देवाघरी गेलेले सर्व नातेवाईक, आपले गुरू, आपले आप्त, आपले सासू सासरे, आपल्या आईचे आईवडील. अशी आपल्या बुद्धीला झेपणारी नाती…
श्राद्ध मंत्र पाहिलेत तर अगदी आपल्याला बाळ असताना ज्या बाईंनी मालिश केली ते अगदी आपल्या गॅलरी मधले छोटेसे तुळशीचे रोपटे, ते आपल्या कडे असलेली आपली मनीमाऊ ते आपल्याकडे अनेक वर्षे पोळ्या करायला यायच्या त्या आजी ते आपण ज्यांच्याकडे नोकरी करतो, ज्यांच्यामुळे आपले घर चालते ते आपले मालक, ह्या सर्वांना श्राद्धात अन्न आणि पाणी दिलेले आहे.
ते जिथे असतील, ज्या जन्मात असतील त्यांना तेथे अन्न पोहोचेल अशी मंत्राद्वारा व्यवस्था केलेली आहे…
#कसे_करावे? चटावरचे श्राद्ध, स-पिंडक श्राद्ध प्रत्यक्ष ब्राह्मण भोजन सहित किंवा ब्राह्मण भोजनाशिवाय.
फार फार मोठा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा, आपल्या धर्माचा अविभाज्य भाग म्हणजे श्राद्धकर्म. एक फार मोठी अदृश्य शक्ती, अशी शक्ती जिच्यात देवतांना आपल्यासाठी बोलवून आणण्याचे सामर्थ्य आहे.पण त्यांना ऊर्जा मिळाली, सद्गती मिळाली तरच ते आपल्यासाठी काहीतरी करू शकतील.आपण देवाला प्रेमाने अर्पण केलेल्या गोष्टी ह्या पितृलोकांच्या मार्फत, त्यांच्याकडून देवांना पोहोचतात व त्यांचे आशीर्वाद पितरांकडून आपल्यापर्यंत.आपल्याला देवाने दिलेल्या संपत्तीची किल्ली पितरांकडे आहे.
आपण श्राद्धात देत असलेल्या सोम व अग्नी ने आपल्या पितरांना सद्गती मिळते, आपला वंश पुढे चालू राहतो. आपल्या कुटुंबाची पारलौकिक व पारमार्थिक प्रगती होते. धर्मावर निष्ठा असलेले कुटुंब, देशाची व समाजाची प्रगती करण्यात हातभार लावते.
ज्या घरी श्राद्ध विधीचा लोप होऊ लागतो त्यांच्या साधारण तिसऱ्या पिढीपासून प्रखर पितृदोष जाणवायला लागतो असे शास्त्रकारांचे मत आहे.हळूहळू संपत्ती (assets) कमी होऊ लागते, घर अशांत होऊ लागते. घरातील संतती वर संकटे येऊ लागतात. मुलं न होणे, झाली तर खूप अडचणी येणे, अचानकपणे एखादा रोग संतती मध्ये उद्भवणे अशी अनेक पितृदोषाची लक्षणे आहेत. त्यावर उपाय म्हणजे केवळ आणि केवळ श्राद्ध करणे.
एक वाक्य खूप आवडते मला – “बड़ा बनो पर उनके सामने नहीं, जिन्होंने तुम्हें बड़ा किया है”! खूप महान कार्य करा, खूप पैसे कमवा, खूप मोठ्ठे व्हा, पण आपल्या पितरांना विसरू नका
