मुक्काम पोस्ट – दापोली © डॉ. मिलिंद न. जोशी

चाळीस वर्षांपूर्वीचा, आमच्या कोकण प्रवासातला एक प्रसंग आठवला. मी त्यावेळी, हल्ली ज्याला ‘टीन एज’ वयोगट म्हणतात, त्या वयोगटाच्या मध्यावर होतो. त्यावेळी प्रवासाची साधनं कोकण प्रवासासाठी तरी मर्यादितच होती आणि जी काही वैयक्तिक वापराची साधनं थोड्या प्रमाणात उपलब्ध होती, ती आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेरची असल्याने असेल, त्या पर्यायांचा विचारही केला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे बराचसा प्रवास हा मुख्यत्त्वे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने केला जात असे. त्यात कोकण प्रवासात तर एसटी बसला त्यावेळी ‘टुरिस्ट बस’चा पर्यायही उपलब्ध नव्हता. जे प्रवास साधनांचं, तेच कोकणात, मुक्कामाच्या ठिकाणी राहण्याच्या सोयींसंदर्भात म्हणता येईल. हॉटेलांची उपलब्धता कमी आणि असल्यास त्या हॉटेलांचा दर्जा यथातथाच असायचा. त्यामुळे कोणा नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्यांकडे किंवा ओळखीच्यांच्या नातेवाईकांकडे मुक्काम करायला संकोच वाटत नसे. तिथली मंडळी देखील आनंदाने, त्यांच्या परिस्थितीत अगत्य दाखवत. आम्ही देखील असेच कोकण प्रवासाला निघालो. मोबाईल स्मार्ट फोन, एटीएम् कार्ड नसताना, मुक्कामाच्या ठिकाणी फोन नसताना, प्रवास होत असे. त्यात बऱ्याच त्रुटी असत पण त्रागा नसे. एखादी गोष्ट चुकली किंवा ठरवल्याप्रमाणे घडली नाही तरी एकमेकांना समजून घेण्याकडे कल असे. आमच्या कौटुंबिक मित्रमंडळातील एका मित्रांच्या कोकणातील घरी, तसंच त्यांच्या तेथील नातेवाईकांकडे आमचा मुक्काम होता.

‘पुलं’च्या ‘म्हैस’ गोष्टीत पहाटे पाचाची बस पाचाला सुटली तरी होती. आमच्या कोकण प्रवासाची सकाळी नऊची बस दुपारी साडेबाराला सुटली. बस सव्वाबाराला आली आणि साडेबाराला सुटली देखील, ह्या आनंदात आधीच्या  खोळंब्याचा बहुतेकांना विसर पडला. ‘शिंची रखडपट्टी झाली नुसती.’ अशा आशयाची कोंकणी स्वगतं कानी पडू लागली तरी त्यात झालेल्या त्रासापेक्षा, मुक्कामी पोहोचायला होणाऱ्या उशिराची विवंचना जास्ती होती. मे महिना असल्याने बस चांगलीच तापली होती. त्या तापाचा नाही म्हटलं तरी परिणाम  जाणवू लागला. ती कोकणी स्वगतं हा त्याचासुद्धा श्राव्य आविष्कार होता. त्या बरोबरच निरनिराळ्या स्वरांत सोडल्या गेलेल्या, उकडणं दर्शवणाऱ्या सुस्काऱ्यांची साथ त्यांना मिळाली. तरी घामाघूम झालेल्या शरीरावर, बस सुरू झाल्याने खिडक्यांतून आत शिरलेल्या वाऱ्याच्या झोतांनी थोडं बरं वाटलं.

एकदा सुरू झाल्यावर बसने पकडलेला वेग मात्र शेवटपर्यंत राखला. त्यामुळे संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आम्ही बसच्या शेवटच्या थांब्यावर म्हणजे कोकणी भाषेत ‘खेडा’स उतरलो; तेव्हा झालेला आनंद क्षणभरही टिकला नाही. आम्ही बसच्या मुक्कामी पोहोचलो होतो. पण आमचं मुक्कामाचं ठिकाण गाठायला अजून किमान दोन बस प्रवास, मग एक छोटेखानी होडी प्रवास आणि मग बैलगाडी प्रवास आवश्यक असल्याचं समजल्यावर वाटेत कुठेतरी रात्रीचा मुक्काम करायला लागणार, अशी शक्यता वाटू लागली. मग खेड एसटी स्थानकावर आंजर्ल्यालासाठीच्या बसची चौकशी सुरू झाली, तेव्हा आंजर्ले गाडी आधीच निघून गेल्याचं समजलं. मग दापोलीच्या गाडीची चौकशी सुरू असतानाच समोर एका बसवर खेड-दापोली अशी धूसर पाटी लावलेली दिसली आणि आम्ही दापोलीपर्यंत पोहोचण्याची धूसर शक्यता निर्माण झाली. आधीच भरलेल्या त्या बसमध्ये संपूर्ण ताकद लावून सामानासह आम्ही नऊ-दहा जण घुसलो आणि बस सुरू झाली. अधले मधले सर्व लहान थांबे घेऊन, बस जेव्हा दापोलीच्या बस डेपोत पोहोचली तेव्हा रात्रीचे सव्वाआठ झाले होते. तिथून त्यानंतर आंजर्ले बस नसल्याने, दापोलीत मुक्काम क्रमप्राप्त होता.

‘दापोलीत कुठे राहायचं?’ ह्या यक्ष प्रश्नाचं कोणाकडेच उत्तर नव्हतं. अशी वेळ आपल्यावर येईल, अशी शक्यताही गृहीत धरली नसल्याने, त्याबद्दल विचार देखील केला गेला नव्हता. आधी म्हटल्याप्रमाणे हॉटेलमध्ये राहण्याच्या पर्यायावर  विचारही झाला नाही. चर्चा मुख्यत्वे, ‘दापोलीत जवळपास कोणाचा नातेवाईक राहतो का?’ ह्या मुद्द्यावर केंद्रित झाली. काहींचे नातेवाईक होते पण ते नातेवाईक सध्या मुंबईस गेले होते. काहींचे नातेवाईक बरेच लांब राहत होते. चर्चेदरम्यान एका काकांना त्यांचे एक दूरचे मामा, चालत पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर राहत असल्याचं आठवलं. आठ-दहा वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली होती. ते दूरचे मामा आता नात्याने आणि अंतराच्या दृष्टीने एकदम जवळचे वाटू लागले. गेल्यावर ते ओळखतील की नाही ह्याबद्दल ते काकासुद्धा थोडे साशंक होते. पण प्राप्त परिस्थितीत हाच पर्याय उत्तम असल्याचं लक्षात आलं आणि सुताने जर कदाचित स्वर्ग गाठता येऊ शकत असेल, तर हा माहितीचा धागा पकडून दापोलीतल्या दापोलीत, काकांचं घर शोधणं शक्य असल्याचं सर्वानुमते ठरलं. काकांना ते मामा एका खानावळीच्या जवळ राहत असल्याची पुसट आठवण होती. सामानासह मग त्या दिशेने ‘कदम-कदम बढाये जा’ सुरू झालं. अपेक्षेप्रमाणे खानावळीत चौकशी करण्याची शक्यता फोल ठरली. खानावळ बंद होती पण बाजूलाच असलेल्या एका टपरीवर मामांच्या घरचा पत्ता समजला. त्याहून आनंदाची बाब म्हणजे आम्ही योग्य रस्त्याने आणि योग्य दिशेनेच जात होतो, हे समजलं. सगळे चिक्कार दमले होते आणि जास्ती चालण्याची शक्ती कोणातंच उरली नव्हती. मामांचं घर अजून दहा मिनिटांवर होतं. पुन्हा वाटचाल सुरू झाली आणि मामांचं घर सापडलं. काकांनी दाराची कडी ठोठावली. पाच मिनिटांनी दार उघडलं. आतल्या इसमाने काकांना काही ओळखलं नाही. तो त्या मामांचा मुलगा असावा, हा आम्ही बांधलेला अंदाज त्यानंतरच्या ओळख परेडीत खरा ठरला. दाराबाहेर अनपेक्षितपणे एकदम आठ-दहा माणसं पाहून तो देखील गांगरला असावा. काकांनी त्या मामांची चौकशी केली आणि आपली ओळख सांगितली. त्याला काकांची ओळख पटली असावी. आम्हाला आत प्रवेश मिळाला. बाहेरच्या खोलीत मिळेल त्या आसनांवर आम्ही कधी बसकण मारली, ते समजलं नाही. दार उघडणारा, आतल्या खोलीत गेलेला इसम पाच-दहा मिनिटं झाली तरी बाहेर आला नाही. मग काका आत डोकावले. घरात तो एकटाच दिसत होता. तो स्वतःच्याच विश्वात हरवल्यासारखा, स्वतःचीच कामं उरकत होता. आता आपली सोय आपल्यालाच लावून घ्यायला हवी, हे काकांना उमगलं. त्याला विचारून काका,काकूंनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. काकांचे मामा-मामी शेतीच्या कामावर देखरेख करण्यासाठी, त्यांच्या शेतावरच्या घरी राहायला गेल्याचं त्याच्याकडून समजलं. थोड्यावेळाने त्याने काका-काकूंना स्वयंपाकाची सामुग्री दाखवली आणि हवं असल्यास जेवण तयार करून घेण्यास सांगितलं. त्याचं जेवण झालं होतं. जेवण तयार करण्याचे त्राण कोणातच नसल्याने, जवळ असलेल्या तहानलाडू, भूकलाडूंवरच वेळ भागवली गेली. कधी एकदा अंथरुणाला पाठ टेकतो असं झालं होतं. तेवढ्यात त्याने अंथरूणं, पांघरूणं समोर आणून टाकली. त्याचा मोठा भाऊ रात्री उशिरा घरी येणार असल्याचं आणि तो आल्यावर त्याला दार उघडण्याचं जाताजाता सांगून, तो स्वतः त्यांच्या जवळच असलेल्या दुसऱ्या घरी निघून गेला. ‘त्याच्या मोठ्या भावाला ओळखायचं कसं?’, हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहिला. बिनधास्तपणे आमच्यावर घर टाकून तो नाहीसा झाला.

रात्री उशिरा त्याचा भाऊ आला. त्याने काकांना ओळखलं. त्याने मग अगत्याने चौकशी केली. सर्वांना थोडं स्वास्थ्य आलं. सकाळी उठल्यावर त्याने आम्हाला दापोली-आंजर्ले एसटीची माहिती दिली. त्याचा भाऊ आम्ही निघेपर्यंत घरी परतला नव्हता. आम्ही एसटी बसने आंजर्ल्याला पोहोचलो.

 

 

डॉ. मिलिंद न. जोशी 
Email : milindn_joshi@yahoo.com   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu