तृतीय पारितोषिक | आरसा – स्वानंद गोगटे
कथाप्रकार – काल्पनिक
आरसा, आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक, आपण आरशात पाहात नाही असा एकही दिवस जात नाही. आरशापासून अनेक खेळणी सुद्धा बनवतात, लहान मुले सुद्धा आरशाशी तासनतास खेळत बसतात. पण हाच आरसा आपला शत्रू ठरला तर…!!!
गोष्ट आहे अश्याच एका आरशाची
महाराष्ट्र गोवा सीमेवर एक छोटेसे गाव आहे सातरडा.
तसे कुणाच्याही अध्यात ना मध्यात असलेले हे गाव तीन वर्षांपूर्वी अचानक प्रकाश झोतात आले. या गावाच्या वेशी जवळ शिवकालीन खजिना सापडल्याचे वृत्त आले होते आणि म्हणूनच पुरातत्व खात्याची माणसे तिकडे कामाला लागली होती. त्या प्रमाणे त्यांना थोड्या बहुत फुटकळ वस्तू आणि भांडी मिळत होती पण खजिना म्हणावा असे काही अजून मिळत नव्हते. त्या माणसांवर जबाबदार म्हणून मुंबई हुन खास या विषयात पारंगत असलेले डॉ तांबे तिथे पाचारण करण्यात आले होते.
बरेच दिवस झाले तरी काहीच सापडत नाही तेव्हा डॉ तांब्यांनी आजूबाजूला चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांच्या कानावर काही गोष्टी पडू लागल्या. ती जागा ज्याच्या मालकीची होती तो नाम्या ही बातमी बाहेर आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून बेपत्ता होता, त्याच्या घरच्यांनी देखील त्यांना काहीच माहीत नाही असे सांगितले होते. आणि त्याच बरोबर नाम्याने गायब व्हायच्या आदल्या दिवशी काहितरी खोदकाम करून एक मोठी वस्तू बाहेर काढल्याची सुद्धा बातमी करणोपकर्णी होती.
डॉ तांबे जवळच्या पोलीस चौकीत गेले आणि त्यांनी तिथल्या पोलीस अधिकाऱ्याची मदत मागितली. डॉ तांब्यांनी खात्री होती की नाम्याला नक्किच काहीतरी मिळाले आहे आणि त्याने ते लपवले आहे. आणि म्हणूनच त्यांना नाम्याच्या घराचा शोध घ्यायचा होता.
त्याप्रमाणे जिल्हाधिकार्याची परवानगी आणून पोलिसांनी नाम्याच्या घराभोवती नाकाबंदी केली आणि तो पोलीस अधिकारी, काही हवालदार आणि डॉ तांबे हे नाम्याच्या घरी पोहचले. सुरवातीला घरच्या लोकांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण कायद्याचा धाक दाखवल्यावर ते बाजूला झाले.
सर्वांनी संपूर्ण घर तपासले, पण काहीच नाही मिळाले, ते सगळे हताश होऊन बाहेर पडणार एवढ्यात डॉ तांब्यांनी एक भिंत थोडी वेगळी वाटली, म्हणून त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर त्या भिंतीचे प्लास्टरिंग नवीन होते, त्यांनी ताबडतोब पोलिसांना ही बाब सांगितली आणि लगेचच ते प्लास्टरिंग काढायला सुरवात झाली. डॉ तांबे यांनी सूचना दिल्या प्रमाणे हलक्या हाताने प्लास्टर काढायला सुरवात केली जेणेकरून जर का खरच खजिना असेल तर त्याला नुकसान होणार नाही.
जसे जसे प्लास्टर काढून झाले तसे तसे आतील गोष्ट सर्वांसमोर आली, आतमध्ये एक पुरुषभर उंचीचा आरसा लावलेला होता. आणि त्याच्यावरही नक्षी आणि त्याची फ्रेम दोन्ही ही बघून हे कळत होतं की हा आरसा कमीत कमी 200 ते 300 वर्ष जुना आहे.
डॉ तांब्यांनी आनंदाने तो आरसा आपल्या कॅम्प वर अधिक संशोधन करण्यासाठी हलवला.
संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने त्याला साफ केल्यावर तो त्यांनी त्यांच्या रूम मध्ये भिंतीला लावून ठेवला. आणि ते काम करायला लागले, अचानक त्यांना काहीतरी हालचाल जाणवली म्हणून त्यांनी चमकून पाहिले तर त्यांच्या खोलीत एक वेगळाच प्रकाश पसरला होता. आणि तो प्रकाश त्या आरशामधून येत होता. डॉ तांबे उत्सुकते पोटी त्या आरशाच्या जवळ गेले आणि न्याहाळू लागले, तसे त्यांना काहीच वेगळे जाणवले नाही म्हणून ते वळून आपल्या टेबलकडे जाणार तेवढ्यात त्यांना मागून कोणीतरी खेचले आणि डॉ तांबे त्यांना कळायच्या आत त्या आरशात खेचले गेले. डॉ तांब्यांना नक्की काय झाले ते कळलेच नाही पण त्यांच्या समोर अजून एक डॉ तांबे उभे होते आणि ते विकृत हसत होते. आणि अचानक त्यांनी समोर दिसणाऱ्या आरशामध्ये उडी घेतली.

इकडे डॉ तांब्याच्या खोलीत आरशामधून एक माणूस बाहेर आला, जो दिसायला डॉ तांब्यांसारखाच होता पण ते होत त्यांचं प्रतिबिंब.
खरे डॉ तांबे आरशामध्ये कैद झाले होते. त्यांनी खूप प्रयत्न केला पण तो असफल ठरला.
त्यांनी त्या आरशामधील दुनियेत नजर टाकली, तिकडे जे दिसत होतं ते सर्व परिचित असून देखील उलट असल्यामुळे अपरिचित वाटत होते. त्यांनी आजूबाजूला शोध घ्यायचे ठरवले.
त्या प्रमाणे डॉ तांबे आरशाच्या दुनियेत फिरायला लागले. एका ठिकाणी त्यांना मोकळी जागा दिसली, ते म्हणजे त्यांच्या खोदकामच्या जागेपासून जवळच असलेले एक गार्डन होते. तिथे ते गेले आणि फिरत होते, अचानक त्यांना आवाज आला कुणाच्या तरी बोलण्याच्या. ते त्या उभ्या असणाऱ्या माणसांशी बोलायला जाणार तेवढ्यात त्यांना कोणीतरी एका झाडामागे खेचले, आणि त्यांच्या तोंडावर हात दाबून ठेवला. जसे ते बोलणारे लोक हळूहळू चालत दूर गेले तेव्हा त्या व्यक्तीने डॉ तांब्याच्या तोंडावरून हात काढला.
डॉ तांब्यांनी चकित होऊन त्या माणसाला विचारलं, कोण आहेस तू? त्या वर तो माणूस म्हणाला, ” मी नाम्या”, हे ऐकताच डॉ तांबे शॉक मध्ये खालती बसले, आणि त्यांनी नाम्याला विचारले अरे हे सर्व काय आहे, आणि आपण कुठे आहोत, ती माणसे कोण होती? नाम्या म्हणाला, मी सर्व सांगतो, पण आता जरा शांत राहा आणि मी सांगतो तसे करा, आणि माझ्या मागून या.
नाम्याने आजूबाजूला कोणी नाही असे बघून जमिनीवरील एक फळी उचलली, आणि त्या खाली असलेल्या पायऱ्या उतरून आत गेला, डॉ तांबे देखील त्याच्या मागून गेले. आत गेल्यावर नाम्या शांतपणे बसलेला दिसला, डॉ नि विचारल्यावर तो म्हणाला, “अव, कधीचा मी यात अडकलोय, पर बाहेर जायचा रस्ताच गावत नाही, आपल्याला आपल्या दुनियेत परत जाण्यासाठी त्यो आरसा हाच एक मार्ग हाय. जेव्हा कधी या आरशाच्या दुनियेतील प्रतिबिंब आपल्या खऱ्या दुनियेतील खऱ्या माणसाला आत खेचून घेतात त्याच वेळी ते प्रतिबिंब बाहेर जायच्या आधी आपण बाहेर जाऊ शकतो.
डॉ तांबे म्हणाले, पण नाम्या तुला हे सगळं कसं माहीत? त्यावर नाम्या म्हणाला, तुम्ही भेटायचे आधी येक म्हातारा इथे होता, गेली 250 वर्ष त्यो इथे अडकला होता. या दुनियेचा हिसाब एकदमच न्यारा हाये, इथे कोणी म्हातारं व्हत नाही की आजारी पडत नाही, फक्त मृत्यू येऊ शकतो, तो पण खूप भयानक असतो, इथे आजारपणामुळे किंवा वयोमानामुळे कोणी मरत नाही तर या आरशाच्या दुनियेतील इतर प्रतिबिंब, जेव्हा ओळखतात की एखादा व्यक्ती हा प्रतिबिंब नसून खरा माणूस आहे तेव्हा ते त्याला मारून टाकतात. म्हणूनच मगाशी मी तुम्हाला अडवलं त्या माणसांशी बोलण्यापासून, कारण ती मानस नव्हती तर प्रतिबिंब व्हती.
आता डॉ तांब्यांना देखील या भयानक परिस्थिती ची पूर्ण जाणीव झाली. त्यांनी ठरवलं, की आपण या दुनियेतून बाहेर जायचंच आणि नाम्याला देखील न्यायचं. त्यासाठी त्यांनी आधी आता ते कुठे आहेत याचा अंदाज घेतला. त्यांच्या ऑफिस पासून ते जास्त लांब नव्हते, पण तिथपर्यंत पोहचण्यात धोका खूप होता. सर्व प्रथम त्यांनी हळूच बाहेर जाऊन ही प्रतिबिंब कश्या हालचाली करतात ते पाहायला सुरवात केली. या प्रतिबिंबांना कोणत्याही भावना नव्हत्या, चेहरा कोरडा असणे हेच त्यांचे प्रमुख लक्षण.
नाम्याने आणि डॉ तांब्यांनी या गोष्टीचा सराव करायला सुरुवात केली.
पण, त्याचवेळी इकडे आरश्या बाहेरच्या दुनियेत काय चालू होते ते पण बघूया…!!
डॉ तांब्याच्या हालचालीत अचानक बदल झालेला लोकांच्या लक्षात आला होता, एवढे दिवस उजव्या हाताने लिहणारे डॉ आता डाव्या हाताने लिहीत होते, स्वतःच्याच कामात ते गर्क असायचे, बोलायचेच नाहीत एकही शब्द. लोकांना वाटले कामाच्या ताणामुळे त्यांना हा त्रास होत आहे, पण खरी गोम कुणालाच माहीत नव्हती, आरशाच्या दुनियेत कोणतेच प्रतिबिंब बोलत नाही, किंबहुना त्यांना बोलताच येत नाही.
चला परत एकदा जाऊया आरशाच्या दुनियेत…!
नाम्या आणि डॉ तांबे आता पूर्ण तयार झाले होते, त्यांनी आपल्या वागण्या बोलण्यात पूर्ण परिवर्तन केले होते. प्रतिबिंब बोलू शकत नाहीत हे त्यांच्या देखील लक्षात आले होते म्हणूनच ते पण मौन धारण करून होते. आणि एक दिवस त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली आणि त्या खड्ड्यातून बाहेर येऊन अर्धा तास बाहेर फेरफटका मारून यशस्वी रित्या परतले.
आता पुढची आणि अंतिम पायरी होती ती म्हणजे स्वतःच्या दुनियेत परत जायची.
ते हळू हळू त्यांच्या आरशाच्या दुनियेतील ऑफिस च्या प्रतिबिंबा जवळ जाऊन उभे राहिले, त्यांना तो आरसा दिसत होता समोर, पण ते त्यातून आरपार जाऊ शकत नव्हते.
अचानक एक लहान मुलगी त्यांना त्या आरशासमोर दिसली… नाम्याची मुलगी गोदा होती ती. ती जशी समोर आली तशी या आरशाच्या दुनियेत देखील एक गोदा आरश्या जवळ दिसू लागली आणि एका क्षणात त्या खऱ्या गोदाला ह्या आरशातील गोदाने खेचून घेतले. डॉ तांब्याच्या लक्षात आले की हाच तो क्षण. ते आणि नाम्या धावत दोन्ही गोदा जवळ गेले , आता आरशातील गोदाच्या लक्षात हा सगळा डाव आला, ती देखील जोरात धावत आरश्या जवळ जाऊ लागली, डॉ तांब्यांनी उडी मारून या गोदाच्या प्रतिबिंबाला पकडले आणि नाम्या आणि खऱ्या गोदाला आरशातून आरपार ढकलले. नाम्या आणि त्याची मुलगी अलगद खऱ्या दुनियेत प्रवेशीते झाले. आता परीक्षा होती डॉ तांब्यांची.
गोदाच्या प्रतिबिंबाला त्यांनी पकडल्यामुळे आणि जोरात जमिनीवर पडल्यामुळे झालेल्या आवाजामुळे इतर प्रतिबिंब आता त्यांच्या दिशेने धावत यायला लागली. या प्रतिबिंबांच्या लक्षात आले की हा खरा माणूस आहे. आता ते तडॉ तांब्यांना पकडणार तेवढ्यात डॉ तांब्यांनी देखील आरशात उडी मारली आणि खऱ्या दुनियेत आले.
जसे ते या दुनियेत परत आले तसे नाम्याने तिथे असलेले एक कापड त्या आरशावर टाकले आणि तो आरसा झाकून टाकला. डॉ तांब्यांनी धावत जाऊन एक हातोडा आणला आणि सर्व जीव लावून त्या आरशावर मारला, क्षणात त्या आरश्याचे तुकडे तुकडे झाले. जसा तो आरसा नष्ट झाला तशी या खऱ्या दुनियेत वावरत असलेली नाम्या आणि डॉ तांबे यांनी प्रतिबिंब देखील नष्ट झाली.
डॉ तांबे आणि नाम्याने आरशाचे सर्व तुकडे एका मोठ्या कापडात बांधून एका खोल खड्ड्यात टाकले आणि वरून माती टाकून दिली, एक अध्याय संपला…!!!
वर्ष – २०३४
सातरडा आता एक औद्योगिक केंद्र म्हणून भरभराटीस आले आहे, गणपत शेठ नि नवीन जागा घेऊन नवीन फॅक्टरी च्या भूमीपूजनाचा कार्यक्रम केला आहे आणि आता फॅक्टरी चा पाया खणणे सुरू झाले आहे. अचानक खोदकामावरच्या कामगारांना जमिनीत पुरलेले आरशाचे तुकडे मिळतात. प्रत्येक कामगार त्याला मिळालेला तुकडा निरखून बघत असतो. आणि अचानक……सर्व कामगार त्या त्यांच्या हातातील तुकड्यात खेचले जातात आणि त्यांच्यासारखे दिसणारे दुसरे कामगार त्या तुकड्यांमधून बाहेर आले आणि भेसूर पणे पण आवाज न करता हसत गणपत शेठ च्या ऑफिस च्या दिशेने जायला लागले.
- स्वानंद गोगटे
कल्याण
तृतीय पारितोषिक (कथा)


