उत्तेजनार्थ पारितोषिक | पत्र-एक आनंद ठेवा- सौ.शुभांगी समीर ओतूरकर
कुठला धागा आपल्याला कुठे नेईल आणि आठवणींचा कोणता पट उलगडला जाईल याचा नेम नाही.
नुकताच विद्यार्थ्यांना ‘ गमतीशीर पत्र ‘ हा धडा शिकवित होते. काका आपल्या पुतणीला पत्र पाठवतात .पण ते पत्र कोरं असतं. ती हिरमुसते. तिची मैत्रीण ते पत्र मेणबत्तीवर धरते नी काय आश्चर्य पत्रावरची अक्षर दिसू लागतात. मुलगी खुश होते. मुलांना यामागचं विज्ञान सांगितल्यावर मुलं चर्चेत रंगून गेली नी मला मात्र माझे सारे लहानपणीचे पत्र प्रवासाचे दिवस आठवले.
लहानपणींच्या आठवणींचं आपल्याला खूप आकर्षण असतं.
आम्ही बहीण भावंडं,मैत्रिणी एकमेकींना अशीच गमतीशीर पत्र पाठवायचो. कधी उलट अक्षरात,कधी ‘ च ‘ च्या भाषेत ,कधी उजवीकडून डावीकडे लिहिलेली.कोड्यात लिहिलेली.
काही पत्र खूप देखणी असायची. दैनंदिन घटनांबरोबर पुस्तकं,नाटक,संगीत यावर चर्चा करणारी.ज्याला कविता, गझल शेरो – शायरीची भरजरी किनार असायची. हा ठेवा मी अलवार जपून ठेवलाय. मित्र मैत्रिणींची ही अशी पत्र पुन्हा पुन्हा वाचणं हा एक आनंद सोहळाच.
संवाद साधण्याचं,मानवी भाव – भावना व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम – साधन म्हणून काही वर्षांपूर्वी पत्राकडे पाहिलं जायचं.विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीने,संकेत स्थळांच्या मायाजालात आपण इतके गुंतलो, रमलो की पत्र लेखनाच्या निर्भेळ आनंदासच मुकलोय.
जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या अनेक घटनांचा दुवा कधी साक्षीदार म्हणजे हे पत्र. कारण कोणतंही असो पत्र लिहिलं जायचं ,पाठवलं जायचं व तेव्हढ्याच प्रेमाने त्याला उत्तरही यायचं.
नात्यानात्यातील,माणसा – माणसातील नव्हे मनाचा मनाशी असलेला मोकळा संवाद म्हणजे ‘*पत्र*.
पत्र एक साधा सोपा दोन अक्षरी शब्द.ज्यात सगळ्या भाव भावना,प्रेम,माय,राग,लोभ,द्वेष,कणव व्यक्त करणारं पत्र.
पत्र – अंतरीच्या उमाळ्यातून आलेलं.प्रेम ,माय आपुलकीचं.
पत्र – आनंदाच्या लाटा वाहून आणणारं, दुःख वाटून घेणारं. पत्र हुरहूर लावणारं, ओढ वाढविणारं.
पत्र – चुकलेल्यांना खडसावून मार्ग दाखविणारं,खंबीर आश्वस्त करणारं.
पत्र – अंर्तबाह्य उजळून टाकणारं, आठवणींची पारायणं करायला लावणारं, जवळ नसताना असण्याचा अहसास देणारं.आणि शब्द म्हणजे आपल्या ‘ शब्द ‘ ‘ भावना ‘ पल्याड पोहचविणारं.
सारं घर अश्या पत्राची जीवाचे कान करून वाट पहायचं.ठराविक वेळी येणाऱ्या पोस्टमनची आतुरतेने वाट पहायली जायची.पोस्टमन पत्र दाराला लावायचे बा खिडकीतून टाकून जायचे.अनेकवेळा पोस्टमनही घरातल्या सुख – दुःखाशी जोडले जायचे, घराचाच एक भाग व्हायचे.
घराघरात पत्र ठेवायची अशी खास जागा असायची.कोपऱ्यात तार लावलेली असायची.पत्र वाचून झालं की ते त्या तारेला लावलं जायचं म्हणजे पुन्हा काढून वाचणं सोयीचं होई.
पत्र ठेवायची जशी निश्चित जागा असायची तशीच पत्र वाचायची पण असायची बरं का.. हो पण ते पत्र कोणाचं आहे यावरून ठरायचं.एखादा कोपरा,पायऱ्या,जिन्यावर, गच्चीत ठिय्या मारून पत्र वाचली जायची,उरी धरली जायची.
जसं कारण तसं पत्र असायचं.अनेकवेळा परीक्षेतील, स्पर्धांतील यशाचे अभिनंदन, कौतुक करणारी आशिर्वाद पर पत्र असायची. तसचं काही चुकलं की कान उघडणी ही व्हायची.एखाद्या मंगलकार्याचे अगत्याचे आमंत्रण असायचे.यातून परस्परांविषयी ओढ, आत्मीयता दिसून येते.नात्यातील बंध अधिक दृढ व्हायचे.
नातेवाईक,मित्र मैत्रिणी यांना पाठवल्या जाणाऱ्या पत्रांतून परस्परांच्या सुख दुःखाची देवाणघेवाण व्हायची, अडी- अडचणी सोडविल्या जायच्या.मनं हलकी मोकळी व्हायची.
मायेची ऊबदार हवा घेवून आजोळचं पत्र यायचं. काळाच्या ओघात मामाच पत्र खरंच हरवलं.सीमेवरच्या जवानांचा तर जीवनाधार आहेत ही पत्र आज ही.
येणाऱ्या पत्रांवर हात फिरवला की,त्या शब्दास्पशार्तून मायेचा ओलावा गंध जाणवायचा.तसचं पाठवणाऱ्याचा हस्ताक्षर त्याचा मूड स्वभाव सांगायचा. पत्रांतून माणूस समजायला मदत होते.पत्रांतून अनेकांच्या व्यक्तिमत्त्वाचे रंग खुलतात.काही पत्र स्वभावासारखीच अघळपघळ भरभरून व्यक्त होणारी तर काही मोजके,मुद्देसूद बोलणारी….सुरू झाली की लगेच संपणारी.आंतरदेशीय पत्राचे चारही कोपरे भरून ही बाकी क्षेम भेटी अंती बोलूच असं म्हणणारी काही पत्रे.काही समीर बसून गप्पा माराव्या इतकी जिवंत.
पत्र म्हणजे अनेक नात्यांना जोडणारा संवाद सेतूच.
या कौटुंबिक स्नेहापलिकडली ही सामाजिक ,राजकीय ,ऐतिहासिक पत्र आपण वाचतो.शिवाजी महाराजांची अधिकाऱ्यांना पत्र, गांधीजिंची पत्र, नेहरूंची इंदिरेस पत्र. अब्राहम लिंकनचं ‘ बाईंस पत्र ‘.
मराठी साहित्यातील पत्र व्यवहार हा तर अद्भुत असा हवाहवासा शब्द खजिनाच आहे. सानेगुरुजी – विनोबा भावे यांची पत्र, कवी अनिलांची कुसुमावती देशपांडे यांना पत्र, जी. ए. व सुनीताबाईंची उच्च साहित्यिक मूल्य असलेली पत्र.पू.शी. रेगे यांची आनंदभाविनी ‘सावित्री ‘ हा पत्र संवादातील मैलाचा दगड.
अनिवार ओढीतून लिहिलेली प्रेमपत्र, कविता हा एक वेगळाच तरल अनुभव. ‘ पत्र तुझे ते येता अवचित, लाली गाली फुलते नकळत ‘. मज सांग सखे तू सांग मला ,पत्रात लिहू मी काय तुला ‘मराठी, हिंदी सिनेमाही या पत्राच्या महत्त्वाला नाकारू शकले नाही. कैक हिंदी,मराठी प्रेंमपत्रांची गाणी गाजली.
पण आजची तरुण पिढी मात्र प्रेमातील या तरल संवादाला मुकली. डिजिटायझेशन, स्क्रीन शॉट,फॉरवर्ड च्या काळात त्यांचं प्रेमही संक्षिप्त स्वरूपात ईमोजीवर व्यक्त होतय. व्हॉट्स अप, मेसेज यामुळे निरोप मिळतोय न ही भावना मनात येऊ लागली काळाच्या ओघात संवाद माध्यमात वेगाने बदल झाला. संदेश वहनाची अनेक गतिमान साधनं हाती आली.यात पत्र या अकृत्रिम संवादाचा निर्भेळ आनंद आपण गमावून बसलो.पत्र लिहिणं, पाठवणं,त्याची वाट बघणं हा सारा प्रवासंच कालबाह्य झाला.
‘चला हवा येऊ द्या ‘ मधील अरविंद जगताप यांच्या पत्रांनी पुन्हा या पत्र प्रवासाला उजाळा दिला. शालेय स्तरावर मुलं केवळ उपयोजित लेखन म्हणून पत्र शिकतात.पत्रांतून व्यक्त होणाऱ्या मोठ्यांबद्दलचा आदर,प्रेम,जिव्हाळा ह्यापासून ही मुलं कोसो मैल दूर आहेत .
मैत्रीतील,नात्यातील सौहार्द,ओलावा टिकावा, रुजावा म्हणून हा पत्ररुपी अकृत्रिम सहज संवाद सुरू राहायला हवा नाही का?मी केलीय सुरवात नी तुम्ही ही लिहिताय नं….
सौ.शुभांगी समीर ओतूरकर.
कल्याण.
उत्तेजनार्थ पारितोषिक विजेता लेख


