आठवण पहिली ,
दिवाळी म्हंटल की आपल्याला आठवतात ते नवनवीन कपडे , फटाके आणि फराळ. पण मला या व्यतिरिक्त आठवतात ते काही क्षण…..
आम्ही लहान असताना दर दिवाळीत आमच्या गावाला म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या ठिकाणी जायचो. सकाळी ८.०० ची ठाणे नाशिक एसटी पकडायची आणि १२.०० वाजता नाशिक सीबीएस ला उतरून नंतर नाशिक कळवण एसटीने दिंडोरीला जायचे. काका काकुंकडे आमची मस्त दिवाळी साजरी व्हायची.नवीन कपडे फराळ आणि काकांनी आणलेले खूप खूप फटाके असा आमचा नेम असायचा.
१९८८ सालातील ही दिवाळी .आम्ही दिंडोरीला गेलो होतो. आमचे चुलत भाऊ ,आते भाऊ, बहीणीही त्या दिवाळीत दिंडोरीला आले होते. आमची खूप धमाल चालू होती .नरक चतुर्दशीला पहाटे ४.०० वाजता उठून मस्त सुगंधी तेल, उटणे लावून आंघोळी आटोपून मोठ्यांच्या देखरेखीखालीआम्ही खूप फटाके उडवले . फराळ झाला.संध्याकाळी छान पणत्या लावल्या आणि घरातील मोठी माणसे ,आम्ही, लहान मुले सगळे अंगणात येऊन बसलो.आम्ही फटाके वाजवले. आमचे फटाके वाजवून झाल्यावर मोठी माणसे आपापल्या कामांसाठी आत निघून गेली. माझी आई , काकू रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागल्या तर काका त्यांचे कचेरीचे काम करू लागले . आम्ही भावंडे बाहेर खेळू लागलो तेवढयात कोणाच्या तरी डोक्यात कल्पना आली की आपण आत्ताच फटाके उडवले , उडले नसतील ते फटाके एकत्र करून त्यातील दारू काढायची आणि ती पेटवायची. आम्हाला असे थोडे फटाके सापडले. त्यातील दारू एका कागदावर काढली.ती पूड किती उडेल काय आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आमच्यातील कोणीतरी आगपेटीची काडी ओढली आणि त्या कागदावर टाकली कागदावर काडी टाकताच मोठ्ठा भडका उडला आणि तो भडका माझ्या मोठ्या भावाच्या (रत्नाकर दादाच्या) उजव्या हातावर उडाला तो जोरात ओरडला. घरात काम करीत असलेले आई काका काकू सगळे धावत आले. पाहतो तर काय दादाची उजव्या हाताची चार बोटे खूपच भाजली गेली होती .माझेही पुढचे केस थोडे जळाले . दादा खूपच रडत होता त्याला त्या वेदना असह्य होत होत्या.त्याला रडताना बघून मलाही रडू येत होते. आम्ही सगळेच खूप घाबरून गेलो होतो.त्याला प्राथमिक उपचार करून डाँक्टरांकडे नेले.आम्ही दिवाळीचे चार दिवस संपल्यावर आमच्या घरी कळव्याला परतलो. दादाला त्या हाताने काहीच कारता यायचे नाही. दिवाळीची सुट्टी संपून आमची शाळा सुरू झाली . दादाची व माझी शाळा एकच असल्यामुळे खूपच बरे झाले .शाळा भरताना त्याचे दप्तर मी त्याच्या वर्गात ठेवायचे . दररोज मधल्या सुट्टीत त्याच्या वर्गात जाऊन ज्या विषयाचे जे लिहून दिले असेल, ते जितके मला जमायचे ते मी लिहून घ्यायचे . हळू हळू त्याचा हात बरा झाला पण त्याच्या हातावरचे व्रण अजूनही त्याच्या हातावर आणि आमच्या हृदयात कायम आहेत .
आठवण दुसरी.
२०११ च्या दिवाळीतील . आम्ही माझ्या माहेरची ४ कुटुंब (माझे कुटुंब तसेच माझे भाऊ बहीण यांचे कुटुंब आई, वहिनीचे आई बाबा) असे एकूण १२ जण २२ तारखेला सकाळी ६ वाजता कळव्याहून औरंगाबाद वऔरंगाबाद जवळील इतर पयर्टन स्थळांना भेट देण्यासाठी निघालो . सुनियोजित वेळेत औरंगाबादला MTDC ला आलो त्यादिवशी आराम केला .
दुसऱ्या दिवशी वसुबारस या दिवशी सकाळी अजिंठा आणि वेरूळ लेण्या पाहण्याचा आनंद लुटला तेथून आम्ही भद्रा मारुतीचे दर्शन घेतले.
२४ तारीख धनत्रयोदशी या दिवशी देवगिरी (दौलताबाद) किल्ल्याला भेट देण्यासाठी बाहेर पडलो. दौलताबाद किल्ल्याची माहिती कळावी यासाठी वाटाड्याची (गाईड) मदत घेतली किल्ल्याचा परिसर खूपच स्वच्छ व नयनमनोहर आहे तिथून पाय निघत नव्हता पण पुढची स्थळ आमची वाट पाहत होती.
पुढील दिवशी आम्ही १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असे श्री घृष्णेश्वराचे दर्शन घेतले तेथून पैठणला गेलो. तेथे संत एकनाथ महाराजांच्या वाड्याला भेट दिली. पैठणला दक्षीण कशी म्हणून ओळखले जाते. वाड्याच्या मागे गोदावरी नदी वाहते तिचे दर्शन घेऊन जायकवाडी धरण पहिले तेथून आम्ही संत ज्ञानेश्वर उद्यानातील लाईट अँड साउंड डान्स शो बघितला. डोळे दिपून टाकणारा असा तो शो होता. तेथून येताना पैठणी साड्या तयार करण्याच्या कारखान्याला भेट दिली
२६ तारखेला नरकचतुर्दशी होती या दिवशी आम्ही जशी घरी दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे मुक्काम केलेल्या हॉटेल वर दिवाळी साजरी केली. सकाळी लवकर उठून रांगोळ्या काढल्या सुगंधी तेल व उटणे लावून अभ्यंग स्नान केले. तिथेच थोडे फटाके विकत घेतले. ते सकाळी उडवले , फटाके उडून आल्यावर, घरून करून नेला होता तो फराळ केला आणि औरंगाबाद पाहावयास बाहेर पडलो. तेथे पाणचक्की पाहिली , बीबी का मकबरा पाहिला, छोटी छोटी खरेदी केली त्याच दिवशी लक्ष्मीपूजन होते आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर ने प्रवास करीत होतो ,त्याची ती गाडी नवीन होती त्यांनी त्याची रीतसर पूजा केली त्यात आम्ही सगळे सहभागी झालो.
२७ तारखेला बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा ) सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो. येताना नाशिक जिल्यातील श्री क्षेत्र दिंडोरी येथे माझे आजोळ आहे तेथे सगळ्यांना भेटून फराळाचा आस्वाद घेऊन कळव्याला संध्याकाळी सगळ्या गोड आठवणी घेऊन परतलो. .
दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती परत भेटलोच आणि आठवणींना उजाळा दिला. अशी आमची औरंगाबाद सहल खूपच छान झाली. काही आठवणी आपण पुसून टाकायच्या म्हांटल्या तरी त्या पुसल्या जात नाहीत. त्या अविस्मरणीय ठरतात.
सौ. मानसी मंगेश सावर्डेकर
नौपाडा ठाणे.