साबरमती आश्रम, अहमदाबाद © डॉ. मिलिंद न. जोशी

काही ठिकाणांच्या फक्त नावांवरून त्यांची स्थळंनिश्चिती करणं कठीण जातं. साबरमती आश्रम देखील त्यातलाच. आश्रम म्हटल्यावर शहरापासून दूर, एखादया जंगलामधे, नदीकिनारी अशाप्रकारचं वर्णन मनात येतं. ह्या वर्णनातील पहिल्या दोन गोष्टींना छेद दिला गेला तो बऱ्याच वर्षांनी, काही कामानिमित्ताने अहमदाबादला पोहोचल्यावर. ही खरंतर दीड दिवसाची, धावती भेट होती. कमी वेळात जास्तीत जास्त बघण्याच्या माझ्या आवडीखातर, नव्हे हव्यासाखातर, मी जेव्हा अहमदाबादमधील प्रेक्षणीय ठिकाणांचा गूगल शोध सुरू केला तेव्हा साबरमती आश्रम हे ठिकाण त्यामध्ये दिसलं आणि आश्चर्य वाटलं; कारण माझा साबरमती आश्रमाच्या स्थानाबद्दल काहीतरी वेगळाच समज झाला होता. अहमदाबाद शहरात हा आश्रम असण्याची शक्यताही मी गृहीत धरली नव्हती. त्यामुळे अहमदाबाद मुक्कामात साबरमती आश्रम हे ठिकाण, स्थळदर्शनाच्या यादीत अग्रक्रमांकावर आलं.

नावाबद्दल जरी आकर्षण वाटलं तरी त्याबद्दलची माहिती मात्र मोघमच होती. परत गूगल विद्यापीठात शिरलो आणि त्याच्या स्थाननिश्चिती बरोबरच स्थानमहात्म्य देखील वाचून काढलं. दुसऱ्या दिवशी दुपारनंतरचा वेळ मोकळा होता. त्या वेळात बघता येण्याजोग्या अहमदाबादमधील स्थळांचा आढावा घेतला आणि ‘सिद्दी सय्यद मशीद’, ‘साबरमती आश्रम’ आणि अहमदाबाद मधील नवीन आकर्षण ‘साबरमती रिव्हर फ्रंट’ असा कार्यक्रम त्याच क्रमाने निश्चित केला. एक ऑटोरिक्षा ठरवली. रिक्षाचालक चांगले माहितगार असल्याचं त्यांच्याशी बोलल्यावर लक्षात आलं. प्रथम सिद्दी सय्यद मशिदीत गेलो. ह्या मशिदीच्या खिडक्यांची अप्रतिम संगमरवरी कोरीवकाम असलेली जाळी, ‘सिद्दी सय्यद की जाली’ म्हणून ओळखली जाते. अहमदाबादचं प्रतिकचिन्ह म्हणून ही जाळी काही संकेतस्थळांवर दृष्टीस पडते. मशिदीच्या बाहेरून देखील ती पाहता येते. नंतरचं ठिकाण आधी उल्लेखल्यानुसार तिथून जवळच असलेला ‘साबरमती आश्रम’ किंवा ‘गांधी आश्रम’.

अहमदाबादच्या साबरमती ह्या उपनगरात, साबरमती नदीकिनारी स्थित असलेलं हे ठिकाण भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एका महत्वाच्या कालखंडाचं साक्षीदार आहे असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. महात्मा गांधींचं त्यांच्या पत्नी कस्तुरबा तसंच विनोबा भावे व इतर अनुयायांसह ह्या ठिकाणी इ.स.१९१७ ते १९३०पर्यंत, बारा वर्षं वास्तव्य होतं. गांधीजी राहत असलेल्या कुटीराला हृदयकुंज असं नाव आहे. त्याशिवाय तिथे विनोबा कुटीर व मीरा कुटीर अशा जोडनावाची वास्तू आहे. तिथे विनोबा भावे गांधीजींबरोबर राहत होते. त्यानंतरच्या काळात तिथे गांधीजींच्या अनुयायी मिरबेन ज्या ब्रिटिश होत्या, त्या राहत असत.

१२ मार्च १९३०ला गांधीजींनी येथूनच, मिठावर ब्रिटिश सरकारने लावलेल्या कराच्या विरोधात आपल्या ७८ अनुयायांसह साबरमती ते २४१ मैल अंतरावरच्या दांडीपर्यंत दांडी यात्रा(मिठाचा सत्याग्रह) सुरू केली. त्याला जनआंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालं. देशभरात ६००००हून अधिक जणांना तुरुंगात डांबण्यात आलं.  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दांडी यात्रेच्या महत्वपूर्ण भूमिकेमुळे व महात्मा गांधींच्या तेथील दिर्घकाळाच्या वास्तव्यामुळे भारत सरकारने हा आश्रम राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केला आहे. ह्या आश्रमाची स्थापना २५ मे १९१५ला अन्य ठिकाणी झाली परंतु गांधीजींना शेती, पशुपालन ह्यासारख्या उपक्रमांसाठी थोड्या मोठ्या जागेची गरज होती. १७ जून १९१७ रोजी आत्ताच्या ठिकाणी, ३६ एकर क्षेत्रात त्याचं स्थलांतर करण्यात आलं. त्याबाबतीत देखील गांधीजींचा वेगळा दृष्टिकोन होता. साबरमती आश्रम एका बाजूस स्मशानभूमी व तर दुसऱ्या बाजूला तुरुंग, ह्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सत्याग्रहींना ह्या दोनपैकी एका ठिकाणी नक्की जावं लागेल. त्यामुळे  सत्याग्रहींमध्ये सत्यशोधाची भावना व निर्भीडपणा विकसित होण्यासाठी ही जागा योग्य आहे. ह्याच आश्रमात गांधीजींनी त्यांच्या ‘ग्रामस्वराज्य’ ह्या संकल्पनेसाठीचे प्रयोग केले. मानवी श्रमाचं मूल्य शिकवणाऱ्या तसंच साक्षरता, शेती अशांवर आधारित देशाला स्वयंपूर्ण करण्याचं शिक्षण देण्याचं अभिप्रेत असलेल्या शाळेची संकल्पना राबवली.

दांडी यात्रेला निघताना, गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तिथे न परतण्याची प्रतिज्ञा केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काहीच महिन्यात त्यांचं देहावसान झालं, त्यामुळे दुर्दैवाने ते तिथे परत येऊ शकले नाहीत.

इ.स.१९६३मध्ये आश्रम परिसरात गांधी स्मारक संग्रहालयाच्या वास्तूची भर पडली. हे संग्रहालय आधी हृदयकुंज ह्या गांधीजींच्या निवासस्थानी होतं. चार्ल्स कोरिया ह्या जगविख्यात वास्तुविशारदांनी त्याचं आरेखन व निर्मिती केली आहे. आधीच्या वास्तूंना पूरक अशी त्याची बांधणी झाली असल्याचं जाणवलं.  १० मे १९६३रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. त्यामध्ये विविध विभाग आहेत. त्यातील ‘माझं जीवन हाच माझा संदेश’ ह्या विभागात गांधीजींच्या जीवनातील आठ पूर्णाकृती चित्र व २५०हून अधिक मोठया आकारातील छायाचित्रं पाहायला मिळतात. दुसरा विभाग गांधीजींच्या इ.स.१९१५ ते १९३०पर्यंतच्या अहमदाबादमधील वास्तव्यासंदर्भात माहिती देतो. नंतरच्या विभागात आपल्याला त्यांच्या जीवनाशी संबंधित तैलचित्रं दिसतात. त्यानंतर आपण एका संग्रहालयात प्रवेश करतो, जिथे त्यांची पत्र, लिखाण, वचनं इत्यादी साहित्य पाहायला मिळतं. त्यानंतर गांधीजींच्या व भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंबंधी माहिती देणारं ३५०००पेक्षा जास्त ग्रंथसंपदा असलेलं ग्रंथालय दिसतं.  हिंदी, गुजराती व इंग्रजीतून प्रकाशित होणारी ८० नियतकालिकं उपलब्ध असलेलं वाचनालय देखील तिथे आहे. गांधीजींनी लिहिलेली व त्यांना आलेली ३४११७ पत्र, हरिजन, हरिजनसेवक, हररिजनबंधु ह्या तत्कालीन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेली गांधीजींच्या लिखाणाची ८७८१ पानं तसंच त्यांची व त्यांच्या अनुयायांची ६०००पेक्षा जास्त छायाचित्रं देखील तिथे संग्रहित करण्यात आली आहेत.

त्यांचा चरखा, लेखनाचं मेज व त्यांच्या वैयक्तिक वापरातील इतर काही वस्तू हृदयकुंजमध्ये आत शिरताना डाव्या बाजूच्या खोलीत पाहायला मिळतात. तिथे एक ‘ना नफा’ तत्वावर चालणारं, गांधीजींच्या जीवनावर आधारित पुस्तकं, वस्तू, स्मरणिका यांचं विक्रीकेंद्र देखील आहे. त्यातून स्थानिक कलाकारांना रोजगार उपलब्ध होतो.

आधी उल्लेखलेल्या वास्तूंशिवाय आश्रमात, नंदिनी नावाचं देशविदेशातून येणाऱ्या अभ्यागतांसाठी अतिथीगृह, मगन निवास हे मगनलाल गांधी ह्या आश्रम व्यवस्थापकांचं निवासस्थान आहे. अजून एक महत्त्वाची जागा म्हणजे ‘उपासना मंदिर’. तिथे गांधीजी प्रार्थनेनंतर  लोकांच्या समस्यांवर तोडगा सुचवीत.

आम्ही हृदयकुंज पासून सुरुवात करून आधी उल्लेखलेल्या सर्वच वास्तूंना भेट दिली आणि महात्म्याला मनोमन वंदन केलं. सर्वच वास्तूंची देखभाल चांगल्या प्रकारे होत असल्याचं जाणवलं.

आश्रमाच्या मागच्या बाजूस साबरमती नदीचं खूपच सुरेख दर्शन घडलं. नदीच्या पलीकडच्या घाटावर नव्याने विकसित करण्यात आलेला ‘रिव्हर फ्रंट’ परिसर दिसत होता. संध्याकाळ झाली; साबरमती आश्रमातून बाहेर पडलो आणि आकर्षक दिवेलागणी करून सुशोभित झालेल्या ‘रिव्हर फ्रंट’वर फेरफटका मारण्यासाठी निघालो. नदीचा किनारा बदलला आणि इतिहासाच्या धगधगत्या कालखंडाच्या दर्शनानंतर वर्तमानातील झगझगत्या रिव्हर फ्रंटवर पोहोचलो.

अहमदाबाद स्थळदर्शनांतर्गत साबरमती आश्रम ह्या प्रतिकस्थळाची भेट, नक्कीच एक वेगळी अनुभूती देऊन जाते.

 

डॉ. मिलिंद न. जोशी 
Email : milindn_joshi@yahoo.com    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu