गेट वे ऑफ इंडिया, मुंबई © डॉ. मिलिंद न. जोशी

प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना आपलं प्राक्तन आपल्या बरोबर घेऊन येते, असं म्हटलं जातं. त्यात तथ्यांशाचा भाग किती आहे, ह्याबाबतीत मतमतांतरं आढळू शकतात. जे व्यक्तीला लागू होतं ते एखाद्या वास्तूच्या बाबतीतही अनुभवायला येतं. तरीदेखील जेव्हा एखाद्या वास्तूच्या इतिहासाबद्दलची माहिती आपल्याला मिळते तेव्हा आपण अचंबित होतो. ‘गेट वे ऑफ इंडिया’चा इतिहास व वर्तमान जाणून घेताना असंच झालं.

खरंतर मी मुंबईकर असल्यामुळे ‘गेट वे ऑफ इंडिया’, परसदारी असावा इतका जवळ आणि पोहोचण्यास सुगम. तरीदेखील फार वेळा काही तिथे जाणं झालं नव्हतं. झालं होतं तेव्हा एक वास्तू म्हणून त्याचं खास आकर्षण वाटलं नव्हतं. एक ठोकळेबाज इमारत आणि आपल्या भारतीय अस्मितेला तडा देणारी वास्तू असा त्याच्याबद्दलचा ग्रह तयार झाला होता. त्याचा परिसर छान दिसतो; इतपतच त्याच्याबद्दलचं प्रशस्तीपत्र मनात तयार झालं होतं. जेव्हा पुरातत्वशास्त्राची अभ्यासक असलेल्या माझ्या मुलीबरोबर दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांच्या ती घेत असलेल्या ‘सिटी वॉक’ मध्ये सामील झालो, त्यावेळी त्याबद्दलची अधिकची वेगळी माहिती मिळाली. आधी उल्लेख केलेल्या ‘प्राक्तना’च्या बाबतीत माझं मत तयार व्हायला हे कारण ठरलं. असो.

काही वास्तूंच्या बाबतीत एक वेगळंच आकर्षण तयार झालेलं असतं. त्या वास्तू खूप सुरेख असतात असं नाही किंवा आकर्षक असतात असं देखील नाही.  त्या वास्तूची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसंच त्या वास्तूचा परिसर, त्यांच्याबद्दलच्या आकर्षणास कारणीभूत ठरत असावा. मुंबईचं प्रतिकचिन्ह म्हणून ओळखला जात असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ला हे वर्णन लागू पडतं.

खरंतर ज्या उद्देशाने ‘गेट वे ऑफ इंडिया’ बांधला गेला तो उद्देशच फोल ठरला. ब्रिटिशांसाठी तर ‘गेट वे ऑफ इंडिया’, ‘कमिंग इन इंडिया’च्या ऐवजी ‘गोईंग आऊट ऑफ इंडिया’ म्हणजे तो प्रवेशद्वाराच्या ऐवजी बाहेर जाण्याचा मार्ग ठरला. 

‘गेट वे ऑफ इंडिया’ ही कमानीसदृश्य वास्तू ‘इंडो-सेरासेनीक’ वास्तू प्रकारची आहे. ह्यात पारंपरिक भारतीय स्थापत्य शैली व इस्लामिक स्थापत्य शैली यांचा मेळ असतो.  तत्कालीन ब्रिटिश राजे पंचम जॉर्ज व त्यांच्या पत्नीच्या इ.स.१९११च्या भारत भेटीच्या वेळी तो बांधण्याचं नियोजित करण्यात आलं. कोणत्याही ब्रिटिश सम्राटाची ही पहिलीच भारतभेट होती व त्याप्रीत्यर्थ दिल्ली दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु त्यांचं आगमन काही तिथून होऊ शकलं नाही. त्यानंतर जवळजवळ दीड वर्षांनी, ३१ मार्च १९१३ला त्याच्या बांधकामास हिरवा कंदील मिळाला. जॉर्ज विटेट ह्या वास्तुविशारदांनी तयार केलेल्या अंतिम आराखड्याला इ.स.१९१४ मध्ये मान्यता देण्यात आली. गॅमन इंडिया ह्या कंपनीतर्फे बांधकाम नियोजित करण्यात आलं.

२६मीटर(८५ फूट) उंचीच्या ह्या कमानीसाठी बसाल्ट ह्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. इ.स.१९२४मध्ये म्हणजे नियोजित वेळेच्या तेरा वर्षांनंतर तो बांधून पूर्ण झाला व त्याच्या बांधकामावर त्या काळी २१लाख रुपये खर्च झाले. कमानीच्या चार कोपऱ्यात चार स्तंभाकृती बुरुज आहेत. त्यांच्या खालील कमानींमध्ये बरीच मोकळी जागा आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या मागील बाजूस समुद्राच्या दिशेला पायऱ्या आहेत. वास्तूवर काही ठिकाणी दगडातील, जाळीसदृश्य कोरीवकाम केलेलं दिसून येतं. सर्व बुरुजांवर घुमट आहेत. मध्यावर देखील घुमट असून त्याचा व्यास १५मीटर(४९फूट) आहे. वास्तूच्या मध्यावर, समोरच्या, वरच्या बाजूस इंग्रजीत ‘राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या २ डिसेंबर १९११रोजीच्या आगमनाप्रित्यर्थ ह्याचं बांधकाम करण्यात आल्या’चं कोरीवकाम करून नमूद करण्यात आलं आहे; ज्या संदर्भातील खरी माहिती आधी उद्धृत केलेलीच आहे. तयार झाल्यावर त्याचा वापर तत्कालीन राज्यकर्त्यांच्या प्रतिनिधींच्या प्रतिकात्मक स्वागतासाठी करण्यात येऊ लागला. तरी देखील नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २८ फेब्रुवारी १९४८रोजी ब्रिटिशांची शेवटची सैन्यतुकडी ह्याच कमानीतून भारताबाहेर पडली. म्हणजे ब्रिटिश सम्राटाच्या आगमनाप्रित्यर्थ उभारण्याचं ठरवलेल्या कमानीतून ब्रिटिश सम्राट आत तर येऊच शकला नाही पण ‘गॅमन इंडिया’ने बांधलेल्या ह्या कमानीतून ब्रिटिशांचं ‘बहिर्गमन’ मात्र झालं. ‘कालाय तस्मै नमः’; दुसरं काय?

त्याचं स्थान मात्र खूपच छान आहे. पार्श्वभूमीवर अरबी समुद्र. समोर ताज महाल हॉटेल व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा आहे. एकंदरच त्या परिसराचं वेगळेपण नजरेत भरतं. त्यामुळे स्थानिकच नव्हे तर साधारणतः सर्वच पर्यटकांमध्ये देखील गेट वे ऑफ इंडिया बद्दल कमालीचं आकर्षण आहे. मुंबईच्या एका टोकाला असल्याने बरेच पर्यटक व पर्यटन कंपन्या तिथूनच मुंबई दर्शनाला सुरुवात करतात. त्यादृष्टीने देखील गेट वे ऑफ इंडिया प्रथम क्रमांक राखून आहे. ब्रिटिशकालीन बऱ्याच इमारती मुंबईत असल्या व त्यातील बऱ्याचशा गेट वे ऑफ इंडियाहून जुन्या व स्थापत्यकलेच्या दृष्टीने अधिक उजव्या असल्या तरी मुंबईचं प्रतीक म्हणून गेट वे ऑफ इंडियाची ओळख तयार झाली आहे. तिथे लहानसहान विक्रेते खाद्यपदार्थ, छायाचित्रं, स्मरणिका वगैरे वस्तू विकताना आढळतात तसंच छायाचित्रकारही त्या परिसराच्या पार्श्वभूमीवरची छायाचित्रं काढून देण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असतात.

जवळपासच्या बेटांवर व खाडीपालिकडच्या ठिकाणी जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसरात पाच धक्के आहेत. त्यातले दोन धक्के कार्यरत असून तिथून प्रवासी वाहतूक चालते.

मुंबईतील यहुदी धर्मियांच्या दृष्टीने त्याला एक वेगळं महत्व आहे. इ.स. २००३पासून तिथे हनुक्का उत्सव साजरा केला जातो. त्यादरम्यान तिथे रोषणाई केली जाते. गेट वे ऑफ इंडिया व त्या परिसराला एक वेगळी करुण प्रासंगिक पार्श्वभूमी देखील आहे. इ.स.२००३च्या ऑगस्ट महिन्यात गेट वे ऑफ इंडियाच्या समोर उभ्या असलेल्या टॅक्सीत बॉम्ब स्फोट झाला तसंच मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या वेळी, ताजमहाल हॉटेल व इतर ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं तेव्हा देखील गेट वे ऑफ इंडिया हा बातम्यांमध्ये केंद्रस्थानी होता.

वांद्रे ते वरळी सागरी सेतू तयार झाल्यानंतर काहीवेळा त्याचा मुंबईचं प्रतिकचिन्ह म्हणून उल्लेख आढळतो व तशी छायाचित्रं नजरेस पडतात तरी जुन्या मुंबईकरांच्या नजरेत गेट ऑफ इंडियाची प्रतिकचिन्ह म्हणून असलेली ओळख पुसली जाऊ शकत नाही.

ह्या सर्वांमुळे मुंबई भेटीदरम्यान गेट वे ऑफ इंडिया ह्या प्रतिकचिन्हांकित स्थळाची भेट निश्चितच अनिवार्य ठरते.

 

डॉ. मिलिंद न. जोशी 
Email : milindn_joshi@yahoo.com    

                                                        

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu