चैत्राची चाहूल…
भारतीय पंचांगात महिना ,तिथी, वार, नक्षत्र यांना असाधारण महत्त्व आहे. ही पंचांग पद्धत आजची नसती वैदिक काळापासून चालत आलेली परंपरा आहे.आपण आपला धर्म हिंदू धर्म या नावाने ओळखत असलो तरी मुळात वैदिक धर्म आहे.
वैदिक काळात कालगणना करण्याचे एक शास्त्र निर्माण झाले आणि त्यानंतर पंचांग निर्माण झाले .कालगणना करण्यासाठी वर्ष हे एक परिमाण मानण्यात आलं आणि मग हा वर्षाचा काळ बारा महिन्यात विभागाला गेला आणि बारा महिने अस्तित्वात आले. नीट बघितले तर लक्षात येते कि या बारा महिन्यांची नावे नक्षत्रांच्या नावावरून दिलेली दिसतात.
उदाहरणार्थ – चित्रा – चैत्र विशाखा- वैशाख ज्येष्ठा -ज्येष्ठ वगैरे .
चैत्र हा आपल्या वैदिक पंचांगातील वर्षारंभाचा महिना समजला जातो.गुढी पाडवा किंवा वर्षप्रतिपदा हा या महिन्याचा पहिला दिवस म्हणून त्यास असाधारण महत्त्व आहे.संपूर्ण वर्षातील सर्व कार्यासाठी शुभ समजले जाणारे जे साडेतीन मुहूर्त आहेत त्यापैकी गुढी पाडवा हे एक मुहूर्त मानले जाते.या दिवशी सकाळी कडूनिंबाच पान खातात किंवा गूळ आणि कडूनिंब एकत्र खातात.या दिवशी दारावर गुढी आणि तोरण उभारण्याची जुनी परंपरा आहे.
गुढी पाडव्यापासून कुळधर्म – कुलाचारांचे भाग म्हणून देवीच नवरात्र या दिवशी सुरू होतं काही घराण्यात रामाचे नवरात्र सुरू करतात व रामनवमीच्या दिवशी रामजन्माच्या सोहळ्यानंतर समाप्त करतात .
चैत्र मासाच्या शुक्ल तृतीयेस गौरी पूजन करतात यानिमित्त पुढील महिनाभर सुवासिनी हार्दिक कुंकू करतात आणि वैशाख शुद्ध तृतीयेपर्यंत हा उपक्रम केला जातो.याला चैत्रगौरीचे हळदीकुंकू असेही म्हणतात.
चैत्रगौरीचे हळदीकुंकू –

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चैत्र शु . तृतीयेला गौरी तृतिया साजरी होते . या दिवशी गौरीची पूजा करून तिला लाकडी किंवा पितळी हिंदोळ्यावर बसविली जाते व नंतर तिला गाणी म्हणत झोके देतात . काही ठिकाणी या पुजेस दोलोत्सव असेही म्हणतात आणि तो अक्षय्य तृतीयेपर्यंत चालू असतो .या दिवशी स्त्रिया सुवासिनींना – हळदी – कुंकू देऊन त्यांची ओटी भरतात व त्यांना हरभऱ्याची वाटली डाळ आणि पन्हे देतोत . ज्यांच्या घरी दोलोत्सव नसतो त्या स्त्रिया महिन्याभराच्या काळात एक दिवस केवळ सुवासिनींना हळदीकुंकू देतात . शक्य आहे तिथे जागरण करतात .
या हळदीकुंकूवामुळे परिचित स्त्रियांना , मैत्रिणींना आणि आप्तेष्ट स्त्रियांना भेटण्याची , त्यांच्याशी सुखसंवाद साधण्याची चांगली संधी गृहिणींना मिळते . चित्ताला प्रसन्नता आल्यामुळे नित्याच्या एकसुरी जीवनात त्यामुळे चांगला बदल घडून येतो .
चैत्र महिना हवेतील गारवा कमी होऊन उष्मा सुरू झालेला असतो .दिवस मोठा तर रात्र लहान असते.निसर्ग मात्र टवटवीत असतो.आकाश निरभ्र असतं.रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशात चांदण्यांच सौंदर्य खूप मनोहारी दिसत . या महिन्यापासून बाजारात आंबे ,टरबूज, खरबूज ही फळं येऊ लागतात.
चैत्र महिन्याच्या पौर्णिमेस चंद्राच्या आसपास चित्रा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला चैत्र नाव देण्यात आलं आहे.


