आमच्या गावाकडचा शिमगा ( होळी – होलटा शिमगा )
लग्न झाल्यावर आम्ही कुठेच लांब फिरायला गेलो नव्हतो. मुलगा पण लहान होता कुठे जायचं ठरत नव्हत . मी आमचं गाव पण पाहिलं नव्हत म्हणून आम्ही पहिल्यांदा आमच्या गावी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे गावाला गेलो. कोकणात मी कधीच गेले नव्हते.
फक्त ऐकल होत. ते सगळ मी बघत होते. सह्याद्रीच्या पर्वत रंगा ,माडांच्या रांगा,आंबा ,काजू , कोकमाची ,फणसाची झाड आणि अथांग समुद, व मोठमोठ्या नद्या.असा निसर्गाचा वरद हस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.
कोकणातील खूपशी ठिकाण जगप्रसिद्ध आहेत. लोटे परशुराम, वेळणेश्वर, गणपतीपुळे, हेदवी , डेरवण ,पावस, मार्लेश्वर पण काही ठिकाण खूप सुंदर असून सुद्धा अपरिचित जरा हटके आहेत.
सकाळी वाशिष्ठी नदी धुक्याची दुलई पांघरून आमचं स्वागत करायला तयार होती . सकाळी धुक्यातून गाडी जाताना काश्मीरलाही मागे टाकणारं सृष्टीसौंदर्य दृष्टीस पडत होत . तेव्हा शिमगा होता. पहिल्यांदाच गावचा शिमगा बघायला मिळणार म्हणून फार आनंदात होते. कोकण कधीच बघितल नव्हतं त्यामुळे ती उत्सुकता वेगळीच होती.
शिमगा (होळी) हा इथल्या होलटे होम साठी प्रसिद्ध आहे. या मध्ये होळीच्या आदल्यारात्री देवाच्या फडात म्हणजेच मैदानात गावकरी जमतात. त्यावेळी होळी आधी सतत नऊ दिवस गावातल्या प्रत्येक वाडीत पेटवलेल्या होळीची पेटती लाकडं म्हणजेच होलटे होम हातात घेऊन ढोलताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिष बाजीत मैदाना पर्यंत मिरवणूक काढली जाते . मैदानात एका बाजूला गावातील मानकरी तर दुसऱ्या बाजूला गावकरी असतात . दोन्ही गटातील ही मंडळी हातातले होलटे एकत्र करून ते पेटवतात आणि मग पुन्हा ते पेटलेले होलटे उचलून मैदानात एकमेकांच्या विरुद्ध बाजूला उभे रहातात. त्या नंतर तीस फुटाच्या अंतरावरून आळी पळीने हे दोन गट हातातले पेटते होलटे एकमेकांवर फेकतात . पूर्ण काळोखात सुरु असणारा हा खेळ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते अशा प्रकारे परस्परांवर तीन वेळा होलटे फेकल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन होलटे एकत्र करून त्याच फडात म्हणजे मैदानात त्याचा होम पेटवून ग्रामदेवतेच्या नावाने फाका मारतात .
पूर्वापार चालत आलेल्या या प्रथेत कोणालाच ईजा होत नाही गावातला सगळा समाज एकत्र येऊन हा आगळा वेगळा होलटे होम साजरा करतो. आख्या महाराष्ट्रातील अशा प्रकारची ही एकमेव वैशिष्टय पूर्ण होळी मानली जाते . होळी झाल्यावर प्रत्येक वाडीत एक एक दिवस अशी देवीची पालखी प्रत्येकाच्या घरी जाते. त्यादिवशी तर खूपच आनंद असतो .प्रत्येक जण घरात देव येणार म्हणून घर सुशोभित करतात. अंगणात सुंदर सुंदर कणा (रांगोळी) काढतात तसेच देवाची पालखी जिथे ठेवणार त्याठिकाणी पालखीच्या आकाराचा कणा( रांगोळी) काढतात . घरात देव आल्यावर ग्रारहाणे घातलात देवाची मनोभावे पूजा करतात. आम्ही सगळेच या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. माझी कोकण ट्रीप माझ्या आयुष्य भर स्मरणात राहील अशी होती.
म्हणूनच आम्ही कोकण वासी नेहमी म्हणतो “येवा कोकण आपलाच आसा ” !!

– सौ मानसी मंगेश सावर्डेकर
नौपाडा ठाणे
छायाचित्र सौजन्य: सुमेध मंगेश सावर्डेकर.


