मनमोहक श्रावण
श्रावण म्हणजे काय असे कोणालाही विचारले तरी सर्वाच्या समोर निसर्गाचं मनमोहक रूप उभे राहते. श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे मनमोहक पाऊस, श्रावण म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, अशी किती तरी श्रावणाची रूपे आपणाला सांगता येतील. श्रावण म्हणजे एक मांगल्याचे प्रतीक असलेला महिना असे वर्णन करता येईल. जो तो आपापल्या परीने व्रतवैकल्य उपासतापास करीत असतो. माणसाच्या गरजा या वेगवेगळ्या असतात आणि या गरजा माणसाला आनंद निर्माण करून देत असतात. जगात सुखी असा कोण आहे हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे माणसांच्या गरजांच्या चक्राप्रमाणे त्याचा आनंद सादर होतो. म्हणून श्रावण तुम्हाला कसा वाटला, कसा भावला हे माणसागणिक अगदी वेगवेगळे असते.
मुळात श्रावण हा शब्दच ऊर्जा देणारा आहे. अगदी गरिबापासून श्रीमंतापर्यंत श्रावण हा मनाच्या कोपऱ्यात अगदी घर करून बसलेला असतो. श्रावण हा शब्द येताच प्रथम ‘श्रावणात घननिळा बरसला..’ हे लताताईंचे शब्द आपल्या ओठावर तरळू लागतात. श्रावण हा ऋतूच आपल्याला प्रेमाचा गोड संदेश देत असतो. निसर्गाची किमया म्हणावी तर या दिवशी उधळण करत असतो. सारा निसर्ग जणू नवचैतन्याने न्हाऊन गेलेला असतो.
निसर्गाने कोकणावर जणू अलंकाराची उधळणच केली आहे. माझे मन हे कोकणातील नयनरम्य अशा निसर्गातच अडकले. माझ्या कोकणची माती मला नेहमीच साद घालत असते. म्हणून मला भावलेला श्रावण म्हणजे कोकणात घालवलेले ते मनमोहक श्रावणाचे दिवस माझ्या मनात अगदी जाखडी नृत्याप्रमाणे नाचत असतात.
श्रावण म्हटले की आजही माझ्या डोळ्यासमोर कोकणातील नयनरम्य निसर्ग ठाण मांडून उभा राहत असतो. श्रावणात भूमी हिरवागार शालू नेसून अगदी नव्या नवरीसारखी नटलेली असते. नद्या-नाले वाहत असतात. धबधबे तर किती बघू आणि किती नको असे वाटत असते. भातलावणीची कामे आटोपून नाचणी टोवण्याची कामे सुरू झालेली असतात. शेतकरी कामात अगदी गढून गेलेला असतो आणि या काळात त्याला आनंद देण्याचे काम हा श्रावण करत असतो. श्रावणात येणारे सण हे कोकणात अगदी आनंदाने साजरे केले जातात. सण कसे साजरे केले जातात हे आपल्याला कोकणात दिसून येतं, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. या काळात रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, नागपंचमी, जन्माष्टमी, दहीकाला हे सण कसे साजरे करावेत याचा आदर्श आपण कोकणातून घ्यावा. कुठलाही गाजावाजा न करता अगदी भक्तिभावाने हे सण साजरे केले जातात.
कोकण हा भौगोलिकदृष्टय़ा डोंगर-नद्या-नाले- टेकडय़ा यांनी व्यापलेला आहे. श्रावणामध्ये निसर्गाच्या सृष्टीचा आस्वाद घेताना अगदी दृष्टी कमी पडते. . हिरवागार निसर्ग वाहणाऱ्या नद्या-नाले हे सगळं अगदी विलोभनीय . श्रावणात पडणारा पाऊस हादेखील जणू जिवलग वाटणारा सखा असतो. कोणतेही नुकसान न पोहोचवणारा पाऊस अगदी उन्हा बरोबर लपंडाव खेळत असतो.
मी लग्न झाल्यावर श्रावण अनुभवण्यासाठी आमच्या गावी सावर्डे( चिपळूण) येथे राहिले होते. श्रावण सुरू झाला म्हणजे सणावारांची सुरुवात होत असे. नागपंचमीची मज्जा तर विचारू नका. दहा-दहा दिवस अगोदर माती आणून बनवलेला नाग, त्याचे रंगकाम आणि नागपंचमीच्या दिवशी बसवलेला नाग त्याची पूजा आजही लक्षात आहे. नागाची पूजा झाल्यावर आम्ही सगळ्या नवीन लग्न झालेल्या मुलीनी फुगड्या घातल्या. गाणी म्हंटली झोके घेतले. नागपंचमीच्या दिवसापासून जाखडी नृत्याची तालीम सुरू होत असे ती अगदी गणपती येईपर्यंत. मंगळागौरीला तर विचारूच नका. इतकी धमाल की बास . जिची मंगळागौर असायची तिच्या घरी आदल्या दिवशी पासून तयारी करायची . मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ खेळलो. जिची मंगळागौर तिने मौन घेऊन जेवायचे बाकीच्यांनी तिला बोलण्यासाठी उचकावयचे. किती मज्जा ती. जन्माष्टमीच्या दिवशी जागवलेली रात्र आणि दुसऱ्या दिवशी साजरा करण्यात येणारा दहीहंडी उत्सव हा जणू एकात्मतेचे प्रतीक . दही-हंडी उत्सव कसा साजरा करावा हे आजच्या शहरातील लोकांनी गावातील लोकांकडून शिकले पाहिजे. श्रावणी सोमवार , मंगळवार आणि शनिवार या दिवशी धरलेले उपवास, श्रावणात घडणाऱ्या विलोभनीय अशा गणपतीच्या मूर्ती .असा हा विलोभनीय श्रावण अगदी सर्वाना हवाहवासा वाटतो.
श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना .माझ्या आईचे माहेर धुळे असल्यामुळे खानदेशी पारंपारिक पदार्थ आमच्या घरी केले जातात . नवीन लग्न झालेल्या स्त्रीयांनी पहिल्या पाच वर्षे पुढील सण करावे हि पद्धत आहे .
सोमवारी उपवास करून प्रत्येक सोमवारी निरनिराळ्या धान्याची शीवामुठ वाहीली जाते.
मंगळवारी मंगळागौर. या दिवशी जीची मंगळागौर असते तिने आणि बाकी वशेळ्यांनी न बोलता जेवायचे. सकाळी जेवायला पुरणा- वरणाचा स्वयंपाक करावा व रात्री जेवायला भाजणीचे वडे आणि मटकीची उसळ आणि आपल्याला आवडेल तो गोडाचा पदार्थ .रात्री मंगळागौरीचे खेळ खेळायचे.
बुधवार व गुरूवारी बुध बृहस्पतींची पंचोपचारी पूजा करून गंधाने तिजोरी, कपाट, दरवाजे यांवर बुध बृहस्पती काढावे .
शुक्रवारी जीवतीची पुजा केली जाते. लेकुरवाळी सवाष्ण जेवायला घालून नैवेद्याला खापरा वरच्या पोळ्या आणि पुरणाचे दिवे करावे ते दिवे घरातील सवाष्णीनेच खावे.
शनिवारी मुंजाला जेवायला बोलावून गोड पदार्थ करावा.
रविवारी सूर्य व्रत करावे .सूर्य मंडळ पाटावर काढावे व पंचोपचारी पूजा करावी . पूजा होईपर्यंत मौन पाळावे.
नागपंचमीच्या दिवशी पाटावर नाग काढून त्याची पूजा करून लाह्या आणि पुरणाच्या दिंडयांचा नैवेद्य दाखवायचा. या दिवशी तळायचे नाही चिरायचे नाही आणि तवा चुलीवर ठेवायचा नाही .म्हणून पोळीचे पीठ भिजवून त्याचे छोटे गोळे हातावर थापून त्याच्या बट्टया करून चुलीवर (गँसवर) पातेल्यात भाजून त्या खायच्या.
पोळा या सणाला बैलांना सजवले जाते . त्यांना बाजरी खायला दिली जाते बैलांची पूजा करून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून बैलांना खायला देतात.या दिवशी बैलांना कुठल्याही प्रकारचे कष्ट होणार नाहीत हे पाहिले जाते, प्रत्येक दिवशी त्या त्या सणाची कहाणी वाचावी.
खानदेशात बाजरीचे पीक जास्त असल्यामुळे दिप अमावस्येला ( दिव्याची आरास) बाजरीचे दिवे करण्याची पारंपारिक पद्धत अजूनही दिसून येते.
साहित्य — गूळ – १/४ वाटी, बाजरीचे पीठ २ वाट्या , वेलची पूड, केशर, चवीपुरत मीठ , थोडे पाणी.
कृती – – गूळ पाण्यात विरघळून घ्यावा त्यात बाजरीचे पीठ , वेलची पूड, केशर, आणि चवीपुरते मीठ घालावे व घट्ट भिजवून घ्यावे . त्या पीठाचे मोठे दिवे करावे . चाळणीला अथवा मोदक पात्राला थोडे तुप लावून दिवे वाफवून घ्यावे . तुप घालून खायला द्यावेत .
आजच्या या सिमेंटच्या युगात खरंच ती मजा हरवल्यासारखी वाटते. मुंबईमधले सण आता कृत्रिम वाटू लागले आहेत. अशा वेळी कोकणातले श्रावणातले विलोभनीय असे दिवस आठवतात. तेच दिवस माझ्या आयुष्यात इंद्रधनुष्याप्रमाणे रंग भरतील यात शंका नाही.
सौ.मानसी मंगेश सावर्डेकर.
नौपाडा ठाणे .


