अक्षय तृतीया
वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया . साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त . अक्षय्य तृतीये दिवशी तृतीया तिथी, सोमवार किंवा बुधवार आणि रोहिणी नक्षत्र हे तीन्ही योग असतील तर तो परमश्रेष्ठ योग मानला जातो . धार्मिक कार्याच्या दृष्टीने हा सण कौटुंबिक पातळीवर श्रद्धेने पाळला जातो . या दिवशी अनेक कुटुंबात तर्पण करून आपल्या पुर्वासुरींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते . या दिवशी जप , हवन किंवा दानधर्म ,तिलतर्पण करणे, उदककुंभदान करणे, मृत्तिका पूजन करणे ही प्रथा आहे . ही सर्व धार्मिक कार्ये या दिवशी केल्यावर त्यांचं पुण्य अक्षय्य टिकतं अस मानलं जात . अक्षयतृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, जलदान, करण्यात येते.
श्रीविष्णू हा या संपूर्ण विश्वाचा प्रतिपालक असल्याने तो आपला पिता आहे असे मानून त्याच्याबद्दलच्या कृतज्ञतेपोटी या दिवशी उदक कुंभाच दान देतात . काही मंदिरातून या दिवशी वसंतोत्सव साजरा करतात .
अनेक ठिकाणी चैत्र गौरीच्या उत्सवाची सांगता स्त्रिया अक्षय तृतीयेच्या दिवशी करतात . या निमित्त विवाहित स्त्रिया हळदी – कुंकुवाचा समारंभ करतात . कुमारीकाही हा सण साजरा करतात . या निमित्ताने सर्व स्तरांतील स्त्रियांमध्ये प्रेमभाव व एकोपा वाढतो . अनेक पारमार्थिक वृत्तीची श्रीमंत माणसं या दिवसापासून पाणपोया उघडून तहानलेल्यासाठी जलपानाची सोय उपलब्ध करून देतात .
मुहूर्त न बघताही या दिवशी नवीन वस्तू, वास्तू, वाहन, व्यवसाय आरंभ, शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास त्यात उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात कित्येक शेकडो किलो सोने विकले जाते कारण अक्षयतृतीया या दिवशी अगदी गुंजभर किंवा १ ग्रॅम सोने जरी खरेदी केले तरी त्यात सातत्याने वाढ होते असे मानले जाते .


