आगळं-वेगळं : धौली, ओडिशा

काही ठिकाणं आपल्या पर्यटनाच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये नसतात; त्याठिकाणी पोहोचेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणाचं महत्व लक्षात येत नाही. आमच्या ओडिशाच्या धावत्या पर्यटनादरम्यान आम्ही असाच एक अनुभव घेतला. २ ते ४ फेब्रुवारी २०१२ ह्या कालावधीत आम्ही ओडिशातील भुवनेश्वर, कोणार्क आणि जगन्नाथ पुरी ही ठिकाणं पाहण्यासाठी तिथे गेलो होतो. तीनच दिवस रजा मिळाली होती. मोजून अठ्ठेचाळीस तास आम्ही ओडिशात होतो. तेव्हढ्यामध्ये आम्ही तिथली सर्व महत्वाची ठिकाणं पाहायचं ठरवलं होतं. हे थोडं आव्हानात्मकच होतं. काळ, काम वेगाचं गणित होतं. ही गणितं शाळेत कधीही बरोबर सुटली नव्हती.

२ फेब्रुवारीला सकाळच्या विमानाने निघून आम्ही दुपारी अडीच वाजता भुवनेश्वरला हॉटेलला पोहोचलो. विमानात ‘लंच’ झालेला असल्याने तसंच ‘टी’ची वेळ झाली नसल्याने, ‘फ्रेश’ झालो आणि लगेच आम्हाला विमानतळावरून हॉटेलला घेऊन आलेल्या टॅक्सी चालकाला फोन लावला. त्याच्याशी हॉटेलला येताना भुवनेश्वरमधील स्थळदर्शनासंदर्भात चाचपणी केली होती. तो तयार झाला आणि लगेचच आम्ही त्याच्याबरोबर निघालो. त्यादिवशी खंडगिरी,उदयगिरी पाहून सिद्धेश्वर, मुक्तेश्वर मंदिरं व अगदी संध्याकाळी लिंगराज मंदिर असं ‘स्थळ’ व ‘देव’दर्शन झालं.

त्याच टॅक्सी चालकाकडे आम्ही दुसऱ्या दिवशीच्या आम्ही आखलेल्या कोणार्क व जगन्नाथ पुरीच्या पर्यटन दौऱ्यासाठी विचारणा केली. तो तयार झाला. कोणार्कचं सूर्यमंदिर आणि जगन्नाथ पुरीच्या देवदर्शनासाठी आम्हाला आवश्यक तेव्हढा वेळ द्यायचा होता. जमलं तर पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर थोडा वेळ फेरफटका मारण्याचं आणि सुदर्शन पट्टनाईक यांची ‘वाळूशिल्प’ पाहण्याचंही डोक्यात होतं. भुवनेश्वरहून कोणार्क व जगन्नाथ पुरी साधारण समान अंतरावर आहेत आणि भुवनेश्वर, कोणार्क, जगन्नाथ पुरी असा एक भौमितिक त्रिकोण तयार होतो.

सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो. प्रथम कोणार्कला जाऊन नंतर जगन्नाथपुरी; असा आमचा विचार टॅक्सी चालकाला बोलून दाखवला. त्याने टॅक्सी सुरू केली. “आपण प्रथम भुवनेश्वर- जगन्नाथ पुरी रस्त्यावर, असलेल्या धौलीला जाऊया. नंतर तुम्ही म्हणाल तसं.” असा त्याचा बेत त्याने आम्हाला सांगितला. आमच्या ठरवलेल्या पर्यटन कार्यक्रमात माझ्या दृष्टीने अधिकच्या ठिकाणाची भर नको होती. तसं मी त्याला सांगून पाहिलं. आधीच आमच्या अतिव्यस्त कार्यक्रमात अजून एका ठिकाणासाठी वेळ काढणं म्हणजे गच्च भरलेल्या मुंबई लोकलमध्ये मधल्या स्थानकावरच्या प्रवाशाने स्वतःसाठी जागा निर्माण करण्यासारखं होतं. धौली ह्या ठिकाणाचं नाव कधी ऐकल्याचं माझ्या जरी लक्षात येत नसलं तरी इतिहासाचा अभ्यास असलेल्या माझ्या मुलीने कान टवकारले. तिथे एक पॅगोडा असल्याची अधिकची माहिती चालकाने दिली. मी त्या ‘धौली’ नावाची त्याच्याकडून खात्री करून घेतली. धौली हे महत्त्वाचं ठिकाण असून पॅगोडाच नाही तर अजून बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल अशी शक्यता मुलीने आमच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे थोड्या नाखुषीनेच मी त्या प्रस्तावाला मान्यता दिली. तरी देखील ती नेमक्या कोणत्या महत्त्वाच्या ऐतिहासिक संदर्भाबद्दल शक्यता वर्तवत होती, याची आम्हाला कल्पना आली नव्हती.

थोड्याच वेळात आमची टॅक्सी एका डोंगराची चढण घाट रस्त्याने पार करू लागली. डोंगरातल्या एका वळणावर मुलीला एक माहितीफलक दिसला. तत्क्षणी तिने चालकाला टॅक्सी थांबवण्याची विनंती केली. मी आणि ती खाली उतरलो. फलकावरच्या माहितीने मी अचंबित झालो. अचानक एका ‘आगळ्या वेगळ्या’ ठिकाणी आम्ही पोहोचल्याचं आमच्या लक्षात आलं. तिचा अंदाज खरा ठरला होता. आम्ही टॅक्सी चालकाला तिथे थांबण्यास सांगितलं पण त्याच्या स्थलदर्शनातील अग्रक्रमावर तो डोंगरावरचा पॅगोडा होता. पॅगोडा पाहून परत येताना तिथे थांबण्याचं त्याने आश्वासन दिलं. त्याला त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची कल्पना होती की नव्हती ह्याबद्दल संदेहच होता.

पॅगोडा येईपर्यंत मुलीने मग आम्हाला त्या ठिकाणाची थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली. ‘धौली ह्या ठिकाणी इतिहासातलं प्रसिद्ध, सम्राट अशोकाचं कलिंग युद्ध लढलं गेलं व त्या युद्धातील संहारानंतर त्याला उपरती झाली व त्याने बौद्ध धम्म स्वीकारला.’ इतिहासाच्या पुस्तकात थोडक्यात संपवलेली ही माहिती एकदम आठवली. पण तिच्या त्या माहितीने आपण एका ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी अचानक दाखल झाल्याचं आमच्या लक्षात आलं.

तेव्हढ्यात आम्ही डोंगराच्या शिखरावरच्या पॅगोड्याजवळ पोहोचलो. चालकाने आम्हाला तो पाहून येण्यास सांगितलं. आम्ही तो सफेद,चकचकीत पॅगोडा पाहिला आणि बुद्धमूर्तीला वंदन केलं. त्याच्या बाजूला फलकावर दिलेली माहिती वाचली आणि ज्ञानवृद्धी झाली. ‘ जपान बुद्ध संघ’ व ‘कलिंग बुद्ध संघ’ ह्यांनी इ.स.१९७०च्या दशकात हा ‘विश्व शांती स्तूप’ बांधला. त्याच्यावर असलेली पाच छत्रं , बौद्ध धर्माच्या पाच आवश्यक तत्वांची प्रतीकं मानली जातात. तिथून आजूबाजूच्या प्रदेशाचं विहंगावलोकन केलं. ‘दया’ नदीची बोटाच्या जाडीची रेषाकृती नजरेस पडली. दया हे नदीचं नावही तिथेच समजलं. नदीच्या आसपास बराच मोकळा भूभाग नजरेस पडत होता. पॅगोड्याजवळ थोडा वेळ थांबलो. मुलीने तिथे आमचं सामुदायिक बौद्धिक घेतलं. तो आम्हाला दिसत असलेला परिसर हा कलिंग युद्धभूमी होती. त्याच दया नदीचं पाणी युद्धातील नरसंहारानंतर रक्ताने लाल झालं होतं, अशी वदंता आहे.

आम्ही टॅक्सीत बसलो आणि परतीच्या वाटेवर आधी पाहिलेल्या माहितीफलकाजवळ चालकाने टॅक्सी थांबवली. थोड्याच अंतरावर आम्हाला एक अप्रतिम गजशिल्प दिसलं. एका मोठ्या खडकाला एक हत्ती जोडल्यासारखा दिसत होता. हत्तीचे फक्त पुढचे अवयव; चेहरा, सोंड, सुळे, पुढचे दोन पाय असं अर्ध शरीर त्या खडकाबाहेर आलेलं दिसत होतं. जणूकाही तो खडकातून चालत बाहेर पडत असल्याचं भासत होतं. त्याच्या चालण्याची गती त्या शिल्पातून स्पष्ट होत होती. त्याचा अर्थ बाजूला लावलेल्या फलकावरील माहितीतून समजला. त्या जागी सम्राट अशोकाचं मनपरिवर्तन झालं. तो  खडकातून बाहेर पडणारा अर्धशरीरी हत्ती, सम्राट अशोकामध्ये घडलेला बदल दर्शवतो. एका महत्त्वाकांक्षी सम्राटाचं शांतीच्या मार्गाने चालणाऱ्या, परोपकारी, कर्तव्यपरायण राजातलं स्थित्यंतर त्या शिल्पातून व्यक्त होतं. माझ्या मुलीच्या दृष्टीला तर प्राचीन भारताच्या इतिहासातलं एक प्रकरण अचानक समोर उलगडत होतं. आम्ही मग तिथली सर्वच माहिती वाचून काढली आणि ‘त्या खडकाखाली दडलंय काय?’ हे पाहायला तिथून थोडं खाली उतरलो. तिथे आणखी एका माहितीफलकाने स्वागत केलं. त्यावर आतमध्ये खडकांवर कोरलेल्या शिलालेखांबद्दलची (खरंतर शिलाआदेशांबद्दलची) माहिती दिली होती. त्यांना अशोकाचे ‘एडिक्टस'(आदेश) म्हणतात. तिथे ‘आदेश क्रमांक १ ते १०,१४ तसंच दोन स्वतंत्र ‘कलिंग एडिक्टस’ कोरलेले आहेत. हा लेख लिहिताना मी जेव्हा माझ्या मुलीबरोबर चर्चा केली तेव्हा तिने त्यातील क्रमांक १ ते १०,१४ हे एडिक्टस भारतात इतर ठिकाणीही आढळतात पण ‘कलिंग एडिक्टस’ फक्त तिथेच दिसतात व त्यातील माहितीमुळेच सम्राट अशोकाच्या इ.स.पूर्व २३२ सालच्या कलिंग युद्धाची, त्याच्या मनपरिवर्तनाची तसंच त्याने त्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारल्याची माहिती मिळाल्याचं तिने सांगितलं. जगाच्या कल्याणाविषयी त्याला वाटत असलेली आस्था त्यात त्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्या एडिक्टसना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ओडिशातील प्राचीन बौद्ध शिल्पांमध्ये त्याचा समावेश होतो. आम्ही आत जाऊन ते एडिक्टस पाहिले. काचेतूनच आम्हाला ते पाहायला मिळाले. मगधी प्राकृत भाषेत व ब्राम्ही लिपीत ते कोरलेले असल्याने वाचता येणं शक्य नव्हतं. दिवसभरात अजून बरीच ठिकाणं पहायची असल्यामुळे, आम्हाला तिथून निघणं भाग होतं. एक आगळं वेगळं ठिकाण आम्हाला पाहायला मिळालं होतं.

सम्राट अशोकाला धौलीबद्दल खास ममत्व होतं. धौली हे एक महत्त्वाचं, बौद्ध उपक्रमांचं केंद्र व्हावं ह्यासाठी त्याने विशेष प्रयत्न केले. बौद्ध धर्माच्या भारतातील व भारताबाहेरील प्रसाराला त्यानंतर गती प्राप्त झाली.

दरवेळी हरवलेलंच गवसतं असं नाही, काहीवेळा ध्यानीमनी नसताना महत्त्वाचं ठिकाण, ऐतिहासिक ठेवा गवसतो. ओडिशा पर्यटनात आम्ही त्याचा अनुभव घेतला.

ओडिशा पर्यटनादरम्यान भुवनेश्वरच्या दक्षिणेस आठ किमी अंतरावरचं धौली हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं ठिकाण तसंच तेथील गजशिल्प व शिलाआदेश जरूर पाहावेत.

डॉ. मिलिंद न. जोशी
संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com          

Pc: google    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu