सुतक

 


डोंगराच्या पायथ्याशी वसलेले माझे छोटेसे गाव, दूरवरून नजर टाकणाऱ्याला तर असेच वाटेल की, डोंगर नावाच्या बापाने चार वर्षांच्या लेकराला अलगद मांडीवर घेतलंय की काय! गाव तसं लहानच; पण माणसं मात्र मोठ्या मनाची. गावात जिल्हा परिषदेची शाळा, ती पण सातवीपर्यंतचीच; पण शाळेतल्या बाई अन् गुरुजी मात्र जीव ओतून शिकवणारे.

गावात तशा चार-पाच आळ्या—खालची आळी, वरची आळी, मधली आळी; दोन-तीन वस्त्या अन् वाड्या. पळत जाऊन जरी वेढा घातला गावाला, तरी अर्ध्या तासात पूर्ण व्हायचा. मनोरंजनाची साधनं कमीच त्यावेळी. टीव्ही असायचा आळीत एक-दोघांकडे. मग शनिवार आणि रविवार, लक्ष्या आणि अशोक सराफ यांचे मराठी पिक्चर बघायला त्यांच्या घराचं थिएटर व्हायचं. इतर दिवशी पारावर सकाळ-संध्याकाळ माणसांची बैठक असायची, अन् बायका रानात येता-जाता, पाणी भरायला जाताना-येताना मिसरी लावत गप्पा मारायच्या. रात्री नऊवर काटा येईपर्यंत तर सगळी अंथरुणावर पडलेली असायची.

गावात पारायण, गोपाळकाला, गौरी-गणपती, दसरा, जत्रा, घटातील नऊ दिवस आणि दिवाळी—हर सण म्हणजे बारक्या पोरांची धमालच! यातला प्रत्येक सण येण्याआधी रोज कॅलेंडर उघडून बघायचं अन् कधी एकदा त्या तारखेपर्यंत पोहोचतोय, असं व्हायचं. एरवी शांत असणारं गाव सणासुदीच्या काळात नुसतं गजबजलेलं असायचं. पुण्या-मुंबईला पैसे कमवायला गेलेली पोरं घरी यायची. आत्या-मामा पिशवीभर खाऊ घेऊन यायचे. चुलीवर कापण्या, शंकरपाळ्या, पुरणपोळ्या—काय मज्जा असायची!

कधीकधी मात्र या आनंदावर विरजण पडायचं. त्याचं कारण म्हणजे गावात पडलेलं सुतक. चौथीत असताना आज गणपती बसले, अन् तिसऱ्या दिवशी वरच्या आळीची म्हातारी मेली. अन् सगळ्यांनी लगबगीनं गणपती विसर्जन केलं तिसऱ्याच दिवशी. दहा दिवसांच्या नियोजनावर पाणी पडलं. म्हातारीचं सुतक अख्ख्या गावाला आलं. आम्हाला मात्र म्हातारीपेक्षा गणपती विसर्जनाचंच दुःख झालं.

आता झालं ते झालं. दिवाळीत मात्र कुणाचं सुतक नको यायला. यासाठी सगळ्या पोरांनी ठरवलं. प्रत्येकाकडे एक आळी, वाडा, वस्ती वाटून टाकली आणि कोणता म्हातारा किंवा म्हातारी अंथरूण धरून आहे का, यावर पाळत ठेवायची असं ठरलं. पण जर असेलच शेवटच्या घडीला म्हातारी किंवा म्हातारा, तर काय करायचं याच्यावर पण जोरदार चर्चा झाली. एकतर देवाला म्हणायचं, “दिवाळीच्या आधीच म्हातारी मरू दे; नाहीतर दिवाळीतले लाडू संपल्यावर तरी!”

दिवसातून शाळा सुटल्यावर एक फेरफटका तरी व्हायचा म्हाताऱ्याच्या घरी. कोण म्हणायचं, “आज एक वाटी शिरा खाल्ला म्हाताऱ्यानं, काय नाय होत म्हाताऱ्याला!” मग जरा हायसं वाटायचं. तर कोण म्हणायचं, “काय खरं नाय; घोटभर पाणी सुद्धा नाय घेतलं.” तेव्हा मात्र हृदयात धाप-धाप असा पंपासारखा आवाज यायचा.

असे करत एक महिना सरला आणि दिवाळी आता तोंडावर आली. आता मात्र म्हाताऱ्याच्या घरी दिवसातून तीन वेळा फेरी सुरू झाली—शाळेत जाताना, मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्या-सुटल्या दप्तरसकट. आता मात्र प्रार्थना बदलली. देवाकडे, “म्हाताऱ्याला आताच काय नेऊ नको. दिवाळी संपली की लगेच घेऊन गेलास तरी चालेल. त्याबदल्यात एका लाडूच्या नैवेद्याऐवजी दोन देईन,” अशी डील व्हायची.

म्हातारं बिचारं चांगलं तग धरून राहिलं आणि शेवटी दिवाळी झाल्यावरच गेलं.
Main Menu