आगळं-वेगळं – गंगा तलाव, मॉरिशस

गंगा तलाव, गंगा टाकं, गंगा तळं, गंगासागर धरण, गंगापूर धरण अशी गंगा नदीशी संबंधित नावं असलेली जलस्रोतांची ठिकाणं आपल्याला भारतात अनेक ठिकाणी आढळतात. बऱ्याच किल्ल्यांवर गंगा टाकं असतं. गंगा ह्या शब्दातून प्रतीत होणारी पवित्रता ह्याला कारणीभूत असावी. राजापूरची ठराविक कालावधीने अवतीर्ण होणारी गंगा असो किंवा दक्षिणगंगा म्हणून नामकरण झालेली गोदावरी असो; पावित्र्य, मांगल्य असे भाव गंगा नदीशी जोडले गेले आहेत. भारतीय संस्कृतीच्या प्रतीकांमध्ये गंगेचं स्थान अनन्यसाधारण आहे.

भारतापासून दूर, हिंदी महासागरात असलेल्या मॉरिशसमध्येदेखील ‘गंगा तलाव’ नावाचा एक तलाव आहे. आमच्या ऑक्टोबर २०१८ मधील मॉरिशस प्रवासात आम्ही इतर लोकप्रिय ठिकाणांबरोबरच ‘गंगा तलाव’ ह्या नितांतसुंदर ठिकाणाला भेट दिली. भारताबाहेर एखाद्या ठिकाणाला  ‘गंगा तलाव’ नावाने संबोधलं जात असल्याचं अप्रूप वाटलं.

आमच्या मॉरिशस प्रवासात पहिल्या दिवशी दुपारनंतर, क्वात्रे बोर्न्स ह्या मॉरिशसच्या मध्यावरच्या शहरातील आमच्या मुक्कामाच्या हॉटेलवर पोहोचल्यावर लगेच आम्ही हॉटेल समोरच असलेला टॅक्सी स्टँड गाठला. विमानातून उतरायच्या नुकतंच आधी मॉरिशस विमान कंपनीने प्रवाशांच्या जेवणपंगती उठवल्या होत्या. त्यामुळे जठराग्नी शांत होता.  टॅक्सी स्टँडवर त्यावेळी एकच टॅक्सी दिसत होती. जणूकाही आमच्यासाठीच ती  टॅक्सी थांबली होती. भारतीय वंशाच्या टॅक्सी चालकाला पश्चिम मॉरिशसमधील पर्यटन स्थळांची मी तयार केलेली यादी वाचून दाखवली आणि त्याचं त्याविषयीचं मत व टॅक्सी भाडं विचारलं. मी ठरवलेली ठिकाणं संध्याकाळपर्यंत पाहणं शक्य असल्याचं त्याने सांगितलं व त्यासाठीच्या टॅक्सी भाड्याची त्याने कल्पना दिली. ती मीटर टॅक्सी नसल्याने, त्याच्याशी वाटाघाटी करून त्याने प्रथम सांगितल्यापेक्षा टॅक्सी भाडं थोडं कमी करण्यात मी यश मिळवलं आणि काही मॉरिशीय रुपये वाचवल्याचा आनंद उपभोगला. टॅक्सी सुरू झाल्यावर, आमचं आपसातलं बोलणं ऐकून त्याने आम्हाला आम्ही ‘मराठी’ भाषिक आहोत का, म्हणून विचारणा केली व तो स्वतः मराठी असल्याचं त्याने सांगितलं. मॉरिशसमध्ये मराठी भाषिक समाज असल्याचं आम्हाला माहीत असलं तरी मॉरिशसचा मराठी माणूस इतक्या लवकर व सहज दृष्टीस पडेल असं वाटलं नव्हतं. आमच्या ‘सहलीसाठी आपलं माणूस’ आमच्या सोबत असल्याचा आनंद झाला. तो मराठी असला तरी त्याला अजिबात मराठी बोलता येत नसल्याचं व ऐकीव मराठीचीही त्याची समज बेताचीच असल्याचं त्याने इंग्रजीतून सांगितलं. त्यामुळे मॉरिशीय मराठीची झलक काही अनुभवता आली नाही. (मॉरिशसच्या साडेतेरा लाख लोकसंख्येमध्ये पन्नास हजार मराठी भाषिक आहेत. आमच्या तेथील पुढील मुक्कामात आमचा मराठी बोलू शकणाऱ्या मराठी माणसांशी संवाद होऊ शकला.) त्यामुळे आमचा संवाद आमच्या भारतीय इंग्रजीतून व त्याच्या फ्रेंच, क्रिओल मिश्रित इंग्रजीतून, एकमेकांना समजून घेत चालला होता. त्यादिवशीच्या कॅसेला बर्ड पार्क, तमारीन बीच व फ्लिक अँड फ्लॅक बीच ह्या पश्चिम मॉरिशसच्या स्थळदर्शनाच्या शेवटी मी त्याला आमच्या दुसऱ्या दिवशीच्या उत्तर मॉरिशसच्या व तिसऱ्या दिवशीच्या दक्षिण मॉरिशसच्या स्थळदर्शनासंदर्भात विचारणा केली. एकंदर भारतातला असो वा मॉरिशसमधला, मराठी माणूस समजूतदार असतो; ह्या निष्कर्षाप्रत एव्हाना आम्ही आलो होतो. त्याला सुद्धा ‘आपलं माणूस’ भेटल्याची भावना त्याने व्यक्त केली व पुढील दोन दिवस आमच्या बरोबर येण्याची तयारी दर्शवली. 

दुसऱ्या दिवशीच्या उत्तर मॉरिशसमधील प्रेक्षणीय स्थळांच्या भेटीनंतर, परतीच्या वाटेवर आम्ही तिसऱ्या दिवशीच्या दक्षिण मॉरिशस स्थळदर्शनाची रूपरेखा ठरवली. त्यामध्ये सकाळी प्रथमतः गंगा तलाव ह्या पवित्र ठिकाणाला भेट व नंतर इतर प्रेक्षणीय ठिकाणं, असा कार्यक्रम ठरला.

सकाळी नऊच्या सुमारास टॅक्सी चालक आला. क्वात्रे बोर्न्सच्या दक्षिणेस साधारण २३ किमी अंतरावर सवाने जिल्ह्यात ‘ग्रँड बसिन’ ह्या आधीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गंगा तलाव परिसरात आम्ही पाऊण तासात पोहोचलो. रस्त्याच्या उजव्या बाजूस एका हातात त्रिशूळ धारण केलेली शिवमूर्ती लांब अंतरावरूनच दृष्टीस पडली. जवळ पोहोचल्यावर त्या मूर्तीच्या प्रचंड उंचीचा अंदाज आला. चालकाने ती मूर्ती ‘मंगलमहादेव’ ह्या नावाने ओळखली जात असल्याची व तिची उंची १०८ फूट असल्याची माहिती दिली. गंगा तलावाच्या प्रवेशद्वाराशी, २००७ साली तिची स्थापना करण्यात आली असून ती मॉरिशसमधील सर्वात उंच मूर्ती आहे. त्याचबरोबर तिथे दुर्गामातेचीही भव्य मूर्ती दिसली. नवरात्रीचा व दुर्गापूजा उत्सवही तिथे भव्य प्रमाणात साजरा केला जातो.

चालकाने त्याची टॅक्सी वाहनतळावर उभी केली आणि आम्हाला गंगा तलाव परिसर पाहून येण्यास सांगितलं. काही पायऱ्या उतरून आम्ही डाव्याबाजूस असलेल्या छोटेखानी मंदिरसंकुलात देवदर्शन केलं. राधाकृष्ण यांच्या सुरेख मूर्ती, शिवलिंग, गणपती यांचं दर्शन घेऊन बाहेरील बाजूस गंगा तलावाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांमध्ये  ठराविक अंतर सोडून स्थापित केलेल्या हनुमान, दत्त, साईबाबा, जटाधारी शंकर यांच्या मध्यम आकारातील मूर्ती दृष्टीस पडल्या. त्यांना वंदन केलं. गंगा तलावाच्या नितांत सुंदर परिसरात फेरफटका मारला. वेगवेगळ्या कोनांमधून तिथलं निसर्ग सौंदर्य न्याहाळणं हा अतिशय आनंददायी अनुभव होता.

गंगा तलाव हा विवर तलाव असल्यामुळे बाजूच्या हिरव्यागार टेकडीसदृश परिसरापेक्षा खोलगट आहे. एका बाजूने आम्ही टेकडीवर चढलो आणि अधिक उंचीवरून गंगा तलावाचं अवलोकन केलं. टेकड्यांवरच्या वनश्रीचं प्रतिबिंब गंगा तलावाच्या संथ, स्वच्छ पाण्यामध्ये पडलेलं दिसलं. एका अपूर्व निसर्गसोहळ्याचे आम्ही साक्षीदार झालो. टेकडीवर  हनुमान मंदिर होतं; तिथे देखील देवदर्शन झालं.

‘महाशिवरात्रीला गंगा तलाव परिसरात यात्रा भरते. महाशिवरात्रीच्या काही दिवस आधी बरेच भक्तगण मॉरिशसच्या वेगवेगळ्या गावांतील आपापल्या घरून, कावड घेऊन पायी चालत गंगा तलावाच्या दिशेने मार्गक्रमणा सुरू करतात. ह्या यात्रेला ‘कावड यात्रा’ असं म्हटलं जातं. वाटेत स्थानिक लोक त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करतात. तिथून परतताना गंगा तलावाचं पाणी बरोबर घेतलं जातं. आलेल्या मार्गानेच आपल्या गावी परतून, गावातील देवालयात ते पाणी अर्पण केलं जातं. गावाच्या वेशीवर कावड यात्रेकरुंचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केलं जातं. अर्थात कालानुरूप त्यामध्ये बरेच बदल झाले आहेत आणि त्याला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. पूर्वी कावड खांद्यावर घेऊन, तिला टोकाला लोटा किंवा गडगं बांधून त्यात गंगा तलावाचं पाणी भरलं जात असे. आता एखाद्या संकल्पनेवर आधारित, वेगवेगळे आकार देऊन, नवनवीन कल्पना लढवून रस्त्याने एकत्रितपणे कावड यात्रा काढल्या जातात. विविध देखावे, दिव्यांची रोषणाई, संगीत यांचा वापर केला जातो. दूरच्या गावाहून निघालेल्या यात्रेकरूंना यात्रा पूर्ण करण्यासाठी चालत चार ते पाच दिवस लागतात. उत्तम कलाकृतींना बक्षिसंही दिली जातात.’ गंगा तलावाचं धार्मिक महत्त्व, त्याचा इतिहास तसंच कावड यात्रेची सुरुवात व तिचं बदलतं स्वरूप यांची रोचक कहाणी आमच्या चालकाकडून तसंच माझ्या मॉरिशीय शैलँड नामक विद्यार्थ्याकडून  ऐकायला मिळाली. शैलँड आमच्याबरोबर नंतरचे दोन दिवस होता.

‘भारतातल्या इतर प्रांतीय लोकांबरोबरच मराठी माणसं देखील इ.स.१८३४ ते १९२० पर्यंत मुख्यत्वे उसाच्या मळ्यांमध्ये ठराविक कालावधीसाठी मजूर म्हणून काम करण्यासाठी करार तत्वावर  ब्रिटिशांनी नेली. त्यातील बरेचजण करार संपल्यावर देखील तिथेच स्थायिक झाले. ह्या स्थलांतरित भारतीयांनी आपल्याबरोबर भारतीय संस्कृती व परंपरा तिथे नेल्या. आजही मॉरिशसच्या लोकसंख्येत मूळच्या भारतीयांचं प्रमाण सत्तर टक्क्यांच्या जवळपास आहे.

पंडित संजीबोनलाल (‘संजीवनलाल’चा मॉरिशिय उच्चार)  नावाचे एक गृहस्थ त्यांच्या करारातून मुक्त झाल्यावर भारतात परतले आणि इ.स.१८६६ साली कापडव्यापारी म्हणून मॉरिशसला आले. व्यापारातून मिळालेल्या पैशांमधून त्यांनी तिथे हवेली खरेदी केली. मधल्या काळात त्यांचं स्थानिक फ्रेंच समाजात वजन वाढलं आणि त्यांनी ग्रँड बसिनच्या आपल्या धार्मिक प्रकल्पासाठी परवानगी मिळवली. करारबद्ध असतानाच त्यांना ग्रँड बसिन ह्या ठिकाणाबद्दल दैवी आकर्षण वाटू लागलं होतं. भारतातून एक मोठं शिवलिंग आणि देवतांच्या मूर्ती आणल्या गेल्या व त्यांची तिथे स्थापना करण्यात आली. इ.स.१८९५ साली  प्रथमतः त्यांच्याच नेतृत्वाखाली, त्यांनीच आखलेल्या मार्गाने यात्रा निघाली. त्यामध्ये काही सधन, निवृत्त शेतमजूर सामील झाले. इ.स.१८९७ साली तेथील गिरी गोसाएन आणि मोहनप्रसाद या दोन स्थानिक पुजाऱ्यांना ग्रँड बसिनचं पाणी जान्हवी(गंगा)तून उसळून वर येत असल्याचा स्वप्नात दृष्टांत झाला. ही बातमी कर्णोपकर्णी पसरली. पुढील वर्षी महाशिवरात्रीला श्रद्धाळू लोकांनी ग्रँड बसिनचं पाणी शंकराला घालण्यासाठी पायी मार्गक्रमणा केली. त्यावेळी त्या तलावाला ‘परी तलाव’ असं संबोधलं जात असे कारण मधल्या काळात, रात्रीच्या वेळेस ह्या ठिकाणी पऱ्या नृत्य करतात अशी एक ‘परीकथा’ तयार झाली होती. त्यानंतर दरवर्षी महाशिवरात्रीला कावड यात्रा व उत्सव साजरा केला जात आहे. इ.स.१९७२ साली मॉरिशसचे तत्कालीन पंतप्रधान शिवूसागर रामगुलाम यांनी गंगा नदीचं पवित्र पाणी मॉरिशसला आणून ग्रँड बसिनच्या तलावात मिसळलं आणि त्या तलावाचं ‘गंगा तलाव’ असं नामकरण केलं. इ.स.१९९८ साली ‘गंगा तलाव’ हे पवित्र स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं.’ या वर्षी मात्र कोविड साथीमुळे कावड यात्रा संपन्न होऊ शकली नाही.

गंगा तलाव परिसर पाहून आम्ही पुढे निघालो. त्यादिवशी अलेक्झांडर वॉटर फॉल, ब्लॅक रिव्हर गोर्जेस, शामारेल वॉटर फॉल व तिथली सप्तरंगी मृदा पाहायचं आम्ही ठरवलं होतं.

मॉरिशस सहलीमध्ये प्रवासी कंपन्या हे स्थळ दाखवत असल्या तरी शक्य असल्यास स्वतंत्रपणे वेगळा वेळ देऊन पवित्रच नव्हे तर नितांत सुंदर गंगा तलाव परिसराला जरूर भेट द्यावी आणि एक ‘आगळं वेगळं’ ठिकाण पाहण्याचा आनंद घ्यावा.             

 

डॉ. मिलिंद न. जोशी
Email : milindn_joshi@yahoo.com                             

Kavad Yatra photo credit – Shri. Shailand Gunnoo, Mauritius.

2 thoughts on “आगळं-वेगळं – गंगा तलाव, मॉरिशस

 • May 2, 2021 at 2:15 pm
  Permalink

  माॅरीशसवर माहितीपूर्ण लेख

  Reply
 • May 4, 2021 at 7:17 am
  Permalink

  मिलींद सर, आपल्या UAE नंतरचा हा मॉरिशस गंगा तलाव बहहलच्या माहीती पर दुसरा लेख वाचला अन मन प्रसन्न आणि पवित्र झाले.
  अथ पासून इति पर्यंतचा हा सुखद प्रवास आपणच करत आहोत असा feel येतो.
  खूप सुंदर. ॥ गंगार्पणमस्तु ॥

  धन्यवाद

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu