आगळं-वेगळं: नामड्रोलिंग मॉनेस्ट्री, बैलाकुप्पे, कूर्ग

२०१६च्या मे महिन्याच्या अखेरीस आम्ही मंगळुरूला गेलो होतो. तिथे पाहण्यासाठी मुख्यत्वे देवळं आणि समुद्रकिनारे. अर्थात तिथलं शांत जीवन, माडांच्यामधून डोकावणारी बैठी किंवा एकमजली छोटीछोटी घरं, हिरवाईच्यामधून धावणारे त्या शांततेला पूरक असे अरुंद पण स्वच्छ रस्ते; थोडक्यात गावपण न सोडलेलं मंगळुरू शहर, सर्वच अनुभवण्यासारखं. दोन दिवसात तिथली प्रेक्षणीय स्थळं; कद्री मंजुनाथ मंदिर, मंगलादेवी मंदिर, कुद्रोलीचं गोकर्णनाथ मंदिर, पणम्बुर बीच इ. पाहून झाली. अजून दोन दिवस हाताशी होते. पर्यटनाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती.

मुंबईहून निघण्याआधीच ‘नेट’वरून मंगळुरू व त्याच्या आजूबाजूच्या परिसराबद्दल, मुख्यत्वे प्रेक्षणीय ठिकाणांबद्दलची माहिती जमवली होती, त्यात बेळूर आणि हळेबिडू येथील पुरातन मंदिरं मंगळुरूपासून पूर्वेकडे साधारण १७० किमीवर दर्शवली होती तर १३० किमीवर आग्नेयेला कूर्ग हे थंड हवेचं ठिकाण दाखवलं होतं. शक्य झाल्यास दोन्ही मोहिमा आखायचं ठरवलं. दोन्ही ठिकाणं दूरची असल्यामुळे आमच्या राहण्याच्या हॉटेलकडूनच टॅक्सी ठरवली.

माझ्या मुलीच्या मंदिर पुरातत्त्वशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं बेळूर व हळेबिडू येथील मंदिरं महत्त्वाची असल्यामुळे आणि तिथे तेव्हढ्यासाठी मुद्दामून जाणं जिकिरीचं असल्यामुळे सकाळी लवकर निघून एक दिवसात जाऊन आलो. खूपच सुंदर कोरीवकाम केलेली मंदिरं पहाता आली.

कूर्ग त्यामानाने कमी अंतरावर, टॅक्सीने तीन तासांवर. कूर्ग हे एक गिरीस्थान(हिल स्टेशन). आम्हाला हिल स्टेशनला जाऊन राहायला फारसं आवडत नाही. बरीचशी हिल स्टेशन आम्हाला एकसुरी वाटतात. डोंगरदऱ्या, एखादा तलाव, त्यातलं बोटिंग, त्याच्या बाजूला अनेक लहानमोठी दुकानं असलेला मुख्य रस्ता. अर्थात हे आमचं वैयक्तिक मत. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते. अनेकदा हिल स्टेशनपेक्षा तिथे जाणारा रस्ता जास्तं भावतो. म्हणून आम्ही शक्यतो एक दिवसात हिल स्टेशनला जाऊन, रात्रीला मुक्कामी परत येतो. डोंगरदऱ्यांच्या सौंदर्याचा खरा आस्वाद जाता येतानाच्या रस्त्यावर थांबून घेता येतो.


मंगळुरूहून कूर्गला जाणारा रस्ताही आधीच्या वर्णनाला अपवाद नाही. कूर्ग जसजसं जवळ येतं होतं, तशी डोंगराची चढण जाणवू लागली. रस्त्याच्या दुतर्फा हिरव्या झाडीत कॉफीची लागवड दृष्टीस पडत होती. पानवेली मोठ्या झाडांच्या बुंध्यांच्या आधाराने वर चढताना दिसत होत्या. मडिकेरी ह्या कूर्गमधील मुख्य ठिकाणी पोहोचण्याआधी आमच्या टॅक्सीचालकाने आम्हाला कावेरी नदीच्या उगमापाशी, ‘तळकावेरी’ला नेलं. त्यानंतर मडिकेरी किल्ला व इतर प्रेक्षणीय स्थळदर्शन झालं. कूर्गच्या प्रसिद्ध चॉकलेट्स विक्रेत्यांना नाराज करणं जिवावर आलं आणि चॉकलेट्स खरेदी झाली. दुपारचे पावणेचार वाजून गेले होते. आता मंगळुरूला परतायचं म्हणून टॅक्सीमध्ये शिरलो. संध्याकाळी सातपर्यंत मंगळुरूला पोहोचू, असा अंदाज होता.

एव्हाना लेखाचं शीर्षक आणि मी आत्तापर्यंत केलेलं लेखन जुळत नसल्यानं वाचकांचा संभ्रम झाला असण्याची शक्यता आहे. कारण मंगळुरूकडे परतण्याच्या तयारीत असलेले आम्ही, त्यानंतर एका वेगळ्या अनुभवाचे साक्षीदार होणार असल्याबद्दल आम्हालाही तिथपर्यंत माहीत नव्हतं. चालकाने आमच्याकडे ‘गोल्डन टेम्पल’ नावाचं अजून एक ठिकाण पहाण्याचा आग्रह धरला. आम्हाला ते ठिकाण नक्की आवडेल ह्याबद्दल त्याला खात्री वाटत होती. आमच्या दोन दिवसांच्या अनुभवावरून त्याने ते अनुमान काढलं होतं. आम्ही मग तो सांगत असलेल्या ठिकाणाची माहिती ‘गूगल सर्च’ करून मिळवली आणि त्याच्या सांगण्याला आमचा होकार दिला. गोल्डन टेम्पल म्हणजेच मडिकेरीहून पूर्वेकडे सदतीस किमीवर बैलाकुप्पे इथली ‘बौद्ध मॉनेस्ट्री’ होती. आम्ही मंगळुरूला वेळेत पोहोचण्याबद्दल व मडिकेरीहुन परतीच्या वाटेवर असलेल्या डोंगरातल्या वळणावळणाच्या रस्त्यामुळे अंधार पडल्यावर जाणं थोडं जोखमीचं वाटत असल्याची आम्हाला वाटत असलेली काळजी त्याच्याजवळ व्यक्त केली. त्यावर त्याने आम्हाला सुखरूप परत नेण्याबद्दल आश्वस्त केलं. मडिकेरीपर्यंत येऊन मॉनेस्ट्री न पाहता परत जाणं योग्य नसल्याचं त्याचं मत त्याने परत एकदा व्यक्त केलं. टॅक्सीचं मीटर आणि त्या अनुषंगाने स्वतःची बिदागी वाढवण्यासाठी तर त्याचा हा आग्रह चालू नाहीये ना, अशी शंकादेखील मनाला चाटून गेली. शेवटी आतल्या पर्यटकाने सर्व शंका,कुशंकांवर मात केली आणि आमची टॅक्सी बैलाकुप्पेच्या दिशेने मार्गस्थ झाली.


तासाभरात आम्ही मॉनेस्ट्रीजवळ पोहोचलो. मधल्या वेळात मॉनेस्ट्रीबद्दल गूगलवर दिलेल्या माहितीचं टॅक्सीतच सार्वजनिक वाचन केलं आणि मॉनेस्ट्री पहाण्यासाठीची प्राथमिक तयारी केली. वाचनात आलेल्या मॉनेस्ट्रीच्या ‘थेगचोग नामड्रोल शेद्रूब दारगिलिंग’ मॉनेस्ट्री ह्या नावाच्या उच्चारणातच धाप लागली. पण लगेचच दिलेलं त्याचं टोपण(थोडक्यातलं) नाव ‘नामड्रोलिंग मॉनेस्ट्री’ उच्चारायला थोडं सोपं होतं, त्यामुळे बरं वाटलं.  “ह्या मॉनेस्ट्रीची स्थापना इ.स. १९६३ मध्ये ‘दृबवांग पेमा(पद्म) नोरबू रिनपोच’ ह्या तिबेटी बौद्ध धर्माच्या पालीअल शाखेच्या अकराव्या पीठासीन अधिकारी व्यक्तीने केली. सध्या ‘कर्म कुचेन’ हे (थोडया सुटसुटीत नावाचे) बारावे पीठासीन अधिकारी तेथील प्रमुख आहेत.  इ.स. १९५९ साली तिबेट सोडून तिबेटी धर्मगुरू व इतरांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर तत्कालीन मैसूर सरकारने तिबेटी आश्रितांसाठी बैलाकुप्पे येथे ३००० एकर जमीन देऊ केली. सुरुवातीस तिथे एक लहानसं बांबूचं मंदिर उभारलं गेलं. त्याचा आता बराच विस्तार झाला आहे. मुख्य मॉनेस्ट्रीबरोबरच इतर मॉनेस्ट्री, प्रार्थना स्थळं, तिबेटी बौद्ध धर्माचं शैक्षणिक केंद्र इथे आहे. पन्नास हजारपेक्षा जास्त तिबेटी लोकांची वस्ती बैलाकुप्पेमध्ये आहे. तिबेटच्या बाहेरची भारतातील तसंच जगातील संख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाची तिबेटी वसाहत तिथे आहे. सर्वात मोठी वसाहत हिमाचल प्रदेशात ‘धर्मशाळा’ इथे असल्याचं आपल्याला ज्ञात आहे.” पण आम्ही भेट देत असलेल्या ह्या ठिकाणाची ही सर्व वैशिष्ट्यं आम्हाला माहीत नव्हती. प्रांजळपणे सांगायचं तर कूर्गजवळ तिबेटी वसाहत आहे, हेच मुळात माहीत नव्हतं. कूर्ग म्हणजे कर्नाटकातील थंड हवेचं ठिकाण, एव्हढीच ‘जोड्या लावा’ किंवा ‘गाळलेल्या जागा भरा’साठी उपयुक्त माहितीची शिदोरी घेऊन आम्ही आलो होतो. ‘हिल स्टेशनमध्ये एव्हढं काय पाहायचं?’ ह्या आमच्या समजुतीला हा एक धक्का होता.


आम्ही टॅक्सीतून उतरलो आणि वैशिष्ट्यपूर्ण तिबेटी नक्षीकाम व रंगकाम केलेल्या कमानिसदृश प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि   एका विस्तृत प्रांगणात पोहोचलो. त्याच्या तीन बाजूंना दुमजली इमारती होत्या. सामायिक व्हरांडा व आत खोल्या, अशी चाळवजा रचना असलेल्या त्या इमारती बौद्ध भिक्षूंच्या निवासाची व्यवस्था असावी, असं सकृतदर्शनी वाटलं. त्या प्रांगणाच्या मध्यभागी एक मोठं होमकुंड होतं. त्यात तुपाच्या आहुत्या दिल्या असाव्यात असं त्यातून येणाऱ्या धुराच्या वासावरून लक्षात आलं. तिथून थोडं डावीकडे वळल्यावर, एक निळ्या रंगाची वास्तू दिसली. तिच्या समोरच्या भागावर ‘दृबवांग पेमा(पद्म) नोरबू रिनपोच'(संस्थापक)यांचं भव्य चित्र लावलेलं होतं. अजून आत गेल्यावर समोर एक तिबेटी रचनेची इमारत दिसली. त्या इमारतीमध्ये एक भव्य सभागृह होतं. सभागृहाला तीन प्रवेशद्वारं होती. सभागृहाच्या बाह्यभिंतीवर मोठी रंगीत भित्तिचित्रं काढलेली होती. सभागृहात जाण्यास मनाई होती. आत काही धार्मिक कार्यक्रम चाललेला दिसत होता. प्रवेशद्वाराशी गर्दी झाली होती. बरेच जण आत चाललेल्या कार्यक्रमाची छायाचित्रं, चलचित्रं काढण्यात गुंतले होते. त्या गर्दीत आम्ही आमच्यासाठी उभं राहण्यास जागा निर्माण केली आणि आतील समारंभाचा अंदाज घेतला. प्रवेशदवाराच्या बरोबर समोरच्या भिंतीवर गौतम बुद्ध व इतर दोन बुद्ध यांच्या भव्य सोनेरी मूर्ती, आकर्षक प्रभावळीत विराजमान होत्या. आतमध्ये समारंभाला साजेशी सजावट केलेली होती. प्रवेशद्वारांना काटकोनात मुनीमजी वापरत तशी छोटी,बैठी लाकडी मेजं ओळींनी मांडलेली होती. प्रत्येक मेजाच्या जवळ बौद्ध भिक्षु बसलेले होते. त्यांनी केशरी, लाल रंगांची वस्त्र परिधान केली होती. त्यांच्या डोक्यावर उंच, गोलाकार केशरी, लाल रंगांची शिरस्त्राणं वाटावीत, अशा कापडी टोप्या होत्या. सर्वजण समोरच्या मेजावर ठेवलेल्या पोथीसदृश पुस्तकात पाहून काही म्हणत होते. एक भारावलेलं वातावरण आत तयार झालं होतं. थोड्या वेळात त्या कार्यक्रमाचा अंदाज आला. बहुदा तो दीक्षा देण्याचा कार्यक्रम चालला होता. बाहेर सगळेच बघे; नक्की सांगू शकणारी जाणकार व्यक्ती तिथे नसल्यामुळे त्यावेळी तरी अंदाजावरच विसंबून स्वतःचं समाधान करून घेतलं. बुद्धमूर्तींना वंदन केलं. थोडा वेळ तिथे थांबलो. तिथून निघत असताना  बुद्धदेवांच्या कृपेने अचानक डोक्यात प्रकाश पडला; त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. विलक्षण योग होता तो! बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध मॉनेस्ट्रीमध्ये बुद्धमूर्तींचं दर्शन झालं होतं. एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही बाहेर आलो. टॅक्सीचालक आमची वाटच पहात होता. निव्वळ त्याच्या आग्रहामुळे आम्ही एक आगळं- वेगळं ठिकाण अनुभवलं. अचानक गवसलेलं हे ठिकाण आमच्या स्मरणात कायमचं घर करून राहिलं आहे.

कूर्गच्या पर्यटनाला जोडून ‘नामड्रोलिंग मॉनेस्ट्री’ला जरूर भेट द्यावी.   
       
डॉ. मिलिंद न. जोशी
संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com          

Pc: google                              

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu