नारायण श्रीपाद राजहंस – बालगंधर्व

बालगंधर्व
जसा जन्मतो तेज घेऊन तारा !
जसा मोर घेऊन येतो पिसारा !
तसा येई घेऊन कंठात गाणे !
असा बालगंधर्व आता न होणे !

नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांचा जन्म दि.26 जून 1888 रोजी नागठाणे सांगली येथे झाला . सहज सुंदर अभिनय आणि केवळ गंधर्वांबरोबरच तुलना होऊ शकेल असा आवाज , म्हणूनच लोकमान्य टिळकांनी छोट्या नारायणाला ‘ बालगंधर्व ‘ ही उपाधी दिली . बालगंधर्व भास्कलाबुवा बखले यांचे शिष्य होते . मास्टर कृष्णराव बालगंधर्वांचे गुरुबंधू . नाट्यगीतासह बालगंधर्वांचे ख्याल , ठुमरी , गझल , दादरा , भाक्तिगीते यांसारख्या गायनप्रकारांवरही विलक्षण प्रभुत्व होते . रंगभूमीवर स्त्रिया आभिनय करत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहूब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बालगंधर्वांना मोठी लोकप्रियता लाभली होती . खरं तर बालगंधर्वांना गायक व्हायचं होतं पण नियतीला त्यांचा गाणारा नाट्यकलाकार मंजूर होता .

इ.स.1905 सालापासून बालगंधर्वांची रंगभूमीवरील कारकीर्द सुरू झाली . किर्लोस्कर संगीत मंडळी मधून बालगंधर्वांनी आपल्या नाट्यसेवेची सुरूवात केली . इ.स.1911 मध्ये नानासाहेब जोगळेकर यांच्या निधनानंतर किर्लोस्कर संगीत मंडळी विस्कळीत झाली . इ.स.1913 साली बालगंधर्वांनी ‘ गंधर्व संगीत मंडळी ‘ ची स्थापना केली . गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे बालगंधर्वांच्या गंधर्व संगीत मांडळीत दाखल झाले . इ.स.1921 साली ही कंपनी कर्जात अडकली होती . पुढील सात वर्षात बालगंधर्वांनी ही सर्व देणी फेडली . आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बालगंधर्वांच्या नाटकांना जबरदस्त यश लाभले . पण त्या पुढेही या संस्थेची आर्थिक स्थिती कायमच चढ उताराची राहिली . नाटकाच्या प्रॉपर्टीसह अनेक गोष्टींमध्ये अस्सलता राखण्यासाठी बालगंधर्व वारेमाप खर्च करीत . त्या बाबतीत ते आग्रही होते . परिणामस्वरुपी संस्थेची आर्थिक स्थिती कायमच चढ उताराची असे . प्रभात फिल्म कंपनीसाठी बालगंधर्वांनी धर्मात्मा चित्रपटात संत एकनाथांची भूमिकाही केली होती .

संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे प्रकार बालगंधर्वांनीच मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले . नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर , गोविंद बल्लाळ देवल , श्रीपाद कृष्ण कोल्हटकर , काकासाहेब खाडीलकर , राम गणेश गडकरी , शांताराम देसाई आदि दिग्गज मंडळींनी लिहिलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली . संगीत नाटक परंपरेच्या उतरत्या काळात बालगंधर्वांनी मोलाची भर घातली . संगीत नाटकांना नवसंजीवनी दिली . इ.स.1929 सालच्या 42 व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान बालगंधर्वांनी भूषवले .

संगीत सौभद्र , संगीत मृच्छकटिक , संगीत शाकुंतल , संगीत मानापमान , संगीत संशयकल्लोळ , संगीत शारदा , संगीत मूकनायक , संगीत स्वयंवर , संगीत विद्याहरण , संगीत एकच प्याला अशा एकाहून एक सरस पंचवीस नाटकात बालगंधर्वांनी भूमिका केल्या . शाकुंतलातील शकुंतला , मानापमानातील भामिनी , एकच प्यालातील सिंधू या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या भूमिका . इ.स.1955 मध्ये एकच प्याला मध्ये त्यांनी साकारलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली . त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली . उतरतं वय तसेच स्त्री भूमिकेसाठी स्त्री पात्रांची उपलब्धता या गोष्टींमुळे रसिकांनी बालगंधर्वांना शेवटी नाकारले . नाट्य रसिकांचा उल्लेख बालगंधर्व नेहमीच मायबाप असा करीत . बालगंधर्वांची सर्वोत्कृष्ट भूमिका कोणती या सर्वेक्षणात एकच प्याला मधील सिंधूने बाजी मारली होती . रसिकांनी सर्वात जास्त पसंती सिंधूला दिली होती .

