ऑर्किडच्या देशातून, जास्वंदीच्या देशात – भाग २ © डॉ. मिलिंद न. जोशी
नंतरच्या दिवशी सकाळी ब्राम्ह मुहूर्तावर हॉटेल सोडलं आणि आम्ही शब्दशः रस्त्यावर आलो. आधीचे तीन दिवस आमच्याशी सौजन्याने वागणारं सिंगापूर, आम्ही सिंगापूर सोडून मलेशियाला जातोय हे कळल्यावर आमच्याशी नाराज झाल्यासारखं वाटू लागलं. हात दाखवल्यावर कधीही, कुठेही घेऊन जाण्यास उत्सुक असलेले टॅक्सी चालक, ‘गोल्डन माईल कंपाउंड’ हे नाव ऐकल्याबरोबर न थांबता, निघून जात होते. साडेसातला आम्हाला ‘गोल्डन माईल कंपाउंडला’ रिपोर्टिंग होतं. सात वाजून गेले होते. मधल्या काळात मी हातातल्या सामानासह आमच्या हॉटेलमधेही जाऊन आमचा ‘प्रॉब्लेम’ सांगितला, पण आम्ही हॉटेल सोडल्यामुळे त्यांच्यालेखी आमची किंमत शून्य होती. त्यांनी बाहेर टॅक्सी मिळेल; प्रयत्न करा असा आशावाद व्यक्त करून मला कटवला. शेवटी एक टॅक्सी चालक तयार झाला आणि आम्ही पंधरा मिनिटं उशिराने ‘गोल्डन माईल कंपाउंडला’ पोहोचलो. तिथे एकंदर सामसूम होती. एक-दोन बस उभ्या होत्या. त्यांच्या गंतव्य स्थळाबद्दल चौकशी केली आणि त्या आपल्या नाहीत, याची खात्री बस पुढून, मागून तपासून करून घेतली. आमची बस सुटली तर नाही ना, अशी शंका वाटू लागली. बाहेरच्या देशात पंधरा मिनिटांचा उशीर त्याज्य असल्याची जाणीव मनात धरून मी आमच्या टूर कंपनीच्या कार्यालयाच्या अर्धवट बंद शटरच्या खालच्या उघड्या भागातून आत सरकलो. आत अजून दिवस उजाडला नव्हता. शटरच्या आवाजाने दचकून आतल्या क्लीनर कम केअरटेकर छाप इसमाने आपल्या अर्धोन्मीलित नेत्रांनी माझ्याकडे बघत, जड आवाजात पण सौजन्याने माझ्या अशा आगमनाची विचारणा केली. मी नुसता ‘क्वालालंपूर’ शब्द उच्चारल्यावर, बस साडेसातच्या ऐवजी साडेआठला सुटणार असल्याची माहिती देऊन तो झोपी गेला. आडवं झोपल्यावर कूस बदलतात तसं तो खुर्चीत झोपल्यामुळे त्याने मानेची दिशा बदललेली, मला दिसली. त्याच्या त्या ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. बाहेर आलो आणि बसची वाट पाहणे या एककलमी कार्यक्रमास सुरुवात झाली.
तिथे ब-याच टूर कंपन्यांची कार्यालयं असल्याने एकेक करत बस येऊ लागल्या होत्या. प्रत्येक येणारी बस ही आपलीच वाटून ती आपली नाही याची खात्री करून घेण्यासाठी तेव्हढ्या शंभर मीटरच्या परिसरात किमान दोन किमी भटकंती झाली. थोडक्यात टूरिस्ट कंपनीवाले सगळीकडे सारखेच या निष्कर्षाला येऊन, नशीबावरचाच भरवसा खरा हयाची खात्री झाली. साडेआठ वाजून गेले तसा धीर सुटत चालला, पावणेनऊच्या नंतर आमच्या टूरवाल्याच्या दुकानाचे शटर संपूर्ण उघडल्याचं लक्षात आलं. तिथे चौकशी केल्यावर त्याने बस साडेआठच्या आधीच आल्याचं आणि पाच मिनिटांत ती सुटेल अशी माहिती दिली. बसला त्यांच्या कार्यालयासमोर जागा नसल्याने ती दुसऱ्या टोकाला उभी करण्यात आली होती. ‘लश देअल’ असं तो म्हणाल्यावर आम्ही त्याने सांगितलेल्या दिशेने धावलो आणि शब्दशः बस पकडली आम्ही आत शिरलो आणि बस सुरु झाली. मला दापोलीच्या बस स्टँडवर बस आमचा डोळा चुकवून आमच्या समोरून निघून गेल्याचा प्रसंग आठवला. तिथे नऊ वाजता सुटणारी, आमचं आरक्षण असलेली बस आधीच भरल्यामुळे पावणेनऊलाच सोडली होती.
पुढे बस प्रवास मात्र उत्तम झाला. पोटातलं पाणी न हलता म्हणावं असा. गुळगुळीत, सरळसोट रस्त्यावरच्या सहा तासांच्या प्रवासात
सिंगापूरची हद्द ओलांडताना (सामानाशिवाय) व मलेशियाच्या हद्दीत प्रवेश करताना ( सामानासकट) असं पंधरा मिनिटांच्या फरकाने दोनदा उतरावं लागलं. बसच्या सीट्स तर बेडसारख्या पसरट होत्या. ब्राम्ह मुहूर्तावर हॉटेल सोडल्यामुळे कमी झालेल्या झोपेची आणि आधी आलेल्या थकव्याची थकबाकी गोळा करायला प्रवाशांनी सुरुवात केली. पु.लं.नी म्हैस गोष्टीत म्हटल्याप्रमाणे, थोड्याच वेळात ते धावतं विश्व गाढ झोपी गेलं . बसच्या वतीने चालक आणि प्रवाशाच्या वतीने मी आडवा जरी असलो तरी जागा होतो. मला काही काही उगाचचे चाळे असतात. भूगोलात शिकलेलं सिंगापूर-मलेशियाच्या मधलं ‘जोहोर बारू’ मला उगीचच खुणावत होते. आणखी एक कारण म्हणजे अजूनपर्यंत आम्ही रस्ता मार्गाने एका देशातून दुसऱ्या देशात प्रवेश केला नव्हता. त्या कारणास्तव सुद्धा हा प्रवास रस्ता मार्गाने करण्याचं आम्ही ठरवलं होतं. तिसरं कारण म्हणजे मलेशियात प्रवेश केल्यावर क्वालालपूर येईपर्यत मलेशियाच्या अंतर्भागाचं दर्शन होणार होतं. ‘असं’ दर्शन आपल्याला त्या देशाच्या सामाजिक पैलूंची झलक दाखवतं. शहरामध्ये दिसणाऱ्या किंवा दाखवलं जाणाऱ्या चित्राहून ते वेगळं असू शकतं. त्याचा निश्चितच वेगळा ठसा आपल्या मनावर उमटतो आणि तो दीर्घकाळ स्मरणात राहतो. सिंगापूरहून मलेशियाला जाताना त्या दोघांना जोडणाऱ्या ‘जोहोर बारु’ हया सामुद्रधुनीच्या मार्गे जाता येतं. जोहोर बारु हे ठिकाण मलेशियाच्या एका प्रांताची राजधानी देखील आहे.
जोहोर बारु आलं आणि गेलंही एखादी खाडी पार करण्यासारखाच तो अनुभव होता, पण मी मात्र ते पाहण्यासाठी आडव्या सीटवर उठून बसलो आणि एक स्वप्न वेडेखुळे साकारल्याचा आनंद घेतला. काहीवेळा आपल्याला कुठल्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळेल सांगता येत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे माझ्याशिवाय इतर सर्व निद्रादेवीच्या स्मरणात लीन असल्याने त्या माझ्या आनंदसोहळ्याला साक्षीदार मात्र नव्हता.
सिंगापूर-क्वालालंपूर रस्त्याच्या दुतर्फा शहरीकरणाचेच ठसे जास्त प्रमाणात आढळले. सगळं बाजार आधारित अर्थव्यवस्थेचं प्रदर्शन वाटत होत. त्यामुळे मला अपेक्षित असलेलं मलेशियाच्या ग्रामीण जीवनाचं दर्शन काही झालं नाही. त्यामुळे थोडा अपेक्षाभंग झाला. पावणेबाराला बस लंचसाठी थांबली. आम्ही ‘नॉनव्हेज’ खात नाही. ‘नान आणि व्हेज’ चालतं. उपहारगृहात बरचसे पदार्थ ‘नॉनव्हेज’ असल्याची माहिती काउंटरवरच्या चौकशीत समजल्यामुळे बसमधे परतलो आणि भूकलाडूंचा डबा उघडला गेला. भूकलाडू आणि बसचा ‘लंच टाईम’ एकदमच संपला. (क्रमशः)
मागील लेखाची लिंक : ऑर्किडच्या देशातून, जास्वंदींच्या देशात © डॉ. मिलिंद न. जोशी – Thinkmarathi.com

डॉ. मिलिंद न. जोशी
Email : milindn_joshi@yahoo.com
pc:google


