डॉ वसंतराव देशपांडे ©मुकुंद कुलकर्णी
” वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणे मिरवत जाणारी नाही . दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे . भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी . ती फुले पहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी ” – पु.ल.देशपांडे
कट्यार मधील आक्रमक शैलीतील पदं असोत किंवा तरल संवेदनशील बगळ्यांची माळ असो वसंतरावांची गायकी सारखीच खुलते , रसिकांना आनंद देऊन जाते . कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक , गुळाचा गणपती , पेडगावचे शहाणे , अवघाची संसार , दूधभात , अष्टविनायक या चित्रपटातून वसंतराव घराघरात पोचले . गणपतीच्या दिवसात वसंतराव , भीमसेन जोशी , कुमार गंधर्व आदी दिग्गजांच्या मैफिली हे मुख्य आकर्षण असे . वसंतरावांचा मारवा , विलासखानी तोडी रसिक कधीही विसरू शकणार नाही . त्यांचा किंचितसा अनुनासिक स्वर मनाचा ठाव घेऊन जात असे . वसंतराव उत्तम गायक होतेच , त्याच बरोबर उत्तम वादकही होते . तबला ,पेटी सारंगी वादनावर त्यांची हुकमत होती .
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत , नाट्यसंगीताच्या क्षितिजावर आपल्या तेजाने तळपणारा हा तेजोनिधी . शास्त्रीय संगीत , नाट्यसंगीत याचा सुगीचा काळ होता तो असे म्हणायला हरकत नाही . एकाच वेळी पं.भीमसेन जोशी , पं.कुमार गंधर्व आणि पं.वसंतराव देशपांडे हे दिग्गज आपल्या स्वर्गीय गायनाने रसिकांना रिझवत होते . पुलं बरोबरचे त्यांचे मैत्र हा एक सर्व मराठी रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता . महेश मांजरेकर यांच्या भाई चित्रपटात याचे अतिशय सुरेख चित्रण केले आहे .
दि. 2 मे 1920 रोजी विदर्भात अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे वसंतरावांचा जन्म झाला . हिंदूस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण वसंतरावांनी वेगवेगळ्या घराण्यातील गुरुंकडून घेतले होते . एका ठराविक घराण्यासोबत त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही . सुरूवातीला विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य , ग्वाल्हेर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्याकडून नागपूर येथे त्यांनी शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षण घेतले .त्यानंतर किराणा घराण्याचे सुरेशबाबू माने , पतियाळा घराण्याचे असदअलीखाँ , भेंडीबाजार घराण्याचे अमन अली खाँ आणि अंजनीबाई मालपेकर तसेच रामकृष्णबुवा वझे अशा एकापेक्षा एक दिग्गजांकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले . पण त्यांच्यावर खरा प्रभाव होता तो दीनानाथ मंगेशकरांचाच . दीनानाथांच्या स्वच्छंदी शैलीचे वसंतराव खरे वारसदार होते . एकलव्य वसंतरावांचे पंडित दीनानाथ मंगेशकर हे द्रोणाचार्य होते . इतक्या वेगवेगळ्या गुरुंकडे शिक्षण घेऊनसुद्धा त्यांच्यावर कधी कुठल्या घराण्याचा शिक्का बसला नाही .
वसंतराव केवळ आठ वर्षांचे असताना संगीतातले त्यांचे टॕलंट भालजी पेंढारकरांनी ओळखले होते . कालियामर्दन या चित्रपटात भालजींनी वसंतरावांना कृष्णाची भूमिका दिली होती . दूधभात , अष्टविनायक अशा काही चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या . 80 पेक्षा जास्त मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते . मराठी संगीत नाटकांच्या सुरूवातीपासूनचा इतिहास त्यांनी संकलित केला होता . राग राज कल्याण या यमन रागातल्या पंचम पूर्णतया वगळून केलेल्या नव्या रुपाचे ते जनक होते . ते अतिशय उत्तम पेटी , तबला वादक होते . वसंतराव सारंगीसुद्धा उत्तम वाजवत.
पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित कट्यार काळजात घुसली , वसंतरावांच्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू . दोन घराण्यांच्या गायकीच्या संघर्षावर आधारित संगीत नाटक . संगीत नाटकांच्या परंपरेतील अमर्याद लोकप्रियता लाभलेलं कदाचित हे शेवटचच संगीत नाटक असावं . पं. भार्गवराम आचरेकर , प्रसाद सावकार , प्रकाश घांग्रेकर , बकुळ पंडित , फैयाज आणि अर्थात जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत यांच्या साथीत वसंतरावांनी हे नाटक अत्युच्चपदी शिखरावर नेऊन ठेवलं होतं . त्यातील खाँसाहेबांची , अत्यंत आक्रमक पद्धतीने त्यांनी गायलेली पद मराठी रसिक कदापी विसरणे शक्य नाही . हेच वसंतराव त्यांच्या किंचितशा अनुनासिक स्वरात जेंव्हा बगळ्यांची माळ फुले , हे वा. रा. कांत यांचं अत्यंत मुलायम भावगीत श्रीनिवास खळ्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गातात तेंव्हा ते ऐकणे हा एक स्वर्गीय अनुभवच .
लाहोरला असताना आसद अली खाँ नावाच्या एका अवलिया उस्तादाने सहा महिने फक्त ‘ मारवा ‘ पिसून घेतला . अनेक दिग्गजांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेल्या वसंतरावांचे पंडित दीनानाथ हेच द्रोणाचार्य होते . पुण्यात अलका टॉकीज जवळच्या एका चाळीत तळ मजल्यावर सारंगिये महमद हुसेन खाँ साहेबांचा एक गायन क्लास होता . याठिकाणी वसंतरावांची आणि पुलंची पहिली गाठभेट झाली . पुढील अनेक वर्षांच्या सुरेल मेत्रीची ती सुरूवात होती .
गाण्यात अत्यंत आक्रमक असणारे वसंतराव , पेटी मात्र विलक्षण हळुवारपणे वाजवत . सतारपण अगदी झुळकी सारखी शीतल .
एकदा पुण्यात एका मैफिलीत हिराबाई गात होत्या . तबल्याला वसंतरावांचा मस्त सुरेख ठेका चालला होता की , भीमसेन जोशी भर मैफिलिला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने म्हणाले , ” गाणाऱ्याला गात ठेवणारा ठेका तो हा .- ” ” वा बुवा “- खांसाहेब अहमदजान थिरकवा म्हटले की मी मी म्हणाऱ्या गवयांच्या अंगाला घाम फुटतो . एकदा हिराबाईंच्या घरी खांसाहेबांचा मुक्काम होता . एका संध्याकाळी वसंतरावांनी दीनानाथरावांच्या ढंगात , रुपकात ‘ चंद्रिका ही जणू ‘ सुरू केले . रुपक हा खांसाहेबांचा लाडका ताल आणि खांसाहेबांनी रुपकाची आपली सारी यादगारी ओतायला सुरू केली . दीड तास चंद्रिका , खांसाहेबांचा रुपक चालूच . तसल्या त्या तापलेल्या हातांनी खांसाहेबांनी वसंतरावांची पाठ थोपाटली . वसंतरावांचे असे अनेक किस्से पु.ल. देशपांड्यांनी आपल्या लेखात खुलवले आहेत.
वसंतरावांचा नातू राहुल आज वसंतरावांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करीत आहे . मराठी संगीत नाटकांचे पुनुरुज्जीवन करण्याचा राहुलचा प्रयत्न स्तुत्य आहे . त्यात त्याला संपूर्ण यश मिळो .
पंडित दीनानाथ मंगेशकरांच्या स्वच्छंदी शैलीत अभिजात शास्त्रीय संगीत , नाट्यसंगीत तसेच मृदू मुलायम भावगीते गाऊन रसिकांना स्वर्गीय आनंद देणाऱ्या वसंतराव या गानमहर्षीस आदरपूर्वक प्रणाम !