महात्मा गांधी , लोकमान्य टिळक , पंडित नेहरू , राजर्षी शाहू महाराज डॉ. आंबेडकर या महापुरुषांना आपल्या आवाजाने विसावा देऊन मंत्रमुग्ध करणारे सुरांच्या दुनियेतील अनभिषिक्त सम्राट म्हणजे बालगंधर्व !

केसरी या वर्तमानपत्राकडून गाण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता . नारायणास या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली होती . त्या कार्यक्रमात ‘ हरवा मोरा देव बंधना ‘ तसेच ‘ ना तर मै गारी दुंगी , ना रहुंगी तुम्ही सो बलमा ‘ ही गीते त्यांनी गायली होती . त्यांचा आवाज , गायकी बघून लोकमान्य फारच प्रभावित झाले होते . उत्स्फूर्तपणे लोकमान्यांनी नारायणास ‘ बालगंधर्व ‘ ही पदवी बहाल केली . नारायणराव पुढे बालगंधर्व या नावानेच प्रसिद्ध झाले .

बदलत्या काळानुसार लोकांनी रंगभूमीकडे पाठ फिरवली . लोकांचा कल सिनेमाकडे झुकला . व्ही शांतारामांच्या आग्रहाने बालगंधर्वांनी प्रभात कंपनीच्या ‘ धर्मात्मा ‘ या सिनेमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले . पण रंगभूमीवरील स्त्री भूमिकेतील बालगंधर्वांना प्रेक्षकांनी स्विकारले नाही . पत्नी लक्ष्मीबाईंचे निधन झाल्यानंतर त्यांनी नाटकातील जोडीदार गोहर कर्नाटकी यांच्याशी कायदेशीर विवाह केला . पण तो काही फारसा यशस्वी झाला नाही . कारकीर्दीच्या अखेरच्या काळात बालगंधर्वांना अत्यंत हालाखीचे दिवस कंठावे लागले . भजन , कीर्तन प्रसंगी तंबोरा धरूनही पैसे मिळवावे लागले . जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याचा प्रसंग ओढवला . 

इ.स.1955 साली बालगंधर्वांना संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आले . इ.स.1964 साली भारत सरकारने पद्मभूषण या सन्मानाने बालगंधर्वांचा गौरव केला . त्याच वर्षी बालगंधर्वांना विष्णूदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . इ.स.2011 साली नितीन देसाई यांनी बालगंधर्व या उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती करून बालगंधर्वांची जीवनकहाणी रसिकांसमोर मांडली होती .

रंगभूमीवरील एक काळ ज्यांच्या नावाने गंधर्वयुग म्हणून ओळखला जातो असे बालगंधर्व म्हणजे मराठी रंगभूमीला पडलेले इंद्रधनुषी स्वप्न होते .

अत्यंत सात्त्विक चेहरा व चेहऱ्यावर कायम स्मितहास्य असणाऱ्या बालगंधर्वांचे वयाच्या 79 व्या वर्षी दि.15 जुलै 1967 रोजी अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले . मायबाप रसिकांना मोहवणाऱ्या नाट्यविश्वातील सुवर्णयुगाची , गंधर्वयुगाची समाप्ती झाली .
शब्दप्रभू गदिमांनी बालगंधर्वांचे सार्थ वर्णन केले आहे .
रतीसारखे जया रुपलावण्य लाभे !
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे !
सुधेसारखा साद , स्वर्गीय गाणे !

असा बालगंधर्व आता न होणे !

मुकुंद कुलकर्णी©

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu