Dial 100 © मुकुंद कुलकणीं
सूडाचा प्रवास , एका रात्रीतल्या वेगवान घटनांनी भरलेला . मूळ कथानक सोडून कुठेही न भरकटलेला हा सिनेमा अंतर्मुख करून सोडतो . मनोज वाजपेयी , साक्षी तन्वर , नीना गुप्ता बाप माणसं आहेत ही .
मुंबईच्या पोलिस हेल्पलाईन मधे सुरू होतो हा सूडाचा प्रवास . सिनियर इन्स्पेक्टर निखिल सूद ला एका महिलेचा फोन येतो . सीमा पालव ( नीना गुप्ता ) ही महिला धमकी देते की आजच खरेदी केलेल्या गनने ती आता आत्महत्या करणार आहे . निखिल सूद ला तिचा आवाज सांगून जातो , ही महिला पोकळ धमकी देत नाहीये . ही हिस्टेरिक , उन्मत्त महिला काहीही करू शकते . पोलिस यंत्रणा वापरून तो तिचे लोकेशन हुडकून काढतो . आपल्या ऑन फिल्ड सहकाऱ्यांच्या मदतीने तिला अडवण्याचा तो प्रयत्न करतो . वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून कारने ती दक्षिण मुंबईच्या दिशेने निघालेली असते.
पुन्हा थोड्या वेळाने तिचा फोन येतो आणि आपला विचार बदलला असून आधी बदला घेऊन आपण नंतर आत्महत्या करणार आहोत असे ती सांगते . सीमाच्या बदल्याचा प्रत्यक्ष संबंध निखिल सूदच्या कुटुंबाशी असतो . सीमाची धमकी ऐकून निखिल हादरून जातो .
रात्रीची वेळ , घरात त्याची बायको प्रेरणा ( साक्षी तन्वर ) एकटीच असते . तिला वाचवणे आणि सीमाला गुन्ह्यापासून रोखणे यात निखिल कितपत यशस्वी होतो , हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच कळेल . पोलिसांचं धावपळीचं आयुष्य . कामाला न्याय देताना आपल्या कुटुंबाकडे होणारं पूर्ण दुर्लक्ष . प्रामाणिक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीची आणि कुटुंबाची होणारी ससेहोलपट समर्थपणे दाखवली आहे . आपल्या मुलाला वाचवू पाहणारी आई आणि आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेऊ पाहणारी आई या दोघींचा संघर्ष आहे हा .
अभिनयाच्या फ्रंटवर जबरदस्त आहे हा सिनेमा . मनोज वाजपेयी या माणसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . वर्दीमध्ये हा जास्तच खुलतो . नीता गुप्ता आणि साक्षी तन्वर या दोन्ही ज्येष्ठ कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं आहे . छोट्याशा भूमिकेत अभिजित चव्हाण , नंदू माधव छानच .शेवटच्या प्रसंगात काहीही आक्रस्ताळेपणा न करता साक्षी तन्वर चा आक्रोश मन हेलावून जातो . बघण्यासारखा आहे हा सिनेमा !
pc:google


