विशाल वटवृक्ष, वनस्पती उद्यान, कोलकाता

ह्यावर्षी जून महिन्यात कोकण किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला; मुंबई थोडक्यात बचावली. त्याआधी वीस मेच्या सुमारास ‘अम्फन’ चक्रीवादळाने ओडिशा व पश्चिम बंगाल राज्यांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला. वादळाची सूचना लवकर मिळाल्यामुळे मनुष्यहानी जरी कमी झाली असली तरी झालेलं इतर नुकसान बरंच होतं. त्यानंतर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांमधल्या एका बातमीने गतस्मृतींची पानं चाळवली गेली.

बातमी होती कोलकाता येथील जगदीशचंद्र बोस वनस्पती उद्यानासंबंधातली; तिथल्या एका विशाल वटवृक्षासंबंधी. “अम्फन चक्रीवादळाच्या तडाख्यात ह्या विशालकाय वटवृक्षाच्या परिघावरच्या खोडांना व फांद्यांना क्षती पोहोचली आहे. नक्की किती नुकसान झालं आहे त्याचा अंदाज बांधला जात आहे.” एका वटवृक्षाच्या संबंधी बातमी प्रसारित होते, ह्यातच त्याचं महत्त्व लक्षात येतं. हा जगातील सर्वात विस्तृत वटवृक्षच नव्हे तर जगातील सर्वात विस्तृत वृक्ष आहे. त्या वनस्पती उद्यानासाठीच नव्हे तर भारतासाठी हा वटवृक्ष अभिमानाचा ठेवा आहे. भारताचा राष्ट्रीय वृक्ष, देखील ‘वटवृक्ष’च आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी आम्ही कोलकाताला फिरायला गेलो होतो. हाजरा रस्त्यावरील महाराष्ट्र निवासमध्ये आमचं वास्तव्य होतं. कोलकातातील जमतील तेवढी महत्वाची पर्यटन स्थळं बघण्याचं आम्ही ठरवलं होतं. तेव्हा भारतात कोलकातामध्येच मेट्रो रेल्वे होती. ट्रामही सुरू होती. त्यामुळे त्यावेळी सर्व प्रकारची; प्राचीन ते अर्वाचीन; चाकांवर चालणारी वाहनं, चालू स्थितीत कार्यरत असलेलं ते भारतातीलच नव्हे तर जगातील एकमेव शहर होतं, कदाचित आजही आहे. आरामशीर अँबॅसॅडर टॅक्सी कोलकातात अजूनही पाहायला मिळतात. आम्ही त्यातल्या सर्व यांत्रिक वाहनांचा वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी, गरजेनुसार वापर केला.

व्हिक्टोरिया मेमोरियल, इंडियन म्युझियम, दक्षिणेश्वर मंदिर, काली घाट, बेलूर मठ ही ठिकाणं पाहून झाली. भारतीय वनस्पती उद्यान(इंडियन बोटॅनिकल गार्डन) हे ठिकाणही पाहण्यासारखं असल्याचं व तिथे जगातील सर्वात मोठा वटवृक्ष असल्याचं, महाराष्ट्र निवासमधल्या मुक्कामात समजलं होतं. वेळ मिळाला तर तिथे जाण्याचं मनात होतं.

एके दिवशी, दुपारनंतर आम्ही टॅक्सीने तिथे गेलो. ‘इंडियन बोटॅनिकल गार्डन’, ‘कोलकाता बोटॅनिकल गार्डन’; पूर्वाश्रमीची ‘रॉयल बोटॅनिकल गार्डन’ अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या ह्या भारतीय वनस्पती उद्यानाचं, २५ जून २००९ रोजी, जगप्रसिध्द भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, आचार्य जगदीशचंद्र बोस ह्यांच्या सन्मानार्थ ‘आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बोटॅनिकल गार्डन’ असं नामकरण करण्यात आलं आहे.

तिथे पोहोचल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ‘पाम ट्री’, जेवणाच्या मोठ्या थाळ्यांसारख्या दिसणाऱ्या, गोलाकार आकाराच्या, कडा असलेल्या पानांच्या वॉटरलीलीज, बांबूंचं बन, ऑर्किड तसंच अनेक प्रकारचे वृक्ष पाहायला मिळाले. ती वृक्षसंपदा पाहत असताना तो वटवृक्ष पाहण्याचं सारखं मनात येत होतं. तिथे त्यासंबंधी चौकशी केल्यावर तो वटवृक्ष त्या वनस्पती उद्यानाच्या एका टोकाकडे असल्याचं समजलं आणि आम्ही त्या दिशेने निघालो. काही मिनिटं दोन्ही बाजूंना मोकळा परिसर असलेल्या सरळ रस्त्याने चालल्यावर, काही अंतरावर समोरच्या बाजूस बऱ्याच मोठया परिसरात पसरलेली झाडी नजरेस पडली. जवळ पोहोचल्यावर लक्षात आलं की ती झाडी म्हणजे ते स्वतंत्र वृक्ष नसून, एकाच विशाल वटवृक्षाच्या पारंब्यांतून तयार झालेलं एक ‘वट’‘नगर’ आहे. आम्ही त्या ‘जंगलात’ शिरण्याआधी त्यासंबंधीची एका फलकावर थोडक्यात दिलेली माहिती वाचली. त्यामध्ये “तो वटवृक्ष त्या वनस्पती उद्यानाचं मुख्य आकर्षण असल्याचं म्हटलं होतं. तो वटवृक्ष अडीचशे वर्षांहून अधिक जुना असून तो १.६ हेक्टर एवढ्या परिसरात पसरला आहे. त्याच्या ३६१८ पारंब्यांची, खोडं तयार झाली असून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये त्याची नोंद घेण्यात आली आहे. ते जगातील सर्वात मोठं नैसर्गिक आच्छादन आहे.”

आम्ही त्याच्या फांद्यांच्या छताखाली शिरलो आणि त्याच्या आधी उल्लेखलेल्या असंख्य पारंब्यांतुन तयार झालेल्या खोडांमधून फिरू लागलो. त्याचं मुख्य खोड शोधण्यासाठी त्याच्या मध्याच्या दिशेने जाऊ लागलो. तेव्हा तिथे समजलं की आता त्याचं मुख्य खोड अस्तित्वात नाही. इ.स.१८६४ व इ.स.१८६७ च्या दोन मोठ्या चक्रीवादळांना तोंड दिलेल्या ह्या वटवृक्षाच्या मुख्य खोडाला कोणत्यातरी रोगाचा प्रादुर्भाव झाला व त्यामुळे इतर झाड जगवण्यासाठी इ.स.१९२५ साली ते कापावं लागलं; त्यावेळी त्याचा परीघ पंधरा मीटरचा होता, अशी माहितीही तिथे मिळाली. त्या खोडाच्या जागी एक स्मृतीशीला बसवण्यात आली आहे पण ती पाहायला आणखी आत शिरणं जोखमीचं वाटलं आणि आम्ही वटवृक्षाच्या परिघावरूनच त्याची प्रदक्षिणा पूर्ण केली. वटवृक्षाच्या भोवती फिरण्यासाठी रस्ता बांधण्यात आला होता पण वटवृक्षाचा विस्तार त्याच्या पलीकडे चालूच राहिला. स्वतःचाच जागतिक विक्रम मोडण्याचा हा प्रकार आहे. एक आगळा वेगळा नैसर्गिक आविष्कार आम्ही पाहत होतो. हा ‘विशाल वटवृक्ष’ हे ‘बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया’चं प्रतीक चिन्ह आहे.

थोडावेळ तिथे थांबलो आणि ते दृश्य मनात साठवलं. तिथून निघालो; उद्यानातील इतर वृक्षसंपदा पाहिली. तिथे समजलेली आणखी काही माहिती ज्ञानवृद्धी करून गेली. इ.स.१७८७ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्नल रॉबर्ट कीड ह्या सेनाधिकाऱ्याने ह्या उद्यानाची उभारणी मुख्यत्वे व्यापार करण्याच्या दृष्टीने उपयोगी अशा, साग व इतर वृक्षांची ओळख करुन घेण्यासाठी केली. तसंच मसाल्याच्या पिकांच्या उत्पादनाचाही हेतू त्यामध्ये होता. तरी देखील ह्या वनस्पती उद्यान निर्मितीची एक सफलता म्हणजे चीनमधून आणलेल्या चहाच्या रोपांची यशस्वी लागवड आणि त्या अनुषंगाने आसाम व हिमालयातील प्रदेशात चहा उत्पादनाला, तसंच त्याच्या व्यापाराला मिळालेली चालना, हे होय.

गजबजलेल्या कोलकातामध्ये आम्हाला एक सुरेख वनस्पती उद्यान पाहायला मिळालं. एव्हढंच नव्हे तर जागतिक विक्रम प्रस्थापित केलेल्या वटवृक्षाच्या छायेत पांथस्थ म्हणून काही क्षण घालवता आले. त्याच वटवृक्षाला ‘अम्फन’ चक्रीवादळामुळे नुकसान झाल्याची बातमी वाचली आणि मनातून हळहळलो.

ह्या वनस्पती उद्यानाचं व्यवस्थापन ‘भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थे’तर्फे केलं जातं. कोलकाता पर्यटनात बारा हजारांपेक्षा जास्त वनस्पती प्रजातींचे नमुने असलेल्या आणि १०९ हेक्टरवर पसरलेल्या ‘आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बोटॅनिकल गार्डन’ला जरूर भेट द्यावी आणि विशाल वटवृक्ष (ग्रेट बनयन ट्री) ह्या भारतासाठी अभिमानाचा ठेवा असलेल्या वृक्षदर्शनासाठी वेगळा वेळ राखून ठेवावा.

डॉ. मिलिंद न. जोशी
         

Pc: google  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu