“जावयाला जावई येतो तेव्हा”

“गौतमने अचानक सांगितलंय नं पार्टीचं ? मग काही तोशीस घेऊ नको. सरळ ॲानलाईन ॲार्डर कर तू नेहा ! एकटी काय काय करशील ? उग्गंच दमू नकोस  !काय म्हणतोय मी ? हांss!”
 
निनादचा चढा स्वर नि पाठोपाठ त्याने धाडकन रिसिव्हर ठेवल्याचा आवाज मला कीचनमध्ये स्पष्ट ऐकू आला. खरं तर लेकीबरोबरचा त्याचा सगळा संवादच ऐकू आला. 
 
अर्थात ह्या इकडच्या एका साईडचा बर्रका !! कीचनमध्ये, हात कामात नि कान संवादात * ही कला लग्नानंतर माझ्यासारख्या एकत्र कुटुंबात रहाणाऱ्या  सासुरवाशिणी सहज आत्मसात करतात. त्यामुळे पलिकडच्या साईडच्या व्यक्तीचं काय म्हणणं असेल ह्याचा अंदाज लावण्यातही तरबेज होतात. ( घरगुती राजकारणात *तग धरायला हे *नैपुण्य * अत्यावश्यकच)
आत्ताही तस्संच झालं.
नेहाचं बाबाशी गूळपीठ असलं तरी मीही तिची निपुण आई असल्याने पलिकडून ती बोललेल्याचा अंदाज लावणं तितकसं कठीण गेलं नाही.
 “अहो, हे घेताय नं थोडं !” मी हातातला कप निनादसमोर धरत म्हटलं.
 “ काs य्यै हे s??” सूरात तिरसटपणा पूर्ण भरलेला. 
 “ नारळाचं थंडगार पाणी आहे. मगाशी नारळ फोडला तेव्हाच फ्रीजमध्ये ठेवलं होतं पाणी गार करायला. घ्या थोडं , म्हणजे राग अंमळ शांत होईल.”
 “राsग म्हणजे ?? मी काय उगाचच चिडणारे का ??”
 “ छे ब्वाॅ !! असं होणारच नै”.
 (ही आपली  उगाचच प्रतिक्रिया दिली मी.  नवरे बरोबर कारणामुळेच रागावतात अशी थिअरी नसतेच खरंतर ! पण .. रिॲक्शन पण तानमान बघूनच द्याव्या लागतात नं!)
 “आधी इथे यायचं ठरलेलं होतं नं, मग अचानक पार्टीचं कसं काय ठरवलं गौतमनं ? ह्याचं कायमच सगळं अनिश्चित कसं म्हणतो मीss! विकेंडला जरा आराम मिळाला असता पोरीला. तो तर नाहीच्च ! उलटा डोक्यावर कामाचा रगाडा“.
 “ तुम्हाला अनिश्चितता काही नविनै का?”
आमच्या लग्नानंतरच्या लगेचच्या काही वर्षातल्या निनादच्या अनेक बेतांची (ठरल्यानंतर बदललेल्या ) आठवण माझ्या चेहऱ्यावर उमटलीच नकळत.
 “आता तुझे टोमणे ठेव बाजूला जरा. विषय नेहाचा चालू आहे नं?
तिला थोडा आराम हवा ही कन्सेप्ट कशी डोक्यात शिरत नाही ह्या बोवाजीच्या ”.
 “अरेच्चा, ही नविनच संकल्पना दिसतीये.  की तुझी लाडाची लेक म्हणून नव्याने उगम पावलेय तुझ्या डोक्यात ? नाही म्हणजे, नेहा लहान असतांना माझ्या आईकडे जायचा आमचा दोघींचा बेत अनेकदा रहित करावा लागल्याचं स्मरतंय मला. नेहाला परिचित आहेत ह्या गोष्टी”.
कितीही हलकंफुलकं सांगायचं ठरवलं तरी आजही त्यावेळच्या नाराजीचा व्रण माझ्या सूरात उतरला नकळत.
 “आता, त्या जुन्यापान्या गोष्टी आठवून मला जाब विचारायचा बेत असेल तुझा तर तो शुध्द वेडेपणा आहे, येतंय का ध्यानाsत ?”!   “जाssब  ?नाही ब्वाॅ ! ती तर वेळीच विचारण्याची * बाब* आहे. ध्यानातै माझ्या पण…
सांगण्याचा मुद्दा हा की , * अचानक सासूबाईंनी त्यांच्या मैत्रिणींना बोलावणं,* कोणाला तरी केळवण म्हणून सहकुटुंब जेवायला बोलावणं इत्यादी गोष्टी घडतांना पाहिल्यायत की नेहाने !! आणि *काम करत राहिल्याने काssही बिघडत नाही.विकेंडला एकदा तरी आराम हवा हे वाक्य म्हणजे शुध्द वेडेपणा * असं ऐकत आलेय मी , * ध्यानात * आहे माझ्या. 
खरंतर ध्यान तुमचं विचलीत झालंयसं वाटतं.”
 “ मssग बरोबरचै !! लेकीबरोबर चांगल्या गप्पा झाल्या असत्या, त्यानिमित्ताने घरातही चांगलंचुंगलं खायला काहीतरी केलं असतंस !
दुसऱ्या दिवशी गौतम आला असता न्यायला लेकीला तर थोडा संवादही वाढला असता आमच्यातला. सग्गळ्या बेतावर पाणी पडलं मग विरस नाही होणार?”
 ‘नेहा आल्याच्या निमित्ताने……’
 म्हणजे अजून माहौल म्हणावा तितका शांत न झाल्यामुळे, ’जणू काही एरवी काही खास केलंच जात नाही’ ह्या अर्थाच्या खडूस वाक्याकडे दुर्लक्ष करावंच लागलं अस्मादिकांना.
 “ होय हो,  विरस होतोच ! मी कैकदा घेतलाय अनुभव.”
 
