आगळं-वेगळं – तोनले सॅप लेक, सियाम रीप, कंबोडिया

जगातील सर्वात मोठं धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंबोडियातील अंगकोर वाट पाहण्यासाठी आम्ही नोव्हेंबर २०१७च्या सुरुवातीस गेलो होतो. सियाम रीप ह्या कंबोडियातील दुसऱ्या महत्त्वाच्या शहरापासून अंगकोर वाट साडेसहा किमी अंतरावर आहे. आमचं वास्तव्य सियाम रीपमध्येच होतं. 

आम्ही कंबोडियात जरी अंगकोर वाट पाहायला गेलो असलो तरी तिथे गेल्यावर त्यात अंगकोर थॉम, बायॉन, ता प्रोम, बनते स्राई, प्रे रूप व इतर बऱ्याच मंदिरांची भर पडली. तेथील थोड्याच दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला बरचसं वेगळं, इतरत्र न आढळणारं अनुभवता आलं. सियाम रीपच्या जवळ असलेल्या ‘तोनले सॅप लेक’ची सफर देखील एक वेगळा अनुभव देऊन गेली.

सकाळच्या प्रदीर्घ सत्रात अंगकोर वाट, अंगकोर थॉम, बायॉन इथलं स्थलदर्शन झाल्यामुळे आम्ही खरं तर खूप दमलो होतो. त्यामुळे हॉटेलवर विश्राम करून तासाभरातच परत निघायचं जीवावर आलं होतं. आमचा टॅक्सी चालक आल्याचा हॉटेलच्या लॉबीतून फोन आला आणि आम्ही लगेच तयार झालो. काही ठिकाणी जाण्यासाठी खरं तर आपण फारसे उत्सुक नसतो. ही ठिकाणं बऱ्याच प्रवासी कंपन्यांच्या स्थळदर्शनाच्या यादीत समाविष्ट केलेली असतात म्हणून, त्यांच्यासाठी आपल्या प्रवासी कार्यक्रमात आपण जागा निर्माण करतो. प्रवासी कंपन्यांच्या स्थळदर्शन यादीबरोबरच जेव्हा स्थानिकदेखील अशा ठिकाणांची भलामण करतात तेव्हा आपल्याला ‘त्यात दम आहे’; ह्या निष्कर्षाप्रत यावं लागतं.  ‘तोनले सॅप लेक’ही त्यातलाच. ह्यातलं ‘तोनले’ म्हणजे काय?, ‘सॅप’ म्हणजे काय?; काही समजत नव्हतं आणि निव्वळ एक ‘लेक’ म्हणजे तलाव पाहायला जायचं, हा एक अट्टहासच असं माझं मत झालं होतं. त्यामुळे त्याविषयीची कोणतीही माहिती न घेता, सर्वांच्या मतास मान वगैरे देऊन, ‘तोनले सॅप लेक’ पाहायला आम्ही तयार झालो.

मला ह्या ठिकाणाची माहिती नाही ही बातमी तिथपर्यंत टॅक्सी चालकामार्फत हॉटेल स्टाफपर्यंत पोहोचली असावी कारण आम्ही लॉबीत आल्याआल्या काउंटरवरची, केसात पांढऱ्या चाफ्याची फुलं माळलेली सुकांता, हातात माहितीपत्रकं घेऊन सामोरी आली. तोनले सॅप लेकला जाताना वाटेत मी ती वाचावी अशी तिची इच्छा होती. तिला नाराज न करता, तिचे आभार मानून आम्ही टॅक्सीतून निघालो. ती माहितीपत्रकं मी वाचत नसल्याचं टॅक्सी चालकाच्या लक्षात आलं. त्यानेच सुचवलेलं ते ठिकाण असल्यामुळे माझी त्यादृष्टीने तयारी करून घेण्याची घाऊक जबाबदारी त्या बिचाऱ्यावर पडली. त्याने मग त्याच्या कंबोडीय इंग्रजीतून माझं बौद्धिक घेतलं. त्याची माहिती आणि आमचा प्रवास एकदमच संपला. एका लांबलचक, बैठया इमारतीसमोर त्याने टॅक्सी उभी केली. आम्ही परंपरागत मासेमारी करणाऱ्या ‘चौन्ग खनेअस’ ह्या गावी आल्याची अधिकची माहिती त्याने दिली. खाली उतरून त्याने आम्हाला तोनले सॅप लेकसाठीची तिकिटं खरेदी करण्याचा काउंटर दाखवला. आम्ही तिकिटं ‘डोला’त(‘अमेरिकन डॉलर’चा कंबोडीय उच्चार) खरेदी केली. टॅक्सी चालकाने आम्हाला एका बोटवाल्याच्या हवाली केलं.

बोटवाल्याचा मुलगाही आमच्याबरोबर होता. आम्हाला बोटीत घेऊन त्याने बोट सुरू केली. बोटीबरोबर त्या चुणचुणीत मुलाने त्याच्या तोंडाची टकळीही सुरू केली. त्याने स्वतःहूनच आम्हाला माहिती द्यायला सुरुवात केली. “तोनले सॅप लेकचा विस्तार प्रचंड आहे. कंबोडियाच्या मध्याच्या थोडया वरच्या भागात सियाम रीपपासून पंधरा किमी अंतरावर हा लेक सुरू होतो आणि दिशांच्या दृष्टीने वायव्य ते आग्नेय असा कंबोडियाची राजधानी नोम पेनच्या थोडया आधीपर्यंत तो पसरलेला आहे. तोनले सॅप लेकमधून सियाम रीप ते नोम पेन अशी ‘स्पीड बोट’ सेवाही उपलब्ध आहे. पावसाळ्यात ह्याचा विस्तार १०००० चौरस किमी एव्हढा होतो व त्याची खोली १४ मीटर पर्यंत वाढते. त्यावेळी मॅकाँग नदीतून येणारं पाणी ह्या जलाशयात साठत जातं आणि गाळ आजूबाजूच्या प्रदेशात पसरतो. त्या दलदलीमध्ये जंगलांची वाढ होते, जी जलचरांच्या पुनरुत्पत्तीसाठी पोषक ठरते. ३००हून अधिक प्रकारचे मासे तसंच साप, मगरी, कासवं इथे आढळतात. कंबोडियात फस्त केल्या जाणाऱ्या माशांपैकी अर्धे ह्या जलाशयातूनच मिळतात. ह्या लेकच्या आसपास मासेमारी व शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. कंबोडियाची तीस लाखांहून अधिक लोकसंख्या तोनले सॅप लेकवर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहे. संपूर्ण आग्नेय आशियातील हा सर्वात मोठा गोड्या पाण्याचा जलाशय आहे. कोरडया ऋतूंमध्ये हा जलाशय आक्रसतो व त्यावेळी पाणी हया लेकमधून मॅकाँग नदीत शिरू लागतं. दरवर्षी घडणारी ही एक नैसर्गिक घटना आहे.” ‘तोनले’ म्हणजे मोठी नदी आणि ‘सॅप’ म्हणजे गोड्या(पाण्याचा) अशी त्याच्या नावाची फोडही त्या मुलाने केली. त्याने सांगितलेली माहिती ज्ञानवृद्धी करून गेली. त्याचं इंग्रजीही चांगलं होतं आणि पाठांतरही. मुख्य म्हणजे ते आम्हाला समजत होतं आणि आम्ही बोललेलं त्याला कळत होतं. त्यामुळे संवाद होत होता आणि आमच्या शंकांचं निरसनही होत होतं. आम्ही त्याच्या त्या माहितीमध्ये चांगलेच गुंगून गेलो होतो.

बोटवाल्याने बोटीचं इंजिन बंद करून त्या जलाशयातच बोट थांबवली आणि आम्ही भानावर आलो. त्यावेळी सूर्य मावळतीला झुकू लागला होता. सुखद वारा सुटला होता. वर आकाश आणि आजूबाजूला फक्त पाण्याशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. आम्ही किनाऱ्यापासून बरेच आत आलो होतो. त्यावरून त्या लेकचा विस्तार लक्षात आला. बोटवाल्याने मग आम्हाला बोट अजून आत नेण्याबद्दल विचारलं पण त्याच्या व्याप्तीची कल्पना आली होती. त्यामुळे आम्ही ‘पीछे मूड’ करण्यास सुचवलं. ‘आत्ता खरी टूर सुरू झाली’, असं बोटवाल्याच्या मुलाने म्हटल्यावर अचंबा जाहला. त्याचा लगेच प्रत्यय आला. बांबूंवर उभारलेल्या एका लाकडाच्या बैठ्या इमारतीवजा रचनेच्या बाजूला त्याने बोट थांबवली आणि आम्हाला हात धरून बोटीतून त्या इमारतीत नेलं. ती एक शाळा होती. तिथे तसा एक फलक इंग्रजी आणि ख्मेर भाषेमध्ये लावला होता. कुठल्याही बाजूने संरक्षक कठडे नसलेल्या लाकडी फलाटावर आठ-दहा मुलांचा पकडापकडीचा खेळ चालला होता. म्हणजे ते त्या शाळेचं वीस फूट बाय वीस फूट क्रीडांगण होतं. आजूबाजूला सगळीकडे पाणीचपाणी होतं. एखादं मूल खेळताना खाली पडल्यास काय होईल, ह्या विचाराने माझ्या अंगावर काटा आला. सगळं जोखमीचं वाटत होतं. आम्ही त्या लाकडी फलाटाच्या मध्यावर उभे राहून बोलत होतो. त्या पाण्यात मगरी, साप असल्याचं आधीच समजलं होतं. त्या मुलांना चांगलं पोहता येतं असं सांगून बोटवाल्याच्या मुलाने आम्हाला धीर द्यायचा प्रयत्न केला. “पण पाण्यात पडलं तर मगरींचा काय भरवसा?” असं मी म्हणेपर्यंत त्याने मला हाताला घट्ट धरून त्या लाकडी फलाटाच्या टोकाशी नेलं आणि पाण्यातलं दृश्य दाखवलं. पाण्यात त्या लाकडी फलाटाखालच्या आधाराच्या बांबूंमधून, लहान थर्माकोलच्या होडक्यात बसून छोटी मुलं वल्हवत इकडून तिकडे जात होती. ते दृश्य पाहून अंगावर आलेला काटा आता सलू लागला. तिथल्या शिक्षकांशी थोडीफार बातचीत केली, तेव्हा तो विद्यार्थीगण आजूबाजूच्या अशाच बांबूंवर उभारलेल्या लाकडी घरांतून राहतो आणि आम्ही पाहिलं तसं पाण्यातून त्यांची होडकी वल्हवत शाळेत येतो, हे समजलं. त्यांच्या त्या शैक्षणिक उपक्रमास व विद्यार्थ्यांच्या जिद्दीस सलाम करून आम्ही बोटीत परतलो. पुढचा थांबा एका अनाथाश्रमाचा असल्यामुळे तिथलं दृश्य अधिक हृदयद्रावक. त्या अनाथाश्रमास यथाशक्ती देणगी देऊन आम्ही पुढच्या टप्प्याकडे निघालो. आजूबाजूस गोडं पाणी असलं तरी पिण्याच्या पाण्याच्या साठवणुकीची सोय करण्यासाठी त्यांना मदत हवी होती.

त्यानंतर आम्ही ख्मेर, मुस्लिम, व्हिएतनामी लोकांची घरं बोटीतूनच बघितली. बोटवाला त्या लोकांच्या घरी जाण्यासाठी आग्रह करत होता पण कोणाच्या घरी असं आगंतुक जाणं प्रशस्त वाटेना. त्यानंतर त्याने बोटीतूनच चर्च, मशीद इत्यादी प्रार्थनास्थळं दाखवली. तरंगता बाजार तर सतत दृष्टीस पडत होता.

त्या बोटवाल्याने आम्हाला अजून एक ठिकाण दाखवायचं ठरवलं होतं. ते म्हणजे त्या जलाशयातील उपहारगृह व स्मरणिका विक्रीकेंद्र. आम्हाला तिथे उतरवलं गेलं आणि त्याच्या मागच्या बाजूच्या दृश्याने पोटात ढवळलं. तिथे त्या पाण्यातच, एका लहानशा बंदिस्त जागेत अनेक मगरी एकावर एक पडल्या होत्या. त्यांचं नेमकं प्रयोजन समजेना. तिथून लवकरात लवकर सटकण्याची इच्छा झाली. पण त्या बोटवाल्याच्या दृष्टीने तो सहलीतला सर्वात आनंददायी टप्पा होता. अशा पकडलेल्या मगरींच्या विविध पाककृती व त्यांच्या मांसाचे तुकडे प्लास्टिकच्या पारदर्शक पिशव्यांतून भरून विक्रीसाठी ठेवले होते. आम्ही पूर्णपणे शाकाहारी असल्यामुळे तिथून निघण्याची घाई करू लागल्यावर त्या कंबोडीय पितापुत्रांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्यांच्या दृष्टीनं एकदम स्पेशल असलेली ती ‘फीस्ट’ आम्ही नम्रपणे नाकारली.

तिथे पाहिलं ते सर्व खरोखरंच वेगळं होतं. थोडक्यात आपण जसे जमिनीवर व्यवहार करतो, तशी तेथील माणसं पाण्यात व्यवहार करत होती. ज्यावेळी तो ‘लेक’ आक्रसतो तेव्हा आत्ताच्या ठिकाणी चिखल उरतो. त्यातून व्यवहार करणं कठीण जातं. ही माणसं मग आपली घरं देखील बदलतात. परत पाण्यातच नवीन घरं उभारून स्थलांतरित होतात. ह्या माहितीने तर थक्कच झालो.

एव्हाना सूर्यनारायणाने तोनले सॅप लेकवरून आपले सहस्त्रकर बाजूला नेले आणि आम्ही दीड-दोन तासांच्या नाविन्यपूर्ण अनुभवातून किनाऱ्यावर परतलो. आमच्या टॅक्सी चालकाला आम्हाला एक आगळं वेगळं ठिकाण पाहण्यासाठी उद्युक्त केल्याबद्दल धन्यवाद दिले.

“तोनले सॅप लेक हा जैवविविधतेचा एक खजिनाच आहे. स्थलांतरित पक्षी देखील तिथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर येतात. युनेस्कोने त्याला ‘बायोस्फिअर रिझर्व’ म्हणून इ.स.१९९७ साली मान्यता दिली आहे.” मी तोनले सॅप लेकला जाताना वाचणं अपेक्षित असलेली,मला दिलेली माहितीपत्रकं परतीच्या प्रवासात वाचली आणि त्यात ही अधिकची महत्त्वाची माहिती मिळाली.

कंबोडियातल्या अंगकोर वाटच्या भेटीबरोबरच सियाम रीप जवळच्या ‘तोनले सॅप लेक’ला जरूर भेट द्यावी.

‘तोनले सॅप लेक’वर एक विस्तृत लेख मी माझ्या ‘कंबोडियातील अंगकोर वाट आणि परिसर’ या पुस्तकात समाविष्ट केला आहे; तरीदेखील त्याचं वेगळेपण लक्षात घेता, ‘आगळं वेगळं’ ह्या सदरामध्ये त्या ठिकाणाची दखल घेणं आवश्यक वाटलं आणि सदराच्या हेतुनुसार पुनर्लेखन केलं आहे.     

 

डॉ. मिलिंद न. जोशी
Email : milindn_joshi@yahoo.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu