‘यांगोन यात्रा’ – ई – पुस्तक खरेदी करा.
‘प्रवासरंग’, ‘रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार(१९०१ ते २०१८)’ व ‘कंबोडियातील अंगकोर वाट आणि परिसर’ या माझ्या पुस्तकांनंतर ‘यांगोन यात्रा’ हे माझं चौथं पुस्तक वाचकांसमोर आलं आहे.गेल्या वर्षीच प्रकाशित झालेलं हे ई – पुस्तक आता ‘गूगल’वर उपलब्ध आहे.
आमच्या यांगोन यात्रेवर एक छोटेखानी पुस्तक तयार होऊ शकतं, असा आशावाद यांगोन यात्रेदरम्यानच निर्माण झाला.
‘यांगोन यात्रा’ असं पुस्तकाचं नाव यांगोन प्रवासातच सुचलं. यात्रा म्हटलं की त्यात धार्मिक अधिष्ठान असलेला प्रवास, असा अर्थ अभिप्रेत असतो. आम्ही आमचा यांगोन प्रवास कुठल्याही धार्मिक भावनेने ठरवला नव्हता. तरी तिथला प्रवास जसजसा पुढे सरकत गेला आणि सरतेशेवटी त्याचं सिंहावलोकन केलं तेव्हा लक्षात आलं की आपण भेट दिलेल्या जवळजवळ सर्वच ठिकाणांवर जबरदस्त धार्मिक छाप आहे. बुद्धदेवांनी तर अवघं यांगोन व्यापलेलं आहे.सर्वच ठिकाणची लक्षात राहिलेली बाब म्हणजे भक्तांच्या चेहेऱ्यावरचे श्रद्धाळू भाव. बौद्ध धर्माच्या दृष्टीनं महत्वाच्या श्वेदगॉ पॅगोडा, सुले पॅगोडा व इतर स्थळं पाहताना आम्ही जरी पर्यटक म्हणून तिथे गेलो असलो तरी प्रत्येक ठिकाणी कधी नतमस्तक झालो हे समजलंही नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या प्रवासाचं ‘यांगोन यात्रा’ असंच वर्णन शिल्लक राहिलं आणि पुस्तकाचं नामकरण पुस्तक लिहिण्यापूर्वीच नक्की झालं.
यांगोन प्रवासादरम्यान आम्ही अनुभवलेलं वेगळेपण वाचकांना निश्चितच आवडेल असा आशावाद मनाशी बाळगून तसंच निव्वळ यांगोन प्रवासावर आधारित पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध नसल्याच्या माहितीवर विसंबून ‘यांगोन यात्रा’ लिहिण्याचा घाट घातला. खरंतर,’यांगोन यात्रा’चं ‘लिखाण’ भ्रमणध्वनीच्या ‘गूगलॲप’वर बसल्याजागी करून एक वेगळा आनंद घेतला.
२४ मार्च २०२० पासून सुरू झालेल्या ‘लॉक डाऊन’चा वाढत गेलेला कालावधी, तसंच ‘करोना’ संकटात पुस्तक छपाई व छापील प्रतींचं वितरण शक्य होणार नसल्याची तसंच त्यातील अनुषंगिक धोक्यांची जाणीव झाल्यावर, ‘यांगोन यात्रा’, ई- पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस आणण्याचा निर्णय घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात वाचकांच्याही मानसिकतेत झालेला बदल व एकंदरच इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी जुळवून घेण्याकडे वाढलेला कल लक्षात घेता, वाचक ह्या ई- पुस्तकाचं नक्की स्वागत करतील, ह्याची खात्री आहे.
माझ्या आधीच्या पुस्तकांप्रमाणेच ‘सहित प्रकाशन’तर्फेच हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे.
‘यांगोन यात्रा’च्या लिखाणाच्या वेळी मी यांगोन यात्रा अनेकदा अनुभवली. यांगोन यात्रेदरम्यान आम्हाला आलेली अनुभूती वाचकांना निश्चितच समाधान देईल. हा लेखनप्रपंच मला आगळा आनंद देऊन गेला; तो वाचकांसमोर ई – पुस्तकरूपात आणताना द्विगुणित होत आहे.
‘यांगोन यात्रा’ आता ‘ गूगल प्ले बुक्स ‘ वर उपलब्ध आहे. सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण पुस्तक खरेदी करू शकता. पुस्तक खरेदी करा, वाचा; आपला अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.
डॉ. मिलिंद न. जोशी
https://books.google.co.in/books/about?id=yHc6EAAAQBAJ&redir_esc=y



