व्दितीय पारितोषिक |गुलमोहर – मुकुंद कुलकर्णी
अंगणी गुलमोहर फुलला
लाल फुलांच्या लिपीतला हा अर्थ मला कळला
गतसाली हा असाच फुलता
तुम्ही पाहुणे आला होता
याच तरुतळी अनोळखीचा परिचय ना घडला
ते डोळे ती हसरी जिवणी
जपली मी तर अजुन चिंतनी
आठव येता वरुनी माथी मोहर ओघळला
नजरभेट ती , ओळख थोडी
अवीट त्यातील अबोल गोडी
वसंत आला , याल तुम्ही ही कोकिळ कुजबुजला
ग दि मा
शालीन तरुणीचे संयमित प्रणयाराधन किती उत्कटपणे व्यक्त झाले आहे गदिमांच्या परिस स्पर्शाने . किती सूचक आणि मुग्ध शृंगार आहे हा !
ग्रीष्मातल्या रणरणत्या उन्हात सहस्त्ररश्मी आपल्या हजार हातांनी पृथ्वीवर आग बरसत असताना , गुलमोहर वृक्ष आपल्या परीने ते थोपवण्याची शिकस्त करत असतो . काजळकाळ्या रात्री छोटीशीच मिणमिणती पणती त्या घनघोर तिमिराचा मुकाबला करते तसाच हा गुलमोहराचा प्रतिकार असतो . विपरीत परिस्थितीत खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश देतो गुलमोहर . पूर्णपणे मेघविरहित निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिमाखदार दिसतो गुलमोहर . पूर्ण भरात असता गुलमोहराच्या वृक्षावर पानापेक्षा फुले जास्त दिसतात . लाल केशरी रंगाचा भरजरी शेला पांघरलेल्या नववधू सारखा दिसतो गुलमोहर !
हा गुलमोहर वृक्ष मला घेऊन जातो माझ्या बालपणात . बालपणाचा सुखाचा काळ म्हणजे वार्षिक परिक्षा संपल्यानंतर येणारी उन्हाळ्याची सुट्टी . कडूनिंबाला येणारा सुगंधित मोहर , पूर्ण बहराने फुललेला मोगरा , रक्तफुलांनी नटलेला गुलमोहर , पिवळ्याधमक समृद्धीची उधळण करणारा अमलताश , आर्त सुमधुर स्वरात कूजन करणारा कोकिळ , क्वचित अवकाळी पावसाच्या शिडकाव्याने वातावरण धुंद करणारा मृद्गंध या सर्व गोष्टी मला माझ्या लहानपणीच्या , तरुण वयातल्या सुवर्णक्षणांची आठवण करून देतात . एकाच मोसमात बहरणारे गुलमोहर आणि बहावा हे वृक्ष मधमाशांची मात्र पंचाईत करत असतील , नक्की कुठे मोर्चा वळवावा ! अशाच एखाद्या गुलमोहरासारख्या स्वर्गीय तरुतळी , साकी आणि जामच्या मदिर सहवासात सुचल्या असतील का उमर खय्यामला रुबाया .
असाच सहसा गावाबाहेर आढळणारा दिमाखदार पलाश वृक्ष . लालभडक फुलांनी रसरसलेल्या या वृक्षाला जंगलातील आग असेच संबोधले जाते . प्राचीनकाळी होळीसाठीचे रंग पळसापासूनच केले जात . हा वृक्ष ही मला गुलमोहर , अमलताश या जातकुळीतील वाटतो . सहसा वसंत ऋतूत होळीच्या आगेमागे पूर्ण बहरात असते पळसाचे झाड .

संस्कृतात गुलमोहराला ‘ कृष्ण चूड ‘ अथवा ‘ राज आभरण ‘ हे नाव आहे . राजसी आभूषणांनी नटलेला वृक्ष ‘ राज आभरण ‘ अर्थात गुलमोहर . भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेत श्रीकृष्णाच्या मुकुटाची शोभा वाढवते गुलमोहराचे फूल . गुलमोहराचे सार्थ नाव आहे ‘ स्वर्गीय फूल ‘
गुलमोहर मूळचा मादागास्करचा , उष्ण प्रदेशात जोमाने वाढणारा आहे हा वृक्ष . ऐन भरात असताना झाडाखाली पडणारा गुलमोहराचा सडा डोळे दिपवून टाकतो . शाळेत असताना आम्ही गुलमोहराच्या पाकळ्या चावून खायचो . तुरट किंचित गोडसर चव असते त्याची . तसेच कुंपणासाठी लावली जाणारी बहुतेक काजळीच , लांब दांड्याची छोटीशी पांढरी फुले असतात त्याला . फुलातून तीन किंवा चार गुलबक्षी रंगाचे केसर बाहेर आलेले असतात , तसे हे फूल नाजूक . देठापासून तोडून मागील बाजूने चोखल्यास इवलासा गोडसर रस लागायचा ही गंमत मला वाटतं आजकालच्या पिढीला दुर्मिळच . खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद शोधायचा होता तो काळ .
सूर्याच्या वाढत्या प्रकोपा समोर ताठ मानेने उभे राहणारे असेच जीएंच्या लेखणीतून उमललेले द्राशाळाचे फूल . ” एका मूर्तीवर , मूठभर जाळ हातात घेऊन गोठवल्या प्रमाणे दिसणारे एक लालभडक द्राशाळाचे फूल होते . ”
गुलमोहराचा विषय निघाला आणि गुलजार यांच्या तरल प्रतिभेतून साकारलेले गुलमोहर गर तुम्हारा नाम होता हे गीत आठवले नाही हे शक्यच नाही .
गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
मौसम – ए – गुल को हँसाना भी हमारा काम होता
आयेंगी बहारे तो अब के उन्हे कहना जरा इतना सुने
मेरे गुल बिना उनका कहाँ बहार नाम होता
शाम के गुलाबी आँचलमें ये दिया जला है चाँद सा
मेरे उन बिना उसका कहाँ चांद नाम होता .
आणि सांगता माझ्या या छोट्याशा पाकळीने
पलिकडच्या वळणावर बहरला आहे गुलमोहर आणि अमलताश
जसा रखरखत्या ऊन्हामध्ये सखे तुझा चांदण्यांचा बाहुपाश
मुकुंद कुलकर्णी
सोलापूर
व्दितीय पारितोषिक (लेख)

