इलेक्शनच्या रिंगणात आवडा – प्रा. भास्कर बंगाळे
नवी नवरी म्हणून आवडा नारबाच्या घरी नांदायला आली तवा नारबाकडं काय व्हतं? साधं घरसुद्धा निट नव्हतं. आवडानंच ते दुरूस्त करून चांगलं छप्पर तयार करून घ्यायला भाग पाडलं. नारबा रोज कामालासुद्धा जात नव्हता. आठवड्यातनं तीन-चार दिवस जायचा आन बाकीचं दिवस बसून खायचा. आवडानं त्याला रोज कोणाच्यातरी शेतावर मजूर म्हणून कामाला जायला भाग पाडलं. त्याला कामाला लावला.लहानपणीच वडिलांच छत्र हरवलेल्या नारबाला म्हातारीन तळहाताच्या फोडावाणी सांभाळला. वाढवला. लहानाचा मोठा केला. दुधा-तुपाचा घास नसेना का पण चटणी भाकरी कधी कमी पडू दिली नाही. गरिबीत वाढवलेल्या देवभोळ्या नारबाचं आपल्या सारख्याच गरिबा घरची पोरगी बघून लग्न केलं आणि आवडा सून म्हणून घरात आली.
सुनमुख बघीतलं आणि त्या आनंदातच थोड्याच दिवसात तिनं जगाचा निरोप घेतला. आवडाची सोबत गेली. नवरा-बायकोचा सुखाचा संसार असावा असं तिला मनोमन वाटायचं. नवरा बायको म्हणजे संसाराची दोन चाकं! ती समान असली पाहिजेत. समान चालली पाहिजेत. एकजरी चाक लेचंपेचं असलं तर संसार सुखाचा होत नाही. दोघांनीही कष्ट करावे, पैसे कमवावेत आणि सुखाचा संसार करावा. याची जाण आवडाला होती.
लग्नापर्यंत परकरात शेळ्या राखत फिरलेल्या आवडाला दुसऱ्याच्या शेतात काम करायचे माहित नव्हते. आता नवऱ्याच्या रोजगाराला हातभार तर लावला पाहिजे. त्यामुळे एक म्हैस घ्या म्हणून ती नारबाच्या मागे लागली. म्हशीच्या दुधाचा संसाराला हातभार लागतो यावर तिची मनोमन श्रद्धा होती.एकदम दहा-वीस हजाराची म्हैस विकत घेणे नारबाला शक्य नव्हते.
त्याने हजार-बाराशेची एक रेडी आणली. तिला थोडे दिवस सांभाळली की तिची थोड्याच दिवसात म्हैस होणार. ती व्याली की दुध डेअरीला जाणार. डेअरीचा नियमानं पगार होणार. तेवढाच संसाराला हातभार लागणार. असा दोघांचा विचार!
नारबा भोळाभाबडा, तशी आवडाही भोळीभाबडी! दोघांची जोड लागलेली. तरी आवडा नारबापेक्षा थोडी हुशारच म्हणावी लागेल.तिनं म्हशीला घराशेजारीच एक छोटसं छप्पर तयार करून निवारा करून घेतला. म्हशीनं काय उन्हात दिवस काढायचं काय? म्हैस आल्यापासून तिच्याशी आवडाचं चांगलच नातं जमलं. म्हशीला ती ‘ही माझी सख्खी भण हाय’ म्हणायची. माणसाला बोलल्यासारखी तिच्याशी बोलायची. संवाद साधायची. तिचं नावदेखील ‘सोनी’ असं ठेवलं होतं. ‘सोने’ म्हटलं की म्हैस वैरण खायची बंद करून तिच्याकडं कान टवकारून बघायची. ‘पाणी आणू का तुला?’ असे विचारल्यावर मान डोलवायची. पाण्याची बादली आणून समोर ठेवली की बादलीभर पाणी घटाघटा पिवून संपवायची. ‘आणखी आणू का?’ विचारल्यावर ‘नको नको’ म्हणून मान हालवायची.आवडीची भाषा म्हशीला अन् म्हशीच्या मनातलं आवडीला चांगलं कळायचं. संध्याकाळी रानातून येताना म्हशीला वैरणीचा भारा आणायचं काम नारबाकडं असायचं. ती वैरण दिवसभर पुरवून पुरवून टाकायचं काम आवडाचं. शिवाय म्हशीची तब्बेत चांगली राहावी, तिचे पाय मोकळे व्हावेत, मोकळ्या हवेत, मोकळ्या रानात गावंधरीला हिंडून फिरून गावाकडंचं चांगलं चुंगलं तिला खायला मिळावं या उद्देशानं दुपारी तिला मोकळी सोडायची अन् गावातल्या येणाऱ्या जाणाऱ्या बाईबरोबर लिंबाच्या झाडाखाली साऱ्या गावातल्या भानगडीवर बोलत बसायची. त्यामुळे साऱ्या गावाची इत्यंभूत माहिती तिला असायची.संसार करावा तर आवडानच असा सारा गाव म्हणायचा.’म्हणजे कसा?

‘ सकाळ-संध्याकाळ आवडा म्हशीची धार काढायची. नियमानं दूध डेअरीला घालायची. दर दहा दिवसानं दुधाचं बील मिळायचं. ते घेऊन यायची. पहिलं म्हशीच्या गोठ्यात जाऊन तिला दाखवायची. तिच्या शिंगावरून डोक्यावरून ओवाळायची आन् म्हणायची, ‘ही बघ गं बया, तुझी आन् माझी कमाई ! कुणा बाप्याला तर जमतीय का अशी?’म्हैस आनंदानं मान डोलवायची. आवडा म्हशीला धनाची देवता लक्ष्मी समजायची. ‘खरी गं तू माझी लक्ष्मी हायस’ म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवून स्वत:च्या आकाळावर बोटं मोडायची.ती बायकांना सांगायची, ‘माझी सोनी दूध देत न्हाय, सोनं देतीय सोनं.’ ‘ते कसं काय?’ ‘हे बघा की !’ ती गळ्यातलं सोनं दाखवायची. दुधाच्या पैशानं तिनं गळ्यातलं दागिनं केलेलं होतं.पैसा पैसा बचत करून दोघेही संसार करत होते. पण दोघेही अशिक्षित! अडाणी! निदान सही तरी करता आली पाहिजे. बँकेत, पोस्टात उपेग होतो. आपण लिहायला, वाचायला शिकू असा प्रस्ताव नारबाने मांडला.
“कुणाकडून शिकायचं?” “आगं त्या मास्तरीन बाई हायत की!” “काय त्या मास्तरीन बाईला येतय ? माझ्या सोनीएवढं न्यान हाय का तिला?” “बरं राह दे मग!” तरी तिनं तिचं भाषण ऐकवलच.
“आवं माझी सोनी म्हणजे साक्षात सरस्वती हाय सरस्वती. तिला जेवढं कळतं तेवढं या जगात कुणाला कळत नसल. म्होरं वैरण नसली की कशी हाऽऽऽ म्हणून वराडती. वैरण टाकली की गपगुमान काय न्हाय बोलता खायला लागतीय. हाक मारली की टका टका टका बघतीय. पाण्याची बादली पुढं ठेवली की प्वॉट भरून पाणी पितीय. एक न्हाय का दोन न्हाय. अजून देवू का विचारलं तर नको नको म्हणून मान हालवतीय. एवढं ज्ञान हाय तिला. फक्त देवानं तिला वाचा दिली न्हाय. न्हाय तर माणसावाणी बोलली असती आन् भाषण देत सुटली असती. ही म्हैस साधी समजू नका. लक्ष्मी आणि सरस्वती दोघींची एक हाय. म्हशीला कमी समजू नका’ असे म्हशीपुराणावर लांबलचक भाषण आवडीने नारबाला ऐकवले. नारबाचे तोंडच बंद झाले.
आवडा आणि म्हैस इतक्या एकरूप झाल्या होत्या की त्यांचं एक वेगळंच जग निर्माण झालं होतं. त्या दोघी शिवाय या जगात वेगळं काहीतरी आहे यावर आवडाचा विश्वास नव्हता.
अशा या आवडाला गावातल्या महिला मंडळाने सभासद करून घेतले. महिला मंडळाचे वेगवेगळे अनेक उपक्रम चालू असायचे. त्यात ती सहभागी व्हायची. तिच्या ज्ञानात आणि वागण्यात बदल होऊ लागला. तिने भिशी लावली. डेअरीचा पगार मिळाला की हप्ता भरायची. चार-दोन हजार शिल्लक पडू लागले. आचार-विचारात बदल झाला. पोरगा-पोरगी नियमानं शाळेत जाऊ लागले.
अलिकडं आवडा त्यांच्या गल्लीत आणि गावात सर्वांची आवडती, प्रेमळ, मनमिळावू व्यक्ती म्हणून ओळखली जावू लागली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. गावातल्या प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक वार्डात उमेदवार उभे करण्याची जुळणी सुरू झाली. गल्ली गल्लीतले पुढारी आणि कार्यकर्ते कामाला लागले. कोणाला कोणाच्या विरोधात उभा करायचे, बॉडी कोणाची आली पाहिजे, मेंबर कोण आणि सरपंच कोण होणार याच्या चर्चा होऊ लागल्या.
आवडाला न विचारताच तिची उमेदवारी पक्की झाली. सरपंच महिला राखीव जाहीर झाल्यामुळे म्हशीची मैत्रिण आवडा हीच या पदाला पात्र आहे. लायक आहे हेही पक्के झाले.
गल्लीतला एक कार्यकर्ता आवडाच्या घरी आला, त्यानं सांगितलं, “काकू, या टायमाला चार नंबर वार्डातनं तुम्ही उभं रहायचं. सरपंच तुम्हालाच करायचा साऱ्यांचा इचार हाय.” “सारं गाव वस पडलं काय? मला सरपंच कराय निघालास.” “तसं न्हाय. आपल्या वार्डातनं तुम्ही उभं तर रहा. पुढं काय व्हईल ते व्हईल.” “सरपंच झाल्यावर काय करायचं असतय?”
“काय आवघड नसतय. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जायचं. साऱ्या मेंबरांची मिटींग घ्यायची. वेगवेगळ्या विषयावर चर्चा करून ठराव पास करायचे. गावाचा विकास करायचा.”
“मला जमतय व्हयरं हितकं ?”
“काय अवघड नसतय. नारादादा हायच की मदतीला. त्यो बगल सगळं. आन् तुम्हा दोघानला मदत करायला आम्ही कार्यकर्ते हायच की. काळजी करू नकू. तुझा आपल्या वार्डातनं अर्ज भरायचा पक्का झालाय. न्हाय म्हणू नकू.”
आवडा अन् नारबा दोघेही ऐकत होते. नारबा म्हणाला, “आम्हा गरिबाला कशाला या भानगडीत पाडताय ? त्ये इलेक्शन आन् त्ये राजकारण तुमचं तुम्ही बघून घ्या. आम्हाला नको त्या भानगडीत.” आवडाचं महिला मंडळातलं ज्ञान ऊतू चाललं होतं. “तुम्ही गप्प बसावो. तुम्हाला काय कळतय!”
आवडाची उमेदवारी नक्की झाल्यापासून गल्लीतल्या आणि गावातल्या लोकांची तिच्या घरी ये-जा वाढली. त्यांच्या बोलण्यात, गप्पात आणि चर्चा करण्यात वेळ जाऊ लागला. चहापाणी करण्यात दूध डेअरीला जाणे बंद झाले. नारबाचा रोजगार साखर आणि चहा पत्तीवर संपू लागला. दिवसभर डोक्यात दुसरा विचार यायचा नाही. रात्री उशिरापर्यंत माणसं दारातून उठायची नाहीत. पान, तंबाखू खात नुसता काथ्याकुट चालायचा. काहीनी तर आवडाला ‘सरपंचीन बाई’ म्हणायला सुरूवात केली. तिला लाजल्यासारखं वाटायचं. संकोच वाटायचा अन् अभिमानही वाटायचा.
एकदाचं वाजत-गाजत धुमधडाक्यात उमेदवारी अर्ज भरले. नारबा असला नसला तरी आवडाचे तालुक्याला हेलपाटे वाढले. गावात तुल्यबळ असे दोन पॅनल पडले होते. वार्डवाईज प्रचाराचे पॉम्प्लेट छापले. चौकाचौकात फोटोसहीत डिजिटल बोर्ड लावले गेले. उमेदवारांच्या नावापुढील चिन्हे तिनं पाहिली. कमळ, हाताचा पंजा, धनुष्यबाण, हत्ती, सायकल, विमान अशी वेगवेगळी चिन्हे होती. तिच्या नावापुढील चिन्ह पाहून तिनं नाराजी व्यक्त केली.
“हे चिन्ह मला न्हाय आवडत. माझ्या ‘सोनीचं’ चिन्ह न्हाय का चालायचं?” तिनं कार्यकर्त्यांना विचारलं. “ते कसं चालल? ही सरकारनं दिलेली वेगवेगळ्या पक्षांची चिन्हं असतात, काकू ! तुझी म्हैस हितं कशी चालेल?” “माझी सोनी लई भाग्याची! लई नशिबान ! तिचं चिन्ह मला मिळाय पाहिजे व्हतं!” आवडा काकूनं हळहळ व्यक्त केली. “तुझी सोनी राहू दे गोठ्यात. आता ह्या तुझ्या दिलेल्या चिन्हावर कामाला लाग.”
प्रचाराला धुम धडाक्यात सुरूवात झाली होती. गल्लीतली तरणी पोरं कामाला लागली होती. गावात कोण कुठं काय बोलतय याच्या बातम्या आवडाला येऊन सांगत होती. कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळायची. भेटेल त्याला, घरी येईल त्याला चहा, नाष्टा जेवण द्यायचे. त्यांची चैन पुरवायची. बिडी-काडी पान तंबाखू, सिगारेट आणि बाटल्या पुरवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आवडाजवळचे साठलेले पाच-दहा हजार कधीच वाऱ्यावर उडाले. पण आता माघार घेऊन चालणार नव्हते. खर्च तर करावाच लागणार होता. तिच्या पॅनलमधल्या पैसेवाल्या सावकाराने तिला पाहिजे तेवढे पैसे पुरवण्याची तयारी दाखवली.
पण नारबाचं धाबं दणाललं. त्यांनं चिंता व्यक्त केली. “निवडून आली तर फायदा काय ? जर निवडणुकीत पडली तर? एकतर निम्म्या गल्लीला वाईट झालो. रोज आपुलकीनं बोलणारी माणसं विरोधात बोलाय लागलीत. आपण या भानगडीत पडायला नको होतं.” ।
पण आवडाला इलेक्शनची चांगलीच नशा चढली होती. ती नशाच वेगळी! घरावर इस्तू पडला तरी उतरत नाही.
“तुम्ही गप् बसा वो! तुम्हाला काय कळतय ? उगच ना चा पाढा बोलत जाऊ नका.” असे नारबाला धमकावून बोलू लागली.
प्रचार धुमधडाक्यात चालू होता.
प्रत्येक घरातल्या, प्रत्येक माणसावर पाळत ठेवली जाऊ लागली. कोण कोणाशी बोलला, ते काय बोलले असतील, कुण फुटला, कोण आला, कुठं काय खलबत शिजतय या बरोबरच ‘येऊन येऊन येणार कोण? … शिवाय हायच कोण?’ अशा घोषणा देत प्रचारक मंडळी खाऊन पिऊन मजा मारत होती.
विरोधक बाईने सर्व कार्यकर्त्यांना बोकडाचे जेवण दिल्याची बातमी कळताच आवडालाही सावकाराकडून पैसे घेऊन बोकडाची मेजवाणी आणि जोडीला सोमरसाचा कट्टा पुरवावा लागला. मतदानाच्या आदल्या रात्री विरोधकाने पैसे वाटल्याची अफवा पसरली, ती ऐकून आवडालाही पैसे वाटावे लागले. चांगल्या लोकांनी नाही पण लफंग्या, दारूड्या लोकांनी चांगलेच हात धुवून घेतले. हे सारे सावकार पुरवत होता.
मतदानादिवशी तर साऱ्या गावाला चैतन्याचे उधान आले होते. हातातली आणि महत्त्वाची कामे तशीच बाजूला ठेवून सारा गाव झटत होता. म्हाताऱ्या, कोताऱ्या, आंधळ्या, पांगळ्या साऱ्यांना खांद्यावर, काठी धरून, मोटार सायकलवर बसवून मतदानासाठी घेऊन जात होते. गावापासून थोडे दूर शेतात वस्त्या करून राहणारे, रोज चालत पायपीट करणारे जिपशिवाय मतदानाला येत नव्हते. मोटारसायकली धावत होत्या. जिपा पळत होत्या. धुमधडाक्यात मतदानाचा दिवस मावळला.
विरोधक वरचढ ठरला. तोंडावर आमचं मत आवडाकाकूलाच हाय म्हणणारांनी आतून दगा दिला. प्रचार आणि आर्थिक पुरवठा कमी पडला असावा. आवडाकाकू सपशेल पराभूत झाली.
मोठ्या बहुमताने विरोधकाची पार्टी निवडून आली. त्यांनी गुलाल उधळत मिरवणूक काढली. त्यांची ग्रामपंचायत तयार झाली. हळूहळू गावातलं वातावरण शांत झालं.
इलेक्शनच्या कालावधीत सोनीनं वैरणीला तोंड लावले नाही की पोटभर पाणी प्याली नाही. येणाऱ्या जाणाऱ्या माणसावर ती ओरडायची, “का येताय भोळ्याभाबड्याच्या घरी’ तुम्ही नादान आहात. येऊ नका इकडं जा तुमच्या घरी’ लोकांना वाटायचं नविन माणसं बघून म्हैस बुजतीय अन् ओरडतीय. पण तिची भाषा कोणालाच कळत नव्हती.
मालकिनीला तिच्याकडं लक्ष द्यायला थोडा देखील वेळ नव्हता. तिच्यापुढची वैरण तशीच असायची. पाण्याची बादली घेऊन मालकीन गोठ्यात गेली तर म्हैस लागली तिच्याकडं डोळं फाडून बघायला.
“अगं, अशी बघतियास काय डोळं वटारून, पी पाणी पी.” म्हशीनं डोळं झाकलं. तिच्या डोळ्यातून पडलेलं पाणी आवडाला दिसले नाही. मालकावर जिवापाड प्रेम करणाऱ्या बैलानं मालकाच्या मृत्यूनं दुःखी होऊन वैरण पाण्याचा त्याग करून जिव दिल्याची तिच्या गावात घडलेली घटना आवडा विसरली होती.
एके दिवशी सकाळी सावकार आवडाच्या घरी आला. कधी किती कशाला त्याने पैसे पुरविले, खर्च केले त्याची पंचवीस हजाराची यादी आवडा आणि नारबापुढं ठेवली. ते एकमेकांच्या तोंडाकडं पहायला लागले.
“आता हे पैसे कशानं द्यायचे?” तेव्हा सावकाराने दुभत्या म्हशीकडं बोट दाखवले. “वीस हजारात म्हैस घेऊन जातो. बाकीचे पाच हजार सवडीनं द्या.”गोठ्यातली म्हैस सोडून नेण्यासाठी सावकार गोठ्यात गेला. म्हैस फुसकारत होती. आवडाची जोडीदारीन, लाडकी मैत्रीण गोठ्यातून बाहेर यायला तयार नव्हती. तिचे पाय उचलत नव्हते. ती आतच अडखळत होती. पण सावकाराने काठीचे फटके मारत दरारा ओढत नेली. जाताना ती आवडाकडं पहात जणू म्हणत होती, “कशाला राजकारणात पडलीस? ते काय शान्या माणसाचं काम हाय व्हय?”
आवडाचा जीव तिळतिळ तुटत होता. तिचा कंठ दाटून आला होता. ‘माझ्या सोने’ म्हणून ती ढसाढसा रडली. सोनीची आठवण होऊन दररोज रडत राहिली.

आता आवडा लिंबाच्या झाडाखाली बसत नाही. रिकामं बसून करायचं काय ? दुसरी म्हैस घ्यायची ऐपत नाही. शिवाय सावकाराचे पाच हजार फेडण्यासाठी बसून चालणार नाही. त्यासाठी कष्ट करावे लागणार होते. ती इतर बायकाबरोबर दुसऱ्याच्या शेतात खुरपण टुरपण आणि इतर कामाला जाऊ लागली.
बचत झालेले पैसे आणि म्हैस सोनीच्या मोबदल्यात ‘सरपंचीन बाई’ ही पदवी मात्र तिला कायमची प्राप्त झाली.
– प्रा. भास्कर बंगाळे
पंढरपूर
प्रथम पारितोषिक (कथा)
________________________________________________________________________________


