एव्हरग्रीन साडी – या साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच हव्यात !!!
साडी ही खरी भारतीय स्त्रीची ओळख. इतर देशातल्या स्त्रियांनी आपल्या देशातले पारंपरिक पोशाख सोडून स्कर्ट , पॅन्ट, शर्ट इ पाश्चिमात्य पोशाखांचा स्वीकार केला असला तरीही भारतात अजूनही साडी आऊट ऑफ फॅशन झालेली नाही. आज धावपळीच्या कामांमुळे स्त्रिया पंजाबी सूट्स , शर्ट पॅन्ट इ. रोज ऑफिसला जाताना वापरत असल्या तरीही सणावारांना , समारंभाला साडी हीच त्यांची पहिली पसंती असते. आजही भारतात अधिक पेहराव असलेला पोशाख म्हणजे साडीच आहे . शिवाय तरुण मुलींमध्येही साडीची क्रेझ भरपूर दिसून येते.
साड्या नेसण्याच्या विविध पद्धती भारतात प्रांतवार प्रचलित आहेत. महाराष्ट्रात नऊवारीचा काष्टा घालून नेसलेली साडी , तर गुजरात मध्ये गुजराती पद्धतीची साडी तर बंगाल मध्ये किल्ल्यांचा जुडगा पदराला बांधून खांद्यावर मिरवण्याची निराळी पद्धत !!
प्रत्येक प्रांतानुसार साड्या बनवण्याच्या पद्धतीत ही बदल होत जातो. बहुतांशी साड्या सुती आणि रेशमी धाग्यांनी विणल्या जातात तरीही त्यावरील नक्षीकाम, कलाकुसर आणि ती विणण्याची पद्धत प्रत्येक प्रांतानुसार बदलत जाते. पारंपरिक साड्यांचे अनेक प्रकार आहेत. उदा. महाराष्ट्रात सर्वात प्रचलित असणारी आणि सर्वांची लाडकी आणि स्टेटस सिम्बॉल म्हणूनही वापरली जाणारी पैठणी, तामिळनाडू मधील कांजीवरम, माळवा येथील माहेश्वरी , बंगाल ची जामदनी,गुजरातची पटोला,बांधणी , बनारसची बनारसी शालू एक ना अनेक अशा प्रत्येक प्रांताची खासियत असणाऱ्या साड्या आपल्याकडे असाव्यात असं प्रत्येक स्त्रीला नक्कीच वाटत असेल. नुसत्या सुती नव्हेत तर जॉर्जेट , शिफॉन ,कॉटन ,सिल्क अगदी जूट च्या सर्व प्रकारच्या साड्या महिलावर्गाची पहिली पसंती !! त्यात हिंदी , मराठी सिनेमातील हिरोइन्स नि घातलेल्या साड्या फॅशन म्हणून घालणे हे तर तरुणीचे सर्वात आवडते काम! याला बॉलीवूड साड्यांचा ट्रेंड असेही म्हणता येईल. साड्यांच्या या वेगवेगळ्या प्रकारांची थोडी माहिती इथे तुमच्यासाठी देत आहोत.
महाराष्ट्रातील पैठणी :
पैठणी म्हणजे महाराष्ट्रातला भरजरी , पारंपरिक वस्त्रप्रकार. पैठणीची खासियत म्हणजे गर्भरेशमी, संपूर्ण जरीचा पदर , रुंद व ठसठशीत वेलबुट्टीचे काठ ज्यात दोन्ही बाजूनी एकसारखी वेलबुट्टी असते. जुन्या काळात पैठणी हे नववधूचे वस्त्र म्हणून मानली जायची. हि श्रीमंतांची मिरास म्हणून मानली जायची कारण त्यावेळी ती त्यांनाच परवाडयाची. कारण पैठणी तयार करायला वेळ बराच लागे आणि ती वैशिष्ट्यपूर्ण असायची. पैठणीचा रंग, त्यावरची नक्षी, त्यातील सोने-चांदीचा वापर, रंग या साऱ्यांमुळे पैठणीचे सौंदर्य खुलून यायचे.जुनी पैठणी सोळा हात लांब व चार हात रुंद असायची. तिच्या काठापदरावर वेलबुट्टी किंवा पशुपक्ष्यांच्या प्रतिमा असत व तिचे वजन साडेतीन शेरापर्यंत म्हणजे सुमारे तीन किलो तीनशे ग्रॅम बसायचे. एका पैठणीसाठी साधारणत: बावीस तोळे चांदीबरोबर सहा, आठ, बारा व क्वचित अठरा मासे म्हणजेच सुमारे १७.४ ग्रॅम सोने वापरण्यात येई. बारामासी, चौदामासी, एकवीसमासी यांसारख्या नावांनी पैठणीचा प्रकार, दर्जा व किंमत ठरवण्यात येई. १३० नंबरचे रेशीम वापरलेल्या छत्तीसमासी पैठण्या राजघराण्यात गेल्याची नोंद जुन्या कागदपत्रांत आढळते. फूल, पाने आणि नदी यांच्या नक्षीकामाच्या पैठणीला आसवली, रुईच्या नक्षीला रुईफुल, चौकोनी फुलांच्या नक्षीला अक्रोटी असे म्हटले जाते.
राजहंसाचा पदर असलेली पैठणी म्हणजे राजेशाही मानली जाते. इतकेच नव्हे तर पैठणीच्या रंगांनुसारही तिला नावे दिली आहेत. पिवळ्या रंगाच्या पैठणीला सोनकळी, काळ्या रंगाच्या पैठणीला चंद्रकळा, गुलाबी रंगाच्या पैठणीला राणी तर कांद्याच्या रंगाच्या पैठणीला अबोली असे म्हटले जाते. या रंगांखेरीज अंजिरी, सोनकुसुंबी व दुधी या रंगांचाही वापर करण्यात येई.
पैठणीमध्ये आधुनिक काळात सेमी पैठणी, सिंगल पदर, डबलपदर, टिश्यू पदर आणि रिच पदर असे पाच प्रकार दिसून येतात. त्याशिवाय पदर व काठ यांच्या विशिष्ट नक्षिकामानुसार मुनिया ब्रॉकेड व ब्रॉकेड असे वर्गीकरण केले जाते.पैठणी साडीची किंमत अडीच हजार रुपयांपासून तीन लाखांपर्यंत असते.
पैठणीच्या साड्यांबरोबर हल्ली ड्रेस मटेरियल, कुर्ते, जॅकेट्स, परकर-पोलके; एवढेच नव्हे तर पैठणीचे दुपट्टे, टाय आणि क्लचही मिळू लागले आहेत. नऊवारी पैठणीचीही क्रेझ पुन्हा आली आहे.
शुद्ध रेशीम, आकर्षक डिझाइन आणि हस्तकला हे पैठणीचे वैशिष्ट्य. त्यामुळे पैठणीचा निर्मितिखर्च वाढतो. पैठणीची किंमत चार ते पाच हजारांपासून सुरू होते, तर डुप्लिकेट पैठणीत सिंथेटिक धागा वापरला जातो. रेशीम तीन ते चार हजार रुपये किलो असते तर सिंथेटिक धाग्याची किंमत रेशमाच्या तुलनेत एक दशांश इतकी असते. त्यामुळे अस्सल पैठणी बनवायला लागणार वेळ आणि त्यातील वापरले जाणारे घटक यामुळे तिची किंमत वाढते पण किंमत जास्त असली तरी तिची सर डुप्लिकेट पैठणीला येणार नाही हे नक्की !
बांधणी :
बांधणी हा पश्चिम भारतातल्या साड्यांचा एक वेगळा प्रकार आहे. यात कोणताही वेगळ्या प्रकारचा धागा किंवा भरतकाम केले जात नाही तर सुटी कपड्याला विशिष्ठ प्रकारे धाग्याने बांधून , गाठी मारून तो वेगवेगळ्या रांगांमध्ये बुडवला जातो. त्यामुळे जे डिझाईन तयार होत त्याला बांधणी म्हणतात. हि डिझाइन्स खूप छान व वैशिष्ट्यपूर्ण दिसतात.
तामिळनाडू मधील टेम्पल बॉर्डर साडी :
तामिळनाडूमध्ये बनणाऱ्या या साड्यांवर तेथील देव देवतांच्या प्रतिमांच्या समृद्धी व सुबत्तेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हत्ती , मोर अशा पशु पक्ष्यांच्या वेगवेगळ्या डिझाइन्स आढळतात. या साड्या साधारणतः: चॉकलेटी, राखाडी, ऑफ व्हाईट , पिवळा अशा रंगात आढळतात.
बनारसी साडी : शालू
बनारसी साडी किंवा शालू याची लोकप्रियता इतकी आहे की लग्नात नववधूने शालू नेसूनच बोहल्यावर उभे राहायचे हा अलिखित नियमच आहे कि काय असे वाटायला लागते. याला कारणही तसेच आहे. बनारसी साड्यांमधील फुला पानांच्या जरीने विणलेल्या वेलबुट्ट्या , नाजूक बुट्टे , जरीचे काठ , उत्तम कापड, उत्तम रंगसंगती अशी या साड्यांची खासियत. बनारसी साडी ही मुख्यता सिल्क, ऑरगेंझा आणि जॉर्जेट मध्ये तयार केली जाते.मोगलांच्या राज्यात ह्या साडयांना लोकप्रियता मिळाली त्यामुळे बनारसी साडयांवर राजस्थानी आणि पर्शियन डिसाईन्स सुध्दा दिसतात. एक साडी विणायला साधारण तीन कारागीर लागतात. पहिला पदर मुख्यता साध्या हातामागावर विणला जातो. एका साडीसाठी पंधरा दिवस ते एक महिना सुध्दा लागू शकतो.
कांजीवरम साडी :
कांजीवरम किंवा कांजीपूरम साडया ह्या बंगलोर जवळच्या कांची गावाचे वैशिष्टय. ह्या साडया भडक रंगात विविध रंगीत धाग्यात विणल्या जातात. पदरावर पौराणिक गोष्टी, मंदीरे आणि पेंटींग्सचा वापर केला जातो. या साड्या खास धार्मिक व लग्नासारख्या मोठ्या प्रसंगात वापरल्या जातात. इतर साड्यांच्या तुलनेत जाड व घट्ट पोत, वैषिठ्यपुर्ण काठ व लफ्फेदार पदर हि या साड्यांची खासियत. साडीच्या डिसाईननुसार एक साडी पूर्ण करायला १५-२० दिवस लागू शकतात. साडीवरच्या जरीकामानुसार २००० पासून ते १०००० पर्यंत साडीची किंमत असू शकते.
पोचमपल्ली:
आंद्रप्रदेशातल्या पोचमपल्ली गावात पोचमपल्ली साडीचा उगम झाला. इथल्या विणकरांनी इक्कतच्या भौगोलिक डिसाईनचा वापर साडीत केलाच पण आता भारतातल्या वेगवेगळ्या साडयांच्या डिसाईन्सचाही उपयोग केला जातो. ही इक्कत कला पोचमपल्लीत १९१५ साली आणली गेली. पोचमपल्लीच्या साडया मुख्यता रेशीम आणि कॉटन मध्ये तयार केल्या जातात.
दक्षिण भारतीय साड्यांचे अनेक प्रकार आहेत त्यातील वर दिलेले कांजीवरम आणि पोचमपल्ली तर प्रसिद्ध आहेतच शिवाय इतरही जसे म्हैसूर क्रेप , धर्मवारम, नारायणपेठ , टेम्पल बॉर्डर इ. अनेक साड्या स्त्रियांच्या खास पसंतीच्या आहेत.
कोटा जाळी :
कोटा साडी ही उत्तर भारतातील एक साडीचा प्रकार आहे. यातील विशिष्ठ प्रकारच्या विणकामामुळे व वेगळ्या धाग्यामुळे ह्यात आपसूकच चौकोनी जाळीची डिझाईन तयार होते त्यामुळे हि जाळीदार दिसते व हवा खेळती राहते. तसेच ही साडी वजनाला हलकी असल्यामुळे उन्हाळ्यात वापरायला ही उत्तम पर्याय आहे.
महेश्र्वरी साडी:
महेश्र्वरी साडीचे मूळ हे इंदोर जवळचे महेश्र्वर. महेश्र्वर हे राणी आनंदीबाईंचे गाव. त्यांना इंदोरच्या शहरी जीवनापासून शांतता हवी असल्यामुळे त्यांचा राजवाडा महेश्र्वर येथे होता. फळांच्या रंगाशी मिळत्याजुळत्या असणा-या ह्या साडीवर आजही आनंदीबाईंच्या राजवाडयाचे आणि मंदीरांचे जरीकाम केले जाते. पूर्वी ह्या गर्भ रेशमी महेश्र्वरी साड्या राजघराण्यातल्या स्त्रिया वापरत. परंतू आता त्या सामान्यांच्या आवाक्यात बसतील अश्या किंमतीतही उपलब्ध आहेत.
चंदेरी साडी:
मध्यप्रदेशमधील चंदेरी हे चंदेरी साडीचे मूळ गाव. ही साडी वजनाला अतिशय हलकी त्यामुळे उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त ठरते. मोहक रंगावर नाजूक चंदेरी महालाचे आणि मंदीराचे डिसाईन, वेलबुट्टी आणि बारीक बॉर्डर साडीला आकर्षक बनवतात. आजच्या आधुनिक तंत्राच्या युगातही चंदेरी साडीचे वैशिष्टय आणि कला एका पिढी पासून दुस-या पिढीपर्यंत हातमागावरच शिकवली जाते. रंग आणि डिसाईन्ससाठी सतत निर्सगाच्या चित्रांचा वापर केला जातो.
पूर्व भारतीय साड्यांमध्ये कलकत्ता साडी, कांथा वर्क केलेली कांथा साडी , बालुचेरी , बोमकाई साडी असे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत.
कांथा साडी :
खरतर कांथा हा वस्त्राचा प्रकार नसून साडीवर केलेल्या भरतकामाचा प्रकार आहे. सुती, रेशमी एवढेच नव्हे तर सिंथेटिक कापडावर साधा धावदोरा आणि रंगीत धाग्यांच्या साहाय्याने पाने , फुले, पशु पक्षी , मानवी आकृत्या , लोककलांमधले प्रसंग अशा विविध डिझाइन्सनी भरतकाम केले जाते. या साड्या संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत.
बोमकाई साडी , संबळपूरी साडी :
बोमकाई आणि संबळपूरी साड्या या ओडिशाची खासियत आहेत. संबळपूरी साडी सुती, रेशमी आणि टसर या तीनही प्रकारात मिळते.
तांत साड्या :
या सद्य सुती ,रेशमी कापडाने विणलेल्या असतात. त्यांचे रंग व डिझाइन्स अतिशय नेत्रसुखद असतात. कॉटनच्या साड्या नेसणाऱ्या स्त्रियांची पहिली पसंती या साडया असतात.
बालुचेरी साडया :
बालूचेरी साड्या ह्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात हातमागावर विणल्या जातात. ह्या साड्यांच्या पदरावर रामायणातल्या कथांच्या प्रसंगाची चित्रे विणलेली असतात व पदराच्या काठावर फुलपानाची नक्षी , बारीक बुट्टे अशी कलाकुसर केलेली असते. यात साधारणतः लाल , जांभळे , निळे अशा रंगांचे रेशीम साडी विणण्यासाठी वापरले जाते.
– चंदा वि. मंत्री
[email protected]
Image Courtesy : Google