 “ओके ! ओके!! नो मोअर टाॅन्टींग!
आता एकदम गांभिर्याने सांगते.
असं बघा, कदाचित् तुमच्याएवढाच विरस लेकीचाही झाला असेल आणि तितकंच गौतमला नाराज करणंही तिला शक्य नसेल. पण ही सिट्युएशन तिची तिला हॅण्डल करू देत की ! आपण त्यात पडून उलटसुलट सल्ले देणं योग्य नाही.
हे झालं माझं मत. तुम्ही शांत झालात की तुम्हालाही पटेल बहुतेक !”
 “तू काही म्हटलंस तरी मी पाह्यलंय, एकंदरीत जावयाला आपल्याशी बोलण्यात काही रस नसतोच तितका ! “
 
 काहीही न बोलता माझी पावलं कीचनकडे वळली. काय बोलणार ? 
 माझ्या आईबाबांशी निनादचा वादविवाद कधीच झाला नाही पण ‘जावयाला आपल्याबरोबर मनमोकळा संवाद करायची आस  कधी लागली नाही’ ही खंत त्यांना  कायम राहिली.
हरप्रकारे प्रयत्न करूनही नातं जिथल्या तिथे राहिलं . ओघवतं झालंच नाही.
 
लग्न ‘दोन कुटुंबानाही जोडतं’ असं म्हणतात. नात्यातल्या मर्यादांच्या खत-पाण्यात अनेकदा ती जोड वृध्दिंगत होतांना आढळत नाही.
* अर्थात् अपवाद नक्कीच असतील.*
 तोच  ‘जावई-निनाद’  भूमिका बदलून ‘सासरा’ काय झाला नि सगळा चष्माच बदलला की हो!!
मला गंमत वाटते ती ह्या नव्या भूमिकेमुळे बदललेल्या दृष्टिकोनाची !!
 ‘हां ! आता करावं तसं भरावं हा नियमच आहे मुळी ! क्या समझे निनाद बच्चमजी!
 माझाच माझ्याशी मनातल्या मनात संवाद झाला. नि … डोक्यात मात्र विचार सुरू झाले,
काहीतरी *चांगलंचुंगलं * करण्याचे हो !!
 
 ©️ अनुजा बर्वे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu