कथा भाग २ : भूतीया टापू
द्वारकेच्या मोहिमे नंतर कॅप्टन राजवीर परत विशाखापट्टणम ला आला होता आणि त्याने INS सातपुडा चा ताबा घेतला होता. मधल्या काळात त्याने घेतलेली सुट्टी आणि सुट्टीत घडलेल्या गोष्टी या बद्दल तो कधीच कुणाशीही बोलला नव्हता. त्याला त्याचे कर्तव्य खुणावत होते म्हणूनच बाकी सर्व गोष्टी बाजूला टाकून त्याने ड्युटी जॉईन केली होती.
जहाजावर आल्या आल्या त्याने आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांना एकत्र बोलावले. शेखर ची कमी त्याला जाणवत होती. शेखरच्या जागी आता हर्षल आला होता. शेखर सारखाच धाडसी आणि तडफदार असा हर्षल या आधी INS राजपूत वर होता आणि तिथून त्याची बदली INS सातपुडा वर झाली होती.
हरीश आणि पराग होतेच राजवीर बरोबर. पराग आता सातपुडा वर रुळला होता. त्यानेच हर्षल ला सर्व विभाग दाखवण्याची जबाबदारी घेतली होती, कोणीही त्याला न सांगता. समवयस्क असल्याने हर्षल आणि पराग ची चांगली दोस्ती झाली होती.
राजवीर जसा मिटिंग रूम मध्ये आला तसे हर्षल, हरीश आणि पराग उभे राहिले. आल्या आल्या राजवीर ने त्यांना त्यांच्या पुढच्या मोहिमे बद्दल सांगायला सुरुवात केली.
“दुसऱ्या महायुद्धात आपल्या भारतीयांसाठी एक महत्वाची घटना घडली होती ती म्हणजे आझाद हिंद सेनेची आगेकूच, आणि त्यांनी घेतलेला अंदमान आणि निकोबार बेटांचा ताबा. आजाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटांचे नामकरण शहिद आणि स्वराज असे केले होते. नंतर जपानी फौजांनी या ठिकाणी बंकर देखील बांधले होते. पण जपान च्या शरणागती नंतर परत हा द्वीपसमूह ब्रिटिश अधिपत्याखाली आला होता.
जरी हा सगळा द्वीपसमूह आता भारताचा भाग असला तरी त्यातील कित्येक बेटांवर अजूनही मनुष्यवस्ती नाहीये. आणि काही बेटांवर मनुष्य अजूनही आदिम अवस्थेत राहतो आहे, बाह्य जगाशी त्याचा अजूनही संबंध आला नाहीये किंबहुना त्याला ठेवायचा नाहीये.
जपानी सैनिकांच्या काही डायऱ्या या बंकर मध्ये मिळाल्या होत्या त्यात एका भूतीया टापुचा उल्लेख वारंवार होता.
हेच ते एक बेट आहे ज्याला स्थानिक लोक भूतीया टापू म्हणजे भूतांचे बेट असे म्हणतात. त्या बेटावर मनुष्य वस्ती आहे पण ती खूपच आदिम अवस्थेत आहे म्हणजे अजूनही त्यांना कपडे घालणे माहीत नाहीये, दगडाची हत्यारे ते लोक वापरतात”
“पण मग अशा बेटावर आपण जाऊन काय करणार आहोत” हर्षल ने पहिल्यांदा प्रश्न विचारला.
राजवीर म्हणाला , “सांगतो”
“गेल्या आठवड्यात पोर्ट ब्लेअर हवाई दलाच्या रेडिओ सिग्नल वर अचानक एक सिग्नल आला, एकदम अगम्य अश्या भाषेत होता तो, त्याची frequency देखील कोणत्याच दुसऱ्या frequency शी जुळत नव्हती. जेव्हा शोध घेतला गेला तेव्हा तो सिग्नल या भूतीया बेटांवरून प्रसारित झाला होता हे लक्षात आले. आणि त्याचा शोध घेण्यासाठी हवाईदलाचे एक हेलिकॉप्टर त्या भागात पाठवले गेले. जसे ते हेलिकॉप्टर त्या बेटाच्या वर पोहचले तेव्हापासून त्या हेलिकॉप्टर चा आणि आपल्या रेडिओ यंत्रणेचा संपर्क तुटला आहे. आणि आता आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे की त्या हेलिकॉप्टर चा शोध तर घ्यायचाच आहे पण त्या रेडिओ सिग्नल चा देखील शोध घ्यायचा आहे.”
आता सर्वांना या मोहिमेचे महत्व लक्षात आले. हरीश जो जहाजाचा कारटोग्राफर होता त्याने त्वरित त्या भूतीया टापूचा नकाशा शोधला. आश्चर्य म्हणजे त्या बेटांचा नकाशा च उपलब्ध नव्हता. ही खरी कसोटी होती. एका अनोळखी प्रदेशात कोणत्याही नकाशाचा आधार नसताना आणि पुढे काय वाढून ठेवलंय ते माहीत नसताना जायचं. सर्वच जण या कठीण परंतु रोमांचकारी मोहिमेसाठी तयारीला लागले.
14 फेब्रुवारी ला त्यांनी विशाखापट्टणम सोडले आणि 16 फेब्रुवारी ला ते पोर्ट ब्लेअर ला पोहचले. आल्या आल्या हर्शल आणि राजवीर यांनी हवाईदलाच्या अधिकाऱ्यांशी मिटिंग केली आणि त्या हेलिकॉप्टर बाबत अजून काही माहिती मिळते का ते बघितले. ते एक सुसज्ज असे लढाऊ हेलिकॉप्टर होते. त्यावर 2 पायलट, आणि 2 आर्मी जवान असे चौघे होते. अजूनपर्यंत कोणाचाही पत्ता लागला नव्हता.
अजून एक महत्वाची बातमी राजवीर आणि हर्षल ला मिळाली ती म्हणजे त्या बेटाच्या एक किलोमीटर च्या परिसरात कुठेही कोणतेच यांत्रिक उपकरण चालत नाही. आता हा मोठा पेच होता.
राजवीर आणि हर्षल ने जहाजावर आल्यावर कश्या पद्धतीने मोहीम आखायची हे ठरवले.
एकूण 15 जणांची टीम करायची असे ठरले. राजवीर स्वतः या मोहिमेत सहभागी होणार होता, त्याने सांगितलेले कारण असे होते की जर का त्या भागात कोणतेच यंत्र चालत नसेल तर संभाषण करण्याचे कोणतेच साधन चालणार नाही म्हणून राजवीर ला मोहिमेत प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थिती वर नियंत्रण ठेवायचे होते. पण त्यातील एक छुपे कारण हे गेल्या मोहिमेतील शेखर चा मृत्यू हे देखील होते. शेखर चा मृत्यू साठी राजवीर स्वतःला जबाबदार मानत होता. आणि म्हणूनच या वेळी त्याने स्वतः जाण्याचा निर्णय घेतला.
18 फेब्रुवारी ला पोर्ट ब्लेअर वरून निघून INS सातपुडा हॅवलॉक बेटांच्या दक्षिणेला साधारण 50 किलोमीटर वर पोहचले. आता त्यांना तो भूतीया टापू म्हणजे भूतांचे बेट समोर साधारण 2 ते 3 किलोमीटर वर दिसत होते.
आधीच तयारी केल्या प्रमाणे INS सातपुडा अजुन बेटांच्या जवळ गेली आणि साधारण एक किलोमीटर आधी तिने नांगर टाकला आणि उभी राहिली. अजूनही INS सातपुडा वरील संभाषण यंत्रणा व्यवस्थित चालू होती.
राजवीर, हर्षल, पराग आणि अन्य 12 मरीन कमांडो शिडाच्या नौकांवर उतरले आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही शिडाच्या नौका बेटाच्या दिशेने न्यायला सुरवात केली.
जसे जसे बेट जवळ येऊ लागले, तसे तसे हवेत उष्णता जास्त जाणवू लागली. अजूनही त्यांना कोणतीही मनुष्यवस्ती दिसत नव्हती किंवा कोणी मनुष्यप्राणी देखील दिसत नव्हता.
दोन्ही बोटी किनाऱ्याजवळ पोहचल्या आणि राजवीर जमिनीवर उतरणार एवढ्यात अचानक एक बाण कुठूनसा आला आणि बोटीच्या शिडाला फाडत पाण्यात पडला. आणि त्या नंतर अक्षरशः बाणांचा वर्षाव सुरू झाला. दोन्ही बोटींवरील सर्व जण कसे तरी जीव वाचवत एका मोठ्या दगडामागे लपले. आणि बाणांचा वर्षाव थांबण्याची वाट पाहू लागले. ज्या वेगात आणि ज्या संख्येने बाण येत होते त्या वरून राजवीर ने अंदाज बांधला की साधारण 100 च्या आसपास लोक असतील. आता आपल्या 15 लोकांबरोबर त्यांचा सामना कसा करायचा याचा च विचार राजवीर च्या मनात होता.
अचानक त्याला जाणवले की सगळीकडे शांतता पसरली आहे आणि बाण थांबलेत. राजवीर ने दगडामागून पाहिले तर त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. शेजारच्या जंगलातून फक्त 5 माणसे बाहेर आली, अंगाने धष्टपुष्ट अशी काळी कभिन्न अशी ती माणसे बाकी सर्व सर्वसामान्य दिसत असली तरी त्यांची उंची असामान्य होती. साधारणपणे 8 ते 9 फूट उंच अशी ती पाचही माणसे होती.
आणि त्यांच्या उंचीपेक्षाही आश्चर्यकारक असे त्यांचे धनुष्य होते. ते धनुष्य कुठेही एका मागास, आदिम जमातीचे धनुष्य वाटत नव्हते तर एक अत्यंत अत्याधुनिक असे संपूर्णतः स्वयंचलित असे दस्त्याचे धनुष्य म्हणजेच crossbow होते.
राजवीर या पाच माणसांना पाहण्यात गुंतला असतानाच हर्षल ने राजवीर चे लक्ष त्यांच्या आजू बाजूला हेरले. या 15 जणांना आता सर्व बाजूने या आदिवासींनी घेरले होते. आणि हे सर्वच जण त्या पाच माणसांसारखेच 8 ते 9 फूट उंच आणि अंगापिंडाने मजबूत होते. राजवीर ने सर्वांना आपापली हत्यारे बाजूला टाकायचा आदेश दिला आणि त्या माणसांसमोर त्याने तात्पुरती हार पत्करली.
त्यांच्यातील दोन जण पुढे आले आणि त्यांनी त्यांच्या पाठीवर लटकलेल्या कातडी पिशवीतून एक छोट्या बंदुकीच्या आकाराचे यंत्र काढले. त्याने सर्वांना हात समोर धरायला सांगितले आणि त्या यंत्रातून लेझर सारखा प्रकाश हातावर मारला. सर्वांचे हात एखाद्या हातकडीने बांधल्यासारखे एका प्रकाशात बांधले गेले. कोणीही आपले हात सोडवू शकत नव्हता. आता पुढे आपले काय होऊ शकते हे विचार सर्वांच्या मनात होता. पण राजवीर मात्र एका वेगळ्याच विचारात होता. कोण आहेत हे लोक? यांची उंची अशी अनैसर्गिक कशी? आपण ज्यांना आदिम समाजत होतो त्यांच्या कडे अशी काळाच्या पुढची शस्त्रे कशी आली? हे सर्व प्रश्न त्याला सतावत होते.
त्या आदिवासींच्या म्होरक्याने सर्वांना खुणेने उभे राहायला सांगितले. आणि सर्वांना जंगलात घेऊन गेले.
जंगलात साधारणपणे 10 मिनिटे चालल्यावर अचानक एक पठारसदृश्य जागा आली. बेटाच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रात ही जागा दिसत असे. राजवीर ने ती जागा ओळखली. पण या जागेच्या साधारण 10 पावलं आधी सर्वजण अचानक थांबले. त्या म्होरक्याने बाजूला जाऊन एक हवेत हात हलवला. अचानक त्यांच्या पुढे एक गुहेचे प्रवेशद्वार प्रकट झाले. या 15 जणांना काही समजलेच नाही की आता पठार दिसत असलेल्या जागी ही गुहा कुठून आली.
त्या म्होरक्याने पुढे जाऊन तिथे असलेल्या एका मडक्यातून एक मण्यांची माळ काढली आणि स्वतःच्या गळ्यात घातली. आणि त्यामधील मध्यभागी असलेला लाल रंगाचा मणी दाबला. अचानक तो मणी लाल प्रकाशात न्हाऊन निघाला. तो म्होरक्या राजवीर कडे वळून बोलू लागला. “तुम्ही इथे काय करत आहात? आम्ही शांतपणे इथे राहत असताना, आम्हाला त्रास द्यायला तुम्ही इथे का आलात?”
राजवीर च्या लक्षात आले की ती जी मण्यांची माळ होती तो एक प्रकारचा ट्रान्सलेटर होता आणि म्होरक्याने त्यांच्या स्वतःच्या भाषेत बोललेले शब्दच राजवीर ला हिंदी मध्ये ऐकू येत होते.
हर्षल, राजवीर आणि पराग ने एकमेकांकडे पाहिले आणि बोलायला सुरुवात केली. हर्षल बोलला, ” मी हर्षल, हे कॅप्टन राजवीर आणि हा पराग. आम्ही भारतीय नौदलाचे अधिकारी आहोत आणि आमच्या हरवलेल्या साथीदारांच्या शोधात इथे आलो आहोत”
त्या म्होरक्याने सांगितले, “माझं नाव T786, आम्ही सर्व जण म्हणजे आमची जमात या ठिकाणी गेली हजारो वर्षे राहात आहोत. आणि या ठिकाणी एकदा कोणी दुसरा आला की त्याला आम्ही जिवंत परत पाठवत नसतो, कारण आमचं गुपित हे आम्हाला सर्वांना सांगायचं नसत. ”
म्होरक्या हे बोलत असतानाच, अचानक त्याचे लक्ष राजवीर कडे आणि त्याच्या गळ्यात असलेल्या एका लॉकेट कडे गेले. त्याने जवळ जाऊन ते लॉकेट निरखून पाहायला सुरवात केली. आणि राजवीर ला विचारले, हे लॉकेट त्याच्याजवळ कसे आले म्हणून. ते लॉकेट होते अकृराने दिलेले. द्वारकेच्या आतून बाहेर पडताना अकृराने राजवीर, सुंदरन आणि राघव यांना शंखाची प्रतिकृती दिली होती तसेच हे लॉकेट दिले होते.
राजवीर ने T786 ला त्या लॉकेट बद्दल सर्व खरं सांगून टाकले. ते ऐकल्याबरोबर T786 खुश झाला आणि त्याने त्याच्या साथीदारांना आदेश दिले की या सर्वांना बंधमुक्त करा. त्याचबरोबर सर्वांच्या हातावर परत एकदा लेझर सोडून सर्वांना बंधमुक्त करण्यात आले.
T786 बोलला,” अक्रूर माझा खूप चांगला मित्र आहे आणि जर का त्याने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला द्वारका दाखवली असेल तर तुम्ही विश्वासघात करणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला बंधमुक्त केले”
राजवीर परत बोलला, “तुम्ही सर्वजण कोण आहात? तुम्ही इथे या एका बेटांवर कसे आलात? आणि तुमचा वेष हा असा आदिवासींसारखा असताना ही अत्याधुनिक शस्त्रे तुमच्याकडे कशी आली?”
T786 बोलला,” आम्ही म्हणजेच आमची जमात या ठिकाणी हजारो वर्षे राहत आहे. माझी ही 786 वि पिढी आहे, माझे खरे नाव टॅम्बो आहे आणि पिढ्यानपिढ्या आम्ही या जमातीचे म्होरक्या म्हणून काम बघतो आहोत. आम्ही सर्वजण हे अक्रूर ज्या ग्रहावरून आला त्या ग्रहावरील लोकांचे आणि इथल्या मानवांचे वंशज आहोत. आमच्या आद्यपुरशाची म्हणजेच T1 ची आई ही माणूस होती तर वडील हे S.W.A.R.G. मधून आलेले होते. म्हणूनच तुम्हाला आमच्या शारीरिक विकासामध्ये आणि तुमच्या शारीरिक विकासामध्ये अशी तफावत जाणवत आहे. ही जी शस्त्रे आहेत ती सुद्धा आम्हाला S.W.A.R.G. मधून भेट म्हणून मिळाली आहेत आणि त्या बद्दल गोपनीयता बाळगणे हीच एकमेव अट या बदल्यात आम्हाला दिली आहे”
पराग ने बोलायला सुरवात केली,” ते सर्व ठीक आहे, आम्ही सुद्धा गोपनीयता बाळगू पण आम्हाला आमच्या साथीदारांना घेऊन परत जायची संधी द्या, आम्ही परत या बेटांवर येणार नाही”
टॅम्बो बोलला, “ते आम्ही करू शकत नाही, कारण तुझे साथीदार जे आकाशातून आले होते त्यांना आमच्या या तंत्रज्ञानाचा शोध लागला होता आणि त्यांनी ते हस्तगत करण्यासाठी आमच्यावर हल्ला केला, आणि त्याचमुळे आम्हाला त्यांना नष्ट करण्यावाचून पर्याय नव्हता. ”
“आमच्या ज्या रेडिओ सिग्नल च्या शोधात तुमचे साथीदार आले होते ते म्हणजे आम्ही आमच्या S.W.A.R.G. मधील नातेवाईकांशी साधलेले संभाषण होते. त्यांच्याकडूनच आम्हाला ही सर्व शस्त्र, हा ट्रान्सलेटर, आमचे ठिकाण गुप्त ठेवण्याचे हे तंत्रज्ञान हे सर्व मिळाले.”
टॅम्बो पुढे राजवीर कडे वळून बोलला, “तुम्ही या बेटांच्या सुरक्षा परिघाबाहेर तुमचे जहाज उभे केले आहे म्हणून ते वाचले, आम्ही तेव्हापासूनच तुमच्या हालचालींवर नजर ठेवून आहोत. तुमच्यावर अकृराने विश्वास दाखवला म्हणून आम्ही तुम्हाला काही करणार नाही पण बाकीच्यांना आम्ही नाही सोडू शकत. तुम्ही परत या बेटांवर या किंवा आधीच्या कोणाचाही शोध घेण्यासाठी येऊ नका, त्या वेळी आम्ही तुम्हाला देखील सोडणार नाही”
अस म्हणून राजवीर ला बोलायची संधी सुद्धा न देता टॅम्बो ने त्याच्या कडील एका यंत्रामध्ये राजवीर ला ढकलले आणि क्षणात राजवीर ला INS सातपुडा वर टेलिपोर्ट केले.
राजवीर ला हा बसलेला दुसरा धक्का होता. आधीच्या मोहिमेत त्याने शेखर ला गमावले होते आणि या मोहिमेत त्याने हर्षल आणि पराग आणि अन्य नौसैनिक. आता राजवीर खरच खूप हताश झाला.
पण हार मानेल तो राजवीर कुठला…!!! त्याने आपल्या खिशात हात घातला आणि टॅम्बो चा तो हार बाहेर काढला. टॅम्बो ने राजवीर ला त्या यंत्रात ढकलताना मोठ्या चलाखीने राजवीर ने तो हार खेचून काढला होता. आता या हाराचा उपयोग करूनच तो त्याच्या सर्व साथीदारांना सोडवायचा विचार करत होता.
रात्रभर राजवीर विचार करत बसला होता, प्रत्येक मोहिमेत असे साथीदार गमवायची पाळी त्याच्यावर आली होती. आता पण त्याचे 14 साथीदार मागे राहिले होते आणि एकटा राजवीर जहाजावर परत पाठवला गेला होता.
त्याच्या मनात कुठे तरी अंधुकशी आशा होती की त्याचे साथीदार जिवंत आहेत आणि अजूनही त्याच बेटावर आहेत म्हणून. आणि म्हणूनच त्याच्या डोक्यात त्याने पक्के बसवले होते की काहीही किंमत द्यावी लागली तरी या वेळी तो त्याच्या सहकाऱ्यांना असे सोडून येणार नव्हता, या वेळी तो त्या सहकाऱ्यांना नक्कीच परत आणणार होता.
पण कसा ते अजून राजवीर ला उमगत नव्हते.
त्याच विचारात राजवीर डेक वर उभा होता. त्याच्या आवडीचा सिगार त्याने पेटवला आणि शांतपणे विचार करत उभा होता.
अचानक त्याला मागे कोणीतरी आलेले जाणवले म्हणून तो सावधपणे वळला, तर हरीश तिथे उभा होता. तो धावत आल्यासारखा त्याला दम लागला होता. राजवीर ने त्याला आधी शांत होऊ दिले आणि विचारले,” हरीश काय झाले…??”
राजवीर ने मोहिमे वर जाण्याच्या आधी हरीश ला एक काम दिले होते ते म्हणजे बेटाच्या आजूबाजूच्या समुद्रतळाचा अभ्यास करायचा आणि काही माहिती मिळते आहे का ते बघायचं. राजवीर ला खात्री होती की हरीश ने नक्कीच काहीतरी महत्वाची माहिती आणली असणार.
जरा दम खाऊन झाल्यावर हरीश बोलला, “तुम्ही बरोबर बोललात कॅप्टन, ह्या बेटाच्या आजूबाजूचा समुद्र वेगळाच आहे. इथे आसपास एकही मासा नाहीये, म्हणजे या पाण्यात मासेच नाहीयेत आणि ही एक आश्चर्य कारक गोष्ट आहे कारण ज्या खोलीवर समुद्रतळ दिसतोय त्या खोलीवर सूर्याचा प्रकाश व्यवस्थित पोहचतो आणि परिणामी वनस्पती देखील असतात आणि त्या खाण्यासाठी मासे…पण इथल्या समुद्रात ना वनस्पती आहेत ना मासे,”
“अजून एक गोष्ट मला दिसली आहे कॅप्टन, आणि ती तुम्ही येऊनच बघावं अशी माझी इच्छा आहे.”
हरीश ने असे सांगितल्यावर राजवीर आणि हरीश दोघेही जहाजाच्या सोनार विभागात गेले. तिथे गेल्यावर हरीश ने त्याला त्याच्या समोरच्या स्क्रीन वर बघायला सांगितले. हरिश ने सांगायला सुरुवात केली, “तुम्ही सांगितल्या प्रमाणे आपण या बेटाच्या आजूबाजूचा समुद्र तपासला, आपण दोन पद्धतीने हा तपास केला. एक म्हणजे सोनार व्हेव पाठवून म्हणजे आवाजाच्या लहरी सोडून. या लहरी एखाद्या वस्तूवर आदळून परत आल्या की आपण त्या आपल्या रिसिव्हर मध्ये catch करतो आणि मग आपल्या संगणका वर त्या लहरींचे रूपांतर आभासी चित्रात होते आणि दिसते.”
“सोनार द्वारे आपल्याला मगाशी मी सांगितल्या प्रमाणे मासे आणि वनस्पती यांबद्दल माहिती मिळाली. पण या वेळी आपण अजून एका पद्धतीने तपास केला तो म्हणजे आपण एक छोटी म्हणजे एखाद्या छोट्या माशाच्या आकाराची एक पाणबुडी पाठवली ज्याला कॅमेरा लावलेला होता आणि त्याचे संचालन रिमोटद्वारे मी आपल्या जहाजवरून करत होतो. त्या कॅमेरा मध्ये आम्हाला हे दिसले”
असे म्हणून हरीश ने राजवीर ला स्क्रीन कडे बघायला सांगितले. स्क्रीनवरील दृश्य पाहून राजवीर अवाक झाला. समोर त्याला पांढऱ्याशुभ्र रितीने चमकणारा असा समुद्रतळ दिसत होता. पण त्याहून जास्त चमकत होती ती म्हणजे त्याच्या समोर दिसणारी भिंत. हो, मानवनिर्मित वाटावी अशी भिंत, बेटाच्या सर्व बाजूने या भिंतीने वेढले होते. आणि त्याला कुठेही भेग अथवा दरवाजा दिसत नव्हता.
अचानक त्याला स्क्रीनवर एक काळी आकृती दिसली जी या पणबुडीच्या बाजूने पोहत गेली आणि त्या भिंतीजवळ गेली. बहुतेक त्या माणसाने या पाणबुडीला एखादा मासा समजलं असावं. त्या माणसाने समोरच्या भिंतीच्या इथे जाऊन स्वतःच्या गळ्यातील एका हारातील निळ्या रंगाचा मणी दाबला. त्या बरोबर समोरच्या भिंती मध्ये एक भेग तयार झाली आणि तो माणूस पोहत त्या भिंतीमधून पार झाला. या पाणबुडीने त्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण त्या आधी तो दरवाजा बंद झाला होता.
आता राजवीर ला डोक्यात प्रकाश पडला आणि एक आशा उत्पन्न झाली की कदाचित तो त्या बेटावर जाऊ शकेल आणि कुणाच्याही नजरेस न पडता आपल्या सहकाऱ्यांच्या जवळ जाऊन त्यांना सोडवायचा प्रयत्न करू शकेल.
राजवीर ने त्याच्या खिशातून टॅम्बो चा तो हार बाहेर काढला. त्याने पाहिले तर त्या हारामध्ये पण एक निळा मणी होता आणि त्यावर समुद्राच्या लाटांचे चित्र होते. राजवीर ने हे धाडस करायचे ठरवले. त्याने ताबडतोब पाणबुड्याचा वेष चढवला, पाठीवर ऑक्सिजन चा सिलेंडर चढवला आणि त्याने पाण्यात उडी मारली. हरीश ने त्याची ती छोटी पाणबुडी बरोबर दिली होती, रस्ता दाखवायला.
टॅम्बो चा हार राजवीर ने गळ्यात घातला होता.
पोहत पोहत राजवीर त्या जागी आला जिथून दरवाजा प्रकट झाला होता. त्याने पाणबुडीकडे पाहत हरिशला इशारा केला आणि भिंतीकडे पाहत निळा मणी दाबला. त्या बरोबर भिंतीत भेग उत्पन्न झाली आणि रस्ता दिसू लागला. राजवीर पुढे जाणार एवढ्यात चुकून त्याचा हात निळ्या मण्यावरून निघाला आणि त्या क्षणाला समोरची भेग बंद झाली.
आता राजवीर ला कळले की त्याला तो निळा मणी सतत दाबून ठेवायला लागेल त्या शिवाय ही भिंत पार करता येणार नाही. राजवीर ने एका हाताने तो निळा मणी दाबून ठेवला आणि पोहत पोहत तो समोरच्या भेगेत शिरला. काही अंतर गेल्यावर त्याला समोर पाण्याचा एखादा पडदा असावा असे दिसायला लागले आणि काही समजायच्या आत तो पाण्यातून बाहेर पडला होता. त्याने उभं राहून पाहिले तर त्याला वरती अजूनही समुद्र दिसत होता, मागे अजूनही समुद्र दिसत होता पण आता तो जिथे उभा होता तिथे पाणी नव्हते. त्याने लगेच तो पाणबुड्याचा वेश काढून तिथल्याच एका दगडाखाली लपवून ठेवला. टॅम्बो ची माळ मात्र त्याने बरोबर ठेवली होती. आणि गरज पडलीच तर असावी म्हणून एक छोटी पिस्तुल त्याने बरोबर ठेवली होती.
जसा जसा राजवीर पुढे गेला तसा तसा त्याला वरचा समुद्र जवळ येतो आहे असे जाणवले आणि काही क्षणात तो समुद्राच्या काठावर उभा होता. आता त्याला त्याच्या मागे कोणताही रस्ता किंवा भिंत दिसत नव्हती. त्याला अचानक काही आवाज ऐकू येऊ लागले. राजवीर धावत जाऊन एका दगडामागे लपला. त्याला आठवले की टॅम्बो ने स्वतःच्या माळे वरील लाल मणी दाबला आणि त्याला राजवीर च्या भाषेत संवाद साधता आला होता आणि राजवीर चे बोलणे त्याला समजत देखील होते.
राजवीर ने त्या टॅम्बो च्या माळे वरील लाल मणी दाबला आणि आता त्याला समोर दिसणाऱ्या माणसांचे बोलणे स्वच्छ ऐकू येऊ लागले. ते काल झालेल्या प्रकाराचीच चर्चा करत होते. त्यांच्यातील एक जण म्हणत होता की टॅम्बो ने आता हा आततायी पणा सोडायला हवा, बाहेरच्या जगाशी आपण संपर्क साधला पाहिजे, त्यांना आपण आपल्याबरोबर समानतेने राहू दिले पाहिजे. पण त्याच्याबरोबरचा दुसरा माणूस मात्र यावर काही ऐकत नव्हता, तो मात्र टॅम्बो कसा बरोबर वागला हेच पटवून देत होता.
राजवीर ने विचार केला, आता रिस्क घेतलीच आहे तर या पहिल्या माणसाशी आपण बोलले पाहिजे. कदाचित तो आपल्याला मदत करेल.
राजवीर ने वाट पाहिली की हा एकटा कधी सापडेल ते पण दोघंही त्यांचे बोलणे झाल्यावर जंगलात निघून गेले. राजवीर परत विचार करत बसून राहिला. अचानक त्याच्या कानावर शब्द आले, “इथे बसून काही होणार नाही, तुला तुझ्या माणसांपर्यंत जायचे असेल तर माझ्या मागून ये”
राजवीर ने चमकून पाहिले तर तोच मगाचचा माणूस हसत उभा होता आणि राजवीर शी बोलत होता, “मी मगाशीच तुला पाहिले होते पण माझा मित्र बरोबर होता आणि त्याने जर तुला पाहिले असते तर सरळ टॅम्बो कडे नेले असते म्हणून मी त्याला घेऊन इथून निघून गेलो”
राजवीर उठून उभा राहिला आणि म्हणाला, “थँक्स, मला मदत करायला आल्याबद्दल, पण तुम्हाला काही यातून धोका नाही ना?”
तो माणूस बोलला, “नाही अजिबात नाही, मी बाकीच्यांसारखा दिसत असलो तरी त्यांच्यासारखा नाही. मी मॅम्बो, टॅम्बो चा सख्खा लहान भाऊ, माझ्या भावाचे वागणे मला मान्य नाही म्हणूनच मी तुम्हाला मदत करतो आहे. कदाचित मी माझ्या भावाच्या विचारांमध्ये बदल नाही घडवून आणू शकणार पण माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न करेन की तुम्ही तुमच्या साथीदारांना घेऊन इथून जाऊ शकाल”
राजवीर अजून काहीही न बोलता मॅम्बो च्या मागोमाग चालायला लागला. ते दोघेही चालत जंगलातून जात होते. मॅम्बो ने त्याच्या कडील एका यंत्रातून राजवीर वर एक रसायन फवारले होते, आणि ज्यामुळे राजवीर वर त्या रसायनाचा एक पातळ थर तयार झाला होता. राजवीर ने विचारले की हे काय आहे तर मॅम्बो म्हणाला की, ” हे प्रकाशशोषक द्रव्य आहे, आपल्या डोळ्यांना एखादी वस्तू तेव्हाच दिसते जेव्हा त्या वस्तूवर आपटून आलेला प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडतो. या द्रव्यामुळे प्रकाश तुझ्यावरून परावर्तीतच होणार नाही आणि त्याचमुळे तू कुणालाही दिसणार नाहीस. अगदी मला सुद्धा. त्यामुळे मी जिथे जाईन तिथे तू माझ्या मागून येऊ शकशील.”
राजवीर साठी हे सर्वच अतर्क्य आणि एखाद्या साय-फाय चित्रपटात शोभेल असे होते. तो काहीही न बोलता मॅम्बो च्या मागे निघाला. दोघेही जंगलातून चालत बरेच अंतर गेले, आता ते आदल्या दिवशी दिसलेल्या पठाराच्या दुसऱ्या टोकाला उभे होते. मॅम्बो ने तिथे एका ठिकाणी आपला हात ठेवला आणि त्या बरोबर एक गुहा त्यांच्यासमोर प्रकट झाली.
राजवीर आणि मॅम्बो दोघेही त्या गुहेत शिरले. थोडे अंतर पार केल्यावर राजवीर च्या लक्षात आले की ते एका अत्यंत अत्याधुनिक इमारती च्या बाहेर उभे होते.
मॅम्बो ने राजवीर कडे वळून त्याच्या नावाने हाक मारली आणि राजवीर ने उत्तर दिल्यावर त्या दिशेला वळून सांगितले की “या इमारती मध्येच तुझे साथीदार आहेत आणि या आधी पकडलेले सर्व इतर लोक देखील. ते सर्वजण दुसऱ्या मजल्यावरील मागच्या बाजूच्या खोल्यांमध्ये आहेत. याच्या पुढे तुला एकट्यालाच जावे लागेल. आणि तेही लपत छपत कारण आतमध्ये इन्फ्रारेड कॅमेरे आहेत आणि हिट सेन्सिटिव्ह कॅमेरे देखील. त्या मध्ये तू दिसशील. हे रसायन मानवी डोळ्यांना तू दिसणार नाहीस याची काळजी घेते पण या कॅमेरा पुढे ते चालणार नाही. एक लक्षात ठेव, जर का सायरन वाजला तर दुसऱ्या मजल्यावर यायला पहारेकर्यांना 4 मिनिटे लागतात फक्त, त्या मुळे तुला जे काही करायचे आहे ते त्या चार मिनिटात कर”
राजवीर ने मॅम्बो चे आभार मानले आणि त्याला सांगितले की “तुला शक्य झाले तर एक बोट तू समुद्र किनाऱ्यावर तयार ठेव आणि मला तू या इमारतीच्या मागच्या बाजूला बरोबर 2 तासांनी भेट.” मॅम्बो तयार झाला आणि निघून गेला. तो जात असतानाच राजवीर ने मॅम्बो कडील ते रसायन फवारणारे यंत्र घेतले.
आता राजवीर ने त्या इमारतीचे निरीक्षण केले. संपूर्णपणे दगडाने ती इमारत बांधली होती. पण सर्व अत्याधुनिक सुविधा त्या मध्ये होत्या. तेवढ्यात त्याचे लक्ष इमारतीच्या बाजूला गेले. तिथे काही बांधकाम चालू होते आणि बिल्डिंग च्या त्या बाजूला बांधकाम करण्यासाठी लावतात तशा बांबूच्या पराती लावल्या होत्या. राजवीर हळू हळू त्या बिल्डिंग च्या जवळ गेला. तिथे पडलेला एक छोटा बांबू त्याने घेतला आणि राजवीर हळूच त्या परातींवर चढला आणि कुणाचाही लक्षात येण्या आधी तो दुसऱ्या मजल्यावरील पॅसेज मध्ये उतरला. त्याला लक्षात आले की तो जिथे उतरला तिथेच वरती कॅमेरा होता आणि त्या कॅमेरा ने राजवीर ला बरोबर टिपले. क्षणात सगळीकडे सायरन वाजू लागला आणि पहारेकरी धावू लागले. राजवीर सुद्धा धावत बिल्डिंग च्या मागील बाजूस असलेल्या खोल्यांच्या इथे गेला आणि धावत जाऊन त्याने त्या खोल्यांच्या पहारेकर्यांच्या डोक्यात बांबू ने प्रहार केला. त्याने ताबडतोब त्यांच्या कडील चाव्या घेऊन सगळ्या खोल्या उघडल्या आणि सर्वांना मुक्त केले. हर्षल आणि पराग बरोबरच बाकीचे त्याचे 12 सहकारी तसेच त्या आधीच्या हेलिकॉप्टर मधील चौघे असे एकूण 18 जण त्या खोल्यांमध्ये बंद होते. त्या सर्वांना कळतच नव्हते की त्यांना कोण सोडवतंय ते. राजवीर ने हर्षल ला हाक मारून आपली ओळख दिली आणि त्याला सांगितले की सर्वांना एकत्र उभं कर. सर्वांना एकत्र उभं केल्यावर त्याने त्या 18 जणांच्या अंगावर ते रसायन फवारले आणि सर्वांना पॅसेज मधील खिडकी च्या इथे यायला सांगितले. सर्व जण निघाले तेवढ्यात त्यांना पॅसेज च्या दुसऱ्या बाजूने पहारेकरी येताना दिसले. राजवीर ने सर्वांना कोणताही आवाज न करता भिंतीपाशी उभे राहायला सांगितले.
ते पहारेकरी धावत आले आणि या सर्वांच्या बाजूने निघून गेले त्या खोल्यांच्या दिशेने.
राजवीर ने सर्वांना खिडकीतून त्या परातींच्या साहाय्याने खाली उतरवले. आणि सर्व जण खाली उतरले आहेत याची खात्री करून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने सर्व जण निघाले.
पण जसे ते समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचले तेव्हा त्यांनी पाहिले की टॅम्बो त्याच्या सैनिकांना घेऊन उभा होता. मॅम्बो ला त्यांनी बांधून ठेवले होते. आणि ते त्याला जाब विचारत होते की त्यांनी गद्दारी का केली म्हणून.
राजवीर ने पाहिले की तिथेच जवळच एक बोट उभी आहे आणि त्याने सर्वांना आवाज न करता बोटीवर जायला सांगितले, हर्षल ला ऑर्डर दिली की सर्वांना घेऊन आपल्या जहाजाच्या दिशेने जा म्हणून. त्या प्रमाणे सर्व जण गेले आणि मग राजवीर धावत टॅम्बो च्या दिशेने गेला. तिथे गेल्यावर त्याने सर्वप्रथम पाण्याने आपल्या शरीरावरील ते रसायन धुतले आणि टॅम्बो समोर उभा राहिला.
राजवीर ला बघून टॅम्बो चकित झाला. म्हणाला , “कॅप्टन, तुम्ही इथे..!!!”
राजवीर म्हणाला की , ” मॅम्बो ने गद्दारी केली तुझ्याशी ती मला मदत करण्यासाठीच, तेव्हा तुझा खरा गुन्हेगार मी आहे, जी काही शिक्षा करायची असेल ती मला कर. पण मॅम्बो ला सोडून दे.”
टॅम्बो बोलला, “कॅप्टन मला माहित होतं की तू असा परत जाणार नाही म्हणून, कारण तुझ्यातील माणुसकी अजून शिल्लक आहे. तुला काय वाटलं की तू माझ्या गळ्यातील हार घेतलास ते मला कळलं नाही, मला लगेच कळलं होतं ते पण मला उत्सुकता होती की तू काय करतोस ते बघायची. म्हणूनच मी तुला तो हार घेऊन दिला. तो हार जो आहे त्या मध्ये ट्रॅकिंग डिव्हाईस पण आहे त्यामुळे तू कुठे कुठे काय काय करतो आहेस हे सर्व मला आणि माझ्या भावाला मॅम्बो ला माहीत होते.”
“मॅम्बो तुला भेटला ते माझ्याच सांगण्यावरून, माझी पण इच्छा आहे की बाह्यजगाशी आता संपर्क साधायची वेळ आता आली आहे पण मला फक्त बघायचं होत की बाह्यजगात अजूनही इमानदार लोक आहेत की नाही ते. आजपासून आम्ही बाह्यजगासाठी आमच्या टापूचे दरवाजे उघडत आहोत. आम्हाला खात्री आहे की जो पर्यंत या जगात तुझ्यासारखे इमानदार लोक आहेत तो पर्यंत आम्हाला कुठलाच धोका नाही.”
“अजून एक लक्षात ठेव कॅप्टन, अक्रूर जसा तुझा मित्र आहे तसेच या टापू वर देखील तुझे टॅम्बो आणि मॅम्बो नावाचे दोन मित्र आहेत”
असे म्हणून टॅम्बो ने एक पेटी उघडली आणि राजवीर ला एक घड्याळसदृश्य वस्तू दिली. टॅम्बो पुढे बोलला, “राजवीर हे घे , आमच्या मैत्रीची एक छोटीशी भेट. हा एक कॉम्पॅक्ट टेलिपोर्टर आहे, याच्या मदतीने तू जगात कुठेही एका क्षणात जाऊ शकतोस.”
राजवीर ने आनंदाने ती भेट स्वीकारली. तो टेलिपोर्टर त्याने आपल्या हातावर बांधला आणि त्यावरील कळ दाबून तो INS सातपुडा वर परत आला. इकडे हर्षल आणि बाकीचे सहकारी देखील सातपुडा वर पोहचले होते. आता राजवीर ने आपल्या नौदल मुख्यालयाला कॉल लावला आणि सांगितले की “भूतीया टापू वरून चार सैनिकांना सोडवले आहे, हेलिकॉप्टर काही मिळाले नाही, बहुदा समुद्रात बुडाले असेल. आणि त्या बेटावरील आदिवासींशी देखील संपर्क झाला आहे, ओव्हर अँड आऊट”
समाप्त
– स्वानंद गोगटे


