आगळं-वेगळं : पट्टडकल, कर्नाटक

ऐतिहासिक विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेल्या हम्पीला भेट द्यायचं बरेच वर्षं मनात होतं. त्याबरोबर आणखी काही जवळपासची ठिकाणं त्याच मोहिमेत पाहाता येण्याची शक्यता अजमावण्यासाठी गूगल सर्च सुरू केला. तसंच प्रसिध्द पर्यटन कंपन्यांच्या प्रवासी कार्यक्रम सुचिंचाही आधार घेतला. आम्ही  हुबळीला राहणार होतो. त्यामुळे हुबळीहून जमण्यासारख्या, पर्यटन कंपन्यांच्या सुचितील ‘बदामी- ऐहोळे- पट्टडकल’ ह्या त्रयीकडे लक्ष गेलं.

या त्रयीतील बदामी व ऐहोळे ह्या ठिकाणांची नावं ऐकायला गुळगुळीत व उच्चारायला सोपी, सुटसुटीत, माधुर्य जपणारी तर ‘पट्ट’डकल, ‘पट्ट’कन उच्चारता देखील येईना. पट्टडकलची ‘पट्टडकल्लू’ व ‘रक्तपूर’ ही नावं देखील सौम्य नाहीत.  पट्टडकल नावातून उगीचच खडबडीत, उंचसखल असा अर्थ अभिप्रेत होत असल्यासारखं वाटलं. ‘ट, ठ, ड ढ, ण’ ह्या अक्षरांचा एकंदरच काठिण्याकडे कल वाटतो.  त्यामुळे ‘पट्टडकल’ नावावरून काही पटलं नाही आणि  पट्टड’कल’ पाहण्याकडे माझा ‘कल’ कमी झाला. ऐहोळे आणि बदामीच्या मध्यावर असल्यामुळे, न टाळता त्याची ‘पट्ट’कनच ‘दखल’ घेण्याचं मी ठरवलं. हे माझ्या मनातील विचार त्यावेळी मी आमच्यातच उघड केले, त्यावर पुरातत्वशास्त्राचा अभ्यास असलेली माझी मुलगी माझ्यावर नाराज झाली आणि तिने पट्टडकल, भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचं ठिकाण असल्याचं सांगितलं.

हुबळीहून सर्वात जवळ बदामी, नंतर पट्टडकल व पुढे ऐहोळे असा ठिकाणांचा क्रम असला तरी आम्ही आमच्या पर्यटन कार्यक्रमासाठी तो उलटा केला. त्यामुळे प्रथम थेट दूरच्या ऐहोळेला जाऊन, त्यानंतर पट्टडकल व शेवटी बदामी. परतीच्या वाटेवरचं शेवटचं स्थलदर्शन मुक्कामाच्या ठिकाणापासून जवळ असणं, सोयीचं असतं हे पर्यटन अनुभवातून शिकलो होतो. जास्ती दिवसांच्या पर्यटनातही लांबची ठिकाणं आधीच्या दिवसात पाहायची, हे ठरून गेलं होतं.

हुबळीहून सकाळी लवकर निघून ऐहोळेला नऊ-साडेनऊलाच पोहोचलो. एकेकाळी चालुक्यांची राजधानी असलेल्या ऐहोळेत अनेक म्हणजे जवळपास सव्वाशे मंदिरं असल्याचं ऐकिवात होतं. त्यातील भगवान विष्णूंना समर्पित असलेलं दुर्गमंदिर व इतर दोन-तीन महत्त्वाच्या मंदिरांना आमची धावती भेट झाली.

ऐहोळेहून साधारण दहा किमी अंतरावर असलेल्या ‘पट्टडकल’ला पंधरा-वीस मिनिटात दाखल झालो आणि त्या ठिकाणच्या नावावरून मी बांधलेल्या अंदाजाबाबत भ्रमनिरास झाला. पट्टडकलमधलं महत्त्वाचं मंदिरांचं संकुल शब्दशः एका प्रतलावर दिसत होतं; कुठे उंचसखलपणा दिसत नव्हता.  नावावरून बांधलेला माझा अंदाज चुकला होता. ‘पुलं’ची आठवण झाली. ‘पूर्वरंग’मध्ये ‘बांडुंग’ शहराच्या वर्णनात ‘बांडुंग’ नावाबद्दल त्यांनी केलेली कल्पना आणि प्रत्यक्षात त्यांना आलेल्या अनुभवातली तफावत गमतीशीरपणे कथन केली आहे.

मंदिर संकुलात प्रवेश केला. तिथल्या माहितीफलकावर दिलेली माहिती वाचली. ‘इ.स.सातव्या, आठव्या व नवव्या शतकातल्या हिंदू व जैन मंदिरांचा हा समूह मलप्रभा नदीच्या पश्चिम तटावर आहे. एकूण दहा मंदिरांपैकी नऊ हिंदू मंदिरं, मुख्यत्वे  बदामीच्या चालुक्यांच्या कालखंडात बांधण्यात आली आहेत तर एकमेव जैन मंदिर राष्ट्रकुटांच्या कालखंडातील आहे. युनेस्कोने पट्टडकलचं वर्णन उत्तर व दक्षिण भारतीय स्थापत्यकलेचं सुसंवादी मिश्रण असं केलं आहे. उत्तर भारतीय (नागर) व दक्षिण भारतीय (द्रविड) स्थापत्यशैलींचं संमीलन आपल्याला इथे पहायला मिळतं.’ एव्हढी माहिती मिळाल्यावर आमच्या मुलीने आम्हाला बाकीची माहिती स्थळदर्शनादरम्यान ती देणार असल्याचं सांगितलं.

सर्व नऊ हिंदू मंदिरं शिवमंदिरं असली तरी त्यात वैष्णव तसंच शक्ती उपासनेसंदर्भातील तत्वज्ञान व आख्यायिका देखील दृगोच्चर होताना दिसतात. हिंदू पुराणांतील व वेदांमधील संकल्पना तसंच रामायण, महाभारतातील कथानकांवरील कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं. सर्व मंदिरं पूर्वाभिमुख आहेत.

नऊ हिंदू मंदिरांपैकी, आठ मंदिरं एकमेकांजवळ आढळून येतात. नववं हिंदू मंदिर थोड्या अंतरावर आहे. जैन मंदिर अजून थोडं दूर आहे.

कदसिद्धेश्वर मंदिर, जंबुलिंगेश्वर मंदिर, गलगनाथ मंदिर, चंद्रशेखर मंदिर, संगमेश्वर मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, विरुपाक्ष मंदिर, पापनाथ मंदिर आणि जैन नारायण मंदिर अशी मंदिरांची नावं असून त्यातील संगमेश्वर मंदिर सर्वात पूर्वी(इ.स.६९७ ते इ.स.७३३) तर जैन मंदिर सर्वात नंतर, इसवीसनाच्या ९व्या शतकात बांधलं गेल्याचं समजलं. ते जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचं आहे. विरुपाक्ष मंदिर सर्वात मोठं असून, तिथे अजूनही पूजाअर्चा होते. बाजूबाजूला असलेली विरुपाक्ष व मल्लिकार्जुन मंदिरं एकसारखी भासतात. फारच थोडे लक्षात येण्यासारखे फरक दोघांमध्ये आहेत. विरुपाक्ष मंदिरात कोरीवकाम अधिक असून ते जास्त चांगलं वाटतं.  त्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती आमच्या मुलीने मग आम्हाला दिली. विरुपाक्ष मंदिराच्या बांधणीवर कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिराच्या बांधकामशैलीचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. त्याला कारणीभूत ठरली चालुक्य राजा विक्रमादित्य दुसरा याची कांचीपुरम नगर असलेल्या पल्लव राज्यावरील स्वारी. एव्हढंच नव्हे तर पुढील काळात राष्ट्रकुटांच्या चालुक्यांवरील स्वारीमुळे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या(लेणे) बांधकामावर विरुपाक्ष मंदिराच्या बांधकामशैलीचा प्रभाव पडल्याचं मानलं जातं. विक्रमादित्य दुसरा याच्या पल्लवांवरील  विजयाप्रित्यर्थ त्याच्या दोन राण्यांनी; लोकमहादेवी व त्रैलोक्यमहादेवी यांनी अनुक्रमे लोकेश्वर म्हणजे विरुपाक्ष मंदिर आणि त्रैलोकेश्वर म्हणजेच मल्लिकार्जुन मंदिराची उभारणी केली. एकंदरच तेथील मंदिरांची उभारणी मुख्यत्वे राजा किंवा राणीच्या स्मारकाप्रीत्यर्थ व राज्याभिषेक समारंभासाठी करण्यात आल्याचं समजलं. तेथील प्रत्येक मंदिराचं काहीतरी वेगळेपण आहे; पण माझ्यासारख्या सर्वसामान्य पर्यटकासाठी त्यांचं वैशिष्ट्य थोडया कालावधीत समजून घेणं कठीण होतं.

आमची मुलगी आम्हाला मंदिरांच्या शिखरांमधील फरक लक्षात आणून देत होती. मंदिरं जवळजवळ असल्याने त्यांची तुलना करणं सोपं जात होतं. द्रविड व नागर शैलीतील फरक त्यातून आमच्या लक्षात आला. आम्ही भारल्यासारखे झालो होतो. आधी म्हटल्याप्रमाणे पट्टडकलमध्ये आपल्याला उत्तर व दक्षिण भारतीय मंदिर स्थापत्यशैलींचा मिलाफ पाहायला मिळतो. तसंच मंदिर स्थापत्यशास्त्रातील प्रगती व त्यात कालानुरूप झालेले बदलही दिसून येतात आणि हे सर्व एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे पट्टडकलचं वैशिष्ट्य तिने विशद केलं. अर्थात हे सर्व लक्षात येण्यासाठी मार्गदर्शकाची गरज आहे व ती भूमिका आमची मुलगी निभावत असल्याने स्थळदर्शनाचा आगळा आनंद मिळाला.

पट्टडकल ‘पट्टकन’ उरकण्याचा माझा विचार चुकीचा होता. शितावरून भाताची परीक्षा होत असेल कदाचित पण नावावरून गावाची परीक्षा करणं बरोबर नसल्याचा धडा मिळाला. एक ‘आगळं वेगळं’ ठिकाण पाहता आल्याचं समाधान मिळालं आणि आम्ही बदामीसाठी प्रस्थान ठेवलं.

मंदिर स्थापत्यशास्त्राचं ‘एक उघड्या हवेतलं संग्रहालय’, असं पट्टडकलचं वर्णन केल्यास ते सार्थ ठरेल. इ.स.१९८७ साली ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून मान्यता मिळालेल्या पट्टडकलला उत्तर कर्नाटक पर्यटनादरम्यान जरूर भेट द्यावी.

डॉ. मिलिंद न. जोशी
    

Pc: google    

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu