पार्लेकरांना पार्ल्यात काय काय हवे आहे ?
लोकांनी विश्वास दाखवून निवडून दिलेल्या सर्वच नवनिर्वाचित नगरसेवकांचे www.townparle.com तर्फे अभिनंदन! पण त्यांच्यावर याच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी मात्र आली आहे. तेंव्हा पार्ल्याला आणि आपल्या प्रभागाला सर्वात सुंदर उपनगर बनवणे हा ध्यास घेऊन कमला सुरुवात करावी अशी प्रत्येक पार्लेकरांची आपणाकडून अपेक्षा असेल.
अशाच जोशी काका , साने काका, राणे काकू , आणि अशाच तमाम पार्लेकरांच्या आपणाकडून असणाऱ्या काही अपेक्षा खाली नमूद करण्याचा आम्ही प्रयत केला आहे.
१. पार्ल्यात उत्तम रस्त्यांची सोय करावी – पार्ल्यातील बऱ्याच रस्त्यांवर भरपूर खड्डे असतात. कित्येक वेळा त्यावरून जाताना २ व्हीलर चालवणाऱ्यांची आणि रिक्षातून जाणाऱ्यांचीही खूप पंचाईत होते. काही ठिकाणी फार छोटे छोटे खड्डे जरी असले तरी रात्रीच्या वेळी ते न दिसल्याने बरेच छोटे मोठे अपघाताचे प्रसंगही येतात. त्यामुळे सगळ्यात आधी नगरसेवकांनी आपापल्या विभागातल्या रस्त्याना नवी चकाकी देणे. अगदी सिमेंटचे गुळगुळीत नसले तरी डांबराचे सरळसोट रस्ते असावेत कारण पेव्हर ब्लॉक लावलेल्या रस्त्यांमधील एक एक ब्लॉक कधी निसटतो आणि रस्ता खड्डेमय कधी होतो हे ध्यानातही येत नाही तरीही पेव्हर ब्लॉक गरजेचे असतील तर त्याची नीट काळजी घेतली जाईल ते कृपया पाहणे.
२. पार्ले पूर्वच्या बागांचा कायापालट करावा –
पार्ले पूर्व आणि पार्ले पश्चिम येथील बागा , उद्याने बघितली की दोघांमधले जमीन आस्मानाएवढे अंतर जाणवते. पार्ले पश्चिम आणि पार्ले पूर्व येथील उद्यानांमधला फरक पाहताक्षणीच नजरेला खुपतो. हे म्हणण्याचे कारण असे की पश्चिमेला असलेल्या बागांचा रूप रंग तेथील रहिवासी आणि नगरसेवक इत्यादींनी मिळून असा काही बदलला आहे की त्या बागा पाहताना पूर्व पार्लेकर अगदी तोंडात बोटे घालेल. दादाभाई क्रॉस रोड वरील वल्लभभाई पार्क हे तिथल्या रहिवाश्यांच्या व अमित साटम यांच्या प्रयत्नांनी असे खुलले कि यात आता संध्याकाळी रंगीत कारंजे बघायला मिळतात , मुलांसाठी अद्ययावत खेळ घसरगुंडी,झोपाळे , सी सो आणि बरेच खेळ आहेत. अगदी योग साठी आणि व्यायामासाठी विशेष जागा देखील येथे ठेवल्या आहेत. आणि झाडांची आणि गवताची हिरवळ आणि मोकळी जागा सकाळी मॉर्निंग वॉक करताना मन मोहून टाकते.
तेच दृश्य आपण जुहू कडे जाताना रस्त्यात येणाऱ्या दोन उद्यानांकडे पहिले कि दिसते. जुहू जोगर्स पार्क आणि पुष्पा पार्क. इतकी सुंदर देखभाल आणि रचना पाहून मन प्रसन्न होते. पुष्पा पार्क मध्ये तर मुलांना सायकल चालवायची अतिशय सुंदर सोय केली आहे. इथे सायकल भाड्यानेही घेता येते.
हल्लीच विलेपार्ले जवळच्या पण अंधेरी हद्दीत येणाऱ्या लल्लुभाई पार्कचंही खूप छान सुशोभीकरण केले आहे.या सर्व बागांमध्ये मॉर्निंग वॉक ला जाताना खरंच खूप छान वाटते.
अशीच छान उद्याने पार्ले पूर्व येथेही बनू शकतील. पूर्व पार्ल्यात जागांची कमी नाही. फक्त पार्लेकरांनी एकत्र येण्याची गरज आहे. मार्केट मध्ये असणारे आनंदीबाई केसकर उद्यान , प्ले ग्राउंड, शान सिनेमाच्या जवळचे स्वातंत्रवीर सावरकर उद्यान , आझाद रोड वरील उद्यान अशी अनेक ठिकाणे व्यवस्थित प्लॅनिंग करून उत्तम सुशोभित बनू शकतील. आणि पार्लेकरांना जवळजवळ पार्ल्यातल्या प्रत्येक एरियात खूप छान जॉगर्स पार्क किंवा मुलांसाठी प्ले पार्क नक्की बनू शकेल.
आपण सर्व पार्लेकर व निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक, स्वयंसेवी संस्था हे सर्व मिळून या ठिकाणांना एक वेगळे रूप देऊ शकतो आणि त्यांच्या उपयुक्ततेत कमालीची वाढ करू शकतो.
तेंव्हा हेही जरा मनावर घ्यावे !!!
३)पार्ल्यात मार्केटमधील पार्किंगची व्यवस्था सुधारावी: माणूस मार्केट मध्ये आल्यानंतर त्याला भाज्या कमी मोटारीच जास्त दिसतात. त्यांच्यासाठी काही सोय केली तर हा त्रासही कमी होईल.
४)पार्ल्यात चांगले सायकलिंग ट्रॅक निर्माण करणे : सायकलिंग करणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली म्हणतात. पण या ट्रॅफिक च्या जमान्यात चालायला जागा मिळाली तरी बेहहतर सायकल चा विचारही नको . असे सल्ले बरेच शहाणे देतात पण प्रत्येक प्रॉब्लेम ला सोल्युशन असतेच असे मानणारे आम्ही पार्लेकर !म्हणूनच तर एक छोटीशी शिफारस करावीशी वाटते की पार्ल्यात रास्ता शोधून सायकलिंग ट्रॅक बनवला तर एक उत्तम काम होईल.
५)पार्ले पश्चिमेतील लोकांचे एक खूप मोठे स्वप्न – सनसिटी सिनेमा जवळील पार्ले ईस्ट वेस्ट ब्रिजला एखादा एस्कलेटर लावा. पार्ले वेस्ट मधून ईस्ट ला मार्केट मध्ये , क्लासला , शाळेत , कॉलेजात आणि तसेच पार्ले ईस्ट मधून वेस्टला अशा अनेक कामांसाठी जाणारी अनेक मंडळी आहेत. पण ब्रिजवरच्या रोजच्या ट्राफिक मुळे रिक्षा मिळणे कठीणच ! बरं चालत जायचं म्हटले तर भर उन्हात ब्रिजचे जिने चढून आणि वर उन्हात चालत जाणे जीवावर येते. तेवढी तिथे शेडची आणि एस्कलेटरची सोय केली तर रिक्षाचे पैसे वचातील आणि थोडी चालही होईल. अगदी ते शक्य नसेल तर एखादी मिनी बस पार्ले ईस्ट ते वेस्ट आणि वेस्ट ते ईस्ट दरम्यान चालू करता आले तर पहा ना जी ब्रिजवरून जाऊन आसपासच्या एरिया मधील लोकांना सोडेल. आम्हाला बीएसटी च्या एसव्ही रोड , जुहूच्या बसेसचा तसा फारसा उपयोग होत नाही. – एक पूर्व व पश्चिम पार्लेकर !!
बाकी नेहमीचे पाण्याचे , विजेचे , कचऱ्याचे इ. प्रश्न असतातच.आणि ते तुम्ही उत्तमप्रकारे सोडवताच. फक्त वरील काही निराळे प्रश्न तुमच्या दर्शनी आणून द्यावेत एवढ्यासाठी हा छोटा प्रयत्न. आणि पार्ल्याला एक आदर्श उपनगर बनवण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा !!!

